विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुंबकीय दृकशास्त्र - प्रकाश आणि चुंबकत्व यांत असणारा संबंध प्रथमतः फॅराडे यानें दाखवून दिला. त्यानें असें दाखवून दिलें कीं, चुंबकरेषेच्या समान्तर मार्गानें प्रकाशकिरणांनीं कांहीं पदार्थातून गमन केलें असतां त्या किरणांचें ध्रुवीभवन होते. या प्रकारचें ध्रुवीभवन करण्याचा धर्म सर्व पारदर्शक पदार्थांच्या अंगीं आहे. या ध्रुवीभवनाची गति सर्व पदार्थांच्या अंगी सारख्याच दिशेनें असत नाहीं. कांहीं पदार्थातून वामतः (वामावतीं) ध्रुवीभवन होतें व कांहीतून वामेतरतः (दक्षिणावर्ती) ध्रुवीभवन होतें. बहुतेक सर्व पदार्थांतून वामेतरतः ध्रुवीभवन होतें. बामेतर याचा अर्थ विद्युत्प्रवाहाच्या सर्पिलाकृति दिशेनें होणारें ध्रुवीभवन होय. याच्या उलट दिशेनें होणारें ध्रुवीभवन वामतः ध्रुवीभवन होय. व्हर्डट यानें असें दाखवून दिलें कीं, द्रावणाच्या योगानें होणारें ध्रुवीभवन द्रावक आणि द्राव्य यांच्या ध्रुवीभवनाच्या बेरजेइतके असतें. आतां प्राण्याच्या अंगीं वामेतर ध्रुवीभवन करण्याची शक्ति आहे, आणि फेरीसायनाइड ऑफ पोट्याशच्या अंगीं वामध्रुवीभवन करण्याचा धर्म आहे तेव्हां पोट्याशमचा क्षार पाण्यांत विरघळवून त्यायोगें ध्रुवीभवनाचा धर्म अंगीं नसलेलें असे द्रावण तयार करता येणें शक्य आहे. परंतु असल्या द्रावणाच्या अंगीं चुंबकत्वविशिष्टत्व असू शकतें. चुंबकाच्या योगानें होणार्या ध्रुवीभवनाचा रासायनिक घटकावयवांशीं कसा काय संबंध आहे याविषयीची माहिती पर्कीन वाश्मथ जान आणि शाइन्राक यांनीं मिळवून ठेविली आहे.
झीमनचा शोधः- फॅराडे यानें हा शोध लावल्यानंतर त्यानें चुंभकत्वाचा प्रकाशाच्या धर्मावर कांहीं परिणाम होतो काय हें पहाण्याचा फार प्रयत्न केला. परंतु त्याच्या निदर्शनास कांहींच आलें नाहीं. सन १८८५ सालीं फिवेझ नांवाच्या बेल्जियन शास्त्रवेत्त्यास असें दिसून आलें कीं मिठाच्या ज्वालेच्या प्रकाशकिरणानें उत्पन्न होणार्या रेषा विच्छिन्नकिरणदर्शक यंत्रातून पाहिल्यास त्या किंचितशा स्थानभ्रष्ट झालेल्या दिसतात. परंतु त्याच्या या शोधाकडे त्या वेळेस कोणीच फारसें लक्ष्य दिलें नाहीं. सन १८९६ सालीं झीमन याला असें दिसून आले कीं, लिथिअम् आणि सोडिअम यांच्या ज्वालेच्या योगानें विच्छिन्नकिरणदर्शकांतून दिसणार्या रेषा चुंबकत्वविशिष्ट क्षेत्रामुळें रूंदावतात. यावरून या गोष्टीकडें त्यानें विशेष लक्ष्य पुरविले. तेव्हां त्यास असें आढळून आले कीं, क्याडमिअम नांवाच्या मूलद्रव्यामुळें दिसणार्या हिरवट निळ्या रेषा फारच रूंद होतात. कित्येक वेळां विशिष्ट परिस्थितीमुळें एका रेषेच्या जागीं दोन, तीन चार रेषा दिसूं शकतात. यावरून शास्त्रवेत्त्यांनीं प्रकाशलहरींविषयीं निरनिराळीं अनुमानें काढली आहेत. त्यांपैकी एक अनुमान असें आहे कीं, 'क्याथोड किरण' आणि प्रकाशकिरण यांत कांहीं तरी निकट संबंध असावा; व या अनुमानांस गणितदृष्ट्या बराच पुरावा उपलब्ध झाला आहे. सन १८७७ साली कर या शास्त्रज्त्रानें असें दाखवून दिलें कीं, एखाद्या विद्युच्चुंबकाच्या जिल्हई दिलेल्या ध्रुवावर जर ध्रुगीभूत प्रकाश पाडला तर तो प्रकाश वाम किंवा वामेतर दिशेनें वर्तुलाकृति भ्रमण पावतो. याविषयीं पुढें रिर्घा, कन्डट, डुबाईस, सिसिंध, हाल, हुरीअन, काझ, आणि झीमन वगैरे पुष्कळ शोधकांनीं निरनिराळ्या प्रकारानें परिश्रम करून बरीच नवीन माहिती उपलब्ध केली आहे. ती केवळ शास्त्रीय व समजण्यास कठिण अशी असल्यानें येथें दिली नाहीं.