विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुंबकजन्य विद्युद्यंत्र (किंवा डायनामो) — वरील यंत्रामुळें १९ व्या शतकांत यांत्रिक सुधारणेंत फार उपयुक्त आणि महत्त्वाच्या अशा घडामोडी झाल्या आहेत. या यंत्राच्या योगानें उपलब्ध असेल त्या जागीं शक्तीचा उपयोग करून तिचें विजेंत रूपांतर करून तिला दूर अंतरावर पाठवितां येते, आणि त्याच विजेचें फिरून एकवार गतींत रूपांतर करून त्या गतीचा कारखाने चालविण्याकडे उपयोग करतां येतो. किंवा एका ठिकाणीं सर्व शक्ति उत्पन्न करून तिची अनेक ठिकाणीं पाहिजे त्या प्रमाणांत वांटणीं करतां येते. थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे लोकवस्ती आणि व्यापाराचें केंद्र यांपासून दूर अंतरावर असलेल्या धबधबे इत्यादिक नैसर्गिक शक्तीचा उत्तम उपयोग करून घेतां येतो. रेशमानें गुंडाळलेली तार घेऊन त्या तारेचें वेटोळें केलें व त्यांत जर एकदम लोहचुंबक घातला तर त्या वेटोळ्यांत वीज उत्पन्न झालेली दिसून येईल. या विजेचा प्रवाह विद्युत्मापकांत (ग्यालव्हानो मिटर) सोडला तर हा प्रवाह क्षणिक असून जोपर्यंत लोहचुंबक हालत नाहीं तोपर्यंत तो बंद रहातो. परंतु जर वेटोळ्यांतून चुंबक बाहेर काढला तर फिरून एक वार विद्युत्प्रवाह उत्पन्न होतो. परंतु हा प्रवाह पूर्वीच्या प्रवाहाच्या उलट दिशेनें वहातो. चुंबक आणि विद्युत् यांच्यामधील यासंबंधाचा शोध १८३१ सालीं प्रसिद्ध शास्त्रज्त्र फाराडे यानें लावला. आणि तेव्हांपासून या विषयांत प्रगतीच होत आहे. या तत्त्वास अनुसरून अनेकांनीं विद्युज्जनक यंत्रें तयार केलीं आहेत. त्यांपैकीं एका यंत्राची माहिती पुढें दिली आहेः— धावडी लोखंडाच्या तुकड्याभोवतीं रेशमानें गुंडाळलेल्या तारेचे वेढे दिलेले असतात. ह्या लोखंडाचीं अग्रें लोहचुंबकाच्या जवळून जतींल अशी योजना केलेली असते. त्यामुळें उलट सुलट असे प्रवाह जाऊं लागतात. हा प्रवाह दोन अर्ध कंकणें उलटसुलट आंसास जोडलीं आणि त्याला लागून दोन फांट्यांच्या टोंकांवरून घेतला तर येणारा प्रवाह एकाच दिशेनें सतत येतो; कारण ज्या वेळेस प्रवाहाची दिशा बदलते तेव्हां एका कंकणाच्या तुकड्याचा स्पर्श बंद होतो व दुसरीकडे दुसर्या बाजूच्या फांट्यावर तो प्रवाह जातो; म्हणजे प्रवाहाची दिशा कायम रहाते.
आतांपर्यत उपयोगांत आणलेल्या चुंबकजन्य विद्युद्यंत्रांत वापरलेला चुंबक साधा पोलादाचा असे. त्याऐवजीं एखाद्या विद्युद्धटमालेच्या (ब्याटरीच्या) प्रवाहाच्या योगानें उत्पन्न झालेला चुंबक वापरतात. त्याकरितां साध्या लोखंडावर रेशमानें गुंडाळलेल्या तारेचीं वेटोळीं देऊन विद्युत्प्रवाहानें चुंबकत्व उत्पन्न करितात. या चुंबकाचा उपयोग केला तर जास्त फायदा होतो; कारण विद्युत्प्रवाहानें उत्पन्न केलेलें चुंबकत्व फार जोरदार असतें व त्यामुळें जोरदार चुंबक रेषा असलेल्या क्षेत्रांतून जर तारेचीं वेटोळीं फिरवली तर जोराचा प्रवाह उत्पन्न होतो. परंतु अलीकडें चुंबकत्व उत्पन्ना करण्याकडे विद्युद्धटमालेचा उपयोग न करितां त्याऐवजीं चुंबकविद्युद्यंत्रानें (डायनामोनें) उत्पन्न झालेल्या विद्युत्प्रवाहाच्या योगानेंच चुंबकत्व उत्पन्न करण्याची पद्धति प्रचारांत आहे. या पद्धतीमध्यें घटमालेच्या प्रवाहानें उत्पन्न होणार्या चुंबकाच्या शक्तीपेक्षां यंत्र-जन्य-प्रवाहानें उत्पन्न होणारी चुंबकशक्ति जास्त जोरदार असते; व त्यामुळें असल्या प्रकारच्या यांत्रिक रचनेपासून जास्त जोरदार प्रवाह उत्पन्न होतो व प्रवाहाच्या जोराच्या प्रमाणांत फायदा होतो.
कोळशापासून वाफ उत्पन्न करून तिच्या योगानें गति उत्पन्ना केली तर उष्णतेच्या गतींत रूपांतर होत असतांना बर्याच शक्तीचें रूपान्तर न होतांच दुसरीकडे ती व्यर्थ निघून जाते. चुंबकविद्युयंत्राचा (डायनामोचा) उपयोग करून गतीचें विद्युत्प्रवाहांत रूपान्तर केलें तर गति व्यर्थ न जातां ती प्रवाहांत रूपांतर पावते, त्यामुळें अशा यंत्रापासून व्यवहारांत फार फायदा होतो. तसेंच विद्युत्प्रवाह फार दूर अंतरावर नेतां येतो व त्यामुळें व्यापाराच्या केंद्रापासून दूर अंतरावर असलेल्या धबधबे आदिकरून नैसर्गिक साधनांचा उपयोग करतां येतो.
दोन प्रकारचे प्रवाह पाठविणारे डायनामो आहेत. एका प्रकारच्या डायनामोमधून क्षणोक्षणीं उलट सुलट असे प्रवाह येतात आणि दुसर्या प्रकारच्या डायनामोमधून एकाच दिशेनें सतत प्रवाह येतो.
उपयोग.— विजेनें मुलामा चढवितां येतो. त्याकरितां विद्युच्चालक शक्तीचा दाब ५।७ व्होल्टपेक्षां जास्त असतां कामा नये. मुलामा चढविण्याची ५।५० भांडीं एका रांगेनें जोडली असतां यापेक्षां कांहिंसा जास्त असा विद्युच्चालक शक्तीचा दाब असला तरी चालतो. विजेने ट्रॅम, आगगाड्या, गिरण्या, चात्या, दळण्याच्या चक्या वगैरे चालवितात. याकरितां एका दिशेनें वहाणार्या प्रवाहाचा उपयोग करितात. या शिवाय धातु वितळविणें आणि दिवे लावणें या कामाकडे याचा उपयोग होऊं शकतो. परंतु या कामाकडे उलट सुलट येणार्या प्रवाहाचा जास्त फायदेशीर रीतीनें उपयोग करतां येतो. उलट सुलट येणार्या प्रवाहांत एक विशेष गुण आहे कीं, असल्या प्रकारच्या प्रवाहाची विद्युच्चालक शक्ति अतिशय सुलभ रीतीनें कमी जास्त करितां येते व ह्या कामांत शक्तीचा अत्यल्प प्रमाणांत व्यय होतो. एकाच दिशेनें येणार्या प्रवाहांत इतकी सुलभता असत नाहीं, म्हणून दिवे लावणें आणि रासायनिक क्रियेकरितां उष्णता उत्पन्न करणें या दोन्हींहि कामांकडे उलट सुलट येणार्या प्रवाहाचा उपयोग बहुधा करितात.