विभाग तेरावा : घ - जलपैगुरीचैत्य — संस्कृत 'चिता' या शब्दापासून हा बनला असल्यामुळें चितेसंबंधीं कांहींहि गोष्ट (उदा. मृत मनुष्याच्या अस्थीवर उभारलेला चबुत्रा, किंवा ती जागा दर्शविणारें एखादें झाड) असा या संज्त्रेचा अर्थ होतो. प्राचीन काळच्या भारतीय वाङ्मयामध्यें, मग तें ब्राम्हणी, बौद्ध किंवा जैन कोणतेंहि असो, चैत्याचा सर्वत्र अर्थ वरच्याप्रमाणें होता. पण पुढें विशेषेंकरून बौद्धांत व जैनांत थोर मृतांच्या अवशेषांवर स्मारकें उभारण्याची सरसहा चाल पडल्यामुळें त्यांच्याच वाङ्मयांत या शब्दाला विशेष महत्व आलें. बौद्ध संप्रदायाचा आशियाखंडांत जिकडे जिकडे प्रसार झाला तिकडे तिकडे हा शब्द किंवा याचे प्रतिशब्द कांहीं थोड्याफार फरकानें गेले. उदा. सिंहलद्वीपांत दागब (संस्कृ. धातुगर्भ), तिबेटांत चौर्टेन किंवा दुंग्टेन. पुढील काळांत, कोणतेंहि पवित्र झाड, अस्थि ठेवण्याचें स्थान किंवा समाधि अशा सामान्य अर्थानें चैत्य शब्दाचा उपयोग होऊं लागला. माहेश्वर कवि (इ.स. ११०१) यानें रचिलेल्या विश्वप्रवास नांवाच्या समानार्थक शब्दकोशांत चैत्य शब्दाचे वरील अर्थ आढळतात. कालीदासाच्या मेघदूतावर (श्लोक २३) टीका करतांनां मल्लिनाथानें याचा उल्लेख केलेला आहे.
अर्वाचीन शिल्पकामांत चैत्य हा शब्द सामान्यतः एखाद्या बौद्ध किंवा जैन देवालयाला व कधीं कधीं बौद्ध शिल्पकलेच्या एका विशिष्ट प्रकाराला-चैत्य दालनाला-योजितात. चैत्य दालनें हिंदुस्थानांत अनेक आहेत. हें एक खडकांत कोरलेलें लेणें असून त्याला मूळ लांकडी छत असे; कांहीं अगदीं जुन्या लेण्यांतून तर बाजूंस वरील लांकडी छताचा भार सहन करण्याकरितां लांकडी कमानी बसविलेल्या आढळतात.
कार्ल्याच्या लेण्यांतील चैत्य उपलब्ध चैत्यांत सर्वात मोठा आहे. त्याची खोली (अथवा लांबी) १२६ फूट व रूंदी ४५ फूट ७ इंच आहे. या चैत्याच्या आंत शेवटीं स्तूप आहे. पूर्वी स्तूपालाच चैत्त्य म्हणत; पण हल्लीं, मृतावशेषावर घुमटाकार बांधलेली समाधि म्हणजे स्तूप व त्यापुढील दालन म्हणजे चैत्य व भिक्षूंची रहाण्याची जागा तो विहार असे अर्थ रूढ झाले आहेत. [संदर्भ ग्रंथ.-विल्सन- एरिआना अँटिका, लंडन, १८४१; बोथलिंग आणि रॉथ— संस्कृत—वोर्टेर्बुच, सेंट पीटर्सबर्ग १८५५-७५ (चैत्य). हॉजसन—एसेच अॅन् दि लँग्वेजेस, लिटरेचर. एट. ऑफ नेपाळ अॅन्ड तिबेट. फर्ग्यूसन—हिस्ट. ऑफ इंडियन अॅन्ड ईस्टर्न आर्किटेक्चर वाडेल—दि बुद्धिझम् ऑफ तिबेट]