विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चुकचि — आर्टिक महासागर व बेरिंग समुद्र यांच्या किनार्यावरील सैबेरियाच्या अगदीं पूर्वेकडील प्रदेशांत रहाणार्या मंगोल महावंशाचे लोक. कोलिमा नदी व बेरिंगची सामुद्रधुनी यांच्यामधील आर्टिक महासागराच्या किनार्यावर हे लोक लहान लहान जमाव करून राहिले आहेत. ते उंच व सडपातळ असून त्यांचे चेहरे ओबडधोबड आहेत. या जातींत एस्किमो लोक मिसळलेले आहेत. चुकचि लोकांचें डोकें गोल व गालाचीं हाडें वर आलेलीं असून गाल इतके वर आलेले असतात कीं दोन गालांवर रूळ ठेवला असतां तो नाकाला लागत नाहीं. ते अमुर नदीच्या कांठच्या प्रदेशांतून आले असावे; असें म्हणतात. मानवशास्त्रदृष्ट्या ही जात म्हणजे मंगोल व अमेरिकेंतील इंडियन महावंश यांनां जोडणारा सांखळीचा दुवा म्हणतां येईल.
चुकचि लोक शांत व सुस्वभावी आहेत, परंतु यांच्यांत म्हातारे व पंगू यांनां ठार मारण्याची चाल आहे. पुनर्जन्मावर त्यांचा विश्वास आहे परंतु आकस्मिक मरणामुळेंच तो प्राप्त होतो असा त्यांचा समज आहे. व याकरितांच आईबापांनां ठार मारणें हें मातृपितृ प्रेमाचें चिन्ह मानलें जातें. चुकचि लोक नांवाला मात्र ख्रिस्ती संप्रदायाचे आहेत परंतु बळि देण्याची चाल त्या लोकांत आहे. ते प्रेतांचें दहन करतात अथवा तीं गिधाडांकडून खाववितात.