विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेरूमन— मद्रास इलाख्यांतील एक शेतकरी जात. एकंदर लो.सं.(१९११) २५६४७३. (यांत पुलैयन धरले नाहींत.) ही विशेषेंकरून मलबारांत आढळते. उत्तर मलबारांत यांनां पुलयन म्हणतात. यांच्या चाळीसांवर पोटजाती आहेत; पैकी कनक्कन, पुल, एर, रोळी व कूडात या मुख्य आहेत. ब्रिटिश राज्य सुरू होण्यापूर्वी वसुलाच्या बाकीबद्दल गुलाम देण्याची मलबारांत चाल असे. त्या काळी चेरूमन हे गुलाम म्हणून दिले घेतले जात. लग्नाला, श्राद्धाला पैसे यांचे मालक देत. वरील जातींकडून ही जात अस्पृश्य गणली जाते. चेरूमन लोकांच्या घरांनां चाळ (झोपडी) म्हणतात. चेरूमींचे कटिवस्त्र गुढग्यापर्यंत देखील नसतें वक्षस्थल उघडें असतें. त्यांच्या हाताकानांत मोठमोठी तांब्यापितळेची कडी घालतात. लग्नांत नवर्याची बहीण नवरीला हुंडा देते. लग्न समारंभांत बायकापुरूष एकत्र नाचतात. गृहप्रवेशानंतर वधूनें मोठमोठ्यानें रडून आपल्या अवस्थेबद्दल शोक करण्याची चाल आहे. ॠतुस्नाता होण्यापूर्वी मुलीचीं लग्ने उरकली जातात. गरीबीमुळे एखादीचें लग्न होत नसेल तर शिष्ठ लोक वर्गणी जमवून आपल्यापैकी कोणा एकाशीं तिचें लग्न लावितात. ॠतुस्नाता कुमारीला वाळींत टाकण्यांत येतें. याच्यांत घटस्फोट फार सोपा आहे. पुलयनांमध्ये लग्नाचा खर्च घेऊन नावडत्या बायकोला दुसर्याला देऊन टाकण्यांत येते. पुष्कळदां चेरूमन नवराबायको एकाच धन्याजवळ रहातात. पहिलें मूल बायकोच्या धन्याचें म्हणून समजलें जातें. पुढील मुलेंहि वयांत आल्यावर आईच्या मालकाचे नोकर होतात. पराया पुरूषाशीं चेरूमीनें व्यभिचार केल्यास तिला बहिष्कृत करतात. बहुधां ती नंतर ख्रिस्ती किंवा मुसुलमान होते. यांच्यांत मृतांनां पुरून वर दगड रोवितात. [थर्स्टन]