विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुंबन — प्रीति, प्रेम व पूज्यभाव व्यक्त करण्याकरितां चुंबन म्हणजे मुका घेणें हा प्रकार सर्वत्र रूढ असलेला आढळतो. सामान्यतः चुंबनाचा विधि लौकिक व्यवहार म्हणून करतात. परंतु मातृप्रीति किंवा स्त्रीपुरूषप्रेम या बाबतींत मात्र चुंबनाची शारीरिक क्रिया ही हृदयांत उचंबळणार्या भावनांचें केंद्रीभूत प्रतिबिंब असतें, व त्यामुळें मनोविकारांनां उत्तेजन मिळतें.
शरीर व मानसशास्त्रदृष्ट्या चुंबन हें प्रेम व क्षुधा या दोन आद्य भावनांचें संयोगीकरण होय. इंद्रियजन्य व्यापारांत स्पर्श हा प्रधान असून शारीरिक स्पर्शाच्या अनेकविध प्रकारांत 'चुंबन' हा अत्यंत उच्च वैशिष्ट्यदर्शक प्रकार आहे. त्यामुळें सुधारलेल्या समाजांतच चुंबनाचा प्रकार परिणत स्वरूपांत आढळतो. उदाहरणार्थ, अगदीं प्राचीन काळीं ईजिप्तमध्ये चुंबन माहीत नव्हतेसें दिसतें. आणि ग्रीक, असीरियन लोकांत अगदीं प्राचीन काळापासून तें रूढ होतें. प्राचीन भारतीयांत हें प्रचलित होतें किंवा नाही याविषयीं मतभेद आहे. मांजर, कुत्रें, वगैरे प्राण्यांत एकमेकांनां नाकांनीं स्पर्श करण्याचा प्रकार दृष्टीस पडतो, व त्याचेंच सुधारलेल्या स्वरूपांत अनुकरण सँडविचद्वीपस्थ, टाँगन, एस्किमो, मलायी वगैरे हलक्या मानव जातींत केलेलें दिसते. डार्विन म्हणतो, ''मलायी लोकांचें चुंबन म्हणजे एकानें आपले नाक दुसर्याच्या नाकावर ठेवून घांसणें.'' गालावर नाक ठेवून हुंगणे, हा चुंबनाचा दुसरा एक रानटी प्रकार होय. मूळ जपानी भाषेंत चुंबनाला शब्द नाहीं.
सुधारलेल्या समाजांत 'चुंबना' च्या तीन कृती आहेत. ओठांनीं शरीराच्या कोणत्याहि भागाला स्पर्श करणे ही एक. ओठांनीं गालाला स्पर्श करणें ही कृति पितृप्रेमाची किंवा मित्रप्रेमाची निदर्शक मानतात; आणि ओठांनीं मुखाला स्पर्श करणें ही कृति प्रमी स्त्रीपुरूषविषयक संबंधाची निदर्शक म्हणून गणली जाते. प्राचीन ग्रीकरोमन लोकांत व आधुनिक फ्रेंचइंग्रजादि यूरोपीयांत हाच शिष्टसंप्रदाय आहे.
बाह्य— चुंबन घेंणें या अर्थाचे जुने इंग्रजी शब्द 'बुस' व 'बास' व त्याच अर्थाचा पर्शियन व हिंदी शब्द 'बूस' यामध्यें विलक्षण सादृश्य दिसून येतें. तसेंच हिंदी व जर्मन कुस म्हणजे चुंबन घेणें आणि संस्कृत व कुस् इंग्रजी किस् या शब्दांमध्यें एक प्रकारचें साम्य दिसून येतें. आतांपर्यंत काढलेले सिद्धांत हिंदुखेरीजकरून इतर आर्य लोकांस लागू पडतात किंवा नाहीं हें आतां पाहूं. रोमन लोकांत ओष्ट चुंबनाचीच पद्धति होती. पण रोमन लोक फार उत्तर कालांतील आहेत. मुखचुंबनाची वहिवाट पूर्वेकडील आहे असें ग्रीक लोकांनीं म्हटलें आहे. ग्रीक लोकांत खरें चुंबन होतें, परंतु मुखचुंबनाची चाल त्यांच्यांतहि नव्हती. इराणी लोकांत चुंबनाची वहिवाट होती. समान नात्याचे लोक मुखचुंबन करीत, व वरिष्ठ दर्जाचे लोक कनिष्ठ दर्जाच्या लोकांच्या फक्त गालाचें चुंबन घेत असत. इंडो यूरोपियन लोकांत पूर्वी चुंबनाची वहिवाट होती कीं तेहि अवघ्राण करीत असत, हें समजण्याला कांहीं मार्ग नाहीं.
प्राचीन जपानी, ईजिप्शियन, केल्टिक, ग्वायनांतील इंडियन वगैरे लोकांत चुंबनाची आधुनिक कृति प्रचलित नव्हती हें खरें असलें तरी अगदी आद्यकालीन समाजांतहि चुंबनाचा कोणतानाकोणता तरी प्रकार रूढ असला पाहिजे यांत शंका नाहीं. शिवाय प्रेम प्रसंगाव्यतिरिक्त इतर धार्मिक किंवा राजकीय, सामाजिक वगैरे नमनप्रसंगीं चुंबनसदृश कृती आचरलेल्या आढळतात. कनिष्टांनीं अत्यंत वरिष्टांनां नमन करण्याकरितां पाय, गुडघे किंवा हात यांनां मुखानें स्पर्श करणें हा प्रकार ग्रीक, इराणी, हिब्रू, ख्रिस्ती वगैरे अनेक प्राचीन व अर्वाचीन समाजांत रूढ असलेला आढळतो. प्राचीन रोमन बादशहा किंवा ख्रिस्ती धर्मगुरू पोप यांच्याबद्दल निष्ठा प्रदर्शित करण्याचा पादचुंबनविधि सुप्रसिद्ध आहे. सूर्यचंद्रादि देवतांनां नमन करण्याकरितां स्वतःच्याच हाताचें चुंबन घेणें हा प्रकार तुर्क व अरब लोकांत रूढ असून तोच प्राचीन ग्रीक व रोमन लोकांत होता. बॉक्सिंग वगैरे शारीरिक सामन्यांतले प्रतिस्पर्धी प्रथम हस्तस्पर्श किंवा हस्तांदोलन करतात, त्याप्रमाणें मध्ययुगांतील यूरोपीय प्रतिस्पर्धी वीर शस्त्रसंग्रामापूर्वी किंवा पराभूत झाल्यानंतर शरणागतिदर्शक म्हणून, चुंबनाची कृति करीत असत. विशेषतः कायद्याच्या दृष्टीनें त्या काळांत विवाहसंबंधांत चुंबनाला फार महत्त्व होतें, म्हणजे वाङ्निश्चयाच्या वेळीं चुंबनविधि झाल्याशिवाय त्याला कायदेशीर स्वरूप येत नसे. यूरोपात कोर्टांमध्यें शपथविधि करतांना न्यूटेस्टामेंट या धर्मग्रंथाचें चुंबन करावे लागतें. फ्रेंच मध्ययुगीन कायद्यान्वयें तर विवाहित स्त्रीचा पतीखेरीज इतरानें मुका घेतल्यास तो व्यभिचाराचा गुन्हा गणला जात असे. आणि अमेरिकेत १९ व्या शतकांत अविवाहित स्त्रीनें पुरुषास चुंबन घेऊं दिल्याबद्दल तिला दंड केल्याचीं उदाहरणे डी टोकेव्हिलनें उल्लेखिलीं आहेत.
चुंबनाच्या कार्यासंबंधाची एक फारच विचित्र कल्पना यहुदी धर्मग्रंथांत आढळते. ती कल्पना म्हणजे पुण्यवान् माणसांनां केवळ चुंबनामुळें मृत्यु येणें ही होय. ईश्वराच्या प्रिय भक्तांनां ईश्वरानें चुंबन घेण्यानें मृत्यु येतो अशी या लोकांची कल्पना आहे. अर्थात् या रीतीनें मृत्यु येणे ही गोष्ट अगदीं बिनत्रासाची व सुखकर असल्यामुळें फक्त अत्यंत पुण्यवान् माणसांनां अशा प्रकारचें मरण लाभतें. आब्राहाम, ऐझॅक, जेकब, मोझेस वगैरे साधुपुरूषांनां अशा प्रकारें मृत्यु आला असें वर्णन आहे.
भारतीय.— प्रोफेसर हापकिन्स यांच्या मतें चुंबनाची आजची क्रिया प्राचीन भारतीयांत नव्हती. त्याच्या याविषयींच्या लेखाचा (अमेरि.ओ.सो.जर्नल २८) सारांश येणेंप्रमाणें :-
वेदांमध्यें चुंबणें या अर्थाचा धातु नसून त्याच्या जागीं वास घेणें (घ्ना) ह्या धातूचा उपयोग केला आहे. ''गाई अगर घोडे ज्याप्रमाणें आपल्या वासरांनां व शिंगरांनां हुंगतात, त्याप्रमाणें देव आपल्या वासरांनां व शिंगरांनां हुंगतात, त्याप्रमाणें देव आपल्या मुलांनां (सर्व प्राण्यांनां) हुंगतो.'' बापानें मुलाचें तीनदां अवघ्राण केलें म्हणजे, मुलांचें आयुष्य वाढतें अशी कल्पना हिदुस्थानांत उपनिषदकालापासून रूढ आहे. चुंबणें या अर्थाचा शब्द फार मागाहून प्रचारांत आला, परंतु चुंबणें व हुंगणें या अर्थाच्या शब्दांचा मूळचा अर्थ स्पर्श करणें, असा होता असें दिसतें. त्याचप्रमाणें मागाहून प्रचारांत आलेला शब्द ''चुंब्'' हा चुप् म्हणजे स्पर्श करणें ह्या धातूवरूनच तयार झाला असावा. शिवाय वरील शब्दाचा ठार मारणें या अर्थी उपयोग केलेला आढळतो. चुप् म्हणजे स्पर्श करणें, या शब्दावरूनच एकंदर सर्व अर्थ निघाले आहेत. वेदकालानंतरच्या पुस्तकांतून चुंबनाचे उल्लेख आले आहेत. शतपथ ब्राम्हणांत प्रणयवर्णनांत चुंबनाचें ''मुखसंमीलन'' असें वर्णन आलें आहे.
मनुस्मृतीमध्यें चुंबनाचें अधरामृतपान करणें, अशा अर्थाचें स्पष्टीकरण केलें आहे. महाभारतांत (पर्व ३, ११२, १२) चुंबनाचें वरील प्रमाणेंच वर्णन आलें आहे. बौद्ध लोकांच्या जातकांमध्यें चुंब हा शब्द रूढ आहे. परंतु घ्रा व चुंब या दोन शब्दांमधील फरक लक्षांत ठेवला पाहिजे. बाप व मुलगा, व एका कुटुंबांतीलच मंडळी यांच्या संबंधानें घ्रा शब्दाचा उपयोग केला जातो. उलटपक्षी चुंब शब्दाचा उपयोग नवराबायकोसंबंधानेंच केलेला असतो. दोन पुरूष एकमेकांच्या मुखांचें चुंबन करीत नाहींत. हल्ली दक्षिण हिंदुस्थानांत स्त्रिया एकमेकींचीं व पुरूष एकमेकांचीं चुंबनें घेतात. वात्स्यायनानें आपल्या कामसूत्रांत चुंबनाचे सर्व प्रकार दिले आहेत पण त्यांत अवघ्राण नाहीं.
जातकांमध्ये चुंबनाची बरोबर कल्पना असून तें आई व मुलगा यांच्यामध्यें चालत असल्याचें लिहिलें आहे. पण आई मुलाच्या टाळूचें चुंबन करते, व टाळूचें अवघ्राण करते असें जातकांत म्हटलें आहे. पुढें कालांतरानें ''चुंब'' या शब्दाचा ओष्ठपान अगर चुंबन असा अर्थ झाला तरी पण अद्याप त्यांत वास घेणें व चाटणें या दोन अर्थांचा बोध होतोच.
पूर्वी खरें चुंबन कोणालाहि माहित नव्हतें. त्यावेळीं चुंबनाच्या ऐवजीं अवघ्राणाची चाल होती, व पुढें कालांतरानें अवघ्राणाचें चुंबनांत परिवर्तन झाले, हा सिद्धांत संस्कृत वाङ्मयाच्या आधारें सिद्ध केला. यावर कोणी असा आक्षेप घेतील कीं अवघ्राण व चुंबन हीं दोन्हीं कदाचित् पूर्वीच्या लोकांनां माहित असावींत, पण त्यांनीं फक्त एकाचाच उल्लेख केला असावा. याला उत्तर असें आहे कीं, एकंदर ग्रंथांतून प्रणयासंबंधी पुष्कळ गोष्टी आलेल्या आहेत, परंतु त्यांत कोठेंहि चुंब् हा धातु वापरला नाहीं.
पुराणांतून चुंबनाचें जरी उत्कृष्ट वर्णन आलें आहे तरी चुंबनाचें अनेक प्रसंग पुराणांत आढळतील अशी जर कोणाची कल्पना असेल तर ती साफ चुकीची आहे. कारण पुराणांत प्रणयासंबंधाची अगदीं रेलचेल असूनहि त्यांत चुंबनाचे प्रसंग क्वचितच आढळतात. याचें कारण असें कीं, पूर्वी चुंबनाची वहिवाट नसल्यामुळें प्राचीन ग्रंथांतून चुंबनाला शिरकाव मिळाला नाहीं, पण पुढें अवघ्राण मागें पडून चुंबनाची सर्वत्र वहिवाट सुरू झाल्यावर गीतगोविंद आदिकरून पुस्तकांत चुंबनानें धुमाकुळ घातला आहे. कामसूत्रकार वात्स्यायन यानें चुंबन हें मनुष्यस्वभावाला धरून आहे, असें म्हटलें आहे तरी कांहीं प्रांतांतील स्त्रियांनां चुंबनाचा अगदीं तिटकारा वाटतो, असेंहि त्यानें कबूल केलें आहे. ह्या सर्व वादाचा एकंदर निष्कर्ष असा आहे कीं, अगदी प्राचीन कालीं अवघ्राणाची चाल होती, परंतु वेदकालानंतर ती मागें पडून चुंबनाची वहिवाट सुरू झाली. तरी पण कांहीं लोकांनां चुंबनाचा तिटकारा असल्यामुळें बहुतेक प्रणयवर्णनांत चुंबनाचा उल्लेख आढळत नाहीं. ह्यासंबंधींचा पुरावा महाभारतांत (पर्व १३, अध्याय १९ श्लोक ७९) पहावयास सांपडेल. प्रो. हापकिन्स यांच्या मतास आम्हीं पाठिंबा देत नाहीं.