विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चेरो— ही बिहार ओरिसामधील जात बरीच प्रसिद्ध आहे. लोकसंख्या (१९११) सुमारें २०००० मुंडा व कोलेरियन वर्गांत हिचा समावेश होतो. छोटा नागपूर संस्थानांतहि यांची वस्ती आहे. बुकानन व डाल्टन यांच्या शोधावरून असें अनुमान निघतें कीं हे पूर्वी बिहारमध्यें सत्ताधीश होते. यांच्या बांधकामाचे अवशेष अद्याप दिसतात. शाहबाद येथील जुनाट बांधकामे यांचीच आहेत. बुद्धगयेंतील एका शिलालेखांत फुदीचंद्राचें नावं आहे. हा चेरो होता अशी परंपरागत कथा आहे. यास शहाबादमधून कोणाच्या मतें सावारानी कोणाच्या मते हरीरानी ख्रिस्ती शकाच्या ५व्या किंवा ६व्या शतकांत हांकून दिलें. चेरो व सावर या दोघांसहि ब्राह्मण अपवित्र समजतात, पण हरिरांस क्षत्रिय समजतात. मिथिला व मगध देशांत चेरो लोक आढळत नाहीत. आता ते शहाबाद जिल्ह्यांत मात्र सापडतात. पालामऊमध्ये मात्र याचें राज्य कांही दिवस शिल्लक होतें पण इंग्रजांनी तेंदेखील घेतले. यांच्या दंतकथावरून यांनी पालामऊ प्रांतावर रजपूताचें साह्य घेऊन स्वारी केली. मग रजपुतांवर रंका व चैनपूरच्या ठाकुरांनी स्वारी केली व त्यांस सुरगुजात घालविले. चेरो लोकांनी युद्धांत मदत केल्यामुळे त्यांस पुष्कळ जमीनी इनाम मिळाल्या. या अद्याप त्यांच्याकडे आहेत. खेरवारांनी या लोकांस तेथे राहू दिले. चेरो लोक मात्र रजपूत रिवाजाप्रमाणेंच रहातात. खैरवार हे चेरो व संताळ लोकांपासून झालेली एक शाखा असावी पालामऊमध्यें चेरो लोकांचे दोन वर्ग आहेत. एकाचे नांव 'बारा हजार' व दुसर्‍याचें 'तेरा हजार' वीरबांधीं असेही नांव आहे. बारा हजाराचा दर्जा वरचा आहे. तेरा हजार हे बारा हजारांचे लेकवळे आहेत.

यांच्या चेहर्‍याची ठेवण हिंदू रक्ताच्या मिश्रणानें बरीच निवळली आहे. तरी पण यांच्या चेहर्‍यांत मंगोल ठेवण स्पष्ट आहे. यांचा रंग गव्हासारखा असतो. यांच्या गालावरचें हाड उंच असतें डोळे तिरपे असतात, नाक रूंद व चपटें असतें. तोंड मोठे व ओठ बाहेर आलेले असतात. [रसेल व हिरालाल].