विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चोपडे, तालुका.— हा मुंबई इलाख्याच्या पूर्व खानदेश जिल्ह्यांतील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ ३६८ चौरस मैल आहे. या तालुक्यांत चोपडे व अडावद ही दोन गांवें व ९४ खेडीं आहेत. १९११ सालीं याची लो.सं. ८२६८८ होती. लोकसंख्येचें प्रमाण दर चौ. मैलास २०५ आहे. १९०३-०४ सालीं जमीनीचें व इतर उत्पन्न अनुक्रमें २.३ लाख व १५००० रू. होतें.
तापी नदीथडीवरील प्रदेशाच्या विहिरींत पाणी विपुल आहे परंतु यांतील जलप्रवाह कालव्याच्या निरूपयोगी आहेत. मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे तापी व तिला मिळणार्या अनेर व गुली या होत. यांतील जमीन काळीची असून सुपीक आहे. या तालुक्यांत दरवर्षी २५ इंच पाऊस पडतो.
शहर.— मुंबई इलाख्याच्या पूर्व खानदेश जिल्ह्यांतील त्याच नांवाच्या तालुक्याचें मुख्य ठिकाण असून याची लोकसंख्या १९११ सालीं १७००८ होतीं. हें शहर फार जुनें असून तेथील मोडकळीस आलेल्या किल्ल्यावरून पुरातन हिंदू राजांच्या अमदानींत यास बरेंच महत्व होतें असे अनुमान निघतें. १६ व्या शतकांत हें एक दाट लोकावस्ती असलेलें मोठें शहर असून येथें रामेश्वराचें देवालय होतें. येथील देवदर्शन करण्यास फार दुरून लोक येत असत. १६७९ मध्यें हें शिवाजीनें लुटल्याचा उल्लेख आढळतो. १८२० त हें शिंद्याच्या स्वाधीन करण्यांत आलें व १८४४ इंग्रजांच्या ताब्यांत आलें.
येथें कापूस व जवस यांचा व्यापार चालतो. १८७० त येथें म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथें दोन दवाखाने, ५ कापूस पिंजण्याच्या गिरण्या, २ रूईचे गठ्ठे बांधण्याचे कारखाने व एक मुलीच्या शाळेसुद्धां ६ शाळा आहेत.