विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुरू — राजपुतान्याच्या बिकानेर संस्थानच्या रेनी निझामतमधील त्याच नांवाच्या तहसिलीचें मुख्य ठिकाण असून बिकानेरच्या पूर्वेस १०० मैल अंतरावर वसलें आहे. हें १६२० त चुर्हू नांवाच्या जाटानें वसविलें. १९११ सालीं याची लोकसंख्या १६०३८ होती. येथे पुष्कळ सावकार लोक रहातात व पुष्कळ चांगली घरें, विहिरी व स्मारकें आहेत. येथील किल्ला १७३९ त बांधला. येथें एक प्राथमिक शाळा, पोस्टकचेरी व दवाखाना आहे.
पूर्वी हें शहर व त्याच्या सभोंवारची ८० खेडीं एका वजनदार ठाकुराच्या ताब्यांत होतीं. याचें व दरबारचें नेहमीं भांडण असे. १८१३ त दरबारानें फौज पाठवून ठाकुराच्या किल्ल्यास वेढा दिला व त्याला जर्जर केलें. शेवटीं ठाकुरानें हिरकणी खाऊन प्राण दिला. यानंतर चुरू दरबारच्या ताब्यांत आलें. परंतु पुढें ठाकुराच्या वंशजांनीं अमीरखानाच्या मदतीनें तें परत घेतलें. यानंतर १८१८ त दरबारनें इंग्रजांच्या मदतीनें चुरू शहर कायमचें काबीज केलें. आतां ठाकुराच्या ताब्यांत फक्त ५ खेडीं आहेत.