विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेर घराणें — चेर घराणें व कोंगु घराणें हीं भिन्नभिन्न होती किंवा एकच असून निरनिराळ्या नांवानें संबोधिलीं जात होतीं याबद्दल अद्यापपर्यंत बराच मतभेद आहे. परंतु चेर घराणें हें कोंगु घराण्याच्या पूर्वी होऊन गेलें व तें त्याच प्रांतावर राज्य करीत होतें या मतास बरीच बळकटी येत चालली आहे. कोंगू घराण्यांतील प्रथम सात पुरूषांस चेर हेंच नांव दिलें पाहिजे.
कांहीं लोकांचें असें मत आहे कीं, चेर घराणें पश्चिमकिनार्यावर राज्य करीत असून त्याचें राज्य पाण्ड्यांच्या उत्तरेसं, पल्लव व चोल यांच्या पश्चिमेस, सह्याद्रीच्या समुद्रकांठच्या भागांत व कोंकणच्या दक्षिणेस असून तें तेथे फार पुरातन कालापासून राज्य करीत होतें. हल्लीचा पालघाटच्या भोंवतालचा व सालेम आणि कोईंबतूरच्या आसपासचा प्रदेश यांत असे. शेवटीं कोंगु राजांनीं म्हैसुर व इतर प्रांत (पश्चिम किनार्यालगतच्या भागाशिवाय सर्व प्रदेश) त्यांच्यापासून हिरावून घेतला. यूरोपांतील सर्व जुन्या भूगोलवेत्यांनीं व हिंदुस्थानांतील सर्व प्राचीन ग्रंथकारांनीं चेर राजांचा उल्लेख केलेला आढळतो. त्यांनां चोल पाण्ड्य यांचे समकालीन म्हटलें आहे व अशोकाच्या शिलालेखांतहि त्यांचा असाच उल्लेख असून त्यांच्या राजास केरळपुत्र म्हटलें आहे. टॉलेमीच्या मतें करूर ही त्यांची राजधानी होती. ह्युएनत्संग हा त्या राष्ट्राचा उल्लेख करीत नाहीं पण त्यांतील एका भागास कोंकणपुर (कोंकण) असें नांव देतो. प्लिनी व पेरिप्लुस यांच्या ग्रंथांतहि चेरांना उल्लेख आढळतो.
पुराणांतून व तामीळ वाङ्मयांतून चेर राजवंशाचें नांव येत असतें. कावेरीच्या दक्षिणेकडे प्रथम चोलांचें मोठें साम्राज्य होतें. त्यांनां चेरांनीं जिंकले व चेरांनां पुढें पांड्यांनीं जिंकलें असें म्हणतात. ख्रिस्ती शकाच्या प्रारंभीं हीं तिन्हीं राज्यें सुव्यवस्थित रीतीनें दख्खनमध्यें नांदत होतीं. चेर व चोल यांचीं आपापसांत नेहमीं भांडणें होत व परस्परांचें प्रांत परस्पर नेहमीं काबीज करीत. कधीं कधीं त्यांच्यांत सोयरिकी होऊन तात्पुरतें भांडण मिटतहि असें. करिकाल चोलाने, चेर राजाचा पराभव करून आपली मुलगी त्याच्या मुलास दिली होती. पुढें करिकालाच्या मुलानें आपल्या मेव्हण्याचा पूहर येथें स्वारी करून पराभव केला.
परंतु पुढें थोड्याच दिवसांत शेंगुत्तुवन (तांबड्या रंगाचा) चेरराजानें नेदुमुडी किल्लीराज चोलाला पराभूत करून आपला अधिकार त्याच्यावर बसविला. मात्र चेरांची ही राजसत्ता एकच पिढीपर्यंत टिकाली. पुढें पाण्ड्यराजानें ती बळकाविली. हा शेंगुत्तुवन चेर मोठा पराक्रमी होता. यानें अश्वमेध यज्त्र करून वंजी (पश्चिम किनार्याकडील) येथें एक पट्टिनी देवीचे मंदिर बांधलें. त्या समारंभासाठी सीलोनचा राजा गजबाहु आला होता. शेंगुत्तुवनाचा मुलगा गजदृष्टी (हत्तीसारखी दृष्टी असलेला) हाहि एक प्रख्यात चेरराजा होता. हा आपल्या बापाच्या वेळीं तोंडी येथे राजप्रतिनिधी होता. यानेंहि बर्याच लढाया मारल्या होत्या. शेवटीं पाण्ड्यराजानें याचा तलैआलंगानम् येथील लढाईत पराभव करून त्याला कैद केलें व येथून चेरांच्या अधिराज्यास उतरती कळा लागली (ख्रि.पू. १ लें शतक). गजदृष्टीच्या ताब्यांतील (तो राजप्रतिनिधी असतांना) प्रदेश, कोल्ली मलाईपासून तोंडीपर्यंत असून त्याच्या दोन्ही बाजूस चोल व पाण्ड्य हीं राज्यें होतीं. चेरांचें राज्य म्हणजे हल्लीचा सर्व मलबार किनारा (मलबार जिल्हा व त्रावणकोर आणि कोचीन संस्थानें) होय. कन्याकुमारीपासून उत्तरेस मंगलोरपर्यंत व आरबी समुद्रापासून पूर्वेस सह्याद्री (क्वचित् सह्याद्रीच्या पुढें म्हैसूरकडील थोडासा भाग) पर्यंत हा प्रदेश येतो. या घराण्याची राजधानी वंजी येथें होती. पेरियानदीच्या कांठी वंजी हें शहर होतें. तिला वंची अथवा करूर असेंहि म्हणत हल्ली या गांवास तिरूकरूर म्हणतात. व तें कोचीनच्या ईशान्येस चौदा कोसांवर पेरियरजवळ आहे. पुढें कुलशेखर अळवार याच्या वेळीं ही राजधानी क्वीलोन येथें गेली. पुन्हां तिरूवंजीकलम् नांवाची आणखी एक राजधानी झाली. ही पेरीयार नदीच्या मुखाशी होती. तामीळवाङ्मयांतील (इ.स. १ लें शतक) उल्लेखावरून चेरांच्या राज्याचे पांच नाडू (प्रांत) होते असें दिसतें. (१) पुली (वालुकामय पुलिन भाग) प्रांत, अगलप्पुलपासून पोनानी नदीच्या मुखापर्यंत; (२) कुडम (पाश्चिमात्य) प्रांत पोनानीपासून अर्णाकुलमपर्यंत; (३) कुड्डम (सरोवरांचा) प्रांत कोद्दायम व क्विलनजवळील; (४) वेणप्रांत, क्विलन ते कन्याकुमारीपर्यंतचा; (५) कर्क (खडकाळ) प्रांत. कुडमप्रांताच्या पूर्वेस चेर व केरळ हे एकच शब्द होत. तामीळ चेरळ शब्दाचेंच कानडी रूप केरळ होय. चेरांच्या देशाला चेरळम् किंवा चेरळनाडु म्हणत व राजांनां चेरळ आदन अथवा चेरळचुइसम पोर्रई म्हणत. चेरळम् म्हणजे पर्वतांची रांग होय. मलबार याचाहि अर्थ असाच होतो.
या राजवंशाबद्दल याशिवाय जास्त माहिती आढळत नाही. ख्रिस्ती शकाच्या पहिल्या व दुसर्या शतकांच्या मागील यांचा इतिहास चांगला आढळत नाहीं. व जो हल्लीं आढळत आहे तोहि वर दिल्याप्रमाणें अपुराच आहे. फक्त कांहीं राजांची नावें आढळतात. त्यापैकीं दोन नांवें वर दिलींच आहेत. त्याशिवाय आणखी दोन नांवें आढळतात. स्थाणुरवि चेरराज हा आदित्य चोलराजाचा समकालीन व मित्र होता. इ.स. ३८९ च्या सुमारास नंबूरी व नायर लोकांनीं चेरराजा विरूद्ध बंड करून त्याचा कांहीं प्रांत बळकावला होता. या चेरांचा शेवटचा राजा चेरमाण पेरूमाल हा होय. हा सन ८२५ च्या सुमारास होता. याच्यावेळीं अरबांनीं मलबार किनार्यावर स्वार्या केल्या. याचें राज्य पाण्ड्यराजानें घेतल्यावर हा आरबांच्या बरोबर मक्केला गेला. व तेथें त्यानें मुसुलमानी धर्म स्वीकारला. तो तेथें ८३१ त मेला. मलबार प्रांतांत मुसुलमानी धर्माच्या प्रसारासाठीं आरबांनां पाठविलें अशी एक गप्प तुहफतुल् मुजाहिदीन या मुसुलमानी बखरीत आढळते. याच्या राज्यांत ग्रामपंचायतींनां अतिशय अधिकार दिलेले होते. याच्या शिलालेखांत कोल्लम किंवा मलबार शक वापरीत. हा इ.स. ८२४-२५ या सालीं सुरू झाला. कांहीचें म्हणणें हा शक चेरमाण यानें आपल्या राज्याभिषेकापासून सुरू केला व कोल्लम अथवा क्लिलन हें शहरहि त्याच वेळीं स्थापिलें. या वंशाची जी नाणीं सांपडतात त्यांवर धनुष्य, बाण व तरवार यांचे चित्र असतें. [माबेलडफ; अय्यंगार— एन्शन्ट इंडिया; इंडि. अँटिक्वरी. पु.१,२,५,८; एपिग्राफिआ इंडिका.पु.५; सालेम डिस्ट्रिक्ट मॅन्युएल; साऊथ इंडियन इन्स्क्रिप्शन्स; स्मिथ-अर्ली व ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडिया; तामील्स, एटीन इंड्रेड इयर्स अॅगो.]