विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुनार, तहसिल.- संयुक्त प्रांताच्या मिर्झापूर जिल्ह्यांतील एक तहसिल. हिचें क्षेत्रफळ ५६२ चौ.मै. आहे. १९११ सालीं हिची लोकसंख्या १७६०४२ होती. अहरौरा व नार ही दोन शहरें व ५८१ खेडीं आहेत. १९०३-४ सालीं सार्याचें व इतर उत्पन्न अनुक्रमें २८७००० व ४५००० रू. होतें. लोकसंख्येचें प्रमाण दर मैलास ३१४ आहे. हींतून गंगा व तिला मिळणारी जिर्गो या नद्या वहातात. या तहसिलीच्या पश्चिमेस विंघ्याद्री पर्वत व तुरळक टेंकड्या असून पूर्वभागांत मैदान आहे. १९०३-४ सालीं हिची २४२ चौरस मैल जमीन नांगरली होती व त्यापैकीं ३६ चौरस मैल जमिनीस विहिरी, तर्ळी यांतून पाणी पुरविण्यांत आलें.
शहर.— हें तहसिलीचें मुख्य ठिकाण असून गंगेच्या तीरावर वसलें आहे. येथें ईस्ट इंडियन रेल्वेचें स्टेशन आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या १००९१ होती. येथील किल्ला फार जुना आहे. विक्रमादित्याचा भाऊ भर्त्रिनाथ (भतृहरि) याचा येथें मठ होता असें म्हणतात. पहिल्या मुसुलमानी रियासतींत येथील किल्ला पृथ्वीराजाच्या स्वाधीन होता. पुढें त्याच्या मरणानंतर तो मुसुलमानांच्या ताब्यांत गेला. यानंतर एक दोन वेळ धरसोड झाल्यावर पुन्हां हा किल्ला इंग्रजांनीं काबीज करीपर्यंत मुसुलमानांच्याच ताब्यांत होता. कांहीं कालपर्यंत या किल्ल्याचा ताबा शीरशहास मिळाला होता; पुढें १५३७ त हुमायूनानें हा काबीज केला. पण शीरशहानें तो पुन्हां त्याच्यापासून हिसकावून घेतला. मोंगल व पठाण यांच्या झटापटींच्या वेळीं बंगाल व बहार प्रांतांचें नाकें म्हणून या किल्ल्यात बरेंच महत्त्व होतें. १५७५ त हा अकबर बादशहानें काबीज केल्यावर १८ व्या शतकापर्यंत तो मोंगलांच्याच ताब्यांत होता व या नंतर तो अयोध्येच्या नबाबानें हस्तगत केला. १७६४ च्या बक्सारच्या लढाईनंतर हा इंग्रजांच्या हातीं आला. १७८१ त राजा चेतसिंगानें बंड केलें तेव्हां वॉरन हेस्टिंग्ज यानें याच किल्ल्याचा आश्रय घेतला होता. येथे हेस्टिंग्जनें बांधलेलें एक घर आहे.
येथील किल्ला विंघ्याद्री पर्वताच्या रांगेतील एका बाहेरच्या बाजूस असलेल्या खडकाळ टेंकडीवर बांधला असून त्याच्या पायथ्याशीं गंगा नदी वाहते. याची लांबी ८०० यार्ड असून रूंदी १३३ पासून ३०० यार्ड आहे; व उंची ८० ते १७५ फूट आहे. याच्या भिंतीचा घेर २४०० यार्ड आहे. गांव किल्ल्याच्या उत्तरेस गंगा व जिर्गो यांच्या संगमानें झालेल्या कोनांत वसलें आहे. गांवाच्या जवळच शहा कासीम नांवाच्या फकीराचें थडगें आहे. येथें थोडासा व्यापार चालतो व मातीची हलक्या प्रतीची भांडी होतात. येथें चार शाळा आहेत.