विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेरापुंजी — आसामच्या खासी टेकड्यांतील एक खेडे. यांत वर्षात सरासरी ४५८ इंच पाऊस पडतो. याच्याइतका पाऊस अशियाखंडाच्या दुसर्या कोणत्याही ठिकाणीं पडत नाहीं. यांत सन १८६१ त ९०५ इंच पाऊस पडला होता, व १८७६ त २४ तासांत ४१ इंच पडला होता. येथें प्रथम खासी टेकड्यांतील मुख्य ठाणें होतें. नंतर तें सन १८६४ त शिलांग येथें नेण्यांत आलें. येथे दवाखाना व एक इंग्रजी शाळा आहे. स.१८९७ त धरणीकंपाचा धक्का बसला होता. येथें उत्तम प्रकारच्या कोळशाची खाण आहे.