विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चोपदार — सातारकर प्रतापसिंह छत्रपतीनीं आपल्या कारकिर्दीत सर्व सरकारी कामदार लोकांनां पूर्वीचे शिरस्ते पाहून नियम घालून दिले. त्याप्रमाणें मिर्धे व चोपदार आणि भालदार यांचेहि नियम होते, ते खालीं दिले आहेत. मिर्धा म्हणजे चोपदारांचा नाईक होय. भालदार व चोपदार साधारण एकच होत.
चोपदार व मिर्धे भालदार यांचा जाबता — मिर्धे यांनीं पाळीप्रमाणें रात्रंदिवस हजर असोन, सर्वांची ओळख राखोन, किताबती असतील त्यासुद्धां नांवें वेगळीं वेगळीं घेऊन, मुजरे सांगत जावे. सभेत कमजाजती परवानगीशिवाय मंडळी बसूं न देतां नजरेचा इरादा समजोन, मंडळी शिस्तवार बसण्यास सुचवीत जावें. व मार्गानें स्वरीसमागमें चालतां, जागा पुढें उंचसखल येईल तशी खबर वरचेवर करीत जावी. समारंभास यादीप्रमाणें त्यांत न चुकतां वेळच्या वेळेस मंडळी बोलावणें ती बोलवावी. कीर्तनसमयीं मुजरे सभेंत सांगणें तें इराद्याप्रमाणें किताबतीसुद्धां सांगत जावे. कामांत इनाम बक्षिसाशिवाय कांही न खातां, व लबाडी न करितां, इमानें इतबारे चाकरी करावी. स्वारींत व स्वारांवर नजर हमेशा ठेवीत असावी. व सरकारचा हुकम मुत्सद्यी व शिष्ट ब्राम्हण यांस बोलावणें करावयाची आज्त्रा होईल त्याप्रमाणें करीत जावें. सदरहू लिहिल्याप्रमाणें बंदोबस्त जलदीनें, हुशारीनें सरकारचाकरी करून दाखवील, त्याजवर सरकार मेहेरबान होईल. ज्याजकडून हें न घडे, त्यास इजा पाहोंचून, पुन्हां त्या कामावर रहाणें होणार नाहीं. व रदबदली होऊन पुन्हां चाकरीच मिळणार नाहीं. हें स्पष्ट समजोन लिहिल्याप्रमाणें वागावें व चाकरी करावी. ज्यास चाकरीवर वागणें, त्यानें जें वस्त्रपात्र असेल तें निर्मळपणें, जेथील तेथें, प्रातःकाळीं अंघोळ करून सचीलपणे गळाठा न दिसतां स्वच्छपणें असावें. घरास वगैरे जातां येतां हजीरनीस यास रूजू होऊन जात जावें. हें न केल्यास गेल्या दिवसांच्या तारखा मजुरा पडणार नाहींत.
भालदार यांनीं स्वारींत व हुजूर असोन सेवा शिस्तावार करावी. व मुजरे सांगत जावे. मानकरी व स्वारसुद्धां बोलावणें आज्त्रेप्रमाणें करावे. कचेरीचे समयीं दोघांनीं दो बाजूंस उभे राहून, गलबला व हिंडणार यांचा बंदोबस्त राखावा. ज्याची विनंती व रदबदली करणें ते त्याचे समक्ष सरकारांशीं करूं नये.
सरकारांतून कायदे लावयाचे तेः—
(१) पाडव्याची नजर करून निंब व बिडे घेत जाणें.(१) सरदामंडाळाकडून इनाम मिळाल्यास घ्यावयाचा शिरस्ता असेल तसें घ्यावें. (१) सरकारवाड्यांत रात्रौ निजावयास चोपदार यानें बारीप्रमाणें असावें. (१) दसर्यास नजर करावी व पोशाख यावयाचा, तो सरकार कृपावंत होऊन दिल्यास घ्यावा. व बकरें व काठीची पूजा, नैवैद्य व दक्षिणा व बकरेची मुंडी मिर्धे याची, बाकी चोपदार व भालदार यांचे. (१) सरकारांतून कोणास पोशाख दिले असतां त्याजकडून इनाम दिल्यास घेत जाणें (१) सरदारमंडळीकडून इनाम आणावयास मिर्धे यांनी चोपदार व भालदार घेऊन जात जावे. तेथून जें येईल तें आपलेपाशीं ठेवून, चोपदार याचा मिर्धा व भालदार याचा मिर्धा यांनीं निमे दोन वांटण्या घेऊन बाकी दोन वांटण्या रहातील, त्यांपैकीं एक वांटणीं चोपदारास व भालदारास देणें. (१) वाड्याकडील (अंतःपुरची) व देवघरची व कचेरीची चाकरी करावी. (१) दिपवाळीस तेल, अर्गजा व फराळास शिरस्तेप्रमाणें पावेल. (१) शिमग्याचे, होळीचा नारळ पावत जाईल. (१) सरकारास मेजवानी इराद्याची जहाल्यास कारणानुरूप पोशाख व इनाम द्यावयाचा जाहल्यास देविला जाईल. (१) सरकारस्वारी जेथें असेल तेथें मिर्ध्यानें असावे. व दाराबाहेर चोपदार यानें असावे. बाहेरून कोणी येईल त्याची वर्दी चोपदार यानें मिर्ध्यास सांगावी. नंतर सरकारचा हुकूम घेऊन आज्त्रा होईल त्यास कचेरींत घेत जावें. (१) सरकारांत चोपदार असतील त्यांनीं सरकारचाकरीविषयीं मिर्ध्याचे हुकुमांत असावें. (१) राखीपुनवेस राखी व विडे पावतील. गोकुळअष्टमीचें निशाण व लोणी व खिरापत व विडे पावतील. (१) संक्रांतीबद्दल तीळ व विडे व खण व सुगडे शिरस्तेप्रमाणें पावेल. व गंजीपैकी गवत ओलें व वाळलें सर्वांबरोबर पावेल. (१) शिमग्याचे पोस्त सरकारमंडळीं व मुत्सद्दी व शिलेदार यांजकडून त्यांनीं दिल्यास घ्यावें. (१) तुळशींचे लग्नबाद्दल ऊंस, आंवळे व चिंचा व चंपाषष्टीबद्दल वांगी सर्वांबरोबर पावेल. (१) मेसकुमाय राणीच्या घुगर्या पावतील. (१) सरकारस्वारी तक्तावर आली असतां कचेरीचा बंदोबस्त राखावा. व इराद्याप्रमाणें ज्याचें त्यास बसवावें. (१) फौजेस आज्त्रा होणें ती मिर्धे यांजपाशीं व्हावी. मिर्धे यांनीं भालदारास सांगून बक्षीस कळवावें. आणि स्वार आणवावे. (१) स्वारींत स्वार, शिबंदी व मानकरी वगैरे लोक इराद्याप्रमाणे चालवावे. व मजुरा देत जावा. (१) विडे सणाचे चार, मिर्धे यास व भालदार यास दोन, व गोकुळ अष्टमीचें निशाण व लोणी व खिरापत सालाबादी पावत आल्याप्रमाणें पावेल.'' या प्रमाणें चोपदार, भालदार व मिर्धे यांचे काम व त्याबद्दल त्यांनां मिळणारे सरकारी वेतन आणि इनामहक्क काय असत याचा बोध या जाबत्यावरून होतो [इतिहाससंग्रह. पु.६.अ.७।८।९.].