विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चोरी — हा शब्द संस्कृत चुर् या धातूपासून झालेला आहे. जंगम माल मालकाच्या परवानगीवांचून त्याच्या ताब्यांतून नेणें यालां चोरी म्हणतात. चोरी हा सर्व आधुनिक कायदेपद्धतींत फौजदारी गुन्हा गणला जातो. चोरीशीं सदृश असे इतर गुन्हे पीनल कोडांत दिले आहेत तेः— (१) जबरीची चोरी किंवा दरोडा (रॉबरी), (२) ठकबाजी (चीटिंग), (३) अपहार (मिस अप्रोप्रिएशन), (४) विश्वासघात (ब्रीच ऑफ ट्रस्ट), व (५) अपक्रिया (मिस्चीफ).

कित्येक प्राचीन कायद्यांत साधी चोरी हा फौजदारी गुन्हा नसे. उदा. रोमन कायद्यांत चोरीबद्दल दिवाणी काम चालून मालकाला चोरीस गेलेला माल किंवा त्याच्या दुप्पट किंवा चौपट किंमत चोरांकडून देववीत असत. प्राचीन इंग्रजी कायदाहि तसाच होता. गुरें चोरणें वगैरे महत्वाच्या चोर्‍यांनां मात्र फौजदारी गुन्हा समजून फाशी, हद्दपारी, सक्तमजुरी वगैरे कडक शिक्षा असत. गुलाम वगैरे माणूस पळवून नेणें याचाहि रोमन कायद्यांत चोरींत समावेश करीत असत; पण आधुनिक इंग्रजी कायद्यांत तो 'अ‍ॅबडक्शन' म्हणून निराळ्या जातीचा गुन्हा मानतात. रोमन कायद्यांत आणखी एक फरक असा होता कीं, विवाहित स्थितींत नवराबायकोला एकमेकांविरूद्ध चोरीचा आरोप करतां येत नसे. पण इंग्रजी कायद्यांत 'मॅरिड वुइमेन्स प्रॉपर्टी अ‍ॅक्ट' (विवाहित स्त्रियांच्या मालमत्तेबाबत कायदा) झाल्यापासून तशी फिर्याद करतां येते. अलीकडील इंग्रजी कायद्यांत चोरीच्या गुन्ह्याला कामल शिक्षा चौदा वर्षे सक्तमजुरी ही आहे. १६ वर्षाच्या आंतील मुलांनां फटक्यांची शिक्षाहि देतात.

भारतीय — स्मृतिग्रंथांत 'स्तेय' म्हणजे चोरी (थेफ्ट) आणि 'साहस' म्हणजे दरोडा (रॉबरी) असे दोन पृथक् गुन्हे मानले आहेत; व त्यांची मनूनें व्याख्या दिली आहे तीः—

स्यात्साहसं त्वन्वयवत्प्रसभं कर्म यत्कृतम् ।
निरन्वयं भवेत्स्तेयं हत्वापव्ययते च यत् ॥
मनुस्मृति अ. ८ श्लोक ३३२.

स्मृतिग्रंथांतील कायदा चालूं पिनल कोडांतील कायद्याच्या दृष्टीनें दोन महत्वाच्या बाबतींत भिन्न दिसतो. पहिली बाब म्हणजे वर्णभेदानुरूप दण्डभेद म्ह. चोराला ब्राम्हण क्षत्रियादि भेदानें दण्डाचें प्रमाण कमजास्त असें तें येणेंप्रमाणें :—
अष्टापाद्यं तु शूद्रस्य स्तेये भवति किल्विषम् ।
षोडशैव तु वैशस्य द्वात्रिंशत्क्षत्रियस्यच ॥
ब्राम्हणस्य चतुःषष्ठिः पूर्णं वापी शतं भवेत ।
मनुस्मृति अ. ८ श्लो. ३३७-३८.

हा प्रकार 'कायद्याच्या दृष्टीनें सर्व इसम सारखेच असतात' (ऑल मेन आर  ईक्वल बिफोर लॉ) या सुप्रसिद्ध कायदेतत्त्वाच्या विरूद्ध आहे. तसेच शारीरिक शिक्षेसंबंधानेंहि स्मृतिग्रंथातले नियम आधुनिक कायदेपद्धतीला अमान्य असे आहेत. चोरीला पिनल कोडांत सक्तमजुरीहून अधिक कडक शिक्षा नाहीं. पण स्मृतिकार शिक्षा सांगतात त्या शरीरावयवच्छेद व प्रत्यक्ष वध इतक्या कडक आहेत. त्या अशा—
अङ्गुली ग्रंथभेदस्य च्छेदयेत्प्रथमे ग्रहे ।
द्वितीये हस्तचरणौ तृतीये वधमर्हति ॥ मनुस्मृति.
येन येन परद्रोहं करोत्यंशेन तस्करः ।
छिन्द्यादङ्गं नृपस्तस्य न करोति यथा पुनः ॥
कात्यायन.

कोणत्यहि आधुनिक सुधारलेल्या राष्ट्रांत चोरीला मरणाची शिक्षा नाहीं. आणि शरीरावयवच्छेदनाची शिक्षा तर खून वगैरेसारख्या कोणत्याहि भयंकर गुन्ह्याला नाहीं. मराठी रियासतींत वरील स्मृतिकारांच्या वचनांस अनुसरून व्यवस्था असे. चोरी आणि दरवडा ह्या दोन गुन्ह्यांस शिक्षा फार कडक देण्यांत येत असे. दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांच्या कामीं गुन्हेगारांस अटकेंत ठेवण्याची, ठार मारण्याची, हात, पाय, कान कापण्याची शिक्षा करण्यांत येत असे. शिवाय चोरीस गेलेला माल गुन्हेगारांकडून मालकांस परत देवविण्यांत येत असे. याखेरीज सरकारची गुन्हेगारी ही अपराध करणारांकडून वसूल करण्यांत येत असे. चोरी करणारास अगर दरवडा घालणारास अटक करण्यांत येत असे; एवढेंच नव्हे परंतु त्याच्यापाशीं रहाणार्‍या त्याच्या आप्तांसहि अटक करण्यांत येत असे. रस्तालुटीच्या कामांत गुन्ह्याचा माग आमुक एक गांवापावेतों जाऊन पुढें त्या गांवांतील लोकांनीं माग काढून न दिल्यास लुटीस गेलेला माल भरपाई करून देण्याची जबाबदारी ज्या गांवापावेतों माग गेला असेल त्या गांवांतील लोकांवर असे. चोरी आणि दरवडा या दोन गुन्ह्यांच्या कामीं कोणत्या प्रकारची व्यवस्था करण्यांत येत असे याचें एक उदाहरण येणेंप्रमाणेः—

सित समीनान मया व अलफ या सालांत कोंकणप्रांतीं चोरट्यांनीं चोर्‍या करण्याचा फार सुळसुळाट चालविला. तेव्हां ५८ चोरांस धरून आणून त्यांची चौकशी करून त्याचे अपराध हुजूर लिहून पाठविण्यांत आले. या एकंदर ५८ चोरांपैकी २० चोरांचीं डोकीं मारावयाचा, १३ असामींचा उजवा हात व डावा पाय, अठरा असामींचा उजवा हात, चार असामींचा उजवा हात व एक कान, एक असामीचा उजव हात व पाय व एकाचा कान कापण्यास हुकूम करण्यांत आला. या अठ्ठावन्न चोरांच्या पुढार्‍यांस विशोभित करून फिरवून मेक देऊन मारावा असा हुकूम सोडण्यांत आला. [सित समानीन मया व अलफ, वाड भाग ८ पान ९६.].

चोरी आणि दरवड्याचे गुन्हे करणार्‍या लोकांचा तपास लागावा म्हणून हे गुन्हे करणार्‍या लेकांबद्दल माहिती देणारांस सरकारकडून बक्षीस देण्यांत येत असे. ही गोष्ट डवा भाग ८ पान ९५ वरील उल्लेखावरून दिसून येते.

इतर देश.— चोरीच्या गुन्ह्याला शरीरावयवच्छेदनाची व मरणाची शिक्षा जपानी, इस्लामी, इराणी, आयरिश तसेंच शपथ व दिव्य करणें या गोष्टी पुष्कळ प्राचीन कायद्यांत असत. पण याशिवाय चोरीसंबंधीं कांहीं चमत्कारिक माहिती येथें देतों. केल्टिक कायद्यांत चोराला गुलामाप्रमाणें विकणें ही एक शिक्षा असे. प्राचीन रोमन कायद्यांत चोराला पकडून आणण्याचें काम फिर्यादीला करावें लागत असे; आणि तें शक्य झाले नाहीं तर मॅजिस्ट्रेटला चोर असेल तेथें नेऊन चोराला पकडण्यांत येत असे. हिब्रू कायद्यांत 'मालमत्तेविरूद्ध गुन्हे' या सदराखालीं व्यभिचार (अल्पवयी माणसाला किंवा बायकोला) फूस लावून किंवा जुलमानें नेणें, निष्काळजीपणामुळें दुसर्‍याचें नुकसान करणें, चोरी, व्याजखोरी (यूझरी), बळजोरी (रेप), हे गुन्हे दिले आहेत. ट्यूटन स्लाव्ह लोकांच्या कायद्यांत घोडा चोरणाराला सर्वांत अधिक कडक म्हणजे दगड फेंकून ठार मारण्याची शिक्षा असे.