विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चोचो — चाचो हें नांव महाराष्ट्रांत फार थोड्यांनां माहीत आहे. या झाडाचे वेल कांकडी किंवा दोडक्याच्या वेलांसारखे असतात. दोडक्यांप्रमाणें हा वेल उन्हाळ्यांत मरत नाहीं. तो अनेक वर्षे टिकतो. थंडीच्या दिवसांत याची वाढ खुंटते. परंतु उन्हाळ्यांत पुन्हा नवे घुमारे फुटून उन्हाळा व पावसाळ्यांत पूर्ण वाढ होऊन पुष्कळ फळें येतात. दिसण्यांत हीं फळें पेरूसारखीं असतात, पण पेरू पेक्षां ३।४ पट मोठीं होतात. त्यांवर कांकडीप्रमाणें बारीक कांटे असतात. चोचोची वरची साल सोलून दुध्याभोपळ्याच्या भाजीसारखी भाजी करितात. व ती दुध्याच्या भाजीप्रमाणें रूचकर होते. किंबहुना त्याच्यापेक्षांहि जास्त चांगली होते. ही भाजी पचण्यास हलकी आहे. चोचोचा ''जाम'' अथवा मोरंबा परदेशांतून येथें विकाण्यास येतो व त्याचा यूरोपियन लोक उपयोग करितात. चोचोच्या दुध्याभोपळ्याप्रमाणें पाकाच्या सुक्या वड्या करतां येतील.
चोचो हा भोपळ्याच्या वर्गातील वेल आहे. परंतु त्याच्या फळांत शेंड्याजवळ एकच बी असते. फळ जून झालें म्हणजे आंतील बीं शेंड्यांतून बाहेर पडतें. व फळांत असतांनाच बी उगवून अंकुर बाहेर पडतो. अशी स्थिति फळ झाडावर असतांनाच होते. तोडून ठेविलेल्या जून फळासहि अंकुर फुटतात. अंकुर फुटलेलें फळ मातींत लावलें म्हणजे बियांजवळ मुळें फुटून तीं मातींत वाढीस लागलीं म्हणजे वेलहि वाढीस लागतो. वेल एखाद्या झाडावर अगर मांडवावर चढवावा.
सीलोन व मद्रास इलाख्यांत चोचोची बरीच लागवड करतात. महाराष्ट्रांत जसे दोडके पुष्कळ विकण्यास येतात तसे मद्रासकडे चोचोचे ढीगच्या ढीग मार्केटांत असतात. तिकडची हवा उष्ण असल्यामुळें तीं फळें तिकडे बारमास दृष्टीस पडतात. मुंबईच्या बाजूस तोंडल्याप्रमाणें चोचोची लागवड फायदेशीर होईल व बारमास फळें लागतील.