विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेट्टी.— चेट्टी ही जात नसून तो एक धंद्याचा वाचक शब्द आहे. चेट्टी म्हणजे व्यापारी (श्रेष्ठी). कित्येक तेलगु व तामीळ व्यापारी आपल्या नांवापुढे चेट्टी हें उपपद लावतात. मद्रास इलाख्यांत यांची वस्ती आहे. कांहीं ब्रम्हदेशांतहि आढळतात. १९११ च्या खानेसुमारींत सुमारें चार लाख चेट्टी नोंदले गेले आहेत. कोमट्यांपासून यांनां वेगळें काढणें कठिण जाते हा चेट्टी श्रेष्ठीचा अपभ्रंश आहे. स्थानभिन्नत्वाप्रमाणें चेट्टीमध्यें पोटजाती बनल्या आहेत. त्रावणकोरकडे यांच्या ४ मुख्य पोटजाती आहेत. (१) कोट्टर (२) परक्कायी, (३) एलूर व (४) अत्त्तुंगल. यांचे बरेचसे आचारविचार तामिळ शूद्रांच्याच सारखे आहेत [से.रि. (कोचीन, त्रावणकोर व मद्रास) १९११.]