विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेस्टरफील्ड — इंग्लंडच्या डर्बीशायरमधील चेस्टरफील्ड प्रतिनिधी विभागाचे चेस्टरफील्ड हें शहर असून म्युनिसिपालिटीचा विभाग आहे. मिडलंड आणि ग्रेट सेंट्रल रेल्वेवर डर्बीच्या ईशान्येस हें २४ मैल आहे. १९२१ साली येथील लोकसंख्या ६१२३६ होती. येथें सेंटमेरी ऑलसेंट प्रार्थनामंदीर आहे. १८७९ साली स्टीफनसनच्या स्मरणार्थ बांधलेल्या दिवाणखान्यांत मोफत वाचनालय, नाटकगृह आणि कलांचे व पदार्थविज्त्रानशास्त्राचे वर्ग आहेत. हँप्टन हाऊसमध्यें रहाणार्या जॉर्ज स्टिफनसन इंजिनिअरची कबर ट्रिनिटी प्रार्थनामंदिरांत आहे. कापसाचे, रेशमाचे, तंबाखुचे, लोखंडाचे व पितळेचे कारखाने येथे आहेत. स्लेटपाटीच्या दगडाच्या, लोखंडाच्या व जस्ताच्या खाणी आहेत. येथील कारभार मेअर, ६ सनदी शहरचे अधिकारी व १८ सभासदांच्या हातांत असतो. शहरचें क्षेत्रफळ १२१६ एकर आहे. चेस्टरफील्डच्या पश्चिमेस ब्रॅम्पटन व वॉल्टन जिल्हे आहेत. येथील लोकसंख्या २६९८ आहे. आग्नेयीकडील हॅसलंड प्रांताची लोकसंख्या ७४२७ आहे व ईशान्येकडील ब्रिमिंगटन विभागाची लोकसंख्या ४५६९ आहे. सॅक्सन लोकांनी या शहराला चेस्टरफील्ड असे नांव दिले. डूम्सडेबुकवरून एवढेंच समजतें की हे न्युबोल्डच्या बेलिफाची हद्द असून राजाच्या मालकीचें होतें; व तें वुइल्यम पेव्हिरेलला मिळालें. १२०४सालीं जॉननें वुइल्यम ब्रुअरला देऊन स्वतंत्र बरोचे सर्व हक्क शहरला दिले. १५९८ साली एलिझाबेथनें यास कॉरपोरेशन दिली. १८३५ पासून येथील कारभार मेअर, ३ सनदी शहरचे अधिकारी व १२ सभासदांच्या हातांत गेला. होलीक्रॉसच्या प्रीत्यर्थ येथे ८ दिवस जत्रा भरते. जॉनलॉर्ड वेक यानें येथें व्यापारी संघ स्थापण्याची परवानगी दिली. १२६६ सालीं बॅरन्स व राजकीय फौजेत झालेल्या युद्धांत डर्बीचा अर्ल रॉबर्ट डीफेरर्स ह्याला कैद करण्यांत आलें. १५८६ सालच्या प्लेगनंतर झालेल्या यादवीमूळें पार्लमेंटच्या सैन्यास रजा मिळाली. कापसाच्या व रेशमाच्या धंद्यामुळें हे शहर चांगलेंच उर्जितावस्थेस आलें आहे.