विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चैतसिंग — काशीचा एक राजा. याचा बाप बळवंतसिंग इ.स. १७७० त वारल्यावर चैतसिंग हा गादीवर बसला. इ.स. १७७८ त फ्रेंच व इंग्रज यांच्यांत जेव्हां लढाई जुंपली, तेव्हां ई.इ. कंपनीला पैशाची अत्यंत गरज लागली व इंग्रजांची सत्ताहि धोक्यांत आली. त्यावेळीं वॉरन हेस्टिंग्जनें चैतसिंगाकडून लढाईच्या खर्चास मदत म्हणून (ठराविक इजार्याच्या रकमेशिवाय) पांच लाख रू. वसूल केले. पुन्हां स. १७७९ व १७८० सालीं याचप्रमाणें ५।५ लाख मिळून तीन वर्षात पंधरा लाख रू. त्यानें चैतसिंगाकडून काढले. अर्थांतच इतकी रक्कम देण्याचें सामर्थ्य नसल्यानें चैतसिंग या जबर मागण्यांनीं नाखूष झाला व राहिलेली बाकी देण्यास त्यानें विलंब लाविला. तसेंच सर आयर कूट यानें ठरविल्याप्रमाणें काशी प्रांताच्या शेजारचा प्रांत जो बहार त्याच्या संरक्षणासाठीं (काशी प्रांताच्या नव्हे) चैतसिंगानें एक हजार घोडदळ ठेवावें असें कंपनीनें त्याला सांगितलें होतें. तें घोडदळ ठेवण्यास या प्रसंगीं पैशाच्या ओढाताणीनें राजास साधलें नाहीं. तेव्हां राजा बंड करण्यास तयार झाला असून व त्याच्याजवळ पैसा व माणसें भरपूर असूनहि तो कंपनीस तीं मुद्दाम देत नाहीं असा या त्याच्या वर्तनाचा विपरित अर्थ हेस्टिंग्जनें केला. एवढेंच नव्हे तर, तो मुद्दामच हट्टानें कंपनीची बरीच मागणी पुरवीत नाहीं व त्याचें कृत्य, तो कंपनीच्या हाताखालील मांडलिक राजा असल्यानें (वास्तविक तो राजा कंपनीचा मांडलिक होता कीं दिल्लीच्या पादशहाचा मांडलिक होता हा प्रश्नच आहे. दिल्लीकरानें कंपनीस दिवाणीचा हक्क दिला असला तरी सार्वभौमसत्ता आपल्याकडे राखून ठेविली होती; ती कंपनीस मिळाली नव्हती. तेव्हां या दृष्टीनें कंपनीचा चैतसिंग मांडलिक बनूं शकत नाहीं.) व त्यामुळें कंपनीस तिच्या संकटसमायीं आपल्या सर्व साधनांसह कांहीं एक आडकाठीं पुढें न आणतां एकदम मदत करणें हें त्याचें कर्तव्य असल्यानें ज्याअर्थी तो ही मदत देण्यास टाळटाळ करितो, त्याअर्थी तो राजद्रोहीहि आहे असें हेस्टिंग्जनें ठरविलें. हेस्टिंग्ज आपल्या कैफियतींत स्वतःच म्हणतो कीं, ''या राजद्रोहाबद्दल मी त्याला खूप कडक शिक्षा देण्याचें ठरविलें होतें''. त्याचप्रमाणें चैतसिंगाकडून पन्नास लाख रू. दंड घेण्याचें त्यानें ठरविलें व तो वसूल करण्यासाठीं हेस्टिंग्ज हा स्वतः काशीस गेला व चैतसिंगाच्या अडथळ्यास न जुमानतां त्यानें त्याला कैद केलें. तेव्हां तेथें रण माजून कंपनीच्या दोन तुकड्यांनां व त्यावरील अधिकार्यांनां चैतसिंगाच्या लोकांनीं कापून काढिलें (२० आगष्ट १७८१) आणि राजास सोडविलें. तेव्हां हेस्टिंग्ज हा चुबारच्या किल्ल्यांत पळून गेला. पुढें कंपनीच्या व राजाच्या मध्यें बर्याच चकमकी झाल्या. हेस्टिंग्जनें राजाचा बराच प्रांत काबीज केला, तेव्हां चैतसिंग हा बुदेलखंडांत मराठ्यांच्या आश्रयास गेला. हेस्टिंग्जनें त्याला गादीवरून पच्दयुत करून त्याच्या एका अज्त्रान पुतण्यास राजा केलें व त्याच्यावर, चैतसिंग हा कंपनीस जितका रसद (शेतसार्याची अथवा इजारा रक्कम) देत असे, तिच्या दुप्पट रसद देण्याचें लादलें. तसेंच त्याचा स्वतंत्र नाणें पाडण्याचा हक्क दिवाणी फौजदारी व न्याय निवाड्याचे सर्व हक्कहि काढून घेतले. पुढें चैतसिंगाचा लतीपूर येथें पराभव झाल्यानंतर त्याचा खासगी किल्ला विजयगड हा हेस्टिंग्जनें मे. पोफॅमच्याकडून लुटविला. त्यांत चैतसिंगाची सारी चीजवस्त नाहीशीं झाली व त्याचें राजकुटुंब दरिद्री बनलें. त्यानंतर चैतसिंगास कुटुंबसुद्धा राजद्रोहाच्या आरोपावरून ग्वाल्हेरच्याा किल्ल्यांत कैदेंत ठेविलें. तो तेथें २९ वर्षे कैदेंत खितपत पडून अखेर तेथेंच मरण पावला (२९ मार्च १९१०). तो कैदेंत असतांनाच त्यास बलवानसिंग नांवाचा एक पुत्र झाला होता. चैतसिंगाच्या मृत्युनंतर याला आग्र्यास आणून ठेविलें होतें. व याला मासिक दोन हजारांची नेमणूक इंग्रजानें करून दिली होती. याला तत्प्रांतस्थ लोक काशीवाला राजा म्हणत असत. याला कुंवर चकवर्तिसिंग नांवाचा एकच मुलगा होता. तो तरूणपणींच निवर्तल्यानें (डिसेंबर १८७९) त्या दुःखानें त्याच्या मागून नऊच दिवसांनीं बलवानसिंग हा मरण पावला. बलवानसिंग हा कवि होता. चक्रवर्तीला एक मुलगा व एक मुलगी अशीं दोन अपत्यें होतीं.
हेस्टिंग्जवर विलायतेंत जो खटला झाला त्याला चैतसिंगावरील उपर्युक्त जुलूम हेंहि एक कारण होतें. पिटनें हेस्टिंग्जच्या बाबतींतील वागणुकीस, ''क्रुर, अन्यायी व जुलमी'' अशीं विशेषणें दिलीं आहेत. परंतु हेस्टिंग्जच्या जातभाई पंचांनीं त्याला निर्दोषी ठरविलें व कारण दाखविलें कीं, चैतसिंग हा कंपनीचा मांडलिक आणि बळवंतसिंगाचा औरस पुत्र नसून लेकवळा होता (आणि असें असतांहि हेस्टिंग्जनेंच त्याला गादीवर बसविण्यांत व्यक्तिशः पुढाकार घेतला होता). यावर व्हिन्सेन्ट स्मिथ म्हणतो कीं, ''असें गृहीत धरलें तरी, हेस्टिंग्जनें चैतसिंगावर जबरदस्त ओझें लादलें, त्याला पकडण्यांत अन्याय व अविचारीपणा केला, आणि त्याला विनाकारण अतिशय कडकपणें वागविलें. चाळीस पन्नास लाखांचा दंड ही अतिशय जबरदस्त रक्कम होती. जुलूमजबरदस्तीशिवाय सर्व गोष्टी शांतपणें पार पाडतां आल्या असत्या.'' हेस्टिंग्जच्या विरूद्ध त्यावेळीं कलकत्त्यास जे सरकारी कौन्सिलांतील सभासद होते, त्यांच्याशीं चैतसिंगानें बरेंच दळणवळण ठेविल्यानेंहि हेस्टिंग्जनें त्याच्यावर हा सूड घेतला असावा असें म्हणतात. [बील-ओरि.बायॉ.डिक्शनरी; स्मिथ-ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया.]