विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुना.— जरी चुना, अगदीं शुद्ध स्थितींत सांपडत नसला तरी कार्बनमय लवणाच्या कर्बितरूपांत तो पृथ्वीच्या पृष्ठभागावर पुष्कळ सांपडतो. कर्बित क्षारांतून कर्बाम्ल काढून टाकून, चुनकळी तयार करण्याच्या रीतीला 'चुना भाजणें' अशी संज्त्रा आहे. हा भाजलेला चुना सत्वर पाणी शोषून घेऊन, उमललेल्या अथवा विरविलेल्या चुन्याचें ऊर्फ फक्कीचें रूप धारण करतो.
चुन्याचा दगडः — याला हिंदुस्थानांत अनेक नांवांनीं ओळखतात. परंतु सर्व साधारण नांव म्हटलें म्हणजे चुना हें होय. हा शब्द हिंदुस्थानी भाषांत अनेक रूपें धारण करितो; उ. चुन्हा, चुना, चुनो, चुनक, इ. संस्कृतांत सामान्यपणें याला चूर्ण असें म्हणतात. परंतु कित्येक लेखक चूर्णसुधा शक्तिभस्म अशीहि नांवें देतात. ज्याला इंग्रजींत 'चॉक' म्हणतात, तो पदार्थ 'खडीमाती' या नांवानें ओळखला जातो. 'क्विकलाईम' याला चुना असें म्हणतात आणि 'लाईम स्टोन' याला 'चुनखडी' असें संबोधितात. 'शेल-लाईम' ला 'शिंपीचा चुना', 'लाईमस्टोन-लाईमला' 'कत्तलका चुना' व 'मारबल' ला संगमरवरी दगड अशीं निरनिरळीं नांवें आहेत.
चुन्याचीं मूलद्रव्यें.- ज्यापसून चुना उत्पन्ना होतो अशा द्रव्यांचे अथवा खडकांचे हिंदुस्थानांत तीन वर्ग आहेत. ते खालीलप्रमाणें :— (अ) चुनखडी, डोलोमाईट, मिलिओलाईट वगैरे; (आ) चुना, कंकर व (इ) चुना, शिंप आणि प्रवाळ.
चुनखडीः— चुनखडीच्या दगडांत बहुतेक खटकर्बितच असते. हें खनिजाम्लांत घातलें असतां कर्बद्विप्राणिद वायू निघतो. सिरकाम्ल व खदाम्ल यांशीं संयोग पावून तोच वायू निघतो. कित्येक वेळां यांत इतर धातूंच्या कर्बितांर्चे मिश्रण असतें यामुळें याचा रंग पांढरा असतांहि कधीं कधीं हा निळसर व काळवट रंगाचा सांपडतो. अगदीं शुद्ध स्थितींत असला तरी याचें दगड अगदीं गुळगुळीत व सपाट असतात. बारीक किड्यांच्या हाडांचे सांपळे एकावर एक बसून त्यांचेच चुनखडीचे दगड होतात असें दिसतें. कारण सूक्ष्मदर्शक यंत्रातून हे सांपळे स्पष्ट दिसतात. पोंवळीं करणार्या किड्यांचें सापळेहि कधीं कधीं यांत दिसतात.
हिंदुस्थानांत असें एकहि क्षेत्र नाहीं कीं, ज्यांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपांत चुनखडी सांपडणार नाहीं. हिंदुस्थानांत सांपडणारे कित्येक जातींचे सुंदर पाषाण उत्तमोत्तम संगमरवरी पाषाणांच्या तोडीचे आहेत. मुंबई आणि सिंधमधील कित्येक भागांतील चुन्याचे दगड हे संगमरवरी दगड नसले तरी त्यांची उत्तम इमारती दगडांत गणना होते. दक्षिण हिंदुस्थानांत त्रिचनापल्ली व कोईमतुर येथें स्फटिकमय 'चुन्याचे दगड' आढळतात पण ते फारच हलक्या प्रतीचे आहेत. उत्तम चुनखडी कडापा, कर्नुल, आणि गन्तुर येथें सांपडतात. पालनाड येथें संगमरवरी दगड आढळतात. मध्यप्रांतांत वर्धा, नागपूर, विंघ्याद्रि पर्वत इत्यादि ठिकाणीं पुष्कळ चुन्याचें पाषाण व सुन्दर इमारती दगड आहेत. संयुक्तप्रांतांत मिरझापुर येथें स्फटिकमय पाषाण सांपडतात. पंजाबमधील पुष्कळशा भागांत उत्तम पाषाण व संगमरवरी दगड देखींल सांपडतात.
चुनखडी व चुना यांच्या उत्पत्तिस्थानांसंबंधीं व्यापारीदृष्ट्या खालीलप्रमाणें वर्गवारीं करतां येईलः—
(१) सत्ना, रेवा संस्थात आणि कटनी, जबलपुर जिल्हा. या दोन्ही भागांतून उत्तम प्रकारचा चुना कलकत्त्यापर्यंत जातो.
(२) सिलहट — खाशिया आणि जेंतिया टेंकड्यांच्या पायथ्याशीं नवप्रस्तर युगांतील चुन्याच्या दगडांचा अखंड पुरवठा आहे. पूर्वी कलकत्ता व दक्षिण बंगालची सर्व मागणी य पुरवठ्यांतून पुरी होत असे व अजुनहि येथील बराचसा भाग वरील ठिकाणीं जातो.
(३) रोहटसगड येथील चुनखडीचा शोण कालव्याच्या कामांत पुष्कळ उपयोग करण्यांत आलेला होता. 'सिंगभूम' मधील बिस्त्रा येथील चुनखडीपासून उत्तम चुना करण्यांत येतो.
(४) हिमालय— हिमालय पर्वताच्या पायथ्याशीं चुनखडीचें मोठाले ढीग रचण्यांत येऊन प्रतिवर्षी भाजण्यातं येतात, आणि अशा रीतीनें उमलविलेल्या चुन्याची उंटाच्या पाठीवरून निर्गत करण्यांत येते.
(५) अंदमान— पोर्ट ब्लेअरच्या नजीक फिकट पिंवळ्या रंगाच्या संगमरवरी दगडांचा एक मोठा संचय आहे. या दगडांपासूनहि चुना चांगल्या प्रकारचा निघतो.
या स्थळांशिवाय इतर स्थळांचीं यादी पाहिजे असल्यास 'मॅन्युअल ऑफ दी जीआलजी ऑफ इंडिया' या पुस्तकांत सांपडेल.