विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चेंगीझखान (११६२-१२२७) :- यास चेंगीझखान व जंगीझखान असेंहि म्हणतात. मोंगल वंशांतील येसुकी नामक एका सुभेदाराचा हा मुलगा. याचें आडनांव तमुजिन्. जेंगीझखान हा ११६२ सालीं जन्मला; आणि वयाच्या तेराव्या वर्षी राज्य करूं लागला. परंतु पुढें प्रजेच्या असंतोषामुळें तो सुरक्षिततेकरितां आवन्तखान नांवाच्या तार्तरी राजाच्या आश्रयास पळून गेला. तेथें चेंगीझनें या राजाच्या मुलींशीं लग्न लावलें. कांहीं कालानंतर सासर्या-जावयांत बेबनाव होऊन आवन्तखान हा चेंगीझच्या शत्रूस मिळाला. परंतु वयाच्या ४९ व्या वर्षी चेंगीझनें आपल्या सर्व शत्रूंवर जय मिळविला. त्यामुळें तार्तरीच्या सरदारमंडळाकडून चेंगीझ यास खाकन असा किताब मिळाला (१२०६) व तार्तरीचा राजा म्हणून त्यास राज्याभिषेक करण्यांत आला. कराकर्म ही त्याची राजधानी होती. बावीस वर्षांच्या अवधींत चेंगीझनें, कोरिया, कॅथे (चीनमधील एक प्रदेश) आणि आशियामधील कांहीं सधन व सुपीक प्रांत जिंकून आपल्या राज्यास जोडिले. यूरोपांत जर्मनीपर्यंत चेंगीझची फौज गेली होती. त्यानें जिंकलेल्या राज्याची लांबी साडेपांच हजार मैल व रूंदी तीन हजार मैल होती. यामुळें शिकंदर बादशहाप्रमाणें सर्वत्र चेंगीझची कीर्ति झाली. तो २९ ऑगस्ट १२२७ रोजी मरण पावला. आपलें राज्य त्यानें ज्युजी, ओक्ताई, चघ्ताई व तुलीखान या चार पुत्रांनां सारखें वाटून दिलें होतें. दिल्लीचा बाबरचा वंश हा चघ्ताई नांवाच्या पुत्राचा वंशज असल्यानें त्याला चकत्यांचा वंश व मोंगली राज्यास चकत्यांची पातशाही म्हणत असत. जगज्जेत्या वीरांमध्यें चेंगीझखानाची प्रामुख्यानें गणना करितात. लहान मोंगल संस्थानिक म्हणून त्याचा जन्म झाला पण मृत्युसमयीं चीनच्या समुद्रापासून यूरोपांतल्या नीपर नदीच्या तीरांपर्यंत त्याचें विजयी सैन्य फिरून आलें होतें. [सर रॉबर्ट डग्लस-दि लाईफ ऑफ चेंगीझखान; बील; होवर्थ-दि हिस्टरी ऑफ दि मोंगोल्स.]