विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चोंभा — याचें उषाहरण नांवाचे ओवीछंदांत लिहिलेंलें एक काव्य प्रसिद्ध आहे. 'चोंभा' हें पाळण्यांतलें नांव असल्यास 'शुंभ' नांवाचा आणि आडनांव असल्यास ''चर्तुवैदिक'' शब्दाचा अपभ्रंश असावा असें राजवाडे सुचवितात.
ग्रंथाची भाषा बहुतेक ज्त्रानेश्वरीसारखी आहे. उनुप्रत्ययांत धातुसाधितें या काव्यांत सडकून आहेत. या प्रकारचीं धातुसाधितें या काव्यांत सडकून आहेत. या प्रकारची धातुसाधितें ज्त्रानेश्वरीपासून श्रीधरपर्यंत कालानुक्रमानें कमी कमी होत जातात. ग्रंथांत 'यज्त्रा' बद्दल 'येन्न' शब्द आला आहे. तसेंच श्वासाबद्दल सस, स्वामीबद्दल सामी, शस्त्रबद्दल सस्त्र, कालिंदीबद्दल काळिंद्री, धनुष्यबद्दल धनुक, जिव्हाबद्दल जीवा, अनिरुद्धबद्दल अनुर्घ; कृष्णबद्दल ऋस्ण, पन्नग बद्दल पानक, भाषाबद्दल भास, या प्रकारचे शेंकडो अपभ्रंश महाराष्ट्री व अपभ्रश प्राकृताप्रमाणें या ग्रंथांत आढळतात. ज्त्रानेश्वरींतीला मराठी भाषेच्या व्याकरणांत सांगितलीं त्यापेक्षां विलक्षण अशी रूपे या ग्रंथांत येतात. सा-सी. इ. षष्ठीचे प्रत्यय म्हणून वापरले आहेत. वरील भाषारूपांवरून ज्त्रानेश्वरानंतर व दासोपंतापूर्वी हा कवि झाला असा निर्णय राजवाडे करितात. या कवीनें भागवत व हरिवंश हे ग्रंथ ताडून पाहिले होते असें कवि सांगतो. यावरून हा संस्कृतज्त्र असावा असें ठरतें.
काव्याच्या भागांस ''प्रसंग'' असें म्हटलें आहे. ओंवी संख्या १८८५ पर्यंत उपलब्ध झालेल्या पत्रांत आली आहे. या काव्याविषयीं राजवाडे म्हणतात, ''ह्यांत एक वैलक्षण्य आहे. तें अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेल्या किंवा माझ्या संग्रहास असलेल्या कोणत्याहि जुन्या ओंवीबद्ध ग्रंथांत नाहीं. प्रायः ज्त्रानेश्वरी ओवींत पहिले तीन चरण अंती सयमक असतात. प्रस्तुत ग्रंथांत प्रायः पहिले दोन चरण सयमक, तिसरा निर्यमक व चवथा सयमक असतो. कित्येक ओव्यांत मुळींच यमक नाहीं. कित्येकांत कोणते तरी दोन चरण सयमक असतात. कित्येक वर्गात यमकाचें सवर्गीय व्यंजन असतें. कोठें कोठें यमकाचे अंत्यस्वर भिन्ना असतात. असे कांही विचित्र प्रकार या ग्रंथांत आहेत. ज्त्रानेश्वरींत चौथा चरण अर्धा असतो. या ग्रंथांत तो पाऊण असतो, सबंध असतो किंवा दीडहि असतो. या ग्रंथांत पहिला, दुसरा, किंवा वाटेल तो चरण अर्धा असतो. असा कांहीं स्वैर प्रकार या अद्वितीय ग्रंथांत आहे. पृथ्वीवरील कोणत्याहि भाषेंतल्या कोण्याहि कवीच्या काव्यांत असले चमत्कार नसतील. बरें, कवीची वर्णनशैली सामान्य आहे म्हणावें तर तशांतलीहि गोष्ट नाहीं. युद्धांचीं वर्णनें, ब्रम्हदेवाची थट्टा, वगैरे प्रसंग चांगले खुलवून सांगण्याची कला कवीला माहित आहे.''
हा कवि कधीं व कोठें होऊन गेला हें नक्की कळत नाहीं. ग्रंथभाषेवरून शके १३०० च्या सुमाराचा हा असावा असें मानितात. रंगनाथस्वामी निगडीकर, शेख महंमद वगैरे कवीनीं आपल्या संतमालिकांत याला नमन केलें आहे. [भा.इ.सं.सं.मं. अहवाल शके १८३३; सं.क.का.सू.; म. सारस्वत]