प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चीन — हा पूर्वआशियांतील एक देश आहे. व चिनी साम्राज्याचा मुख्य भाग आहे. मांचुरिया, मांगोलिया, तिबेट आणि सिनक्यांग (पूर्वतुर्कस्तान, कुलजा वगैरे म्हणजे उत्तरेकडे मांगोलिया व दक्षिणेकडे तिबेट यामध्यें असणारीं संस्थानें) हे चिनी साम्राज्याचे दुसरे भाग होत. हा देश २०० ते ५०० उत्तर अक्षांशांत व ८०० ते १३०० पूर्व रेखांशांत वसला आहे. ह्यांचें क्षेत्रफळ ४३ लक्ष चौरस मैल आहे. उत्तरेस आशियांतील रशिया ६००० मैलांच्या सरहद्दीवर पसरला आहे. पूर्वेस कोरिया, चीनचा समुद्र व पीत समुद्र आहेत. दक्षिणेस व नैॠत्येस चीनचा समुद्र, फ्रेंच इंडोचीन, ब्रह्मदेश व हिमालयांतील संस्थानें आहेत. पश्चिमेस हा देश फारच निमुळता झाला आहे.

खरा चीन देश अथवा अठरा परगणे साम्राज्याच्या आग्नेय भागांत आहेत. याच्या उत्तरेला मांगोलिया, पश्चिमेस तुर्कस्तान व तिबेट, दक्षिणेस टाँकिन व टांकिनचें आखात, पूर्वेस चीनचा समुद्र, पीतसमुद्र, चिलीचें आखात आणि मांचुरिया आहेत. ह्यांचे क्षेत्रफळ सुमारें १५,००,००० चौरस मैल आहे. उंच डोंगरपठारें, व पर्वतांच्या ओळी  यामुळें हा देश आशिया खंडापासून वेगळा पडला आहे. नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वहात जातात. एकंदरींत चीन देशाला समुद्रमार्गाखेरीज जगाशीं दळणवळणाचा दुसरा मार्ग नाहीं असें म्हटलें असतां चालेल.

स्व रू प व र्ण न.— पश्चिम चीन डोंगराळ प्रदेश आहे. व येथील लोकवस्ती विरळ आहे. पूर्वचीन सखल प्रदेशांत मोडत असून येथील लोकवस्ती दाट आहे. किनार्‍याची एकंदर लांबी ४५०० मैलांपेक्षां जास्त आहे. परंतु किनारा अर्धचंद्राकृति आहे. फोर्मोसा आग्नेय किनार्‍यासमोर आहे. ईशान्य भागांतील सपाट मैदान फार महत्त्वाचें आहे. हे ७०० मैल लांब असून १५० पासून ५०० मैल रुंद आहे. या मैदानाचा बराच भाग समुद्राकडे उतरता होत गेला आहे.

पर्वत :— पूर्व तिबेटांत कुएनलुन पर्वत आहे. वायव्य भागांत लुंगशांग, रिचयोपेन व नानशान या पर्वतांच्या ओळी आहेत. रिचयोपेन पर्वताचीं शिखरें २०००० फूट उंच गेलेलीं आहेत. झेचुएन प्रांताच्या उत्तरेला मिनशान व किऊलुंग ओळी आहेत.

नद्या व कालवे :— चीन देशांत पुष्कळ नद्या व कालवे आहेत. उत्तरेकडील नद्यांतून लहान होड्या जातात. दोन सर्वांत मोठ्या नद्या यांगत्सीक्यांग व हवांगहो या होत. हवांगहो (पिवळी नदी) नदीची लांबी २४०० मैल आहे. हिला वैहो हीच कायती महत्त्वाची नदी येऊन मिळतें. ही नौकागमनास योग्य अशी नदी नाहीं. शिवाय पुरामुळें आजूबाजूच्या प्रदेशांस धोका असतो. या कारणास्तव या नदीच्या कांठांवर मोठीं शहरें नाहींत. यांगत्सीक्यांग ही चीन देशांतील फार महत्त्वाची नदी होय. ही देशांतील मध्यभागांतून २९०० मैल लांब वहात जाऊन पीत समुद्रास मिळतें. हिच्या कांठांवर दाट लोकवस्तीचीं व संपत्तीनें भरलेली शहरें आहेत. मिन, हानक्यांग अथवा हान या यागत्सिक्यांगला मिळतात. चीनच्या आर्थिक, व व्यापारी भरभराटीस हीच नदी कारणीभूत झाली आहे है्वहो नांवाची दुसरी मोठी नदी वरील दोन नद्यांच्या मध्यभागीं आहे.

यांगत्सिक्यांगच्या खालोखाल युनहो अथवा मोठा कालवा हा नाव्य आहे. हा कृत्रिम कालवा चहक्यांग प्रांतांतील हांगचौपासून चिहली प्रांतांतील तीन्त्सीनपर्यंत आहे. तीन्त्सीन येथें हा पैहोला मिळाला असल्यामुळें पेंकिंगजवळ तंगचौपर्यंत जातो असें म्हटलें तरी चालेल. ह्या कालव्याची लांबी ३६३० ली अथवा १२०० मैल आहे. कालव्याचा सर्वांत प्राचीन भाग यांगत्सि व हवैहोमध्यें आहे. हा भाग इ. स. ४८६ सालीं बांधला असावा असें कनफ्यूशीयसच्या पुस्तकावरून कळतें. ३र्‍या शतकांत ह्या भागाची दुरुस्ती करण्यांत आली. बाकीचा भाग वेगवेगळ्या काळांत बांधला गेला. पैहो (लांबी ३५० मैल) नदींतून पेंकिगला जातां येतें. म्हणून ही महत्त्वाची समजली जाते. दक्षिणेकडील प्रांतांत सिक्यांग अथवा पश्चिम नदी प्रसिद्ध आहे. हिची लांबी १००० मैल आहे. हिला वेगवेगळी नांवे आहेत.

सरोवरें :— चीन देशांतील मध्यभागांत पुष्कळ सरोवरें आहेत. सर्वांत मोठें तंगसिंग नांवाचें सरोवरा हुनानमध्यें आहे. निरनिराळ्या भागाला येथील लोकांनीं निरनिराळीं नांवे दिलीं आहेत. तंगसिंगच्या पूर्वेस १८० मैलांवर पोयांग सरोवर आहे. सुचौफूच्या नजीकचें ताई सरोवर आकारासाठीं व आजूबाजूच्या रम्य देखाव्याबद्दल प्रसिद्ध आहे. याशिवाय आणखीं कांहीं लहान सरोवरें आहेत.

मोठी भिंत :— परकीय लोकांच्या स्वार्‍यांपासून बचाव होण्यासाठीं बांधलेली चीन देशांतील प्रसिद्ध भिंत, चिहली, शान्सी, शेनसी आणि कान्स या प्रांतांच्या उत्तरसिमेवरून जातें. ही भिंत बांधण्यास इ. स. पूर्वी ३ र्‍या शतकांत सुरुवात झाली. १५ व्या शतकांत हिची दुरुस्ती केली व १६ व्या शतकांत ही ३०० मैल वाढविली. हिची एकंदर लांबी १५०० मैल आहे. लाओसंग आखातावरील ज्ञान है क्वान येथील समुद्रकिनार्‍यापासून ह्या भिंतीची सुरवात होऊन पेकिंगच्या पूर्वबाजूनें जाऊन हवांगहोपर्यंत गेली आहे. पेकिंग व हवांगहोच्या दरम्यान आंतील व बाहेरील अशा दोन भिंती आहेत. भिंतीची उंची २० पासून ३० फूट आहे. २०० यार्डांच्या अंतरावर ४० फूट उंचीचे बुरूज बांधले आहेत. पाया १५ ते २५ फूट खोल असून भिंत १२ फूट रूंद आहे. मुख्य दरवाजावर अजून लष्करी पहारा असतो.

हवामान :— चीन हा अवाढव्य देश असल्यामुळें येथील हवा निरनिराळ्या ठिकाणीं निरनिराळी आहे. युनान, क्वांगसी व क्वांगटुंग असलेला दक्षिण भाग (त्यांत कँटन शहर आहे) उष्ण कटिबंधांत आहे. उत्तर भागाची (यांत पेकिंग शहर आहे) हवा उत्तर यूरोपसारखी आहे. येथील हिवाळा अतिशय कडक आहे. मध्यभाग समशीतोष्ण कटिबंधांत आहे. येथील पावसाचें मान अनिश्चित आहे.

प्रांत :— खर्‍या चीन देशाचे खालीं दिल्याप्रमाणें भाग होतात. चेहक्यांग, चिहली, फुकिएन, आनुहुई, होनान, हुपेह, कानसु, क्यांगसी, क्यांगसु, क्वांगसी, क्वांगतुंग, क्वैचौ, शान्सी, शानतुंग, शेनसी, झेचुएन आणि युनान.

लो क व स्ती— लोकवस्ती दाट असल्याबद्दल चीन देशाची बरीच प्रसिद्धि आहे. चीनमध्यें व्यवस्थित खानेसुमारी नसल्यानें लोकसंख्या बिनचूक देणें अशक्य आहे. १९१६ च्या कस्टम्स खात्याच्या रिपोर्टावरून चीनची लोकसंख्या (मँचुरीयाचे ३ प्रांत धरून) ४४५८७३००० होती असें दिसते. मध्यचीन देशांत एकंदर लोकसंख्येच्या तृतियांश लोकसंख्या आहे.

चिनी लोक वसाहत करण्यांत प्रसिद्ध आहेत. त्यांनीं मांचुरिया, मांगोलिया व तुर्कस्थान येथील जमिनीची मशागत करून शेतीच्या कामास योग्य केली. इंडोचायना, मलाया पूर्वेकडील देशांत चिनी मजूर शेतकरी व व्यापारी आहेत. १० व्या शतकांत आफ्रिकेच्या किनार्‍यावर चिनी वसाहती होत्या. कॅलिफोर्निया येथील सोन्याच्या खाणींसाठीं व इतर ठिकाणीं मजूर म्हणून पुष्कळ चिनी लोक गेले. परंतु त्यांच्या साध्या रहाणीमुळें व द्वेषामुळें युनायटेडस्टेट्स, आस्ट्रेलिया, कानडा या देशांत चिनी मजुरांविरुद्ध कायदे करण्यांत आले आहेत. वेस्टइंडिज व दक्षिण अमेरिकेंत मुदतबंदीचे मजूर आहेत.

सा मा जि क स्थि ति :— १९०४-५ च्या रुसोजपानी युद्धानें पूर्वेकडील देशांत जी जागृति उत्पन्न झाली त्याचा परिणाम चीन देशांत सुद्धां दृष्टीस पडूं लागला. हा फरक किती प्रमाणांत आहे हें सांगणें कठिण आहे. कारण चिनी लोक मूळचे पुराणप्रिय, त्यांची संस्कृति अतिशय प्राचीन, त्यांचीं नीतितत्त्वें अजून देखील तींच आहेत. कांहीं बाबतींत चिनी मनुष्य युरोपियन लोकांपेक्षां कमी दर्जाचे असतील पण हा फरक त्यांच्या सुधारणेच्या विरुद्ध धोरणामुळें असतो. त्यांचा व्यवहार गतानुगतीक धोरणावर असतो. सामाजिक व राजकीय रचना कुटुंबपद्धतीवर आहे. बाप कुटुंबाचा मुख्य असतो. राष्ट्र हें एक मोठें कुटुंब असून सरकारची सत्ता ही बापाच्या ठिकाणीं असते. मुलाचे गुणावगुणांवर बापाचा मानापमान अवलंबून असतो.

या पद्धतीमुळें मरणानंतरचे होणारे विधी यांनां महत्त्व आलें आहे. वडील मुलगा अथवा दत्तक पुत्र यांनीं मृताच्या आत्म्यास आहुती, कागदाच्या केलेल्या सर्व वस्तू, वगैरे गोष्टी अर्पण करावयाच्या असतात. सुतक तीन वर्षेंपर्यंत पाळावें लागतें. व सुतकांत पांढरी वस्त्रें धारण करून सुतक पाळणारानें मांस, दारू व सार्वजनिक उत्सव यांपासून अलिप्‍त रहावें लागतें. अशाच तर्‍हेचे विधी लग्न व सामाजिक उत्सव यांनांहि लागू आहेत. मध्यवर्ति सरकाराचें विधींचें खातें म्हणून एक वेगळें खातें आहे. मुलांची लग्नें लहान वयांत ठरविलीं जातात. वर व वधू यांचे आईबाप सर्व गोष्टी ठरवितात. खुद्द वर व वधू यांनां लग्नाच्या बाबतींत कांहींच अधिकार नाहीं. लग्नाचा शेवटला विधी म्हणजे नवर्‍यानें बुरखा उचलून नवरीचा चेहरा पहाणें हा होय.

चिनी लोकांचे चार सामाजिक वर्ग आहेत ते असे :— विद्वान शेतकरी, कारागीर व बनिये. पिढीजात सरदारी वर्ग येथें नाहीं. अधिकारी वर्गाला जास्त मान दिला जातो. कांहीं चिनी घराण्यांत वंशपरंपरेनें पदव्या असतात. ''येनचे पवित्र ड्यूक'' हीं मुख्य पदवी आहे. चीनी लोकांचीं लहान लहान शेतें असतात. संपत्तीची वांटणी सारखी करावी लागते. एका वारसालाच सर्व संपत्ति देतां येत नाहीं. त्यामुळें फारच लहान शेतें सर्वत्र ठिकाणीं सांपडतात. सरकारी नोकरींत पेनशन घेतलेल्या लोकांचा वर्ग इतर देशांतील बड्या लोकांच्या सारखा असतो. आईबापांना मुलें गुलाम म्हणून विकतां येतात. स्त्रीगुलामांची संख्या जास्त आहे. चिनी लोकांनां मुलगा झाल्यानें आनंद होतो. कारण स्त्रियांचा दर्जा कमी समजला जातो. स्त्रीला लग्नापूर्वी बापाच्या, लग्नानंतर, नवर्‍याच्या व वैधव्यांत मुलांच्या आज्त्रेंत रहावें लागतें. अनेक स्त्रिया करण्याची चाल चीन देशांत आहे. केव्हां केव्हां पहिली बायको म्हातारी होत चालली म्हणजे स्वत:च दुसरी बायको पाहून देते. दुसर्‍या बायकांनी पहिलीच्या आज्त्रेंत असलें पाहिजे. वरिष्ठ वर्गांतील स्त्रियांना यापेक्षां चांगल्या रीतीनें वागवितात. पायांची वाढ खुंटवून ते लहान ठेवण्याची चाल चीन देशांत बरेच दिवसांपासून आहे. हक्का स्त्रिया मात्र ही चाल पाळीत नाहींत. मुलाचा जन्म झाल्याबरोबर तो एक वर्षाचा आहे असे समजतात.  जन्मदिवशीं त्याला दुसरें वर्ष लागलें असें समजतात.

चीन लोक नव्या वर्षाचा पहिला दिवस सणाचा म्हणून पाळतात. भेटीच्या वेळीं हस्तान्दोलन अथवा चुंबनादि प्रकार न करतां हात जोडून नमस्कार करणें, दंडवत करणें इत्यादि गोष्टी करतात. डोक्याचा कपडा व जोडे या बाबतींत काय तो पुरुष व स्त्रियां यांच्या पोषाकांत फरक असतो बाकी इतर बाबतींत त्यांचे पोषाक सारखे असतात असें म्हणण्यास हरकत नाहीं. चिनी स्त्रिया चेहर्‍याला रंग लावितात. दक्षिण चीनांतील मुख्य अन्न भात आहे. परंतु उत्तरेकडे तांदुळाखेरीज बाजरी नाचणी वगैरे धान्य खातात.

चिनी लोक कोणत्या वस्तू खातात यांची मोजदाद करणें सोपें नाहीं. तांदुळापासून काढलेली एक तर्‍हेची दारू हे लोक पितात. चहा जेवणाच्या अगोदर व नंतर पितात. पाकशास्त्रांत चिनी लोक फ्रेंचांच्या खालोखाल आहेत. चिनी लोकांचा मांगोलियन वंशांत समावेश होतो. कित्येकांच्या मतें  मुळची शाखा वायव्येकडून आली असावी व कित्येकांच्या मतें ती मध्यचीन देशांतील असावी. चीनी लोकांचीं गालाचीं हाडें उंच असतात व रंग बहुतकरून पिंवळा असतो.

चीनमधील समाजाची पितृसत्ता व पितृपूजा या दोन तत्त्वांवर उभारणी झाली आहे. चीनचा पाश्चात्य संस्कृतीशीं जसजसा संपर्क अधिक येत चालला त्या त्या मानानें चीनमध्यें नवीन नवीन कल्पना उदयास येत चालल्या. प्राचीन चालीरीतींविरूद्ध या नवीन पद्धतीनें शिकलेल्या लोकांची बंडें करण्यास सुरुवात केली. यूरोपीयन व अमेरिकन मिशनर्‍यांनीं चीनमध्यें पुष्कळ शिक्षणसंस्था काढल्या व त्यामुळें चीनमधील समाजाच्या मूलभूत तत्त्वावर आघात होऊं लागले तरी पण एकंदरीनें चीनमधील मागसलेल्या समाजांत पूर्वीच्याच भावना अद्यापि खिळून आहेत. अद्यापीहि बहुतेक चिनी लोक आपले राष्ट्रीय पंचांगच वापरतात. चीनमध्यें मोफत व सक्तीचें शिक्षण, लष्करी शिक्षण, इत्यादि गोष्टी प्रचारांत आल्या आहेत. तथापि यांचा अंमल फारसा होत असलेला आढळत नाहीं. स्त्रियांच्या सुधारणेसाठीं जी चळवळ १९१२ मध्यें सुरू करण्यांत आली ती जरी बरीच फैलावली असली तरी सामान्य जनता अद्यापीहि स्त्रियांच्या सुधारणेच्या बाबतींत उदासीनच आहे.

हाँगकाँग बंदरावरील नवीन पुलाचें बांधकाम सुरू असतांना परकी लोक जिवंत मुलांचे तेथें बळी देणार आहेत अशी हूल उठल्यामुळें इंग्रज अधिकार्‍यांनी खानेसुमारीस सुरुवात केली, तेव्हां आइबापांनीं आपलीं मुलें लपवून ठेविलीं होती.

जु ना ध र्म.— चीन देशांतील जुना धर्म एकेश्वरी पंथाचा होता. या अखिल विश्वाचा एकच शास्ता असून तो सद्‍गुणांचा पुरस्कर्ता व दुर्गुणांचा द्वेष्टा आहे अशी समजूत होती. हा शास्ता सृष्टिकर्ता समजला जात नसे. याला टिएन म्हणजे आकाश अशी संज्ञा प्राप्‍त झाली. हळूहळू शागटी अशी दुसरी संज्ञा प्रचारांत येऊं लागली. या दोन्हीं संज्ञा एकाच देवाच्या वेगवेगळ्या रूपास लावीत. पुढें सूर्य, चंद्र, ग्रह आणि तारे यांची पूजा सुरू झाली. पृथ्वीची पूजा व इतर सृष्ट पदार्थांच्या पूजा होऊं लागल्या. पूर्वजांची पूजा व त्यांच्या नांवानें केलेले हवन इत्यादि गोष्टी प्रचारांत येऊन त्या अजून देखील चालू आहेत.

ता ओ  ध र्म.— लाओत्झु याच्या एका शिकवणीवरून एका तर्‍हेच्या धर्मतत्त्वांची मांडणी नंतरच्या लेखकांनीं केली. खुद्द लाओत्झु यानें ताओ म्हणजे मार्ग. या तत्त्वाचा पुरस्कार केला. याच तत्त्वावर धर्ममतांची रचना झाली. या मार्ग शब्दांचे पुढें बरेंच अर्थ झाले. परंतु बुद्धधर्मानें या धर्मास मागें टाकलें. ताओधर्मानें बुद्ध धर्मांतील कांहीं वाईट गोष्टी घेतल्या. सध्यां या दोन्ही धर्मांत फारसा फरक साधारण लोकांस दिसत नाहीं.

बु द्ध ध र्म.— बुद्धधर्म चीन देशांत केव्हां सुरू झाला हें नक्की सांगतां येत नाहीं. तरी अशी दंतकथा आहे कीं, बादशहा मिंगती (५८-७६) याला स्वप्नात सोन्याच्या रंगाचा मनुष्य दिसला. बादशहाच्या एका बंधूनें हा मनुष्य म्हणजे साक्षात् शाक्यमुनि बुद्ध असावा असें अनुमान काढलें. यावरून बुद्धधर्माची माहिती चिनी लोकांस अगोदरपासून झाली असली पाहिजे असा तर्क चालतो. तरी इ. स. पूर्वी २१७ व्या वर्षी बुद्धधर्माचा शिरकाव चीन देशांत झाला असावा. कारण त्यावेळीं कांही शामन धर्मप्रसारकांना कैदेंत टाकलें होतें. एवढेंच सांगतां येईल कीं, मिंगतीच्या स्वप्नापासून बुद्धधर्माला विशेष मान मिळूं लागला. इ. स. ६५ त १८ लोकांचें एक धर्ममंडळ पाठवून खोतानमध्यें या धर्माची माहिती मिळविली व ६७ त हें मंडळ बौद्धग्रंथ, मूर्ती व काश्यपमदंग नांवाचा भिक्षु यांसह परत आले. चवथ्या शतकानंतर चिनी लोक भिक्षू होऊं लागले. पुष्कळ भिक्षू हिंदूस्थानात जाऊं लागलें. ४०१ सालीं कुमरजीव हा गाओसिंग बादशहाच्या दरबारीं येऊन राहिला. ४०५ सालीं हा आचार्य झाला व यानें बौद्धग्रंथांवर टीका लिहिल्या. ५१० त बोधिधर्म (चिनी याला टामो नांवानें ओळखतात) हा कँटन शहरी बौद्ध आचार्यांच्या पवित्र पात्रासह आला. हळूहळू बौद्धधर्माची छाप चांगली बसली. ११व्या शतकाच्या नंतर बुद्धधर्म सुरळीत चालू झाला व सध्या सर्व चीनभर त्याचा प्रसार झाला आहे. १ल्या शतकांत कनिष्काच्या वेळेस महायान व हीनयान असे दोन भेद झाले. चीन देश पहिल्या प्रकारांत येतो. महायानांत मूलतत्त्वें कायम ठेवून इतर सुधारणा करण्यांत आली.

म झ् द ध र्म :— ७व्या शतकांत मझद धर्म अथवा झोरोअ‍ॅस्टरचा धर्म चीनदेशांत प्रथम सुरू झाला. यात अग्निपूजा मुख्य आहे. परंतु या धर्माचा विशेष भरभरराट झाला नाहीं. व ९व्या शतकांत याचा मागमूस देखील राहिला नाहीं.

मु स ल मा नी  ध र्म :— महमदाचा मामा वाहब-अबी-काभा हा कांही मुसुलमानांसह ६२८ त बादशहास नजराणा घेऊन आला व येथेंच राहिला. यानें सर्व चीनभर प्रवास केला. या नंतर खलिफ अबुग्याफरने ७५५ सालीं ४००० अरबांचे सैन्य बंड मोडण्यासाठी पाठविलें. ते लोक येथेंच राहिलें; व सध्याचे चिनीमुसलमानाचे तेच पूर्वज होत. ४थ्या शतकांनंतर चेंगिझखानाच्या विजयानंतर पुष्कळ अरब येथें येऊन राहिले व लोकांत मिसळले. सध्या मुसलमान लोक इतर लोकात इतके मिसळले आहेत. कीं, त्यांच्यात फरक दाखविणें कठीण आहे. आज पन्नास लाखांपासून एक कोटीपर्यंत मुसलमान लोक चीन देशांत आहेत.

नेस्टोरियन ध र्म :— ६३१ त नेस्टोरियन लोकांचें धर्ममंडळ चीन देशांत आलें व त्यांनीं ख्रिस्तीधर्माचा प्रसार सुरू केला. बादशाही फर्मानानें (६३८) यांनां बर्‍याच सवलती मिळाल्या. परंतु १३व्या शतकापासून याचा कायमचा नायनाट झाला.

म णि सं प्र दा य :- खाल्डीयन मणि याला पूज्य समजणारे मणिसंप्रदायी लोक ६९४ सालीं चिनांत आले. परंतु ९ व्या शतकाच्या सुमारास या धर्माचा लोप झाला.

य हु दी ध र्म — इतर दंतकथांप्रमाणें मिळालेली माहिती वगळली तरी यहुदी लोक प्रथम सन ११६३ त चीन देशांत आले असें अनुमान काढण्याला कांहीं हरकत नाहीं. यांनी आपल्या धर्माचा फार थोडा प्रसार केला. हे लोक हळूहळू कमी होत चालले. व इतर लोकांत इतके मिसळले कीं, त्यांनां यहुदी म्हणून ओळखणें कठीण होतें. तरी ते आपला संप्रदाय गुप्‍त रीतीनें पाळतात.

याशिवाय खिस्तीधर्मप्रसार सन १८६० पासून सुरू झाला.  सध्यां रोमन कॅथोलिक व प्रोटेस्टंट या दोन्हीं पथांचे बरेच अनुयायी आहेत. उदा. १९२० सालीं १९९४४८३ रोमन कॅथॉलिक चिनी ख्रिस्ती व ६१८६०१ प्रॉटेस्टंट ख्रिस्ती होते. ५००० बाप्टाइज्ड चिनी आहेत. प्रॉटेस्टंट मिशनला जोडून २७ युनिव्हर्सिटी कॉलेजें, २५६ मध्यम शिक्षणाच्या (मिडल) शाळा व ५८१ उच्च प्राथमिक शिक्षणाच्या शाळा आहेत.  

शि क्ष ण व  व र्त मा न प त्रें — १९ व्या शतकाच्या शेवटपर्यंत चीनमध्यें जुन्या ग्रंथांचे अध्ययन हेंच शिक्षण होतें. प्राथमिक शिक्षणाची सोय सराकरनें केली नव्हतीं. चांगल्या स्थितींतले लोक खासगी शिक्षक ठेवीत असत. गरीब लोकांची मुलें शाळेत जात. या ठिकाणीं मुलगे ४-५ वर्षेपर्यंत ग्रंथ मुखोदगत करीत. नंतर पत्रलेखन व सोपें लेखन शिकत. दुय्यम शिक्षणाची सोय जरा चांगली होती. सार्वजनिक खर्चाने प्रांताच्या मुख्य ठिकाणीं व इतर मोठ्या शहरांत विद्यालयें असत. सरकारी नोकरीत शिरून बहुमानाच्या जागा विद्येवर मिळत. यामुळें या शिक्षणाची जास्त सोय होती. सिऊत्साही, चूजेन व चिनशिह या तीन पदव्या असत. शेवटची पदवी पेकिंगला पास झालेल्यांनां मिळत असे. पाश्चात्य पद्धतीवर शिक्षण देणार्‍या संस्था प्रथम रोमन कॅथोलिक मिशनर्‍यांनीं सुरू केल्या. यांनीं १८५२ त एक विद्यालय स्थापिलें. शिवाय विश्वविद्यालय वैद्यकशाळा, मुलींच्या शाळा इत्यादि गोष्टी मिशनरी लोकांनीं केल्या.

१८६१ त पेकिंग व कँटन येथें विद्यालयें स्थापून सरकारनें पाश्चात्य पद्धतीवर शिक्षणाचा पुरस्कार केला. परंतु बास्कर बंड होईपर्यंत या शिक्षणाची जास्त महती चिनी लोकांनां व सरकारला कळली नाहीं. १९०२ सालीं पेकिंगला एक विश्वविद्यालय स्थापिलें. रुसो जपानी युद्धानंतर नवीन शिक्षणपद्धतीचा पुरस्कार करण्यांत आला.

१९१० सालीं प्राथमिक व दुय्यम शिक्षणाच्या बर्‍याच शाळा स्थापन झाल्या. प्रत्येक प्रांतांत एकेक विश्वविद्यालयाची स्थापना झाली. परदेशांत विद्यार्थी शिक्षणासाठीं पाठविण्यांत आले. आज चीनमध्यें शिक्षणाचा अहवाल पुढील प्रमाणें आहे. सरकारी शिक्षक (नार्मल) शाळा दोन प्रकारच्या (उच्च व सामान्य) आहेत. उच्च ३ व सामान्य २७५ आहेत; प्राथमिक शाळा उच्च व खालच्या दर्जाच्या (नागरिक शाळा) अशा दोन प्रकारच्या आहेत. उच्च प्रा. शाळा १०२३६ असून सरकारी  आहेत. नागरिक शाळा १६७०७६ आहेत. पैकीं बर्‍याच खासगी खर्चानें चाललेल्या आहेत. उद्योगधंद्याच्या शाळा खालच्या व वरच्या अशा दोन प्रकारच्या आहेत. १० सरकारी विश्वविद्यालयें आहेत. या खेरीज मिशनर्‍यांनी चालविलेल्या शाळा, कॉलेजें व विश्वविद्यालयें आहेत. बरेच चिनी विद्यार्थी परदेशी शिक्षणाकरितां जातात. सरकारी खर्चानें राहाणारे सुमारें १२०० चिनी विद्यार्थी ग्रेटब्रिटनमध्यें व ७०० अमेरिकेंत आहेत. खासगी खर्चानें राहाणारे निराळेच. पेकिंग गॅझेट हें सर्व जगांत जुनें वर्तमानपत्र समजलें जातें. परंतु यांत बादशाहीफर्मानें, सरकारी हुकूम व इतर गोष्टी प्रसिद्ध होतात. यावरून याला वर्तमानपत्र म्हणता येणार नाहीं. १८७० पासून वास्तविक वर्तमानपत्रें प्रचारांत येऊ लागलीं. सध्या १००० वृत्तपत्रें व नियतकालिकें चीनमध्यें प्रसिद्ध होतात. १९१७ च्या वाङ्‌मयविषयक ठरावामुळें साध्या भाषेंतलें प्रकाशन अधिक उत्तेजित दिसतें. ५०० पर्यंत वाचनालयें व १९०० व्याख्यानगृहें व ७३३ फिरते व्याख्यानसंघ या देशांत आहेत.

शे त की व उ द्यो ग धं दें — चीन देशांत बहुतेक लोक शेतकरी आहेत. येथील शेतें लहान आहेत. जुन्या पद्धतीनें लागवड होते. मेंढ्या, गुरेढोरें यांचे कळपच्या कळप पाळतात. जंगल खात्याकडे दुर्लक्ष आहे.

चिनी शेतकरी फार मेहनती असतात. तांदूळ सर्व देशभर पिकतो. याच्या खालोखाल चहा व कापूस पिकतो व या नंतर ऊस, खसखस व बांबू यांचा नंबर लागतो. याशिवाय वेगवेगळ्या तर्‍हेची फळफळावळ चीन देशांत होतें.

अफू :— १९२१ सालीं अफूच्या लागवडीची चीनमध्यें अभिवृद्धि आली. इंग्लंडनें या गोष्टीचा निषेध केला व 'लिग ऑफ नेशन्स'नें ती बाब विचारांत घेतली. कित्येक प्रांतांतील लष्करी अधिकारी, सैन्याचा पगार भागविण्याकरितां अफूची पैदास करण्यास भाग पाडीत असत. अफूच्या बंदीमुळें अफूच्या अर्काच्या व्यापारास तेजी आली. इंग्लंड व अमेरिका यांनीं तयार केलेला खंडोगणती मॉर्फिया येथें विकला जात असे व जपानी लोक जकातचोरीनें तो माल चीनमध्यें नेत असत. कानसू व हूनन येथें खसखसीची लागवड करण्याची मुभा देण्यांत चीननें विश्वासघात केला अशी ओरड इंग्लंडनें १९११ नोव्हेंबरमध्यें केली होती. १९२४ नोव्हेंबरच्या जिनोव्हा परिषदेत, आपल्या नियंत्रणाबाहेरच्या कांहीं खासगी लोकांच्या कृत्याबद्दल आपण जबाबदार नाहीं असें चीननें बजाविलें होतें.

खनिज :— खनिज पदार्थ विपुल आहेत. पण परकीयांनां खाणी खणण्याची परवानगी दिली नाहीं. यामुळें खनिज पदार्थांचा व्यापारास मुळीच उपयोग झाला नाहीं. खाणी व्यापारी खात्याच्या अंमलबजावणीखालीं येतात. कोळसा, लोखंड, तांबें व कथील हे मुख्य पदार्थ आहेत. शानसी प्रांतांत सर्वांत मोठी कोळशाची खाण आहे. लोखंड देखील कोळशाच्या खाणीजवळच शानसी प्रांतांत व इतर ठिकणीं सापडतें. सोनें व चांदी यांच्या लहान खाणी देखील आहेत. १९१३ सालीं व्यापारी खात्याच्या मंत्र्यानें खाणींसंबंधीं कांहीं नियम तयार केले. या नियमांमध्यें जी एक प्रमुख गोष्ट गोंवण्यांत आली ती म्हणजे संस्थानांतील सर्व खाणींवर सरकारचा ताबा आहे ही होय. पण खाणींतील खनिज पदार्थांवर जबर जकात बसविण्यांत आल्यामुळें या धंद्याला जितकें उत्तेजन मिळावें तितकें मिळालें नाहीं. १९१६ मध्यें खाणीबाबत नवीन नियम करण्यांत आले. पण लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांनां अशी भीति वाटत होती कीं जर खनिखोदनाचें काम परदेशीय कंपन्यांनीं परदेशीय भांडवलाच्या जोरावर सुरू केलें तर चीनमधील व्यापार परदेशीय लोकांच्या आयताच ताब्यांत जाईल. यासाठीं त्यांनीं या खनिखोदनाच्या धंद्याचा प्रश्न बाजूसच ठेवून दिला. एका दृष्टीनें लोकशाहीच्या या पुरस्कर्त्यांचें म्हणणें अगदीं खरें होतें; पण त्यामुळें चीनचा आर्थिकदृष्ट्या तोटा झाला. हीहि एक गोष्ट कांहीं खोटी नाहीं. १९१९ सालीं चीनमध्यें एकंदर १४७७४३३ टन कोळसा बाहेर पडला. चिहली व मँचूरिया या ठिकाणींच कोळशाच्या खाणीं पुष्कळ आहेत. याशिवाय चीनमध्यें लोखंड व तांबें या धातूहि पुष्कळ सांपडतात. १९१९ सालीं चीनमधून ६३०००० टन तांबें जपानमध्यें गेलें.

प्राचीनकाळापासून चीनदेश चिनींमातीचीं भांडी व रेशमाचें कापड याबद्दल प्रसिद्ध आहे. कापसाचें सूत व कापड हातमागावर सर्व ठिकाणीं काढतात. परकीयांनीं चालविलेल्या कांहीं कापसाच्या गिरण्या आहेत. हिंदी सुताचें कापड बहुतेक चिनी स्त्रिया तयार करतात. याशिवाय शाई, पंखे, रंग, मुलाम्याचीं कौलें, लाखेचीं भांडीं इत्यादि लहान उद्योगधंदे आहेत. चीन देशाचा परक्या देशांशीं व्यापार तहान्वयें खुल्या केलेल्या बंदरांतून चालतो. कापड, अफू, तांदूळ, साखर, धातू, तेल, कोळसा, लोंकरीचें कापड, वगैरे वस्तूंची आयात चीन देशांत होते. हिंदुस्थानच्या खालोखाल चीन देश हा मँचेस्टरचा गिर्‍हाईक आहे. रेशीम व चहा या दोन वस्तूंची निर्गत चीन देशांतून होते. जाणार्‍या व येणार्‍या मालावर शेंकडा ५ टक्के जकात पडते. चीनमध्यें धामधुम माजली असतांना सुद्धं या काळांत पुष्कळच कारखानें अस्तित्वांत आले. त्यांपैकीं पुष्कळ कारखाने देशी कारखानदारांनीं चालविले होते. चीनमध्यें कच्च्या मालाची मुबलक पैदास होत असल्यानें व मजूरीहि स्वस्त असल्यामुळें चीनमध्यें कारखाने निघतील तितके थोडेच अशी स्थिति आहे. १९१९ त यासंबंधींचे जे आंकडे प्रसिद्ध झाले आहेत त्यांवरून चीनमध्यें रेशीम, सुताचा माल, छत्र्या, लोंकर, औषधें, सुया, टाचण्या, विजेचें दिवे, टेलिफोनचें साहित्य, दारू, इत्यादि निरनिराळ्या प्रकारचा माल तयार होत होता असें आढळतें. १९१९ त चिनी लोकांनीं पुष्कळच पेढ्या स्थापन केल्या. चीनमध्यें जहाजेंहि पुष्कळ तयार झालीं. चीनमध्यें या लोकशाहीच्या काळांत, जिकडे तिकडे बेबंदशाही माजली असतां व्यापाराची प्रगतीच होत होती. १९१९ सालीं चीनमध्यें बाहेरून २०४८८२५५९ पौंडांच्या किंमतीच्या मालाची आयात झाली व १९९५७८३३१ पौंडांच्या किंमतीच्या मालाची निर्गत झाली. आयात मालांत कापूस, धातू, रॉकेल तेल, साखर, सिगारेट, रेल्वेच्या गाड्या, यांत्रिक सामान, कोळसा, मासे, कागद व मोटारी वगैरे प्रमुख जिन्नस होत व निर्गत मालांत, रेशीम, द्विदलधान्यें, चहा, कांतडीं लोकर इत्यादि प्रमुख जिन्नस होत.

१९२० पेक्षां १९२१ सालीं व १९२१ सालापेक्षां १९२२ सालीं चीनमधील व्यापाराची प्रगति झालेली आहे असें आढळतें. निर्गत मालांसंबंधीं चांगली प्रगति झालेली आहे. १९२३ च्या फेब्रुवारीमध्यें अमेरिकेंतील तीन मोठ्या भांडवलवाल्यांनीं, कापूस व रेशीम यांच्या व्यापाराबद्दल चीनमधील मोठ्या व्यापार्‍यांशीं एक करार केला. चीनमधील २००० शहरांत पाश्चात्य जीवितक्रमाची तद्देशीयांनां ओळख पटावी म्हणून सिनेमा कंपन्यांनीं चीनमध्यें सिनेमाचा प्रसार करण्याचाहि करार केला. लष्करी लोक व लुटारू यांच्या दंग्यामुळें चीनचा अंतस्थ व्यापार मंदावलाच होता. १९१९ सालीं एकंदर ४० कापसाच्या गिरण्या होत्या व १९२२ मध्यें १०२ कापसाच्या व १०१ रेशमाच्या गिरण्या होत्या. मजूरवर्गांपैकीं शेंकडा ५० स्त्रिया असून चौदा वर्षांच्या आंतील मुलांचें प्रमाण शेंकडा २० असें पडतें. कामाचे तास दर दिवशीं १२ ते १४ पर्यंत असतात. कारखान्यांतील व्यवस्था आरोग्यदृष्ट्या वाईट असून मातृत्व प्राप्‍त झालेल्या स्त्रियांच्या फायद्याच्या तेथील कारखान्यांत सोई केलेल्या नाहींत. अशा स्त्रियांनां प्रत्यहीं ३६ ते ४० सेंट इतकें वेतन मिळतें.

परक्या देशांशीं खुष्कीवरील व्यवहार प्राचीन मार्गांनीं म्हणजे मध्यआशियांतून होतो. अलिकडे आगबोटींचा उपयोग युरोप, अमेरिका वगैरे देशांशीं व्यापार करण्यास होतो. बहुतेक आगबोटी परकीय कंपन्यांच्या मालकीच्या आहेत. अंतर्गत दळणवळण नदी, कालवे, सडका व रेलवे यांनीं होतें. २० व्या शकतापासून रेल्वेचें महत्त्व अतिशय वाढलें आहे. शांघाय व बुसुंगमध्यें रेल्वेचा पहिला फांटा १८७५ त उघडला. परंतु एक चिनी मनुष्य चिरडल्यामुळें अधिकारी खवळले व त्यांनीं सर्व रेल्वेचें सामान, डबे, इंनिज, स्टेशन वगैरेंची नासधुस केली. नंतर १८८६ त खुद्द अधिकार्‍यांच्या सत्तेखालीं एक मंडळी स्थापन झाली. परंतु परकीय लोकांच्या सहाय्यावांचून काम चालेना. त्यामुळें स्वत:चा ताबा ठेवण्याची धडपड व्यर्थ गेली. यामुळें व राजकीय डावपेंचामुळें फ्रान्स, रशिया, व ग्रेटब्रिटन या राष्ट्रांनां सवलती मिळाल्या. या सवलतींविरुद्ध पुष्कळ आरडाओरड झाली. १९१८ सालीं चीन देशांत मांचुरियांतील १८५७ मैलांची रेल्वे धरून एकंदर ६००० मैल रेल्वे होती व २२७३ मैल रेल्वे तयार करीत होते.

वै मा नि क आ णि बि न ता री :— १९२१ जुलैंत टीसिनॅनफ्यूपर्यंत 'पेकिंग वैमानिक डाक' सुरू झालीं होती. परंतु चिहलीच्या गव्हर्नरानें सवलती देण्याचें नाकारिलें; कारण त्याला वैमानिकखात्याचा ताबा मिळवावयाचा होता. म्हणून शांघाइकडे, चिनकिअँगच्या मार्गानें जावें लागत असे. १९२३ ऑगस्टमध्यें 'मिटसुइ बुसन कैशा' नामक एका जपानी कंपनीनें, पेकिंगजवळ शूअ‍ॅगचिओ या ठिकाणीं, एक बिनतारी विद्युत्संदेशाचें स्टेशन बांधलें, व त्यास अर्ध्या लक्षावर खर्च झाला. सार्वराष्ट्रिय बिनतारी दळणवळणाच्या थेट रस्त्यावरील पेकिंग हें सध्या एक केंद्रच आहे.

स र का र व रा ज्य का र भा र — चीन देशांतील राज्यव्यवस्थेंत १९०५ पासून बदल होण्यास सुरवात झाली. याच वेळेला एक कमीशन नेमून त्यानें इतर देशांतील राज्यकारभाराचा अभ्यास करावा असें ठरलें. १९०७ सालीं सहायकारी मंडळाची स्थापना झाली. १९०८, १९०९ व १९१० सालांच्या फर्मानांवरून खुद्द पार्लमेंट सभा, तिच्या सभासदांची संख्या व कोणकोणत्या संस्थेकडून सभासद निवडावयाचें या गोष्टींचा उहापोह करण्यांत आला. आठ संस्थांकडून २०० सभासद घ्यावयाचें ठरलें. १९१० सालीं राजप्रतिनिधीनें जी राष्ट्रीयसभेची सुरवात केली तींत दोन तर्‍हेच्या सभांचें बीज होतें. या सुधारणांच्या अनुरोधानें एकंदर राज्यकारभारांत सुधारणा करण्यांत आलीं.

आजची वस्तुस्थिति पाहिल्यास वरिष्ठ सरकारची मुख्य सत्ता मुख्य प्रधानाच्या हातांत असतें. हा प्रधान अध्यक्षानें नेमावयाचा असतो. प्रधानानें नऊ लोकांचें प्रधानमंडळ नेमावयाचें असतें. या नऊ प्रधानांच्या ताब्यांत प्रत्येकीं परराष्ट्र, गृह, जमाबंदी, लष्कर, आरमार, न्याय, शिक्षण, व्यापार व दळणवळण हीं खातीं असतात. याशिवाय, रेल्वे, पोस्ट व तारखातें, जकात इत्यादि गौण खाती आहेत.

जुनी पद्धत :- बादशाहा सर्व राज्यांत अतिशय मोठा समजला जात असें. बादशाही फर्मान म्हणजे कायदा समजत. सर्व लहानमोठ्या अधिकार्‍यांचे अधिकार बादशाहाच्या इच्छेवर अवलंबून असत. बादशहास एक सहाय्यकारी मंडळ असे परंतु या मंडळाच्या इच्छेप्रमाणें बादशहानें चाललेंच पाहिजे असें नव्हतें. अशा तर्‍हेच्या राज्यकारभाराच्या कल्पना अतिप्राचीन काळापासून चालत आल्या होत्या. बादशहाची सत्ता राज्यकारभारांत अनियंत्रित असली तरी इतर बाबतींत ती बरीच मर्यादित होती.

सैन्य व आरमार :- १९०५-६ च्या सुधारणेच्या काळापूर्वी मांचुसैन्य व प्रातिकसैन्य असे दोन तर्‍हेचें सैन्य होतें. बॉक्सर बंडानंतर युआन सिकाई यानें उत्तरेकडील सैन्य तयार केलें व रूसो जपानी युद्धानंतर मात्र पाश्चात्य पद्धतीवर सैन्य तयार होऊं लागलें. १९०९ सालीं चिनी आरमारांत ४३०० टनाचें एक क्रूझर व ३००० टनांची तीन क्रूझरें व कांहीं टार्पेडो एवढींच होतीं. परंतु यानंतर बरीच सुधारणा करण्यांत आली आहे.

जमाबंदी.— प्रत्येक प्रांताचा राज्यकारभार स्वतंत्र असून साम्राज्य सरकारास कोणत्याच तर्‍हेचा कर व सारा वसूल करावा लागत नाहीं. प्रांतिक वसुलांतून कांहीं रकम साम्राज्यसरकारास दिली जातें.

उत्पन्नाच्या सात बाबी आहे. त्या :— (१) जमीनीवरचा कर (२) मिठावरील कर (३) साम्राज्याची बंदरावरील जकात (४) व्यापारावरील कर (५) स्थानिक जकात (६) स्थानिक अफूवरील कर (७) किरकोळ.

खर्चाच्या बाबतींत मात्र साम्राज्य व प्रांतिक सरकारांत बरीच तेढ येतें. कारण साम्राज्यसरकारास (१) बादशाही घराण्याचा खर्च (२) मांचु सैन्याचा खर्च (३) राजधानीतील मुलकी खर्च (४) इतर सैन्याचा खर्च (५) आरमारी खर्च (६) परकीय कर्ज या बाबींकडे लक्ष द्यावें लागतें. १९१६-१७ सालीं चीनचें एकंदर उत्पन्न ४७२८३८५८४ टेल असून खर्चहि तितकाच होता. १९२० सालीं चीनला ६५७६२७०६३ टेल कर्ज होतें.

स्थानिक पेढ्या राष्ट्रांतर्गत व्यापाराला पुरेशा आहेत. शांगसी बँकेच्या शाखा सर्व साम्राज्यभर आहेत. शांघाय येथे व कांहीं प्रसिद्ध बंदरांत परकीय पेढ्या आहेत. पेकिंग येथें एक सरकारी पेढी स्थापन झाली आहे.

१९१० सालच्या फर्मानाप्रमाणें ७२ कँडरीन वजनाचें (१ कंडरीन = १ शंभरांश टेल औंस) डॉलर नाणें चालू झालें. त्याचप्रमाणें लहान नाणीं देखील प्रचारांत आलीं.

सांप्रत चांदीचीं व तांब्याचीं नाणी चालू आहेत. तांब्याच्या नाण्यांचें प्रमाण चांदीच्या नाण्यांशीं बसविलें नाहीं. चिनी औंस अथवा टेल(५६५ ग्रेन) हें प्रमाण आहे; कारण टेल हें नाणें नसून एक वजन आहे.

१९२१ च्या सप्टेंबर महिन्यांत कॅनेडिअन बँकिग सिंडिकेटनें तीन लक्ष सोन्याच्या डॉलरचें कर्ज देऊं केलें. सार्वराष्ट्रियमंडळाचा कटाक्ष अशीं कर्जे दिलीं जाऊं नयेत असा होता; व या बाबतींत इंग्लंडचा दुटप्पीपणा चांगलाच निदर्शनास आला. ऑक्टोबरअखेर सरकारचें दिवाळें निघालें व पन्नास लक्ष अमेरिकन डॉलरच्या कर्जासंबंधीं करार झाला. सरकारी अधिकार्‍यांचे पगार बरेच महिने थकले व वॉशिंग्टन कॉन्फरन्सला पाठविलेल्या शिष्टमंडळाचा खर्च भागविण्यासहि पैसा उरला नाहीं. सैन्याची पगाराबद्दल सारखी मागणी सुरूच होती. १९२३ सालीं चीनची आर्थिकदृष्ट्या हलाखीची स्थिति झाली. सार्वराष्ट्रीय मंडळाकडून बारा लक्ष कर्ज अगाऊ घेण्याबद्दलचे प्रयत्‍नहि व्यर्थ गेले. चीनच्या परराष्ट्रांतील प्रधानांनां अकरा महिन्यांचा पगारहि मिळाला नाहीं. टेलिफोनकरितां १६ लक्ष येन व टेलिग्राफकरितां २० लक्ष येन अशी जपानची चीनकडे बाकी होती, ती फेडण्याचं चीनला सामर्थ्य उरलें नाहीं. चीनमधील परकीयांच्या बँका, चीनच्या बँकेतून मोटाल्या रकमा कर्जाऊ घेत असत व त्यामुळें चीनच्या बँकांना फार फायदा होत असे. १९२३ ऑक्टोबरमध्यें शेवटीं चीनमधील आर्थिक गोंधळ अथवा अस्ताव्यस्तपरा नाहींसा करण्याचा प्रयत्‍न करण्यांत आला.

परराष्ट्रीय धोरण :- कोणताहि तहनामा वगैरे न करणार्‍या परकीयांनीं, सैन्य, पोलीस, टेलिग्राफ व वायरलेस वगैरे ज्या खात्यांचा जम चीनमध्यें बसविला होता ती सर्व खातीं तेथून काढून टाकण्यांबद्दल १९२१ च्या नोव्हेंबर महिन्यांत चीननें वॉशिंग्टन, परिषदेस निक्षून सांगितलें. १९२३ च्या सप्टेंबरांत, लिनचेंजच्या अत्याचाराची जबाबदारी आपणावर नाहीं असें चीननें प्रसिद्ध केलें. तथापि, शॅनटंगच्या गव्हर्नराच्या बडतर्फीखेरीज सर्व मागण्या कबूल करण्यांत आल्या व रेल्वेच्या रक्षणार्थ पोलीस ठेवण्याविषयीं निर्णय देण्याचा हक्क चीननें राखून ठेवला. १९२१ मध्यें जर्मनीशीं चीनचा एक तहनामा झाला. १९२४ जुलैमध्यें पुनः जर्मनीशीं तहनामा झाला. 'लीग ऑफ नेशन्स' च्या कौन्सिलांत आपणास घेतलें नाहीं. म्हणून १९२४ ऑक्टोबरमध्यें चीन देश खचून गेला होता.

जपानबरोबर :- अक्टोबर १९२१ मध्यें चीनने जपानची शानटंग परत करण्याची मागणी नाकारली. चीननें युद्ध पुकारलें तेव्हांच जर्मनीचा किआंचौचा कौल संपला असें चीनचें म्हणणें होतें. शानटंगहून जपाननें चालतें व्हावे असा चीनचा मानस असून शानटंग रेल्वेचा समाइक ताबा असावा हेंहि चीनला मान्य नव्हतें. १९२२ त जपाननें तो मुलूख सोडून दिला. १९२३ त बॉक्सर इंडेम्निटीतून ४४ लक्ष येन व शॅनटंगरेल्वेच्या विक्रीतून १५ लक्ष येन, या दोन्ही रकमांचा उपयोग, सिनो-जपानी यांच्या संबधाच्या वर्धनांत व्हावा, असें जपाननें ठरविलें. १९१५ चा सिनो-जपानी तह रद्द व्हावा अशी चीननें मागणी केली व ती जपाननें नाकारली. विनी विद्यार्थ्यांनीं बहिष्काराची चळवळ केल्यामुळें १९२३ मेमध्यें जपानी व्यापार्‍यांचें फार नुकसान झालें. परंतु ती चळवळ अल्पायुषी ठरली. चीन देश जपानी माल घेत नसे तरी जपानला आपला माल मात्र विकीत असे. १९२३ जुलैमध्यें चीन व जपान यांचा स्नेह जमला. इंग्लंडच्या ऐवजीं दुसर्‍या एखाद्या राष्ट्राशीं स्नेह करणें जपानला जरूरच होतें. पाश्चात्य राष्ट्रांनां आपला चीन देशांतील मुलूख घेण्याचा हेतू नाही असें भासविणें आणि १९१४ सालीं जर्मनीपासून शॅनटंग घेतल्यामुळें उत्पन्न झालेला चिनी लोकांचा क्षोभ कमी करणें असें जपानचें दुहेरी धोरण आहे व तेंच वॉशिंग्टन परिषदेंत दिसून आलें.

सोव्हिएट रशियाबरोबर :— १९२२ व १९२३ सालीं, मँचुरियाच्या तीन प्रांतात बोल्शेव्हिक मतांचा प्रचार सुरू करण्यांत आला होता. १९२३ च्या जानेवारींत सोव्हिएट प्रतिनिधींनें चीनशीं तहाचें बोलणें सुरू केलें. पूर्वी झारनें केलेल्या मागण्या रशियानें सोडून द्याव्या व मँगोलियाबाहेर कोणतेंहि राजकीय धोरण अंमलांत आणलें जाणार नाहीं अशी त्यानें हमी घ्यावी अशा दोन अटींवर हें स्नेहाचें बोलणें सुरू करण्यांत आलें. १९२४ मध्यें सोव्हिएट सरकार, चीनशीं युद्ध जुंपेल म्हणून तयारी करू लागलें व मंचुरीयाच्या सरहद्दीवर सैन्य जमविण्यांत आलें. १९२४ च्या सप्टेंबरांत, इंग्लंड व फ्रान्स हे देश चीनच्या राजकारणांत उगीच पडतात अशी सोव्हिएटनें तक्रार केली. कारण चीनला लढाऊ गलबतें पाठविणें म्हणजे रशियावर हल्ला करण्याची पूर्वतयारीच होय असें सोव्हिएट सरकारास वाटलें.

अमेरिके बरोबर :- १९२३ सालीं अमेरिकेशीं वितुष्ट आले. एका अमेरिकन मनुष्याचा खून झाला त्याबद्दल अमेरिकेनें चीनला जाब विचारला व वायरलेस स्टेशनें बांधण्याचा करार पूर्ण करावा अशी चीनजवळ मागणी करण्यांत आली. १९१८ च्या करारान्वयें जपाननें वरील हक्काचीच मागणी केलेली होती व त्यामुळें चीनला संकट पडलें. अमेरिकन इंजिनियर सर्व सामानासह वरील स्टेशनें बांधण्यास चीनमध्यें आले व चीननें त्यांनां मनाई केली. १९२४ मेमध्यें, बॉक्सर इंडेम्निटींचें पैसे देण्यापासून अमेरिकेनें चीनला मुक्त केलें.

ग्रेटब्रिटनबरोबर :- १९२३ एप्रिलमध्यें इंग्लंडनें बॉक्सर इंडेम्निटीचे पैसें अमेरिकेचें अनुकरण करून चीनला शिक्षणाप्रीत्यर्थ खर्च करावे म्हणून परत दिले व शांघाय येथें एक धंदेशिक्षणाची शाळा काढावी अशीहि सूचना केली.

ची न दे शा चा इ ति हा स — चीन देशाचा पहिला ऐतिहासिक राजा म्हटला म्हणजे फुही हा होय. हा ख्रिस्तीशकापूर्वी २८५२ व्या वर्षी जन्मून २७३८ व्या वर्षी मरण पावला. यानें समाज स्थापन करून विवाहपद्धति अमलांत आणिली. याशिवाय यानें चिनी लोकांस मासे धरणें, शिकार खेळणें व गुरें पाळणें ह्या गोष्टी शिकवून त्यांस गायन, वादन व चित्रलिपी यांचीहि माहिती करून दिली. हा द्वैतमतवादी होता. याच्या मागून शान्नुंग हा बादशहा प्रसिद्धीस आला. याचा काळ म्हटला म्हणजे ख्रिस्तिशकापूर्वीचें २८ वें शतक होय. यानें शेतकींचीं आउतें शोधून काढून चिनी लोकांस शेतकींचे ज्ञान करून दिलें. याशिवाय पुष्कळ वनस्पतींच्या औषधी गुणांचा शोध लावला. याच्या नंतर व्हांगति (हुआंगति) प्रसिद्धीस आला. याची कारकीर्द ख्रिस्त पूर्व २७०४ अथवा २४९१ व्या वर्षी सुरू झाली असावी. यानें चिनी राज्याची मर्यादा वाढविली. यानें चिनी लोकांस देवालयें व घरें बांध्यण्याची कला शिकवून दळणवळण सुलभ होण्याकरितां बैलांच्या गाड्या व नावा यांची योजना केली याच्या बायकोनें चिनी लोकांस रेशिमाचे किडे कसे पाळावे व त्यांपासून रेशीम कसें तयार करावें हें शिकविलें.

कन्फ्युशिअस यानें सांगितलेल्या वृत्तांतांत वरील तीन राजे येत नाहींत. तो दुसर्‍याच राजांची वर्णनें देतो. त्यापैकीं पहिला याऊ हा होय. याची कारकीर्द ख्रिस्तापूर्वीच्या २३५७-२२५८ पर्यंत. याच्या नंतर शून हा गादीवर आला, व याच्या नंतर याचा प्रधान यू राजा झाला. यानें ख्रिस्ती शकापूर्वीच्या २२०५ व्या वर्षापासून २१९८ वर्षापर्यंत राज्य केलें. यानें हिआ घराणें स्थापन केलें. या घराण्यांत ख्रिस्तीशकापूर्वीच्या १७६६ व्या वर्षापर्यंत एकंदर १८ राजे झाले. या घराण्यांतील चुंगकांग (२१५९-२१४७) नांवाच्या राजाच्या कारकीर्दीत एक ग्रहण दिसलें होतें. या नंतर शांग अथवा यिन घराण्याची चीन देशांत स्थापना झाली. हें घराणें ख्रि. पू. १७६३-११२२ पर्यंत टिकलें. यातील पहिला राजा चोंगतग हा फार दयाळू असून प्रजेला फार ममतेनें वागवीत असे. याच्या मागून पानकाँग (१४०१) व वुतींग (१३२४) या राजांनीं राज्य केलें. या घराण्यांतील शेवटचा राजा चौसिन हा होय. हा फार दुष्ट होता. याची बोनबंग या गृहस्थानें चांगली कानउघाडणी केली म्हणून याला कैदेंत टाकण्यांत आलें. तितक्या अवधींत या गृहस्थानें चिनी वाङ्‌मयांतील पहिला ग्रंथ लिहून ठेविला. याचा मुलगा वूवंग यानें पुढें चौ घराणें स्थापिलें. यानें चीन देशांत सरंजामी पद्धत अमलांत आणली; याचा परिणाम असा झाला कीं यानें केलेले जहागिरदार कांहीं दिवसांनीं छोटे संस्थानिक झाले. प्रथम चिनी साम्राज्यांतील सर्व सत्ता सम्राटाच्या ठायीं एकवटली असून तिचा सर्व मांडलिकांवर मोठा दरारा असे. परंतु खास सम्राटाच्या ताब्यांतील मुलूख साम्राज्यांतील संस्थानिकांनी वेष्टिला असल्यामुळें चिनी सम्राटाचें आपली सत्ता वाढविण्याचें साधन खुंटून जाऊन त्याच्या मांडलिकांस एकमेकांविरुद्ध अथवा परकीय लोकांशीं युद्ध करून आपली सत्ता वाढविण्याचा अवसर मिळाला होता. या योगानें सम्राटाचा धाक हळू हळू कमी होऊन संस्थानिक त्याला न जुमानीतसें झाले. हें घराणें ख्रिस्तापूर्वीच्या २४९ वर्षांपर्यंत राहिलें.

यानंतर त्सिन घराणें आलें. याची कारकीर्द ख्रि. पू. २४९-२१० पर्यंत झाली. याच घराण्यांत शी व्हांगति नांवाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. यानें हयेग यांग (यालाच अलीकडे सीगान फू म्हणतात) हें शहर राजधानी केलें; व साम्रज्यातील संरजामी पद्धत मोडून त्याची प्रांतिक विभागणी केली; व प्रत्येक प्रांतावर स्वत:स जबाबदार असा देखरेख करणारा कामगार नेमला. याशिवाय साम्राज्यांत रस्ते, कालवे, इमारती वगैरे बांधून सांपत्तिकदृष्ट्या याची सुधारणा केली. याच्याच कारकीर्दीत चीनमधील प्रसिद्ध भिंत बांधली गेली. वरील घराण्यानंतर हान घराण्याचा अम्मल सुरू झाला.  व तो इ.स. २३ व्या वर्षापर्यंत कायम होता.  या घराण्यांतील दुसरा राजा हेव्इति (ख्रि. पू. १९४-१७९) यानें वाङ्‌मयवृद्धीस पुष्कळ उत्तेजन दिलें. याच घराण्याच्या अमदानींत चिनी लोकांस हिंदुस्थानची माहिती झाली. पुढें वूति (१४०-८६ ख्रि. पू.) गादीवर आल्यावर पूर्वतुर्कस्थानांत चिनी लोकांनीं आपली वसाहत करून इराण व रोम येथून येणारा व्यापारी माल व कलाकौशल्याच्या वस्तू ते आपल्या देशांत घेऊन जाऊं लागले. २३व्या शतकांत याच घराण्यांतील लिऊसिउ नांवाच्या पुरुषानें पूर्वेकडील हान घराणें स्थापन केलें. हें २ र्‍या शतकाच्या अखेरपर्यंत कायम होतें. या घराण्याच्या कारकीर्दीत (६५ इ. स.) चीन देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झाला. या घराण्याच्या अमदानींत चीन देशास एकत्व प्राप्‍त होऊन तें चिरस्थायी झालें व चिनी लोकांची सांपत्तिक व बौद्धिक उन्नति झाली. यानंतर ७व्या शतकापर्यंत चीन देशांत एकंदर तीन घराणीं झाली. त्यांचीं नांवें वेई, तसिन व सुइसाय हीं होत. या मध्यंतरीच्या कालांत हिंदुस्थान व चीनमध्यें बरेंच दळणवळण असावें असें एकमेकांकडे गेलेल्या वकीलातींवरून वाटतें. पुढील वकिलातींची जंत्री मॉबेल डफ देते: २५७ मध्यें हिंदुस्थानांतून एक वकीलमंडळ भेट म्हणून हत्ती व घोडे बरोबर घेऊन चीनला गेलें. ४२८ त दुसरें वकीलमंडळ हिंदुस्थानातून चीनला गेलें. (सुंग घराण्याची बखर). ४७७ त पश्चिम हिंदुस्थानातून एक वकीलमंडळ चीनला गेलें. यानंतर ५०२, ५०३, ५०४, ५०७, ५०८, ५१५, ५४१, ५७१, ९०४. या वर्षी निरनिराळीं वकील मंडळें हिंदुस्थानांतून चीन देशास गेल्याचे व तेथून इकडे आल्याचे उल्लेख सांपडतात.

इ. स. ६१८ त काओत्सू यानें तअंग घराण्याची स्थापना केली. याच्या नंतर याचा मुलगा ताइत्संग यानें ६२७-६५० पर्यंत राज्य केलें. याच्या कारकीर्दीत मध्यआशियांतील चिनी सत्ता पुन्हां स्थापित झाली व चीन देशाची मर्यादा पूर्व-इराण व कास्पीअन समुद्र यांपर्यंत जाऊन पोहोंचली. या वेळेस चीन देश फार प्रसिद्धीस येऊन चिनीदरबारांत नेपाळ, इराण, मगध व कान्स्टांटिनोपल येथून वकील येत असत. याच्या राज्यांत शेतकी, व्यापार व वाङ्‌मय यांची अभिवृद्धि झाली. ताइत्सिंग याच्या मागून या घराण्यांत ६८३ मध्यें वू-हौ ही विधवा राणी राज्यकारभार पाहूं लागली. ही चीन देशांतील राज्यसूत्रें हातीं घेऊन राज्यशकट हांकणारी पहिली स्त्री होय. पुढें याच घराण्यांत सुत्संग (७५६-७६२) व ताइत्संग (७६३-७८०) या दोन राजांनीं राज्य केलें. हें घराणें ९०० पर्यंत कायम होतें.

९०७ सालीं ताइत्सु यानें लाअंग घराण्याची स्थापना केली. ९०७-९६० च्या दरम्यान चीन देशाची सत्ता पांच घराण्यांच्या ताब्यांत जाऊन शेवटीं चाओ क्वांगयीन यानें सुंग घराणें स्थापन केलें. या घराण्यांत पुढें दिलेले राजे झाले. ताईत्सुंग ९७६-९९७, चेनत्सुंग ९९७-१०२२, जेनत्सुंग १०२३-१०६४, हवेईत्सुंग ११-०१-११२६, काओत्सुंग ११२७-११६३. हवेईत्सुंग याच्या कारकीर्दीत नुची तार्तर लोकांनीं शेनसी, शानसी व होनान हे प्रांत काबीज करून यांगत्किकँगपर्यंतचा मुलूख आपल्या ताब्यांत घेतला; व किन घराणें स्थापन केलें. या वेळेपासून चीन देशांत दक्षिणेस सुंग व उत्तरेस किन या दोन घरण्यांचा अम्मल सुरू झाला. पुढें १२ व्या शतकांत चीन देशावर मोंगल लोकांच्या स्वार्‍या होऊं लागल्या. यावेळीं मोंगलांचा पुढारी प्रसिद्ध चंगीजखान हा होता. मोंगलांनीं सुंग घराण्याची मदत घेऊन किन घराण्याचा पाडाव केला व पुढें लवकरच सुंग घराण्याचा नाश करून सर्व चीन देशाची सत्ता आपल्या हातीं घेतली. मोंगलांचा कुब्लाइखान नांवाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. यानें मोंगल घराण्यास युएन हें नांव दिलें; व स्वत: शित्सु ही पदवी धारण केली. मोंगलांनीं चीन देशावर १२५९ पासून १३६८ पर्यंत आपली सत्ता गाजविली. १३६८ त चू युएन-चांग या चिनी गृहस्थानें मोंगलांची सत्ता झुगारून देऊन मिंग घराण्याची स्थापना केली. याच घराण्याच्या अमदानींत इ. स. १५१७ त कॅन्टन बंदरीं पोर्तुगीज व सतराव्या शतकाच्या पूर्वार्धांत इंग्रज या यूरोपियन लोकांनीं प्रवहेश केला. हें घराणें १६४४ पर्यंत कायम होतें. पुढें चीन देशावर मांचू लोकांनी आपलें राज्य स्थापिलें या नवीन घराण्याच्या कायेनलुंग नांवाच्या राजाच्या कारकीर्दीत डच, इंग्रज, पोर्तुगीज हे यूरोपिअन लोक चीनशीं अफू, चहा, रेशीम या जिनसांचा व्यापार करीत असत. यानंतर कायकिंग या राजाच्या कारकीर्दीत १८०७ सालीं चीन देशांत डॉ. मॉरिसन या प्रोटेस्टंट धर्मप्रचारकानें प्रवेश केला. वरील घराण्याचा ताओक्वांग नांवाच्या बादशहाच्या कारकिर्दीत चीन व ग्रेटब्रिटन या दोन साम्राज्यांत कांहीं व्यापारी बाबतींत तंटा उपस्थित होऊन १८४० त या दोघांमध्यें लढाई सुरू झाली. या लढाईंत चीन देशाचा पराभव होऊन चिनी लोकांस अ‍ॅमॉयफूचौ, निंगपो व शांघाई हीं चार बंदरें परदेशीय व्यापारांकरितां खुलीं करावीं लागलीं. यानंतर १८५० त हायेन फेंग नांवाचा राजा चीनच्या गादींवर बसला. याच्या अमदानींत चीन देशांत हंग सिउत्सुआन या नांवाच्या मनुष्यानें बंड केलें. याच सुमारास म्हणजे १८५७ त ब्रिटिश व फ्रेंच सरकारांनी चीनविरुद्ध लढाई पुकारली. ही लढाई १८६० पर्यंत चालून शेवटीं चीन देशास हार खावी लागली. या लढाईनंतर झालेल्या तहान्वयें चीन देशानें युद्धखर्च म्हणून ८०००००० टेल नाणें देण्याचें आश्वासन देऊन आणखी यूरोपियनांनां देशाच्या अंतर्भागांत प्रवेश करण्याची व ख्रिस्ती संप्रदायाचा प्रसार करण्याची मोकळीक दिली. हायेन फेंग हा मेल्यावर १८६१ त तुंगची हा गादीवर आला. यानें १८७५ पर्यंत राज्य केलें. याच्यानंतर क्वांगसू हा गादीवर आला. १८७१ त रशियानें सरहद्दीवर बंदोबस्त ठेवण्याकरितां चीनपासून कुलीजा हा प्रांत आपल्याकडेच ठेविला आणि चीनमध्यें शांतता स्थापन झाल्यानंतर तो परत करावा असें ठरलें. पुढें काशगरिया प्रांतांत याकुबबेग यानें बंड केलें. यामुळें सर्व मध्यआशियांत अस्वस्थता उत्पन्न झाली. चिनी सरकारनें ही अस्वस्थता मोडून टाकून सर्वत्र शांतता स्थापन केली व रशियन सरकारापाशीं कुलीजा प्रांत परत देण्याविषयी बोलणें लावलें. यासंबंधीं बरीच वाटाघाट होऊन १८८१ त तह झाला. या तहान्वयें कुलीजा प्रांताचा कांहीं भाग रशियाच्याच ताब्यांत राहून बाकी चिनीसरकारास परत मिळाला. या वेळेस खुद्द चिनी सरकारच्या ताब्यांतील प्रदेशाच्या विस्ताराची मर्यादा पुढें दिल्याप्रमाणें असून कोरिया, लूच्चू, अनाम, ब्रह्मदेश, नेपाळ वगैरे सरहद्दीवरील राज्यांची चीनच्या मांडलीक संस्थानांत गणना होत होती. उत्तरेस सैबेरियापर्यंत, दक्षिणेस अनाम व ब्रह्मदेशापर्यंत, पूर्वेस पॅसिफिक महासागरापर्यंत व पश्चिमेस काश्गर व यारकंद प्रांतापर्यंत.१८७६ त जपाननें कोरियाशीं व्यापारी तह करून त्या प्रांताचें स्वातंत्र्य कबूल केलें व याचेंच अनुकरण इतर राष्ट्रांनीं स्वीकारून कोरियाशीं याच अटीवर तह करण्यास सुरुवात केली. ही गोष्ट चिनी सरकारास पसंत न पडून त्यांनीं जपानी सरकारास ताळ्यावर आणण्याचा प्रयत्‍न केला. १८८५ त या दोहोंमध्यें तह झाला. हा तह १८९४ पर्यंत टिकला. १८७७-७८ सालीं चिनी साम्राज्यांतील शानसी व शानटूंग या प्रांतांत मोठा दुष्काळ पडला. १८८१ त चिनी साम्राज्यांत तारायंत्र सुरू झालें. याच सुमारास चिनीसरकारनें बर्‍याचशा आरमारी सुधारणा अमलांत आणल्या. जपानी व चिनी सरकारांची कोरियाबद्दल वाटाघाट चालू असतां फ्रान्ससरकारनें अनाम संस्थानाशीं जपानकोरियासारखाच तह केला व यावरून चीन व फ्रान्स या दोघांत युद्ध सुरू झालें. हें युद्ध १८८६ त बंद होऊन या दोन्ही देशांत तह झाला. या तहान्वयें चिनीसरकारनें आपली सरहद्द व्यापारास खुली केली व फ्रान्सनें चिनी सरकारची अनामवरील सत्ता कबूल केली. या युद्धानंतर चिनी साम्राज्याची इभ्रत बरीच वाढली. १८८६ त चिनी सरकारनें ग्रेटब्रिटनची ब्रह्मदेशावरील सत्ता कबूल केली.  १८९४ त चीन व जपान यांच्यामध्यें कोरियाच्या बाबतींत पुन: युद्ध सुरू झालें. या युद्धांत चीन देशाचा पराभव होऊन चिनीसरकारनें जपानास ३००००००० पौंड युद्धखर्च, लायओतंग द्वीपकल्प, फोर्मोसा बेट व कांहीं व्यापारी सवलती देण्याचें कबूल केलें; परंतु जपानची वाढती शक्ती रशियास हानिकारक वाटून त्या राष्ट्रानें फ्रान्स व जर्मनी या दोन यूरोपांतील राष्ट्रांच्या मदतीनें जपानीसरकारास फोर्मोसा बेटाखेरीज चीन देशाच्या इतर प्रदेशावरील आपले हक्क सोडण्यास भाग पाडलें. या कार्याबद्दल रशियानें चीनपासून मान्चूरिया प्रांत आपल्या आटोक्यांत ठेवण्याकरितां सैबेरिया रेल्वेला चीनमधून जाण्याला मोकळीक करून घेतली. फ्रान्सनें कांहीं रेल्वेच्या व खाणीच्या सवलती मिळवून मेकाँग नदीथडीवरील सरहद्द आपल्या मताप्रमाणें ठरविली. १८९५ त या सरहद्दीबद्दल चिनी, इंग्रज व फ्रेंच यांच्यामध्यें तंटा उपस्थित झाला होता, परंतु तो फ्रेंच व इंग्रज लोकांनीं आपसांत मिटविला. जर्मनीस चिनीजपानी तहाबद्दल कांहीं मोबदला मिळाला नव्हता. तेव्हां त्याचा वचपा काढण्याकरितां दोन जर्मन धर्मप्रचारकांच्या खुनाच्या सबबीवर चिनी सरकारापासून त्यानें ९९ वर्षांच्या करारानें कियाचौ बंदराचा ताबा घेतला (१८९८). याच सुमारास रशियानें पोर्ट आर्थर बंदराचा व ग्रेटब्रिटननें वेइहैवाइ बंदराचा जर्मनीप्रमाणेंच ताबा घेतला. चिनी-जपानी युद्ध झाल्यावर चिनीसरकारनें साम्राज्यांत परदेशीय भांडवलानें रेल्वे तयार करूं देण्याचें ठरविलें व या गोष्टीचा फायदा घेऊन रशिया वगैरे यूरोपांतील राष्ट्रांनीं आपल्याला सोयीस्कर व फायदेशीर असे आगगाडीचें रस्ते बांधले. याच सुमारास चिनी लोकांत सम्राज्यातील वाईट राज्यपद्धति बदलून टाकण्याबद्दल जारीनें चळवळ सुरू झाली. या चळवळीचें दृश्य स्वरूप परभाषेंतील वाङ्‌मयविषयक व शास्त्रीय पुस्तकांच्या चिनी भाषांतरांच्या लोकांत वाढता प्रसार होय. वर्तमानपत्रें नवीन कल्पना चोहोंकडे पसरवूं लागलीं व लवकरच १५०० तरुणांनीं पेकींगच्या परदेशीय विश्वविद्यालयांत प्रवेश केला. कांहीं प्रांतिक राजधानीच्या शहरीं लोकांनीं वर्गणी जमवून शाळा उघडल्या. चिनी बादशहानें आपल्या आईची सत्ता झुगारून देऊन स्वत: सर्व राज्यकारभार पहाण्याचें ठरविलें व या चळवळीच्या कांहीं पुढार्‍यांस बोलावून प्रचलित राज्यव्यवस्था सुधारण्यासंबंधीं त्यांनां सल्ला विचारला. यानंतर पुष्कळ चांगल्या सुधारणा अमलांत आणण्याचीं जाहीरपत्रकें प्रसिद्ध केलीं. पण या सर्व गोष्टींस प्रतिकूल असा साम्राज्यांत एक पक्ष असून त्या पक्षाचें चालकत्व सत्ताहीन केलेल्या विधवा राणीनें (बादशहाच्या आईनें) स्वीकारलें होतें व या पक्षास सैन्याचा पाठिंबा होता. या पक्षानें उचल खाऊन बादशहास आपल्या अंकित केलें व त्यास विधवा राणीच्या देखरेखीखालीं वागण्यास भाग पाडलें. याप्रमाणें या चळवळीचा नाश होऊन कांही सुधारकाग्रणींस फांशी जावें लागले. यानंतर १९०० सालीं चिनी साम्राज्यांत परदेशी लोकांविरुद्ध बॉक्सर नावांची चळवळ झाली. या चळवळीचें ध्येय ''परदेशीयांस हांकलून लावा व राजघराण्याचें रक्षण करा'' हें असून इला सम्राज्यसरकारची फूस होती. या चळवळीनें साम्राज्यांत बरीच अंदाधुंदी उत्पनन होऊन चिनी सरकार व इतर राष्ट्रें यांच्यामध्यें लढाई झाली. पुढें चिनी सरकारचा पराभव होऊन इतर राष्ट्रांनीं ज्या अटी घातल्या त्या अटी कबूल करणें भाग पडलें (१९०१). यानंतर चिनी लोकांत जागृति उत्पन्न होऊन त्यांनां पाश्चात्य संस्कृति व पाश्चात्य राज्यपद्धतीची आवश्यकता भासूं लागली. सुधारणावादी पक्षाचे लोक तर प्रचलित राज्यपद्धति समूळ बदलून टाकावी असें प्रतिपादन करूं लागले. परंतु चिनी सरकार येथपर्यंत मजल मारण्यास तयार नव्हतें. विधवा राणीची प्रवृत्ति अजूनहि सुधारणेला प्रतिकूल अशीच होती. तिनें फक्त, पाश्चात्य पद्धतीवर शिक्षण, जमीनसारावसुलींत फेरफार व सैन्याची पुनर्घटना, वगैरे किरकोळ सुधारणा अंमलांत आणल्या व मागच्या सारखा साम्राज्यावर प्रसंग गुदरूं नये म्हणून ती साम्राज्यातील परदेशस्थ लोकांशी विशेष सलगीनें वागूं लागली. पुढे साम्राज्यप्रजाजनांतील व परकीय लोकांतील पूर्वीचा वैरभाव नष्ट होऊन ते एकमेकांशीं अधिक आदरानें वागूं लागले. परकीय अंमलाखालीं न रहातां पाश्चात्य संस्कृतीनें आपण आत्मोन्नति करून घेऊं अशी चिनी लोकांची दृढ समजूत होती. १९०५ च्या दरम्यान समुद्रावरील जकातीची पुनर्घटना झाल्यामुळें चिनी सरकारचे उत्पन्न वाढलें व यानंतर चिनी सरकारनें कांहीं परदेशीय रेल्वे विकत घेतल्या.

१९०२ मध्यें रशियानें मांचूरिया प्रांत सोडून देण्याचें कबूल केलें होतें; पण रशिया आपलें वचन पाळील असा रंग दिसत नव्हता. मांचूरियांतील रशियन सत्ता जपानी सरकारास न खपल्यामुळें जपान व रशिया या दोन राष्ट्रांत युद्ध झालें व त्यांत रशियाचा पराभव होऊन दक्षिण मांचूरियातील रशियास दिलेल्या सवलती जपानास मिळाल्या व रशियाचा उत्तरेकडील रेल्वेच्या टापूंतील प्रदेशाचा ताबा कायम राहिला. या युद्धनें चिनी लोकांत बरीच खळबळ उडाली. परकीय दोन राष्ट्रांनी साम्राज्यसत्तेस यःकश्चित् समजून साम्राज्यपटावर एकमेकांशीं युद्ध करून आपली तडजोड करून घ्यावी याचा चिनी लोकांस खेद वाटला. त्यांची जागृति अधिक प्रज्वलित होऊन जपानचें अनुकरण केलें असतां आपणासहि यूरोपियन राष्ट्रांस तोंड देतां येईल अशी त्यांची खात्री झाली.

सा म्रा ज्यां ती ल ल ष्क री व इ त र सु धा र णा.— १९०५-७ च्या दरम्यान चिनी सरकारनें बर्‍याचशा लष्करी सुधारणा अमलांत आणल्या. राजघराण्यांतील व सरदार घराण्यांतील तरुणांनी लष्करी शिक्षण घ्यावें असें जाहीर करण्यांत आलें. याप्रमाणें लष्करी पेशाचा दर्जा वाढविण्यांत येऊन सैन्यातील लोकांचा पगार वाढविण्यांत आला. १९०७ सालीं एक राष्ट्रीय फौज तयार करण्यांत येऊन तिचें आधिपत्य मुख्य सरकारास जबाबदार अशा अधिकार्‍यांवर सोंपविण्यांत आलें.

१९०५ सालीं साम्राज्याच्या राज्यपद्धतींत योग्य सुधारणा करण्याकरितां एक साम्राज्यमंडळ स्थापन करून त्यास परदेशांतील निरनिराळ्या राज्यपद्धतीचें परिशीलन करण्यासाठीं परदेशास पाठविले. हें मंडळ परत आल्यावर १९०८ नंतर ९ वर्षांनी चीन देशांत पार्लमेंट (प्रतिनिधीसभागृह) स्थापन करण्याचें जाहीर केले.  १९०६ सालीं चिनी सरकारनें अफू पिणे, उत्पन्न करणें किंवा ओढणें बंद करण्याबद्दल जाहीरपत्रकें काढलीं.

१९०२ सालीं चिनी सरकारनें पेकिंग येथें पाश्चात्य धर्तीवर एक विद्यापीठ स्थापन करून एक कलाभुवन उघडलें व शिक्षक व अधिकारी यांस शिक्षण देण्याकरितां एक नवें खातें निर्माण केलें. १९०६ सालीं प्रचलित परीक्षा घेण्याची पद्धत बंद केली. इतिहास, भूगोल, परकीय भाषा व उच्च दर्जाच्या शिक्षणांत अर्थशास्त्र व कायदा हे विषय शिकविण्यांत येऊं लागले.

१९०८ सालीं एंप्रेस डॉवेजर लंगयू मरण पावल्यामुळें चीनचा राज्यकारभार रीजंटच्या मार्फत चालू झाला. यावेळीं चीनची आर्थिक व सामाजिक स्थिति फारच खालावली होती. पाश्चात्य शिक्षणानें नवीन नवीन कल्पना उदयास येऊं पहात असल्यामुळें जुन्या व नव्यांमध्यें दुफळी माजली होती. चिनी सरकार तर कर्जबाजारी बनलें होतें. मांचू राजघराण्याच्या अंमलाखालीं नेहमीं दुष्काळ व महापूर यांनीं, लोकांना पीडा होत असल्याकारणानें मांचु घराण्याची सत्ता अजीबात नष्ट करण्याची प्रबल इच्छा लोकात जागृत झालेली होती. विशेषत: डॉ. सन्यत्सेन यांच्या अनेक हस्तकांनीं तर मांचु राजघराण्याच्या विरुद्ध जोरानें चळवळ चालू केली होती. व त्यांच्या प्रयत्‍नाला यशहि येत चाललें होतें. तशांतच हुकौत्र रेल्वेसाठी परराष्ट्रांतून कर्ज काढण्याचें मांचुघराण्यानें लोकांच्या इच्छेविरुद्ध ठरविल्यामुळें, तर काप लोकांनीं बंडें करण्यास सुरवात केली.

१९११ सालच्या आक्टोबर महिन्यांत हंकौ येथें लोकांनीं बंड करून वूचंग टांकसाळ व हन्यंग येथील दारूगोळा आपल्या ताब्यांत घेतला. हें पाहतांच रीजंटची गाळण उडून त्यानें काहीं दिवसापूर्वी पदभ्रष्ट करण्यांत आलेल्या युआन शिकाई या चिनी व्हॉईसरॉयला, आपणांस मदत करण्यास बोलावलें व त्याला हुनान व हुयेन या प्रांतांचे व्हाईसराय नेमंलें. युआन हा रजिंटच्या बाजूनें बंडखोर लोकांचा पाडाव करण्याच्या उद्योगास लागला. तरी मनांतून त्याला जितका उत्साह वाटावयास पाहिजे तितका वाढत नव्हता. त्यानें लौकरच बंडखोरांचा पराभव केला, पण जनतेमध्यें जी प्रक्षोभाची ज्वाला पसरलेली होती ती मात्र ह्याला शमवितां आली नाहीं. कांहीं दिवसांनी युआन हा चीनचा मुख्य प्रधान झाला.

चीनमधील १४ प्रांतांनीं राजशाहीविरुद्ध बंड पुकारलें होतें व राजशाहीच्या कांहीं कट्टया पुरस्कर्त्यांनीहि राजशाहीबद्दल तटस्थपणा स्वीकारण्यास सुरुवात केली होती. राजशाहीचें केंद्र असा नानकिंग प्रांत हाहि लोकशाहीच्याकडे झुकूं लागला होता. अशी परिस्थिती पहातांच, युआननें सन्यत्सेन व त्याचे अनुयायी यांच्या बरोबर, बोलणें लावावयाचें ठरविलें. त्याप्रमाणें वाटाघाट सुरू होऊन 'राजशाही कां लोकशाही' या प्रश्नाचें उत्तर चीनच्या जनतेच्या प्रतिनिधीच्या मतावर सोपवावें असें ठरविण्यांत आलें. त्याप्रमाणें सर्व प्रांतांच्या प्रतिनिधींची सभा भरून सन्यसेन याला चीनच्या प्रजासत्ताक राज्याचें अध्यक्ष म्हणून निवडण्यांत आलें. चीनच्या बादशहानें आपण सिंहासन सोडल्याचें जाहीर केलें.

डॉ. सन्यत्सेन हा चिनी प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्ष झाल्यावर युआन यास निरनिराळ्या प्रांतांमध्यें प्रांतिक स्वराज्य स्थापन करण्याच्या कामावर नेमण्यांत आलें. पुढें कांहीं दिवसांनी डॉ. सन्यत्सेन यानें आपल्याऐवजीं युआन यासच तात्पुरता अध्यक्ष नेमलें व युआनहंग यास उपाध्यक्षाची जागा देण्यांत आली. एप्रिल २ इ. स. १९१२ मध्यें, प्रजासत्ताक राज्याची राजधानी पेकिंग येथें करण्यांत आली. चीनमधील निरनिराळ्या प्रांतांचें प्रत्येकीं पांच प्रतिनिधी कांहीं इतर व औटर मंगोलिया व तिबेट यांमधील प्रत्येकी पांच प्रतिनिधी व कोकोनरचा प्रतिनिधि अशा सर्व प्रतिनिधींचें मिळून एक मंडळ निवडण्यांत आलें.

युआन शिकाइ हा प्रजासत्ताक राज्याचा अध्यक्ष झाला खरा. पण अध्यक्ष्याची कामगिरी पार पाडणें हें फार मुष्किलीचें काम होतें. तो स्वत: मनापासून राजशाहीचा पक्षपाती होता. त्यामुळें लोकशाही पक्षाचा तो मनांतून अत्यंत द्वेष करीत असे. चीनची आर्थिक स्थितीहि फार खालावली होती. सर्व जनतेंत बेदिली माजून राहिली होती. अशा स्थितींत आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर त्यानें कसाबसा राज्यकारभाराचा शकट चालू ठेवला होता. त्यानें निरनिराळ्या राष्ट्रांकडून कर्ज मिळविण्याची खटपट केली. त्याप्रमाणें १९१३ सालीं १ कोटी पौंडांचे कर्ज मिळालें. अशा रीतीनें पैसा हातीं येतांच त्यानें आपलें खरें स्वरूप प्रगट करण्यास सुरवात केली. चीनच्या पार्लमेंटमध्यें कू पिन टंग या जहाल पक्षाचे लोक फार होते. त्यांच्यांशीं त्यानें विरोध मांडण्यास सुरुवात केली. अर्थातच त्याचाहि प्रतिकार करण्यासाठीं निरनिराळ्या प्रांतातून सुरुवात झाली. कांहीं कांहीं ठिकाणीं छोटी बंडेंहि झालीं. पण युआननें तीं सर्व मोडून टाकिलीं. अशा रीतीनें आपलें वर्चस्व स्थापन केल्यानंतर युआननें चीनच्या राज्याची संघटना करण्यास सुरुवात केली. पाण्यासारखा पैसा खर्च करून व लष्करी सामर्थ्याचा देखावा मांडून त्यानें आपल्या बाजूचें लोकमत तयार केलें व निवडणुकीमध्ये यश संपादन केलें. अशा रीतीनें पुन्हां पांच वर्षे अध्यक्ष स्थानावर आरूढ होतांच त्यानें प्रथम पार्लमेंटमधील जहालपक्षाच्या प्रतिनिधींनां गुप्‍त कटांत सामील असल्याच्या आरोपावरून हांकलून लावलें. त्याच्याप्रमाणें प्रांतिक कायदेमंडळांतूनहि जहालपक्षाच्या प्रतिनिधींचेंहि उच्चाटन करविलें. चीनमधील सर्व सरकारी अधिकार्‍यांची बैठक भरवून त्यांनां पुढील धोरणासंबंधीची त्यानें दिशा आंखून दिली. इतकी सर्व व्यवस्था झाल्यानंतर त्यानें पूर्वीप्रमाणें एकतंत्री अंमलाची पद्धत सुरू करण्याचा घाट घातला.

पण एवढ्यावरूनच त्याची महत्त्वाकांक्षा तृप्‍त झाली नाहीं. त्यानें स्वतःला बादशहा म्हणवून घेण्याची व आपलें घराणें राजघराणें बनविण्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा धरली. या त्याच्या महत्त्वाकांक्षेला पुष्कळ दिशेनें विरोध होणार हें त्याला पूर्णपणें माहीत होतें. तरी त्या विरोधाला तोंड देऊन आपले हेतू सफळ करण्याचा त्यानें संकल्प केला.

महायुद्ध सुरू होतांच चीनमध्यें राजशाही स्थापन व्हावी एतदर्थ जोराची चळवळ सुरू झाली. युआनच्या पक्षपात्यांनीं युआनला राजपद प्राप्‍त व्हावें यासाठी खूप खटपट आरंभिली, पण युआननें राज्यपदावर आपला हक्क सांगितल्यास त्या गोष्टीला जपान कधींहि संमति देणार नाहीं असें जपानच्या परराष्ट्रमंत्र्यानें जाहीर केल्यामुळें या प्रश्नाला नवीनच स्वरूप प्राप्‍त झालें. खुद्द युआनच्या पक्षपात्यांपैकीं, लियंग चइचओ या प्रसिद्ध विद्वानानें, युआनला असली महत्वाकांक्षां न धरण्याबद्दल जाहीर सूचना केली; व आपलें हें मत जनतेमध्यें फैलावण्यास सुरुवात केली. युआनहि कमी वस्ताद नव्हता. त्यानें हा प्रश्न प्रांतिक सरकार व त्यांमधील प्रतिनिधींच्या मतांवर सोंपविण्याचा बहाणा केला व त्याला सनदशींरपणाचें स्वरूप आणलें. प्रांतिक मंडळांतील प्रतिनिधी याच्याच बाजूचे होते व त्यांनीहि एकमतानें युआनच्या म्हणण्याला दुजोरा दिला. युआननें जपानची व लोकमताची पर्वा न करतां आपण तख्तनशीन होण्याचें ठरविलें, व १९१६ च्या २ फेब्रुवारीला आपला राज्याभिषेकाचा दिवस जाहीर केला.

पण युआनाच्या या सुलतानशाहीला प्रत्युत्तर म्हणूनच कीं काय यूनप्रांतानें त्साइ एप्रोच्या नेतृत्वाखाली बंडाचें निशाण उभारलें. थोडक्याच दिवसांनी कुअंगशी व क्यूइचौ या प्रांतांनी तोच मार्ग चोखाळला युआनच्या अनुयायांनी युआनला आपला बेत लांबणीवर टाकण्याचा व तसें जाहीर करण्याचा उपदेश केला पण त्यानें ही गोष्ट साफ नाकारली. त्यामुळें त्यांच्या पक्षपात्यांतच फाटाफूट झाली. युआनविरुद्ध जिकडेतिकडे असंतोष माजला. चीनमध्यें यादवी माजण्याचीं चिन्हें दिसूं लागलीं. पण सर्वांच्या सुदैवानें युआन हा अशा आणीबाणीच्या वेळीं मरण पावला व त्याच्या जागीं युआन हंग हा चीनचा अध्यक्ष झाला.

पण युआनच्या अंगांत जे अलौकिक गुण होते त्याचा युआन हंगच्या अंगी बराच अंशी अभाव होता. त्यामुळें याच्या अमदानींत चीनमध्यें अधिकच बंडाळी माजली. चीनमध्यें कुमिन्ट हा पक्ष व लष्करीपक्ष होते. हे पक्ष राजकीय तत्वांवर एकमेकांशीं भांडण्यापेक्षां व्यक्तिद्वेषच माजवीत होते. या वेळी चीनची सत्ता, लष्करीपक्षाच्या ताब्यांत होती ली युआन हंग यानें या पक्षाच्या सर्व प्रतिनिधींची बैठक भरवून सर्व चीनावर आपल्या पक्षाचा अंमल असल्याचें जाहीर करण्यास सांगितलें. या लष्करी पक्षाचा प्रमुख टूमन चि गुइ हा चीनचा प्रधान होता. त्यांनें दक्षिण चीनमधील कांहीं प्रतिनिधी व चीनमधील कांहीं प्रतिनिधी यांचें एक छोटेसें मंत्रिमंडळ तयार केलें. पार्लमेंटमध्यें कुमिंटंग पक्षाचें प्राबल्य होतें, यानें १९११ पूर्वी नानकिंग येथें ठरलेली प्रजासत्ताक पद्धति अमलांत आणण्याविषयीचें आपलें मत जाहीर केलें. पण लियुअन हंगनें त्याची पर्वाच बाळगली नाही. त्यामुळें पुन्हां चीनमध्यें पूर्ववत अंदाधुंदीचें साम्राज्य सुरू झालें.

त्याचवेळीं महायुद्धांत चीननें दोस्तांच्या वतीनें भाग घ्यावा किंवा नाहीं या प्रश्नाला महत्त्व प्राप्‍त झालें. टुआनचिजुई व त्याचें मंत्रिमंडळ दोस्तांच्या वतीनें महायुद्धांत चीननें भाग घ्यावा या मताचे होतें पण पुष्कळसे अधिकारी चीननें तटस्थ रहावें या पक्षाचें होते. अशारितीनें चीनमध्यें या प्रश्नावर द्विधामत झालें होतें व त्यांतच पक्षद्वेषाचीहि भर पडली. ज्यावेळीं हा प्रश्न पार्लमेंटपुढें आला त्यावेळीं, प्रथम प्रधान व अध्यक्ष यांच्यामध्येंच भिन्नमत झालें. टुआननें राजीनामा देण्याची धमकी घातल्यामुळें अध्यक्षानें प्रधानाच्या म्हणण्याला दुजोरा द्यावयाचें कबूल केलें. टुअननें दोस्तांच्या वतीनें भाग घेण्याचें बहुमतानें ठरविलें व त्यानें जर्मनी विरुद्ध चीननें लढाई पुकारल्याचे जाहीर केलें. पण थोडक्यात दिवसांत, पक्षभेदाचें झाकलेलें स्वरूप पुन्हां उघडकीस येऊं लागलें. अध्यक्ष युआन हंग याच्या पक्षामध्यें पुष्कळच लोक, कूमिटंग पक्षाचें होते. त्यांनां टुआन व त्याच्या लष्करी पक्षाचें वर्चस्व असह्य होऊं लागलें होतें. त्यांनीं टुआनचा पक्ष कमजोर करण्याचें ठरविलें. टुआननें जपानशीं आंतून संधान बांधलें आहे अशी बातमी या लोकांनां लागली होती. या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनीं टुआनच्या पक्षाविरुद्ध चळवळ करण्यास सुरवात केली होती. चीननें दोस्तांच्या वतीनें प्रत्यक्ष युद्धांत भाग घेणें, जर्मनीचें सुखासुखी वैर पत्करणें बरें नाहीं असें मत त्यांनी प्रतिपादन करण्यास सुरवात केली.  पार्लमेंटच्या सभेंत दोस्तांनां यापुढें चीननें प्रत्यक्ष मदत करूं नये असें ठरविण्यांत आलें. पण टुआननें, तसें करण्याचें नाकारलें तेव्हां अध्यक्षानें त्याला मुख्य प्रधानाच्या जागेवरून बडतर्फ केलें. टुआननें आपल्या लष्करीपक्षाच्या साहाय्यानें, कुमिटंगच्या पक्षाचा पाडाव करण्याचा निश्चय केला व उलटपक्षीं कुमिटंगपक्षानेंहि दक्षिण चीनमध्यें आपलें सैन्य जमवून, पार्लमेंट व लोकांच्या हक्कांचें संरक्षण करण्यासाठीं तयारी चालविली.

टुआननें आपल्या पक्षाच्या साहाय्यानें टींटसिन येथें एक तात्पुरतें सरकार स्थापन केलें व त्या सरकाराचा अध्यक्ष सूशी चंग यास नेमलें. आपल्या सैन्याच्या जोरावर त्यानें पेकिंग येथें येऊन ली युआन हंग यास आपल्या मागण्याला रुकार देण्याबद्दल धमकीवजा निरोप पाठविला. अध्यक्षानें या अडचणींतून आपला बचाव करण्याकरितां जनरल चंग यास बोलावणें पाठविलें. त्याप्रमाणें तो आपल्या सैन्यासह राजधानींत आला पण टुआनच्या म्हणण्याला शेवटीं ली हनचंगला रुकार द्यावा लागला.

चीनमध्यें अशा प्रकारें बंडाळी माजलेली पहातांच अमेरिकेनें चीनला आपली अंतःस्थ स्थिति सुधाण्याविषयीं व तत्पूर्वी जर्मनीविरुद्ध लढाई न पुकारण्याची सल्ला दिली. याचा अर्थ अमेरिका ही टुआनच्या धोरणाला प्रतिकूल आहे असा कुमिटंगच्या पक्षपात्यांना केला. त्यामुळे तर कुमिटंगच्या पक्षाला बळ चढलें. शिवाय टुआनचें जपानशीं सूत असल्याची बातमी सगळीकडे पसरल्यापासून तर जपानपासून चीनचे रक्षण करण्याचा या कुमिटंग पक्षानें निर्धार केला.

इकडे जनरल चंग यानें या अवधींत तिसराच डाव आरंभला होता. त्यानें आपल्या हातीं साम्राज्याची सत्ता आणून मांचू घराण्यांतील बाळराजास पुन्हा तख्तावर बसवून राजशाही स्थापन करण्याचा घाट घातला होता. हे पहातांच टुआननें त्याच्यावर स्वारी करून त्याला शरण येण्यास भाग पाडलें; व अशा रीतीनें पुन्हां प्रधानकीचीं वस्त्र धारण केलीं. टुआन हा आतां जवळ जवळ 'सुलतान' झाला. तेव्हां त्याच्याशीं अध्यक्ष लीयुआनहंगचें पटेनासें होऊन त्यानें राजीनामा दिला व त्याच्या जागी फैंगकूचंग हा अध्यक्ष झाला. यानंतर टुआननें दोस्तांच्या वतीनें जर्मनीविरूद्ध युद्ध पुकारल्याचें पुन्हा जाहीर केलें.

दोस्तराष्ट्रें व चीन सरकार यांच्यामध्यें गुप्‍त तह होऊन 'बाक्सर युद्धाची खंडणी' कमी करण्याचें व समुद्रावरील व्यापारावर चीनला जकात वाढवूं देण्याचें कबूल केलें. शिवाय चीनला १ कोटीं येन कर्जहि देण्याचें ठरविण्यांत आलें.

चीनची आर्थिक परिस्थिति अगदीं खालावत चालली होती. अशा वेळीं ही आयत्या वेळीवं पैशांची मदत मिळाल्यामुळे टुआन हा चीनची आर्थिक व राजकीय परिस्थिति सुधारण्याच्या उद्योगास लागला. याचवेळीं त्यानें जर आपल्या विश्वासांत कूमिंटनच्या पक्षाच्या प्रतिनिधींनां घेतलें असतें तर चीनमध्यें पुन्हां शांतता प्रस्थापित होण्याचा बराचसा संभव होता. पण ती मुत्सद्देगिरी त्यानें न दाखविल्यामुळें दक्षिणचीन उत्तरचीन विभागणीबद्दल चळवळ सुरू झाली. अध्यक्ष फेंगचेंग हा नमतें घेण्याला तयार होता पण टुआन हा त्याला तयार नव्हता. अर्थात् अध्यक्ष व टुआन यांचें पटेनासे झाल्यामुळें टुआननें प्रधानकीचा राजीनामा दिला. पण लष्करी पक्षाच्या आग्रहावरून त्यानें तो राजीनामा परत घेतला.

लवकरच अध्यक्षाच्या निवडणुकीला सुरुवात झाली, व जनरल सूची चंग हा अध्यक्ष म्हणून निवडून आला. त्यानें दोस्तराष्ट्रांच्या सहाय्यानें उत्तरचीन व दक्षिणचीनमध्यें एकी घडवून आणून संयुक्त पार्लमेंट बनवण्याची खटपट केली; पण त्यांत त्याला यश आलें नाहीं. शांघाई येथें जी शांततापरिषद भरली होती तींत जपानशीं जो गुप्‍त तह केला होता व ज्याच्यामुळें जपानला चीनच्या राजकारणांत आपलें वर्चस्व गाजविण्याला संधी मिळण्याचा संभव होता तो तह टुआननें मोडून टाकावा अशी दक्षिण चीनच्या प्रतिनिधीनें व चीनमधील तरुणपक्षानें मागणी केली. ती नाकारण्यांत आल्यामुळें ठिकठिकाणीं प्रचंड निषेधप्रदर्शक सभा भरविण्यांत आल्या. विद्यार्थ्यांनीं संप केले. याचा फार परिणाम होऊन टुआन याला आपल्या प्रधानकीचा राजीनामा द्यावा लागला. चिंचग याचा पक्ष बळावला व चीनमध्ये शांतता होईल असें वाटूं लागलें. पण सूचि चंग हाहि जपानच्या बाजूचा आहे असें थोडक्याच दिवसांत आढळून येऊं लागलें. उत्तरचीनमधील लष्करी पक्षानेंहि पुन्हां आपलें सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्‍न सुरू केला; व अध्यक्षानें जनरल चंग यास अधिकाराची जागा देऊं केल्यानें पुन्हां राजशाही स्थापन होणार असेंहि भाकीत कित्येकांकडून करण्यांत येऊं लागलें.

या अंदाधुंदीच्या काळांत चीनमध्यें बेबंदशाहीच माजली होती. लोकांचें हाल फार होऊं लागले होते. चीनची आर्थिक परिस्थिति फारच बिघडली होती. ही हलाखीची स्थिति नाहीशी करण्याकरितां अमेरिका, ग्रेटब्रिटन, फ्रान्स व जपान यांनीं एकत्र जमून चीनला आर्थिक मदत करावयाचें ठरवलें. चीननें आपलें लष्कर मोडून टाकावें अशी अट मात्र या राष्ट्रांनीं घातली होती. पण ही अट पाळली जाईल असा रंग दिसेना, उलट कांहीं कांहीं भागात चीनमधील सरदारांनीं आपापलीं सैन्यें वाढविण्याचाच उद्योग आरंभला.

गेल्या तीन चार वर्षांत चीनमध्यें मध्यवर्ती सरकार मुळींच राहिलें नाहीं असें दिसतें. देशांत पैसा विपुल आहे, परंतु सरकारचें मात्र दिवाळें निघालें आहे. लुटारूपणा करणारें व कज्जेदलाली करणारे लष्करी गव्हर्नर, लोकांवर सत्ता गाजवूं लागले. बेकायदेशीर वर्तन करणार्‍यांपासून जनतेचें व परकीय नागरिकांचें रक्षण करण्यास सरकारजवळ सामर्थ्य उरलें नाहीं. वरील पुंड लोक हे सरकारांतून पगार न मिळाल्यामुळें बेफाम झालेले सैन्यांतील शिपाईच होत.

१९२१ मे मध्यें काटकसर करण्याची चळवळ सुरू झाली. लिशिहवेह या गृहस्थाची फडनीस म्हणून नेमणूक करण्यांत आली. याचा परिणाम चीनमध्यें जपानी सत्तेचा पुनः प्रवेश होण्यांत झाला. जूनमध्यें इचंग नामक व्यापारी ठिकाणावर व यांगत्सिक्यांग या नदीतीरावरील वूवंग या ठिकाणीं, दंगे होऊन कत्तलहि झाली. याला मुख्य कारण म्हरजे उभारलेल्या कर्जाचें व्याज देण्याची सरकारला ऐपत राहिली नाहीं हें होय. आर्थिक व सामाजिक दृष्ट्या बरीच प्रगति झालेली असूनहि सरकारचें दिवाळें निघालें. त्याचें मुख्य कारण असें कीं, निरनिराळ्या प्रांतांच्या लष्करी गव्हर्नरांमध्यें तंटे होऊं लागले. चीनच्या परदेशाशीं होणार्‍या व्यापारांत हे गव्हर्नर ढवळाढवळ करीत असत. सप्टेंबरांत जनरल बूपेहफूनें, ३०००० झेचूअ‍ॅनीज लोकांचा मोड केला. हे लोक बाह्यत: स्वातंत्र्यार्थ, परंतु वस्तुतः लुटीकरतांच लढत होते. यंगटीझे येथील दर्यावर्दी खात्यांत विस्कळितपणा उत्पन्न झाला व डिसेंबरांत सरकारनें दिवाळें काढलें. डॉ. वूयेन हा परराष्ट्रमंत्री मुख्य प्रधान झाला व त्याच्या नंतर लिअंग शिहयी हा मंत्रीपदावर आरूढ झाला. 'दि बँक इंडस्ट्रियेल डी चायने' नामक बँकेचें दिवाळें निघालें व फ्रान्समध्यें त्यामुळें खळबळ उडाली.

१९२२ त चीनमधील विविध पक्ष व त्यांची स्थिति :— पेकिंग सरकारचा ताबा मिळावा म्हणून दोन बलाढ्य प्रांतिक गव्हर्नरांमध्यें जी झटापट चालली होती त्यासच अन्तस्थ युद्ध असें म्हणतात. परराष्ट्रांनीं पेकिंग सरकारला मान्यता दिलेली नसून पेकिंग सरकारनेंच लीग ऑफ नेशन्सच्या कौन्सिलांत आपले प्रतिनिधी पाठविले होतें. परंतु पेकिंग सरकार सत्ताहीन व द्रव्यहीन झालें होतें.  कँटन अथवा दक्षिणेकडील सरकारचा राज्यकारभार सन्यत्सेन पहात होता. चीनच्या १८ प्रांतांपैकी फक्त दोहोंवर दक्षिण सरकारचा अम्मल चालू होता, व चेन चिअंग मिंगच्या नियंत्रणाखालीं मोठें सैन्यहि होतें. वू पेइफू व चँग टिसो लिन हे प्रतिस्पर्धी पुढारी मुकडेन येथें होतें. ते १९२२ च्या एप्रिल मध्यें पेकिंगवर चाल करून गेले. निकराचें युद्ध झाल्यावर वू पेइफूनें चंग टिसोलिनचा पराभव केला. चंग टिसोलिन हा पळून गेला. २० लक्ष डॉलर चिहली लोकांबद्दल व ८ लक्ष डॉलर सामान्य लोकांच्या बद्दल नुकसानभरपाई म्हणून घ्यावे असा वू पेहफूनें त्यांस हुकूम केला. वू पेइफू हा स्वदेशांतील कांहीं भाग जपानला विकावा या सूचनेच्या विरुद्ध होता. कारण कर्जामुळें उत्तरेकडील पेकिंग सरकार जपानच्या हुकूमतीखालीं होतें व 'अ‍ॅन फ्यू क्लब' च्या चळवळीमुळें जपानचें तेथें चांगलें बस्तान बसलें होतें. ऑगस्ट १९२२ मध्यें, चन हिअंगमिंग यानें दक्षिणचीनातील सन्यत्सेनची सत्ता संपुष्टांत आणली व तेथें तोच मालक झाला. १९२२ नोव्हेंबरच्या सुमारास पार्लमेंटमध्येंहि सुमारें वीस तट पडलें.

१९२३ च्या जानेवारीत चॅग चिअंगमिंग हा पळून गेल्यामुळें सन् यत् सेन हा कॅन्टन येथें पुन: अधिकाररूढ झाला. टिसाओ कुन, वू पेहफू, चि सच मुअन, व लू अं ग शिअंग अशा उत्तरेकडील चार पुढार्‍यांचा दक्षिणेकडील पुढार्‍यांशीं समेट व्हावा म्हणून फेब्रुवारींत प्रयत्‍न करण्यांत आला. १९२३ सालीं अनेक दरवडे, मारामार्‍या व दंगे झाले. पगार थकल्यामुळें संतापलेले लोकच दंगे करीत असत व याच लोकांनीं सरकारला आपलें सैन्य परत बोलवा असा एक निर्वाणीचा संदेश पाठविला. या लष्करी लोकांनां उघडपणें राज्यसूत्रें हातीं घेतां येईनात; तथापि त्यांनीं प्रधानमंडळावर दाब ठेविला होता. लष्करी पुंडांच्या दहशतीमुळें १९२३ जूनमध्यें लि युआनहंग नांवाच्या अध्यक्षानें व त्याच्या प्रधानमंडळानें राजीनामा दिला. ऑक्टोबरांत टिसाओकुन हा नवीन अध्यक्ष निवडून आला व ह्या कामीं बरेच लाचलुचपतीचे प्रकार घडून आले. सर्व प्रांतांत १९२३ सालभर अंतस्थ युध्दें चालूच होतीं. डिसेंबरांत, सन् यत् सेन यानें कॅन्टन येथील जकातीचें ऑफिस ताब्यांत घेऊन सर्व सारा व जकात ताब्यांत घेण्याचा धाक घातला. सोव्हिएट सरकार व मजूरपक्ष यांचें सहाय्य होईल अशी त्यास अपेक्षा होती. पेकिंगला जकात देऊं नये अशी ह्यानें अमेरिकेस विनवणी केली. बिनहरकतीनें परदेशचें लष्करी सामान चीनमध्यें जाऊं लागलें. फ्रान्सहून बाँबगोळे नेणारीं १२ विमानें मुकडेन येथें उतरली व अशा रीतीनें अंतस्थ युद्धाची व्याप्ति वाढत चालली.

१९२४ सालभर युध्दें चालूच होतीं. कइंगसू व चेकिअंग अशा दोन प्रांतांच्या गव्हर्नरांमधील तंटे विकोपाला गेले. पेकिंग येथें १९२४ ऑक्टोबरांत, राष्ट्रिय सैन्यानें बंड केलें व आगगाड्या, तारायंत्रे व टेलिफोन वगैरे उध्वस्त केले. शेवटीं साधारण शांतता झाल्यावर हु अंग फू नामक नवीन अध्यक्षाची निवडणूक झाली. तथापि नोव्हेंबरमध्यें, वू पेइ फू हा दक्षिणेंत सैन्याची जमवाजमव करून दहशत उत्पन्न करण्याचा प्रयत्‍न करीत होता असें दिसतें. सन्यत्सेन सु हा १९२५ त मरण पावला.

चि नी म जू र.— पुढें दिलेल्या दक्षिण आफ्रिकेंतील चिनी मजुरांच्या स्थितीवरून व अमेरिकेंतील चिनी लोकांच्या स्थितीवरून चिनी मजुरांची परदेशांत कोणत्या प्रकारची स्थिति असते याची कल्पना येईल.

इ. स. १९०४ सालच्या फेब्रुवारी महिन्याच्या ८ तारखेस ट्रान्सव्हाल कायदेकौन्सिलांत आफ्रिका खंडाच्या बाहेरील मंडळींनां मजुरी करण्याकरितां देशांत येऊं देण्याविषयी एक नियम पास झाला. त्याचीं कलमें येणें प्रमाणें :—

९ व्या कलमाप्रमाणें प्रत्येक चिनी मजूर आपल्याला पाठविणार्‍या मालकाला अथवा ज्याला तो आपले सर्व हक्क देईल अशा मालकाला बांधला जाईल.

१४ व्या कलमाप्रमाणें कोणत्याहि चिनी मनुष्याला व्यापार करण्याची, आज्ञापत्र घेण्याची, जमीन करारानें भाड्यानें घेण्याची अगर कोणताहि व्यवहारिक हक्क मिळविण्याची सक्त मनाई होती.

१८ व १९ कलमाप्रमाणें मजुरानें आपल्या धन्याची जागा सोडूं नये व तसें करणें झाल्यास योग्य मनुष्याची अथवा ज्याला त्याच्या मालकानें तसा अधिकार दिला असेल त्याची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाऊं नये.

२० व्यांतील कलम (२) प्रमाणें मजुरानें धन्याच्या आवाराबाहेर सांपडल्यास कोणत्याहि पोलीसला त्याला एकदम पकडण्याची पूर्ण मोकळीक असावी.

३१ कलमा (१०) प्रमाणें आपल्या धन्याची नोकरी सोडून गेलेल्या मजुराला दुसर्‍या मजुरानें घरांत घेतलें अगर लपवून ठेवलें अथवा वरील नियमभंग केला किंवा असें काम करणार्‍यास दुसर्‍यास प्रवृत्त केलें तर त्या मजुराला ५० पौंड दंड केला जाईल; व तो न दिल्यास तीन महिन्यांची कैद दिली जाईल.

हा कायदा लागू होण्यास राजसंमतीची गरज होती; व ती पार्लमेंटमध्यें दोन दिवस सारखी बवति न भभति होऊन शेवटीं मार्चच्या ११ तारखेला मिळाली, आणि मे महिन्याच्या १२ तारखेस कोणत्याहि चिनी मनुष्याला इंग्रज सरकारला हक्कानें मजुरी करण्याकरितां कोणत्याहि इंग्रजांच्या ताब्यांतील मुलुखांत नेण्याची परवानगी मिळाली. ह्या नियमानुसार चिनी लोकांची पहिली तुकडी हांगकांगहून १९०४ च्या मे महिन्यांच्या २५ तारखेस निघाली. मजुरी रोज १ शिलिंग ठरली होती व अडीच वर्षांच्या अवधींत रँड माइन्समध्यें काम करण्यास अर्ध्या लाखाहून अधिक चिनी लोक पाठविण्यांत आले. परंतु लवकरच असें दिसून आलें कीं त्यांनां अति व्रूच्रपणानें  वागविण्यांत येतें. त्यांनां परत आपल्या देशीं पाठविणें हेंहि द्रव्यदृष्ट्या कठीणच झालें. त्यांनां येथें राहूं देणेंहि अधिक खर्चाचें दिसूं लागलें. खाणींच्या मालकांनां चिनीलोकांकडून काम करून घेण्यांत अतोनात फायदा होत असे; कारण त्यांची मजुरी कोणत्याहि गोर्‍या मनुष्यापेक्षां निमपटीनें तरी कमी असे. पुष्कळसे चिनी लोक काम करूं लागल्यामुळें दक्षिण आफ्रिकेंतील मजुरांकरितां नेमलेल्या मंडळास अतिशय फायदा होऊन मुसुलमान लोकांनां गोळा करून नेण्याची खटटक त्यांच्या कपाळाची एकदाची सुटली. ट्रान्सवालमधील चिनी मजुरांनां निष्ठुरतेनें वागविल्याबद्दल इंग्लंडांतील उदारमतवादी आणि रूढमार्गवादी ह्या उभय पक्षांचा राग खवळला. चाबकानें मारणें व अन्य तर्‍हेनें निर्दयपणानें चिनी मजुरदारांशीं वर्तणूक केल्यामुळें पुष्कळ चिनी लोक पळून गेले व जे राहिले ते लोकांनां भीतिदायक वाटूं लागले. ह्या सर्वांचा शेंवट येथें एक राष्ट्रीय संघ स्थापण्यांत झाला. हा संघ (प्रागतिक मंडळाचे) कसेंहि काम पुढें ढकलणार्‍या मंडळींविरुद्ध होता. चिनी मजुरदारांनां पुढें केव्हांहि आफ्रिकेस आणूं नये व तेथें असलेल्यांनांहि खाणीच्या मालकांनां खर्चानें परत चीनला पाठवून द्यावें असें तेथील नवीन संघाच्या क्रेसवेल नांवाच्या एका पुढार्‍यानें फार स्पष्टरीतीनें जाहीर केलें.

युनायटेड स्टेट्समधील चिनी लोक.— परराष्ट्रांतील लोकांनीं आपल्या देशांत रहाणें म्हणजे देशांतराधिवास करणें हें सामाजिक दृष्ट्या युनायटेड स्टेट्समधील लोकांना जितकें महत्त्वाचें दिसतें तितकें जगांतील दुसर्‍या कोणत्याहि लोकांनां दिसत नाहीं. देशांतराधिवासाचें मुख्य दोन प्रकार देता येतात. एक इष्ट व दुसरा अनिष्ट. ह्या दुसर्‍या प्रकारांत नैतिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या व शारीरिक दृष्ट्या नागरिक रहाण्यास अयोग्य अशी मंडळी मोडतात. या दोन प्रकारांमधील रेषा बरोबर रेखाटणें अतिशय कठिण आहे म्हणूनच चिनी लोकांनां युनायटेड स्टेट्समधून काढावें की नाहीं हा प्रश्न अद्याप सुटत नाहीं.

चिनी लोकांनां आपला देश सोडून जाणें केव्हांहि बरें वाटत नाहीं. परंतु १८५४ सालापासून युनायटेड स्टेट्समध्यें त्यांची संख्या फारच जोरानें वाढूं लागली व पुढें तर हजारों चिनी दरवर्षी तिकडे लोटूं लागलें. ह्यांची गर्दी कॅलिफोर्निआ प्रांतांत इतकी झाली कीं, तेथील लोकांनीं चिनी लोकांनां देशांत येऊं देऊं नये इतकेंच नव्हे तर जे आलेले आहेत त्यांनां हांकून द्यावें असा कायदा पास करण्याकरितां सरकारास विनंति केली. व असा कायदा १८९४ सालीं पासहि केला. त्यामुळें बहुतेक सर्व लोकांनां तो देश सोडून जावें लागलें. कॅलिफोर्निआंतून चिनी लोक निघून गेल्यामुळें त्या प्रांतांचें बरेंच नुकसान झालें. कारण तेथील गोर्‍या लोकांपेक्षां चिनी लोक कोणत्याहि कामाकरितां मजुरी कमी घेऊन जास्त वेळ काम करीत असत. अर्थात् थोड्या पैशांत अधिक काम करणारी मंडळी निघून गेल्यामुळें कारखानदारांचें नुकसान होऊं लागलें; व चिनी लोकांनां सरकारनें कायद्यानें हांकून देऊं नये म्हणून पुनः सरकारकडे अर्ज जाऊं लागले. जे गोरे लोक चिनी लोकांमुळें उपाशी मरूं लागले होते त्यांनीं यांनां हांकून देण्याविषयी उलट अर्ज केले. मोलमजुरीचें काम रेल्वेचे रस्ते बांधण्याचें काम, शेतकी, वीणकाम, जोडे तयार करण्याचें काम व केरसुण्या बांधण्यासारखींहि कामें चिनी लोक निम्म्या दरानें करीत असत. थोडक्या पैशांत उदरनिर्वाह करून राहिलेली पुंजी दारू पिण्यांत, भटकण्यांत व अशीं दुसरीं भलती कामें करण्यांत उडवीत असत. तर्‍हेतर्‍हेचे गुन्हें करण्याकरितां चिनी लोकांनीं गुप्‍तमंडळे स्थापिली होतीं व लुटालूट, चोर्‍या, जुगार व वेश्यावृत्ति हे त्यांचे धंदे असत व हीं कामें करण्यास जे प्रवृत्त होत नसत त्यांचा खून करण्याकरितां ते कुर्‍हाडी बाळगणारीं माणसें कामीं लावीत. हा जुलूम ते बहुधा आपल्याच लोकांवर करीत.

थोड्या पैशांत काम करणें हें इष्ट आहे असें चिनी लोकांनां देशांत राहूं देणार्‍या मंडळीचें मत पडलें. कारण त्यांचें म्हणणें असें कीं थोड्या पैशांत काम केल्यानें मनुष्यामध्यें असलेली अन्तर्लीन बुद्धिमत्ता अथवा कार्यशक्ति हिला अनायसे उद्दीपन मिळतें; व नैसर्गिक द्रव्यसाधनांचा फायदा सहज घेतां येतो. उलट पक्षाचें असें म्हणणें पडतें कीं, थोड्या पैशांत काम करणें हें माल स्वस्त दरानें विकण्यासारखेंच आहे; व त्यामुळें द्रव्यसंचय न होतां. उलट द्रव्यविभागणी मात्र होते. असें झाल्यास पेढ्या व सावकारकीच्या धंद्याला मोठाच व्यत्यय येतो. १९०४ सालच्या एप्रिल महिन्याच्या २३ तारखेचा 'आउटलुक' पत्रांतील उतारा घेण्यासारखा आहे. तें पत्र असें म्हणतें कीं चिनी मजुरदारलोकांसारखी काटकसर, कार्यदक्षता, उद्योगीपणा व राजनिष्ठा क्वचितच आढळते. कॅलिफोर्नियांतील शेतकी व बागाईत हे केवळ त्यांच्या श्रमाचें फल होय. जर कायद्यानें त्यांनां नागरिकत्वाचा हक्क मिळूं शकत नाहीं तर स्वजातिसंघ करून राहणें त्यांनां भाग पडतें. यांत त्यांचा दोष नाहीं.

का य दे का नू.— १८६८ सालच्या बर्लिंगेम येथें झालेल्या तहाप्रमाणें कोणत्याहि चिनी मनुष्याला देशांत येण्याची अगर देश सोडून जाण्याची पूर्ण परवानगी मिळाली आहे. देशांतराधिवासी होण्याची तेव्हां सक्त मनाई नव्हती. १८८२ त पास केलेल्या कायद्यानें चिनी लोकांनीं १० वर्षे युनायटेड स्टेट्समध्यें येऊं नये असें जाहीर केलें. परंतु तेथें आधी गेलेल्यांना घालविण्यांत आलें नाहीं. उलट ज्यांची चीनला जाऊन परत येण्याची इच्छा होती त्यांनां परवाना देत असत. शेवटीं ह्या गोष्टीचा चांगलाच उहापोह होऊन १८९४ च्या डिसेंबर महिन्याच्या ८ तारखेला पुढील कायदा पास करण्यांत आला. त्यांचीं कलमें येणेंप्रमाणें :— (१) दहा वर्षेपर्यंत चिनी मजूरदारांनीं युनायटेड स्टेट्समध्यें पाऊल टाकूं नये. (२) चिनी मजुरदारांनां बायका मुलें व कमीत कमी ३००० रुपयांची मालमत्ता अथवा तितकें कर्ज असल्यास येऊं देण्याची परवानगी असावी. (३) अंमलदार, शिक्षक, विद्यार्थी, व्यापारी, प्रवासी व देश पाहण्याचें लालसीनें आलेली मंडळी यांनां मज्जाव नसावा. (४) युनायटेड स्टेट्समध्यें रहाणार्‍या सर्व चिनी रहिवाशांनां ''परमकृपापात्र नागरिक'' अशी संज्ञा देऊन त्यांचें पूर्णपणें रक्षण करावें व त्यांनां नागरिकाचे सर्व हक्क द्यावे असें ठरविण्यांत आलें. परंतु नंतर एक सभा भरून तींत १९०२ सालच्या एप्रिल महिन्याच्या २९व्या तारखेस पास झालेले सर्व कायदे अधिक जोरानें अंमलांत आणले गेले.

पनामा.— पनामाची खाडी (कॅनाल) खोदतांना चिनी मजुरांनां कामाला लावावें किंवा नाही याविषयीं युनायटेड स्टेट्सच्या अधिकारीमंडळाला बरीच वाटाघाट करावी लागली. तत्संबंधीं प्रेसिडेंट रुझवेल्टचें म्हणणें असें पडलें की, वर्णभेद न ठेवतां शक्य तितक्या लवकर व उत्तम रीतीनें जेणेंकरून पनामा कॅनाल खोदतां येईल अशी योजना करणें इष्ट आहे. चिनी मजुरदारांशीं निष्ठुरतेनें न वागतां नागरिकांचाहि पोटमारा न होऊं देण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अशानें खरे कार्योपयुक्त मजुर कोणते आहेत हें कळून सर्वस्वी हें खोदकाम परराष्ट्रीयांच्या हातांत दिलें जाणार नाहीं. यावर फोरम नांवाचें पत्र चिनी लोकांना त्यांचा धर्म, कर्मठपणा, चालीरीति, ध्येयें व यांसारख्या दुसर्‍या गोष्टीबद्दल मज्जाव करावा असें म्हणतें.  परंतु डॉ. रॉबर्ट हचेसनचें म्हणणें असें पडतें कीं चिनी लोकांनां मज्जाव केव्हांहि करूं नये. निदान काटकसरीपणा हा त्यांचा गुण गर्हणीय नसून अनुकरणीय आहे.

चि नी भा षा — ही भाषा बोलण्याची भाषा व लिहिण्याची भाषा या दोन पृथक् सदरांखालीं पडते. पाश्चात्य भाषा व बर्‍याचशा पौरस्त्य भाषा यांत बोलण्याची व लिहिण्याची भाषा एकच असल्यामुळें असा फरक करण्याचें कारण पडत नाहीं. पण चीनमध्यें या दोन भाषा बर्‍याच भिन्न आहेत.

बोलण्याची भाषा ही सर्वत्र एक नसून तिचेहि अनेक पोटभेद आहेत. तथापि या सर्व पोटभाषा मूळ एकाच भाषेपासून निघाल्या आहेत; आणि शिवाय लिहिण्याची भाषा ही सर्वत्र एकच असल्यामुळें सर्व चिनी प्रांतांनां एकत्र जोडणारें तें मोठेंच साधन आहे.

मंडारिन ही एक प्रमुख पोटभाषा आहे. हिची पेकिंगीज (पेकिंग राजधानीची भाषा) ही महत्त्वाची शाखा आहे. ही भाषा बहुतेक चिनी लोकांना येते. एवढेंच नव्हें तर सरकारी अधिकारी याच भाषेंत एकमेकांशीं बोलतात. कॅन्टनीज भाषा ऐतिहासिक व भाषाशास्त्रदृष्ट्या महत्त्वाची खरीच पर तिला पेकिंगीज मागें टाकिते. चीनमधील सर्व पोटभाषा एकाक्षरी असून त्यांमध्यें फारसे वेगवेगळाले उच्चार नाहींत. कॅन्टनीजमध्यें आठशें नऊशें उच्चार व पेकिंगीजमध्यें ४२० पेक्षां जास्त उच्चार नाहींत. मोंगोलियन जनता व काळाची प्रगति यांचा परिणाम होऊन पेकिंगमधील उच्चार हळू हळू कमी होत गेले. या उच्चारदारिद्र्याचा असा परिणाम झाला कीं निरनिराळ्या शब्दांचें काम एका उच्चारावर भागवावें लागत आहे. कधींकधीं एकाच उच्चाराला दहा दहा अर्थ असतात. तेव्हा भाषणाचा अर्थ समजून घेणें फार कठिण जाते यांत शंका नाहीं. या अडचणीला तोड म्हणून अनेक युक्त्या लढविण्यांत आल्या आहेत. एक युक्ति म्हणजे एक कल्पना व्यक्त करण्यासाठीं जोडशब्द योजणें ही होय. उदा. 'को' चा अर्थ 'वडील भाऊ' असा आहे पण याच अर्थानें शब्द योजण्यापूर्वी को-को असा अभ्यास किंवा द्विरुच्चार करितात किंवा 'त' (महत्) हा उपसर्ग लावून त-को असा उच्चार करितात. पुष्कळ वेळां शब्दांनां विशेषणें जोडून म्हणतात. उदा. 'लाओ-हु' म्हातारा वाघ. यावरून बोलण्याची भाषा द्विराक्षरी बनली आहे असें दिसून येईल.

आतां कमी उच्चारांची अडचण कशी नाहींशी करण्यांत येते तें पाहूं. एकच उच्चार निरनिराळ्या सप्‍तकांत म्हणून उच्चारांची संख्या वाढविली जाते. एखादें चिनी वाक्य स्पष्ट, हळूं व नीट म्हटल्यास भाषानभिज्त्र माणसाला तें गाण्याप्रमाणें लागेल. साधारणपणें चार स्वर स्वतंत्र वाटतात- सम, आरोह, अवरोह व प्रवेश. शिवाय प्रत्येकाला खालच्यावरच्या सप्‍तकांत जातां येतें. पण कॅन्टनीज भाषेला मात्र हे आठ प्रकार लागतात; पेकिंगीजला चारच उपयोगी पडतात. या स्वरांना प्राचीन इतिहास आहे; म्हणजे कोणत्या काळांत कोणता स्वर उद्भूत व प्रवृद्ध झाला याची कांहीं माहिती सांपडते. पुढील एकाक्षरी संभाषण चार पेकिंगीज स्वरांची बरोबर कल्पना आणून देईल :— १ला स्वर-मेला (थोड्या खेदपूर्ण, पण उंच एक स्वरांत); २ रा स्वर-मेला? (निवळ प्रश्न); तिसरा स्वर-मेला? (लांब ओढून म्हटलेला संशय प्रदर्शित करणारा प्रश्न); ४ था स्वर-मेला ! (चोख व निश्चयाचें उत्तर). हें उच्चारभिन्नत्व संवयीनें कळतें.

चिनी लिपीची माहिती विज्ञानेतिहासांत (पृ.६५) आलीच आहे. परकीय भाषा शिकण्यास त्या भाषेतील कोश जो आवश्यक लागतो त्याची उणीव चिनी भाषेंत नाहीं हें 'चीनचा वैज्ञानिक इतिहास' या ज्ञानकोशाच्या ५ व्या विभागांतील प्रकरणावरून दिसून येईलच. पण व्याकरण मात्र नाहीं याचें आश्चर्य वाटतें. शब्दांचा एकमेकांशीं संबंध कसा असावा, यासंबंधीं नियम चिनी लोकांनीं ठरविलेले नाहींत; कारण त्यांची जरुरीच भासली नाहीं. परकी लोकांनीं मात्र चिनी भाषेचें व्याकरण करण्याचें बरेच प्रयत्‍न केलेले आहेत. तथापि अगदीं शुद्ध असें व्याकरण अद्याप झालेलें नाहीं. नेहेमींची बोलण्याची भाषा व पुस्तकी भाषा यांत बरेंच अंतर आहे. फार प्राचीनकाळीं या जवळजवळ होत्या. आतां पुस्तकी भाषेचा अर्थ आपल्याकडील प्राकृताप्रमाणें समजावून सांगावा लागतो, पुस्तकी भाषा फार उच्च दर्जाची आहे व बोलकी भाषा अवनत झाली आहे. त्यामुळें वक्तृत्वाचा अभ्यास करण्याची चिनी लोकांत आवड उत्पन्न होत नाहीं व यामुळें चिनी नाट्य भाषा प्रगत झालेली नाहीं.

चि नी वा ङ्‌म य.— चिनी वाङ्‌मयामध्यें आपणाला पुढील गोष्टी आढळून येतील (१) याचा आरंभ अतिशय पुरातन कालीं झाला असून त्याची वाढ आजपर्यंत अव्याहतपणें होत आहे. (२) हें वाङ्‌मय सर्वांगपरिपूर्ण असून आपणाला या वाङ्‌मयामध्यें केवळ विषयच नव्हे तर प्रत्येक पोटविषयांवर व त्यांतील प्रत्येक निरनिराळ्या मुद्यांवर भरपूर लिखाण आढळून येईल, आणि यामुळें एकंदर वाङ्‌मयाची वाढ फारच अवाढव्य प्रमाणावर झालेली आपणांस दिसून येईल. (३) चिनी इतिहासाची कितीहि कसून छाननी केली तरी त्यामध्यें आपणांस सत्याचा विपर्यास केलेला क्वचितच आढळून येईल. (४) त्याप्रमाणेंच या वाङ्‌मयामध्यें फारच शुद्ध व उच्च ध्येय पुढें ठेवल्याचा प्रत्यय येऊन ग्राम्यता व अश्लीलता यांस अजीबात फांटा दिलेला दिसेल.

चिनी भाषेमध्यें चिनी वाङ्‌मयाचा इतिहास अद्याप कोणी लिहिलेला नाहीं. परंतु चिनी ग्रंथकार वाङ्‌मयाचा आढावा काढण्याकरितां अथवा सूची करण्याकरितां या वाङ्‌मयाचे मुख्यत: ४ भाग करतात. यांपैकी पहिल्या भागांत वेदांगस्वरुपी वाङ्‌मयाचा अंतर्भाव होतो. या वर्गांत कन्फ्युशियस याचें धर्मशास्त्र, कोश, भाषाशास्त्र व व्युत्पत्ति वगैरे शब्दाभ्यासविषयक ग्रंथ यांचा समावेश होतो. दुसर्‍या भागामध्यें निरनिराळ्या प्रकारचें सरकारी, खासगी वगैरे इतिहास, चरित्रात्मक, भूवर्णनात्मकं व सूचीस्वरूपी ग्रंथ येतात. तत्त्वज्ञान, धर्म, कला व शास्त्रें, ज्ञानकोश व इतर विषयांवरील ग्रंथ तिसर्‍या भागांत येतात व चवथा भाग केवळ काव्यांकरितां राखून ठेवलेला असतो.

या वाङ्‌मयाचा कालानुक्रमानें विचार करावयाचा म्हणजे प्रथम आपणांस काव्याकडे वळलें पाहिजे. सर्व सामान्य नियमांप्रमाणेंच मनुष्याच्या विचारांनां प्रथमत: जें उच्चाराचें स्वरूप आलें तें काव्यांतच आलें. व सर्वांत प्राचीन असें जें चिनी वाङ्‌मय आज उपलब्ध आहे तें पोवाडे व वीररसात्मक लावण्या व इतर अशाच प्रकारच्या गाण्यांच्या रूपांत आढळतें. यापैकीं कांहीं ख्रिस्तपूर्व १००० वर्षे या कालचीं असून बहुतेक सरंजामी कालांतीलच आहेत. याच काव्यांचा कन्फ्युशियस यानें संग्रह करून त्यास 'शिकिंग' (संहिता) असें नांव दिलें व तो संग्रह हल्लीं त्याच्या धर्मशास्त्रांत सामील झाला आहे. मात्र हा संग्रह करतांना कन्फ्युशियस यानें एकंदर ३००० प्रचलित पद्यांपैकीं फक्त निवडक सुमारें ३०० पद्यांचाच यांत समावेश केला आहे. या कवितांचा विषय सामान्यत: युद्ध व प्रेम हा असून कांहीमध्यें नाच, मद्यपान व आयुष्यांतील सुखदुःखें व राजांचे सद्‍गुण अगर दुर्गुण यांचेहि वर्णन आढळतें. चिनी काव्याला अन्त्ययमक हें अवश्य आहे व निर्यमक कवितेचा प्रघात चीनमध्यें नाहीं.

यानंतर 'तअंग' घराणें राज्यावर असतांना (इ. स. ६१८-९०५) चीन देशांत काव्याची फार भरभराट होऊन बेसुमार वाढ झाली.  इ.स. १७०७ मध्यें 'तअंग' कालांतील कवींच्या सर्व कविता बादशहाच्या हुकमानें एकत्र केल्या. त्यांची एकंदर संख्या ४८९०० इतकी भरली व त्यांचे ९०० ग्रंथ झाले. याची एक प्रत केंब्रीज येथील विश्वविद्यालयांतील ग्रंथसंग्रहालयांत आहे. या कालांतील प्रमुख कवी म्हटले म्हणजे मेंग हौ-जॉन (६८९-७४०); वांग वेई (६९९-७५९) हा चितारीहि होता; लिपो उर्फ लितैपो (७०५-७६२) याला 'स्वर्गच्युत देवदूत' असें म्हणत. हा नौकेंत बसला असतां पाण्यांत पडलेल्या चंद्राच्या प्रतिबिंबास अलिंगन देण्याकरितां  ओणावला असतां बुडून मेला. याच्याच तोडीचा तुफु (इ. स. ७१२-७७०) हा कवि आपल्या कवितांचे महत्त्व इतकें मानीत असें कीं त्यानें हिवतापावर औषध म्हणून आपल्या कविता म्हणण्यास उपदेश केला होता. पो चुइ (इ. स. ७७२-८४६) हा मोठमोठ्या अधिकाराच्या जागांवर असूनहि त्यानें पुष्कळ उत्तमोत्तम कविता रचल्या आहेत. याच्या कविता बादशाही हुकूमानें शिलांवर खोदून ठेवल्या आहेत.

तअंग घराण्यानंतर आलेल्या सुंग घराण्याच्या कारकीर्दीतहि काव्याची बरीच भरभराट झाली. या कालच्या काव्यामध्यें कल्पना व रचना यामध्यें जास्त वैचित्र्य आढळून येतें. परंतु या कालांतील काव्यांमध्यें ठिकठिकाणीं कृत्रिमता व निर्बंध आढळतात, त्याचप्रमाणें या कालांतील आयुष्यक्रमहि पूर्वीइतका सुखाचा व सुलभ नसून जीवितक्रमाकडेहि कवींचें लक्ष्य वेधलेलें दिसतें. या कालांतील कवींमध्यें सुमा कुआंग, ओश्यांगहिड, वांग अन्शि हीं नांवें प्रामुख्यानें आढळतात. याखेरीज सु तुंग पो (इ. स. १०३१-११०१) हाहि बराच लोकप्रिय होता.

यानंतर होऊन गेलेल्या मोंगोल व मिंग घराण्यांच्या कारकीर्दीत जरी काव्यामध्यें पुष्कळ भर पडली तरी वरील दोन कालांतील काव्यांची सर त्यांस आली नाहीं. यांच्या मागून नुकतेंच पदच्युत झालेलें मांचु घराणें अधिकारारूढ झालें. या घराण्यांतील दोन बादशहांखेरीज बाकीच्यांच्या कारकीर्दीतहि वरीलप्रमाणेंच स्थिति होती. कांग ही व चिएन लुंग हे दोघेहि सुसंस्कृत बादशहा असून कवी होते व यांपैकीं एकानें तर एकंदर ३३९५० स्फुट काव्यें लिहिलीं.

चीनमध्यें महाकाव्य मुळींच उत्पन्न झालें नाही, तथापि सर्वच कविता केवळ लहान लहान चुटके नसून कांहीं काहीं बरींच मोठीं खंडकाव्यें आहेत. चीनमध्यें ध्वनिकाव्यें फार उत्कृष्ट समजलीं जातात. काव्यामध्यें सुगमता, साधेपणा व शुद्धरचना यांकडे विशेष लक्ष्य देण्यांत येतें. परंतु कांहीं टीकाकरांचें असेंहि मत दिसतें की, क्लिष्टता हाहि एक काव्याचा गुणच असून अर्थ जितका गूढ तितकें स्वारस्य अधिक असें त्यांचे म्हणणें आहे. एका चिनी ग्रंथकारानें 'हृदयतरंगाचें शब्दचित्र' अशी काव्यांची व्याख्या केली आहे. चिनी काव्यांचा विषय सामान्यत: निसर्ग, व आयुष्यांतील सुख दुःखाचें प्रसंग हे आहेत. शृंगारिक कवितांचाहि कांहीं अभाव नाहीं. तथापि या विषयावर चिनी कवींचा विशेषसा भर दिसत नाहीं व जीं आहेत त्यामध्येंहि सभ्यतेचें व शिष्टाचाराचें अतिक्रमण अगर ग्राम्यविनोद व अश्लीलता यांनां मुळींच वाव नाहीं. चिनी कवींची प्रतिभा गिरिनिर्झर व त्यांतील येंक्षकिन्नर आणि वृक्षलता व पुष्पें यांमध्यें स्वच्छंदानें व उल्हासानें विहार करते. चिनी कवीचे जिवितक्रमाबद्दलचे उद्‍गार बहुश: निरुत्साही असून त्यांमध्यें पुष्कळवेळां दुःखाची छटा व भविष्यकाळाच्या अज्ञानामुळें औदासिन्य आढळून येतें. कवि आनंदाच्या लहरींत असला म्हणजे त्यास मद्यापासून स्फूर्ति होते व दुःखांत असला म्हणजे समाधान मिळतें. चिनी कवींमध्यें मद्यासक्ति सार्वत्रिक असून पुष्कळ कवींनीं सुरेचे गोडवे गाइले आहेत. ताओधर्म व बौद्धधर्म यांतील कांहीं विषयांवरहि चिनी कवींनी पद्यरचना केली आहे, पण सामान्यपणें चीनमध्यें पारमार्थिक अगर सांप्रदायिक अशीं काव्येंच आढळत नाहींत.

इतिहास :— कन्फ्यूशिअस यानें काव्याप्रमाणेंच प्राचीन कागदपत्रांचा संग्रह केला. त्यास 'शू किंग' असें नांव असून तो कन्फ्यूशिअस याच्या धर्मशास्त्रांत सामिल केला आहे. जरी हे कागदपत्र म्हणजे अर्धवट टिपणें वगैरे स्वरूपाचे आहेत तरी त्यांवरून वरील काव्यांच्या मदतीनें त्यावेळच्या संस्कृतीचें व समाजस्थितीबद्दलचें अनुमान काढतां येतें. यामध्यें यौ नांवाच्या एका बादशहाच्या कारकीर्दीपासून (ख्रि. पू. २३५७-२२५५) आरंभ केला असून त्यानें वर्षांची लांबी व ॠतुकाल ठरविल्याबद्दलचा उल्लेख आहे. याच्या कालगणनेंत अधिकमास गृहित धरावा लागत असे. यानें आपलें राज्य एका लोकप्रिय व पूत्रवत्सल मनुष्यास अर्पण केलें. याचें नांव शुन बादशहा (ख्रि. पू. २२५५-२२०५). यानें राजकीय संस्था स्थापन केल्या व कायदा, न्याय, दंड, धार्मिक विधि व संस्कार व कामगारांच्या परीक्षा घेण्याची पद्धषत इत्यादि गोष्टी अमलांत आणल्या. हा प्रार्थना करीत असे व यज्त्र (होम) करीत असे. यानंतर महात्मायु (ख्रि. पू. २२०५-२१९७) यास राज्य मिळालें. यानें जलप्रलयानें आलेलें पाणी राज्याच्या बाहेर समुद्रांत वाहून नेल्यानें यास हा अधिकार मिळाला. (हा जलप्रलय नोहाच्या काळाचाच होय असें दाखविण्याचा पाश्चिमात्य ग्रंथकार भोळसर प्रयत्‍न करतात.) याखेरीज या बादशहाच्या कारकीर्दीत निरनिराळ्या सभोंवतालच्या देशांतून खंडणीदाखल जें सोनें, रुपें, तांबें, लोखंड, पोलाद, रेशीम, पिसें, हस्तीदंत, कातडीं वगैरे जिन्नस येत असत त्याबद्दल कांहीं माहिती दिली आहे. एका भागांत निरनिराळ्या मोहिमा व त्यांमध्यें मिळालेल्या विजयांचें वर्णन असून, सैन्यासमोर प्रोत्साहनपर केलेलीं भाषणें, जाहिरनामें वगैरे नमूद केलीं आहेत. यांतच मद्यपानाविरुद्ध काढलेल्या जाहिरनाम्यावरून त्याकाळीं मद्यपानाचा प्रसार विशेष झाला असून तो पुढें अजीबाद बंद झाला असावा असें दिसतें. गेल्या दोन तीन शतकांत मद्यपान हें अपवादादाखलच आढळण्यांत येतें.

यानंतर कन्फ्यूशियस यानें आपला पितृदेश जोलु त्याची बखर लिहिण्याचें काम हातीं घेऊन ती ख्रि. पू. ७२२ पासून ४७९ (कन्फ्यूशियस हा याचवर्षी मरण पावला) पर्यंत आणली व पुढें त्याच बखरीवर टीका लिहिणारा त्सौविउ मिंग यानें कांही वर्षे पुढें चालविलें. या बखरीचें नांव घुनचिउ असें असून तीमध्यें कांही मित्या देऊन त्या दिवशीं घडलेली हकीगत दिली आहे. यामध्यें राजांच्या परस्पर भेटी, जन्म, मृत्यु, लग्नें, स्वार्‍या इ. विषय असून ग्रहणें भूकंप, धूमकेतु, दुष्काळ वगैरेंचाहि उल्लेख आहे.

परंतु चीनमध्यें इतिहासाचा वास्तविक आरंभ सुमाचिएन (१४५-८७ ख्रि. पू.) या ग्रंथकारापासून होतो. यानें सर्व देशभर प्रवास केला होता व बापाच्या मरणानंतर तो दरबारी ज्योतिषी होता व याच्या बापानें आरंभ केलेल्या शि-चि नांवाच्या बखरीचें काम यानें बहुतेक पार पाडलें. या बखरीचे ५ भाग केले आहेत. (१) बादशहांच्या कारकीर्दीचें वर्णन, (२) घडलेल्या गोष्टींचें कालानुक्रमानें कोष्टक, (३) निरनिराळ्या विषयांवर स्वतंत्र लेख: (अ) विधि व संस्कार, (आ) संगीत, (इ) सृष्टिशास्त्र, (ई) पंचांग, (उ) ज्योतिष, (ऊ) धर्म, (ॠ) पाटबंधारे, व (ए) व्यापार, (४) मांडलिक राज्यांचा इतिहास, (५) चरित्रें. या बखरीचा आरंभ पीतबादशहापासून होतो. यानें ख्रि. पू. २६९८ या वर्षापासून १०० वर्षे राज्य केलें. यानंतर वर निर्दिष्ट केलेले यौ, शुन व इतर असे ४ राजें झाले. हा काल म्हणजे चीनचें सत्ययुग होतें व सर्व प्रजा व राजा सद्‍गुणी असून सर्वत्र समृद्धि व शांति नांदत होती. यानंतरचा कांहीं काळ असाच दंतकथा वगैरेनींच व्याप्‍त आहे. यानंतर चौ घराण्याबद्दल (ख्रि. पू. ११२२-२५५) कांहीं माहिती आढळतें. यापैकीं पहिल्या ३०० वर्षानंतरची साधारणत: विश्वसनीय अशी माहिती मिळते. ख्रि. पू. तिसर्‍या शतकामध्यें एका राजानें त्यावेळीं सर्व किरकोळ राज्यें स्वसामर्थ्यानें पादाक्रांत करून एकतंत्री राज्यस्थापना केली व ख्रि. पू. २२१ या वर्षी स्वतःची पहिला बादशहा म्हणून द्वाही फिरविली. प्रत्येक गोष्टीचा आरंभ आपल्या कारकीर्दीपासून झाला पाहिजे या महत्त्वाकांक्षेनें प्रेरित होऊन एका मंत्र्याच्या सल्ल्यानें त्यानें शेतकी, वैद्यक, ज्योतिषखेरीज करून सर्व विषयांचे ग्रंथ जाळून टाकण्याबद्दल हुकूम सोडले. हा हुकूम अमान्य केल्यामुळें सुमारें ४६० लेखकांस ठार मारण्यांत आलें व पुष्कळांनां हद्दपार केलें. ही गोष्ट पुस्तकांची (ग्रंथांची) होळी म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु कांहीं ग्रंथ भिंतींमध्यें पुरून किंवा अन्य तर्‍हेनें राखून ठेवण्यांत आलें. नाही तर चिनी वाङ्‌मयाचा आरंभ ख्रि. पू. २१२ या वर्षापासूनच व्हावयाचा. ख्रि. पू. २०६ या वर्षी चीन घराण्याची अखेर होऊन हान घराण्याच्या हातीं राज्य आलें. तेव्हां छपवून ठेवलेलीं पुस्तकें पुन: शोधून काढण्यांत आलीं. मात्र या संशोधनाच्या लाटेमध्यें पुष्कळसे बनावट ग्रंथ मूळच्या नांवानें पुढें करण्यात आले व सध्यांच्या शोधकास या काळच्या वाङ्‌मयामध्यें खरे कोणतें व बनावट कोणते याची छाननी प्रथम करावी लागते. यापैकीं कन्फ्यूशिअन धर्मशास्त्र -बहुतेक परंतु सर्व ग्रंथ नव्हेत- हें पहिल्या वर्गांत मोडतें व तौ-ते-चिंग वगैरे पुस्तकें दुसर्‍या वर्गांत मोडतात. सुमाचिएन याच्या ग्रंथासारखे निरनिराळ्या घराण्यांचे इतिहास त्याच्याच पद्धतीनें लिहिलेले असे एकंदर २४ प्रसिद्ध झाले. या सर्वांची एक आवृत्ति इ. स. १७४७ मध्यें निघाली आहे. तिची एक प्रत (ग्रंथसंख्या २१९) केंब्रिज ग्रंथसंग्रहालयांत आहे. प्रत्येक घराण्यांतील राजांनी आपल्या पूर्वी होऊन गेलेल्या घराण्याचा इतिहास लिहून काढविला आहे व तो नि:पक्षपातीहि आहे. हे इतिहास बहुतेक सरकारी कागदपत्रांवरून तयार केलेले आहेत. फक्त तअंग घराण्याचा इतिहास पहिल्यानें चुकीचा लिहिलेला आढळून आल्यामुळें ओउ यांग हिउ या पंडितानें तो पुन: लिहून काढला. हे इतिहास सुमाचिएन याच्याच बखरीच्या धर्तीवर लिहिलेले आहेत.

तथापि चीनमधील ऐतिहासिक वाङ्‌मय म्हणजे केवळ वरील बखरीच नव्हत; कारण चिनी ग्रंथकारांचा इतिहास हा आवडता विषय असून वरील सरकारी बखरींखेरीज पुष्कळ लहानमोठे इतिहास कांहीं पूर्ण, कांहीं विशिष्ट कालचे, कांहीं राजकीय कांहीं शासनसंस्थांविषयीं असे निरनिराळ्या प्रकारचे बाहेर पडले आहेत. यापैकीं एक दशांशाचाहि नामनिर्देश करण्यापुरेसा आपणाजवळ स्थलावकाश नाहीं. तथापि चिनी लोकांचा सर्वांत आवडता जो 'तुंग चिएन' (इतिहासदर्श) त्याचा नामनिर्देश करणें अवश्य आहे. हा इतिहास इ. स. च्या अकराव्या शतकांतील सुमा कुआंग नांवाच्या मुत्सद्यानें लिहिलेला असून त्यामध्यें ख्रि. पू. पांचव्या शतकापासून इ. स. ९६० पर्यंतची हकीकत दिली आहे. याची भाषाशैली मोठी रमणीय आहे. परंतु यांतील विषयांची मांडणी अभ्यासास सुलभ नसल्यामुळें त्याचें पुन्हां परीक्षण करून चुसु या टीकाकारानें (इ. स. ११३०-१२००) ती बदलली व हल्लीं हा ग्रंथ चिनी इतिहासावर आधारग्रंथ समजतात.

च रि त्रें — वरील बखरींखेरीज निरनिराळ्या लोकांनीं चरित्र संग्रह प्रसिद्ध केले आहेत. कांहीं व्यक्तींची चरित्रें निरनिराळ्या लेखकांनीं निरनिराळ्या दृष्टींनीं लिहिलेलीं आहेत. चिनी लेखकांनीं लिहिलेल्या चरित्रांमध्यें इतर देशांतील सामान्य चरित्रग्रंथांपेक्षां विशेष असें कांहीं आढळत नाहीं. चिनी चरित्रकार नेहमी जन्मस्थानापासून चरित्राचा आरंभ करितो; परंतु जन्मकाल मात्र देतोच असें नाहीं. तो बहुतेक वय व मृत्युकाळ यावरून काढावा लागतो. पूर्वजांबद्दलचा थोडीशी माहिती असते व आयुष्यामध्यें मिळालेल्या निरनिराळ्या अधिकाराच्या जागा, उत्कर्ष अगर अपकर्ष ही सर्व काळजीपूर्वक दिलेलीं असतात.

भू व र्ण न  व प्र वा स :— चिनी वाङ्‌मयामध्यें भूवर्णनात्मक ग्रंथांचीहि रेलचेल आहे. परंतु चीन देशाबाहेरच्या देशांबद्दल थोड्याशा टिपणांखेरीज सर्वसामान्य भूवर्णनात्मक असे ग्रंथ चीनमध्यें सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत झाले नव्हते. तथापि चीन देशाच्या भूपृष्ठीवर्णनावर असंख्य ग्रंथ आहेत. प्रत्येक प्रांत व जिल्हा यांचें सविस्तर वर्णन आपल्याला आढळून येईल व त्यांच मुख्य इमारती, पूल, टेंकड्या व पर्वत, पुराणवस्तू, प्राचीन अवशेष वगैरे, विशिष्ट लोकांचीं चरित्रें व इतर ध्यानांत ठेवण्यासारख्या गोष्टी यांचें टांचण आपणाला दिसेल. चिनी साम्राज्याचा एक मोठा भूगोल इ. स. १७४५ मध्यें प्रसिद्ध झाला व इ. स. १७९४ मध्यें एक कालाक्रनुमिक भूगोल बाहेर पडला.

चिनी लोकांनां प्रवासाची फार हौस असे. व निरनिराळ्या प्रवाश्यांनीं शेजारच्या देशांत खासगी रीतीनें अथवा वकील म्हणून सरकारीं कामाकरितां गेले असतां मिळालेली विविध माहिती आपल्या लहानमोठ्या टांचणांत नमूद करून ठेविली आहे. बौद्धधर्माच्या प्रवेशाबरोबर बुद्धाची जन्मभूमी, बौद्धधर्माचें ग्रंथ, मूर्ती वगैरे पहाण्याची इच्छा होऊं लागली. यामुळें बरेच चिनी प्रवाशी यात्रेच्या निमित्तानें हिंदुस्थान वगैरे देशांकडे आले. यांपैकीं फाहिआन हा इ. स. ३९९ मध्यें मध्यचिनांतून गोबीच्या ओसाड प्रदेशांतून खोतान येथें येऊन हिंदुकुश पर्वत ओलांडून हिंदुस्थानांतील मुख्य मुख्य शहरें पाहून कलकत्याजवळ गलबतांत बसून वाटेंत सिंहलद्वीपांत २ वर्षे राहून मोठ्या प्रयासानें इ. स. ४१४ यावर्षी किआऔजवळ चीनमध्यें उतरला. दुसरा ह्युएनत्संग हा इ. स. ६२९ मध्यें हिंदुस्थानांत येऊन इ. स. ६४५ सालीं परत गेला. यानें आपणाबरोबर पुष्कळ मूर्ती, चित्रें व बुद्धाच्या वेळच्या १५० स्मरणीय वस्तू आणि ६५७ ग्रंथ आणले. व या ग्रंथांचे चिनी पंडितांच्या सहाय्यानें भाषांतर करून इ. स. ६४८ मध्यें आपलें प्रवासवृत्त लिहिलें.

त त्व ज्ञा न — चिनी तत्वज्ञानाच्या इतिहासामध्यें लौत्झु यास अग्रस्थान दिलें पाहिजे. या नांवाचा खरोखरीच कोणी तत्त्ववेत्ता होता किंवा तो केव्हां होऊन गेला. याबद्दल कांहींच विश्वसनीय माहिती नाहीं. निरनिराळ्या ग्रंथांमध्यें उद्धृत केलेलीं सुभाषितें एकत्र केलेला एक ग्रंथ ख्रि. पू. सहाव्या शतकापासून तौतेचिंग या नांवानें लौत्झु याच्या नांवावर प्रसिद्ध आहे. परंतु याचें अतंरंगपरीक्षण केलें असतां हीं सुभाषितें एकाचींच नसून विविध ग्रंथकारांच्या ग्रंथांतील अवतरणें आहेत हें स्पष्ट दिसतें. या ग्रंथाचा ग्रंथांच्या होळीच्या नंतरच पहिल्यानें उल्लेख आढळतो (म्हणजे त्या ग्रंथाच्या कालानंतर ४०० वर्षांनीं).  परंतु यांतील प्रक्षिप्‍त भाग गाळला असतां लौत्झु याच्या नांवानें चालत आलेल्या बहुतेक सर्व सुभाषितांचा संग्रह यांत आढळतो. यामध्यें अकर्तृत्ववादाचा पुरस्कार केला आहे. त्याप्रमाणेंच अपकरिषूपकारः हें तत्त्वहि त्यांत आढळतें. याच्या उलट कन्फ्यूशिअन यानें कर्तृत्ववादाचा पुरस्कार केला असून 'अपकारिषुन्यायदंड: हे तत्त्व प्रतिपादन केलें आहे. ख्रि. पू. चौथ्या व तिसर्‍या शतकाच्या सुमारास होऊन गेलेल्या चुआंगत्सू नावांच्या तत्ववेत्त्यानें लौत्झु याचा पक्ष घेऊन कन्फ्यूशिअस याच्या तत्वावर व पुढें दिलेल्या मोति याच्या सिद्धांतावर अशी कडक व मार्मिक टीका केली कीं त्याचें खंडन करणें त्या काळच्या विद्वानांनाहि अशक्य वाटलें. याच्या ग्रंथाच्या ५३ प्रकरणांपैकीं हल्लीं फक्त ३३ च प्रकरणें शिल्लक आहेत. परंतु जें शिल्लक आहे त्यावरूनहि याची गाढी विद्वत्ता सिद्ध हाते व जरी तो पाखंडी, केवळ कल्पनावादी समजला जातो तरि त्याची कल्पकता आदरणीय वाटते.

कन्फ्यूशिअस याचे आपल्या शिष्यांबरोबरचे संवाद व त्याच्या आयुष्यांतील कांहीं प्रसंग यांचा समावेश त्याच्या धर्मशास्त्रावरील ग्रंथांमध्यें एका भागांत केलेला आहे. मनुष्य हा स्वभावत: चांगला असून बाह्यपरिस्थितीमुळेंच पुढें दुष्ट होतो हा याचा मूळसिद्धांत असल्यामुळें पुत्रवात्सल्य व शेजारधर्म याचें त्यानें फार जोरदार भाषेंत विवेचन केलें आहे. याचा परमेश्वरावर भरंवसा असावासें दिसतें. परंतु मरणोत्तर स्थितीची कल्पना त्यास नसून मनुष्याच्या चांगल्या अगर वाईट कृत्याचें फळ त्यास मिळतें असेंहि त्यास वाटत नसे. केवळ सद्‍गृणाकरितांच सदाचरण पाहिजे असें त्याचें म्हणणें असे. कन्फ्यूशियस याच्या धर्मशास्त्रापैकीं दुसरा ग्रंथ मेन्शिअस (ख्रि. पू. ३७२-२८९) याचा असून त्यानें आपला गुरू कन्फ्यूशिअस याचेच सिद्धांत विशद केलेले आहेत. याच्याच ग्रंथामुळें कन्फ्यूशियस याच्या मतांचा सर्वत्र प्रसार होऊन ती सर्वमान्य झालीं यानें 'मोति' याचा जो विश्वप्रेमाचा (लोककल्याणवाद) सिद्धांत त्याचें खंडण केलें. कन्फ्यूशिअस याच्या धर्मशास्त्रांतील बाकीचे दोन ग्रंथ त्याच्या नातवानें लिहिले व त्यांमध्यें तत्वज्ञानविषयक स्फूट लेख आहेत. मेनशिअस यानें 'मो ति' प्रमाणेंच 'यांगचू' याच्या स्वार्थवादाचाहि मोड केला. मेन्शिअस याच्या म्हणण्याप्रमाणें 'मो-ति' हा लोकहितार्थ सर्वस्वार्पण करण्यास तयार होईल तर 'यांगचू' हा केंसभरहि झीज सोसणार नाहीं. ख्रि. पू. ३ र्‍या शतकांत एक हुन त्झू हा तत्ववेत्ता होऊन गेला. याचें म्हणणें असें होतें कीं मनुष्य हा स्वभावतःच दुष्ट स्वभावाचा असून त्याला उत्तम नैतिक शिक्षण मिळालें तरच तो सुधारतो. यानंतर यांग हिऊंन (ख्रि. पू. ५३-१८) हा होऊन गेला. यानें वरील दोन्ही मार्गांच्या मधील मार्ग पसंत केला. त्याचें मत असें होतें कीं मनुष्य हा स्वभावत: केवळ चांगला अगर वाईट नसून त्यामध्यें दोन्ही स्वभावांचें मिश्रण असतें व वस्तुस्थितीप्रमाणें या गुणांची वाढ होते. याखेरीज हुइनानत्झु (हुइ नान येथील तत्त्वज्ञानी) या नांवाखालीं चालत आलेला एक मोठा ग्रंथ आहे. हा ग्रंथ हुइनानचा राजा लिउआंन (मृ. ख्रि. पू. १२२) यानें लिहिला असें म्हणतात. यानें किमयेवरहि एक ग्रंथ लिहिल्याचें ऐकिवांत आहे. परंतु चीनचा ग्रीस देशाशीं संबध येऊन किमयेचा प्रवेश चीनमध्यें या कालाच्यानंतर झाला. या ग्रंथामध्यें लौत्झु याचेच सिद्धांत प्रतिपादित केले आहेत. परंतु लौत्झु याचे सांप्रदायिक लोक या कालीं अमृताच्या शोधांत गुंतले होते. यावरून हा ग्रंथ कदाचित बनावट असण्याचा संभव आहे. चीनमध्येंहि बेंटलेप्रमाणें कांहीं सत्यान्वेषी टीकाकार होऊन गेले; पण त्यांनीं फक्त कन्फूशिअसच्या ग्रंथांवरच परिश्रम केले व इतर सांप्रदायिक ग्रंथांकडे कोणी लक्ष्य दिलें नाहीं. त्यामुळें परकी मनुष्याला अशा ग्रंथांबद्दल मत बनविणें फार कठीण जातें.

वांगचू (इ. स. २७-९७) हा जडवादी तत्त्ववेत्ता असून त्यानें कन्फ्यूशिअस  व मेन्शिअस यांच्या ग्रंथांवर कडक टीका केली आहे. याच्या ग्रंथांपैकीं फक्त एकच ग्रंथ अस्तित्वांत आहे. याच्या ग्रंथामध्यें दैव, भविष्य, मृत्यू, पिशाच्च, विष, चमत्कार वगैरे निरनिराळ्या विषयांवर ८४ निबंध आहेत.

याखेरीज चीनमध्यें निरनिराळ्या कालांत पुष्कळ तत्त्ववेत्ते होऊन गेले. चुहि (इ. स. ११३०-१२००) हा कन्फ्यूशिअस ग्रंथावरील टीकाकार असून याचे बरेच ग्रंथ आहेत. यानें 'इचिंग' या ग्रंथांतील गूढ उकलण्याचा प्रयत्‍न केला. इचिंग हा कन्फ्यूशिअस याच्या धर्मशास्त्राचा एक भाग असून तो सांकेतिक भाषेंत लिहिलेला आहे. हा ग्रंथ चौ घराण्याचा संस्थापक वेन राजा (ख्रि. पू. ११२२-२४९) यानें लिहिला असें म्हणतात. शौ-युंग (इ. स. १०११-१०७७) याच्या मतें ही लिपी संख्यावाचक असावी. चेंगइ (इ. स. १०३३-११०७) याच्या मतें ही भाषा वस्तूंची सार्वकालिक योग्यता दाखविते. याप्रमाणें निरनिराळ्या विद्वानांचें निरनिराळे तर्क आहेत. परंतु १७ व्या शतकांतील एका ग्रंथकाराच्या म्हणण्याप्रमाणें फक्त 'चु हि' यासच त्या लिपीचा अर्थ बरोबर कळला होता. परंतु तो काय आहे हें अद्यापहि परकीय मनुष्याला एक गूढच आहे.

अ र्थ शा स्त्र.— या विषयावरहि चिनी वाङ्‌मयांत ग्रंथांची उणीव दिसत नाहीं. ख्रि. पू. ७ व्या शतकामध्यें चि संस्थानचा मुख्य प्रधान क्वान चुंग यानें अर्थशास्त्राचा अभ्यास करून त्याअन्वयें आपल्या संस्थानाची संपत्ति व सामर्थ्य पहिल्या प्रतीचें करून दाखविलें. याच्या ग्रंथाचा बराच भाग त्यानें स्वत: लिहिलेला व कांहीं त्याच्याच तत्त्वांचें ग्रथन करून त्याच्यानंतर लिहिलेला असा आढळतो. त्याचें मत प्रत्येक देश हा स्वावलंबी पाहिजे असें होतें.  व त्याप्रमाणें त्यानें शेतकीची सुधारणा केली व कारखानेहि वाढविले. कारण पहिल्याचा उपयोग लढाईमध्यें स्वपोषणार्थ होतो व दुसर्‍याचा शांततेमध्यें स्वसंपत्ति वाढविण्याकडे होतो. तो आयात खुली असावी या तत्वाचा होता व भांडवलवाल्यांचाहि लढाईंत व शांततेच्या काळीं उपयोग होतो असें त्याचें मत होतें. मेन्शिअस हा ठोक व्यापार करणारे व मक्तेदार यांच्यावर जबर कर बसवावें असें म्हणत असे व तो संघ व कोंडी यांच्या विरूद्ध असे वांगअनशि यानें पुष्कळ सुधारणा केल्यामुळें यास 'सुधारक' असें म्हणत. यानें सर्व व्यापाराचा मक्ता सरकारकडे घेतला. उत्पन्नाचा उपयोग प्रथम कर भरण्याकडे नंतर स्थानिक मागणी पुरवण्याकडे करून शिल्लक राहिलेला माल सरकारनें स्वस्त दरानें घेऊन ज्या भागांत विशेष मागणी असेल तिकडे पाठवावयाचा किंवा सांठवून ठेवावयाचा. यामुळें लोकांनां नेहमीं ठराविक भावानें जिन्नास मिळत व जास्त कर देण्याचा त्रास नसे. सरकारचा कर व फायदा मिळून अव्याहत वसूल येत असे. त्याप्रमाणेंच शेतकर्‍यांनां शेंकडा २१/२ व्याजानें सक्तीनें तगाई मिळत असे. परंतु पुराणमताभिमानी चिनी लोकांस या सुधारणा न आवडून त्याच्या आयुष्यांतच त्या बंद पडल्या.
 
युद्धकला.— युद्धकला अथवा व्यूहरचनाशास्त्र या विषयावर चीनमध्यें वाङ्‌मय आढळत नाहीं. सुन वु याचा ख्रि.पू. ६ व्या शतकांतला एक युद्धकला या नांवाचा ग्रंथ आहे व त्यामध्यें, व्यूह, व्यूहछिद्रें, हेर वगैरे १३ प्रकरणें आहेत. या ग्रंथांत चित्रेंहि आहेत.

शेतकी.— शेतकीवरील सर्व चिनी वाङ्‌मय अर्वाचीन आहे. इ.स. च्या १२ व्या शतकामध्यें चेन फु यानें शेतकी, गुरांची पैदास व रेशमाचे किडे या विषयांवर लहान लहान पुस्तकें लिहिलीं. याखेरीज १३ व्या शतकामध्यें लिहिलेलें शेतकीवरील एक सचित्र पुस्तक आहे. त्याची पुनरावृत्ति कांग हि बादशहाच्या हुकुमानें निघून तीत चौपिंगचेन यानें अर्वाचीन धर्तीची चित्रें घातली आहेंत. परंतु शेतकीवरील सर्वमान्य ग्रंथ 'नुंग चेंग चुआन शू' हा 'हु कुआंग चि' यानें रचला. यांत ६० प्रकरणें असून त्यांमध्यें प्राचीन शेतकी, जमीनविभागणी, शेतकी, जलयंत्रे, कृषियंत्रें, लागवड, रेशमाच्या किड्यांची जोपासना, झाडें, गुरांची पैदास, अन्ना व दुष्काळ इतके विषय आहेत.

वैद्यक.— या विषयावरील ग्रंथ चिनी वाङ्‌मयामध्यें भरपूर आहेत. त्यांपैकीं सर्वांत प्राचीन ग्रंथ 'पीत' राजानें (ख्रि.पू. २६९८-२५९८) लिहिल्याची आख्यायिका आहे. हा प्रश्रोत्तररूप आहे. यामध्यें सर्व परंपरागत ज्ञान संगृहीत केलेलें आहे. याप्रमाणेंच व व्रणचिकित्सा, पोतविधि यांची स्थिति आहे. नाडिशास्त्र, ज्वर, त्वग्रोग, नेत्ररोग वगैरे विषयांवर पुष्कळ स्वतंत्र ग्रंथ आहेत. परंतु यांपैकीं कोणताहि ग्रंथ पेन त्सौ या ग्रंथाची बरोबरी करूं शकणार नाहीं. हा ग्रंथ लि शिचेन यानें वीस वर्षे परिश्रम करून इ.स. १५७८ सालीं समाप्‍त केला, यामध्यें प्रणिज, खनिज, वनस्पति वगैरे मिळून १८९.२ औषधांचें विवेचन केलें आहे.
 
भविष्यज्ञान.— या विषयावरहि फार प्राचीन काळापासून चिनी वाङ्‌मयामध्यें ग्रंथरचना आढळून येते. सरकारी पंचांगामध्येंहि शुभाशुभ दिवस निर्दिष्ट केलेले असतात. फक्त ज्योतिष, रमल, सामुद्रिक, मुखपरिक्षा, किमया वगैरे विषयांवर अनेक ग्रंथ आहेत.

चित्रकला.— चिनी लोकांत लेखविद्या ही चित्रकलेइतकीच मान्य झालेली आहे. तथापि चित्रकलेवर पुष्कळ मोठेमोठे ग्रंथ रचलेले आहेत. त्यांपैकी 'हुआन हो हुआपु' हा ग्रंथ फार मोठा आहे. पण त्याचा कर्ता अज्ञात आहे. या ग्रंथांत 'हुआन हो' घराण्याच्या कालांतील (इ.स. १११९-११२६) बादशाही चित्रसंग्रहांत असलेल्या ७१९२ चित्रांची व त्यांच्या २३२ चित्रकारांची नांवनिशी दिली आहे.

संगीतशास्त्र.— या विषयावर प्राचीन वाङ्‌मय अस्तित्वांत नाहीं. कन्फ्यूशिअन धर्मशास्त्रांतील या विषयावरचा भाग पुष्कळ शतकापूर्वीच नाहींसा झाला आहे. कांहीं भाग बखरीमध्यें आढळतो पण संगीतावर स्वतंत्र असा ग्रंथ इ.स. ९ व्या शतकापर्यंत आढळत नाहीं. या शतकामध्यें चि ए कुलु या नांवाचा ग्रंथ मध्यआशियांतून आला. अर्थात तो मूळचा सिथिअन लोकांचा होता. १६ व्या १७ व्या शतकामध्यें झालेले संगतिशास्त्रावरचे अनेक ग्रंथ आहेत. त्यांमध्यें संगीतशास्त्राची उपपत्ती व इतिहास यांचें विस्तृत विवेचन केलेलें आहे. त्यांप्रमाणेंच निरनिराळ्या वाद्यांचीं चित्रें व रागांचे लेखनादर्श (नोटेशन) दाखविले आहेत.

इतर किरकोळ - या सदराखालीं निरनिराळ्या विषयांवरील लहान मोठे ग्रंथ येतील. उदाहरणार्थ, पुराणवस्तुसंशोधन, मुद्राविद्या, कला, रत्‍नपरिक्षा, चहा, दारू, खेळ, विनोद, सूपशास्त्र वगैरे चिनी वाङ्‌मयामध्यें अमुक विषयावर ग्रंथ नाहीं असें नाहीं.

समुच्चयग्रंथ - चिनी लोकांत निरनिराळ्या विषयांवरचीं उपयुक्त पुस्तकें एकत्र करून छापण्याचा प्रघात फार पुरातन कालापासून चालत आलेला आहे. यांपैकीं उदाहरणार्थ आपण लुंग वेइ पिशु हा ग्रंथ घेऊं. हा आकारानें अष्टपत्री ४०० पानांच्या ८ ग्रंथांएवढा होईल. यामध्यें पुढील विषयांचा समावेश केलेला आहे. वाक्प्रचार व म्हणीं व त्यांवर टीपा आणि स्पष्टीकरण, भूवर्णन, दक्षिणदेशांतील वनस्पतिवर्णन, ९२ लोकोत्तर पुरूषांचीं चरित्रे, सुंदरस्त्रीचीं लक्षणें व स्त्रीपरीक्षा व किरकोळ विषयांवर टिपणें :— यांत विश्वोत्पत्ति, लोकोत्तर चमत्कार, मंगोल राजवाडा, मिंगबादशहा, चिनांतील रानटी जाती, ऐतिहासिक प्रसंग, पुराणवस्तु, जादू, अंधविश्वास वगैरे सर्व विषयांवर माहिती आढळते. भाषेच्या शैलीकडे विशेष लक्ष्य पुरविण्यांत येतें व कांहीं ग्रंथांनां केवळ भाषाशैलीमुळेंच महत्त्व येतें.

याप्रमाणेंच चिनी लोकांमध्यें अशी चाल आहे कीं, प्रसिद्ध अगर अप्रसिद्ध कोणीहि ग्रंथकार मृत झाला असतां त्याच्या आप्तांनीं त्याच्या एकंदर लेखांची एक समुच्चयावृत्ति काढावयाची. या आवृत्तीमध्यें प्रथम लेखकानें बादशहास पाठविलेलें अगर इतर सरकारी कागदपत्र (त्यांचें महत्त्व तात्पुरतें असून नष्ट झालें असलें तरी हरकत नाहीं), नंतर इतर ग्रंथांस लिहिलेल्या प्रस्तावना व चीनमध्यें एकाच ग्रंथांत निरनिराळ्या मित्रांकडून निरनिराळ्या प्रस्तावना लिहून घेण्याची चाल असल्यामुळें यांची संख्या बरीच असते. नंतर समकालीन व्यक्तींचीं व ग्रंथकारांचीं चरित्रें, नंतर ग्रंथकारानें केलेल्या प्रवासाचें वर्णन, त्यानें पाहिलेल्या स्थलांचें व इतर गोष्टींचें वर्णन येतें, नंतर त्यानें लिहिलेलें निरनिराळ्या विषयांवरचे निबंध, व इतर किरकोळ अभिनंदनार्थ, सहानुभूतिपर संदेश वगैरे किरकोळ गोष्टी देतात. यावरील गोष्टींनीच बहुतेक १०-१२ ग्रंथसंख्या होते. बाकीच्या २० किंवा ३० जसे असतील तितक्या ग्रंथांत ग्रंथकाराची स्वतःची कविता अगर इतर महत्त्वाचें लेखन दिलेलें असतें.

कादंबर्‍या — कांदबर्‍या या वाङ्‌मयाचा भाग समजल्या जात नाहीत तथापि कांहीं कादंबर्‍या त्यांच्या भाषाशैलीमुळें वाचण्यालायक समजल्या जातात. परंतु एकंदर चिनी वाङ्‌मयामध्यें जें औचित्य दिसून येतें त्याचा मात्र कांदबर्‍यांमध्यें अभाव दिसतो. चिनी कांदबर्‍यांमध्यें साधारणतः मध्यम स्थितींतील आयुष्यक्रमापासून तों समाजाच्या अगदीं नीचावस्थेपर्यंतची चित्रें आढळून येतात. सान कुओचि या ऐतिहासिक कादंबरीमध्यें २ र्‍या शतकाच्या अखेरीच्या काळाचें वर्णन असून त्यांतील कांहीं ऐतिहासिक प्रसंगांचें चित्र फार बहारीचें उठलें आहे. याचा कर्ता १३ व्या शतकांतील असून त्याच सुमारास चिनी वाङ्‌मयामध्यें कांदबर्‍यांचा प्रवेश झाला होता. यानंतर कादंबर्‍यांची वाढ अव्याहतपणें चालू होती व ही वाढ १७ व्या शतकामध्यें अगदीं शिखरास पोंचून या शतकाची बरोबरी आतां होईल असें दिसत नाहीं. हुंग लौमेंग ही कांदबरी बरीच उच्च दर्जाची असून तिच्या लेखकास कांहीं राजकीय कारणामुळें आपलें नांव आज्ञात ठेवावें लागलें. याचें संविधानक स्वकपोलकल्पित असून बरेंच गुंतागुंतीचें आहे. मुख्य विषय प्रेम असून त्यांत महत्त्वाकांक्षा, श्रीमंती, दारिद्र्य व इतर निरनिराळे मनोविकार व आयुष्यांतील स्थिति व प्रसंग यांचें वर्णन येऊन निरनिराळीं ४०० स्त्री-पुरूषांचीं स्वभावचित्रें दिली आहेत. तथापि पुसुंगलिंग याने १६७९ त लिहिलेल्या लिओ चै या गौष्टींच्या संग्रहाइतकीं लोकप्रिय कोणतीच कादंबरी झाली नाहीं. या गोष्टींवरून परकीय वाचकांनां चिनी आयुष्यक्रमाचें व परंपरागत कथांचें चांगलें ज्ञान होतें; व चिनी वाचकांस या ग्रंथाची भाषाशैली पाहून मोह पडतो.

नाट्य :— चिनी वाङ्‌मयामध्यें नाटकांचा प्रवेश कादंबर्‍यांबरोबरच झाला. त्यापूर्वी कांहीं पद्धतशीर रीतीनें ताल-सुरावर व गाण्याबरोबर बसविलेले कांहीं नाच असत व हे बहुतेक मोठमोठ्या समारंभकाळीं होत असत. मंगोल सत्तेपूर्वी (इ.स. १२६०-१३६८) नाटक असें चिनी लोकांत प्रचारांत आढळत नाहीं. मंगोल लोकांनीच बहुधा कादंबर्‍या व नाटकें हीं आपल्याबरोबर  मध्यआशियामधून चिनांत आणली असावीं. परंतु हींच नाटकें सध्यां चिनी लोकांचीं अवश्यक करमणुकीचीं साधनें होऊन बसली आहेत. चिनी लोकां इतकी नाटकास जाण्याची चटक इतर कोणत्याहि लोकांमध्यें आढळणार नाहीं. मंगोल कालांतील १०० नाटकांचा एक समुच्चयग्रंथ इ.स. १६१५ मध्यें प्रसिद्ध झाला. दुसरा एक असाच समुच्चय ग्रंथ इ.स. १८४५ मध्यें प्रकाशित झाला. मंगोल कालांतील हिआंगचि अथवा पश्चिम महाल हें नाटक फारच लोकप्रिय असून त्याचें कथानक व त्यांतील रसपरिपोष फार मनोवेधक आहेत. या नाटकग्रंथामध्यें जी भाषा वापरली आहे ती सभ्य आहे. परंतु नट हे वाटेल तसे अचकट विचकट हावभाव करतात व वाटेल ती वाक्यें बोलतात. चिनी लोकांस लांब कथानकाचें एकच नाटक आवडत नाही तर एका मागून एक फार्सवजा निरनिराळ्या ऐतिहासिक अगर इतर प्रसंगांवरील चुटके त्यांस फार आवडतात.

कोशः— ख्रि.पू. १२ व्या शतकामध्यें लिहिलेला एर्‍हया हा ग्रंथ कोशासारखाच समजला जातो. यामध्यें सर्व विषय मुख्य १९ सदरांखालीं देऊन बहुतेक शब्द व वाक्प्रचार यांचा संग्रह केला आहे. हुशेन यानें सर्व लिखाणांतील चिनी शब्द एकत्र करून ते सुमारें ५०० सदरांमध्यें संगतवार लावून शुवेन हा ग्रंथ लिहिला.  यामध्यें १०००० शब्दांचा संग्रह असून हा कोश जुन्या ग्रंथांचे काल व कर्तृसत्यत्व सिद्ध करण्यास फार उपयोगी आहे. या कोशांत नसलेले बरेच शब्द ज्या ग्रंथामध्यें असतील तो या कालानंतरचा असें समजण्यास बिलकुल हरकत नाहीं. यावरूनच तौ ते चिंग हा ग्रंथ बनावट असावा हें सिद्ध होतें. चिनी लोकांनीं कोशरचनेमध्यें फार परिश्रम केलेले दिसतात. त्यामुळें चिनी वाङ्‌मयामध्यें कोशांचा भरणा पुष्कळ आहे. यामध्यें कांगहि या बादशहानें स्वतःच्या देखरेखीखालीं तयार करविलेला व 'कांग हि' याच नांवाचा कोश फार प्रसिद्ध आहे. यामध्यें ४४००० शब्दसंग्रह आहेत.

चिनी वाङ्‌मयाची अनादि काळापासून झालेली अवाढव्य वाढ लक्षांत घेतली असतां त्यांतील प्राचीन ग्रंथांतील उल्लेख व संदर्भ एकदम ध्यानांत येणें फार कठिण होत जाणें साहजिकच आहे. त्यामुळें विद्वज्जनांची ही उणीव भरून काढण्याकरितां पुष्कळ अनुक्रमणी व विल्हेवार सूची प्रसिद्ध झाल्या आहेत या बाबतींतहि कांग हि बादशहानें पेइ वेन युन फू 'वाङ्‌मयदीपिका' नांवाचा एक प्रचंड ग्रंथ निर्माण केला आहे यामध्यें विविध संदर्भ, वाक्प्रचार, म्हणी वगैरे सर्वांचा समावेश केलेला आहे. व प्रत्येक ठिकाणीं मूळ ग्रंथांतील उतारे दिलेले आहेत. यामध्यें सुमारें १॥ कोट शब्द आहेत.

ज्ञानकोश.— सर्व विषयांवरील ज्ञान सारांश रूपानें एकत्र करण्याच्या इच्छेनें काम करीत असतां चिनी लोकांनींच प्रथम ज्ञानकोशाची कल्पना काढली. 'तै पिंग युलान' हा ग्रंथ या शाखेपैकीं जरी सर्वांत जुना नसला तरी सर्वांत महत्त्वाचा आहे. हा इ.स. १० व्या शतकाच्या अखेरीस बादशहानें आपल्या खास देखरेखीखालीं व स्वतः सर्व तपासून प्रसिद्ध केला. यांत १०००० प्रकरणें असून तो रोज तीन प्रकरणें तपाशीत असे. याच सुमारास 'तै पिंग कुआंग चि' या नांवाचा याच धर्तीवरचा एक ग्रंथ प्रसिद्ध झाला. या दोन्ही ग्रंथांच्या पुष्कळ आवृत्त्या निघाल्या आहेत. मिंग घराण्यांतील ३ र्‍या बादशहानें युंग लो (इ.स. १४०३-१४२५). (१) कन्फ्यूशिअन धर्मशास्त्र, (२) इतिहास, (३) तत्त्वज्ञान व (४) इतर वाङ्‌मय, यांमध्यें ज्योतिष, भूवर्णन, सृष्टिशास्त्र, वैद्यक, भविष्यज्ञान, बौद्धधर्म, तौधर्म, कला वगैरे सर्व विषयांचा समावेश करून, या चार विषयांवरील सर्व तत्कालपर्यंतचें वाङ्‌मय एकत्र करण्याचा हुकूम केला. त्याप्रमाणें इ.स. १४०८ मध्यें एक प्रचंड ज्ञानकोश बादशहापुढें ठेवण्यांत आला. याचें नांव 'युंग लो ता तिएन' असें असून तो लिहण्यास सुमारें २२०० माणसें ५ वर्षे काम करीत होतीं. यांमध्यें २२८७७ प्रकरणें असून ६० प्रकरणें विषयसूचीचीं आहेत. एकंदर पृष्ठसंख्या अजमासें ९१७४८० आहे. हा ग्रंथ एवढा मोठा होता कीं त्याला छापावयास लागणार्‍या भयंकर खर्चास भिऊन तो छापावयास तसाच ठेऊन दिला. याच्या पुढें दोन नकला केल्या. पैकीं एक पेकिंग येथें होती व दुसरी मुळाबरोबरच नांकिंग येथें होती. नाकिंग येथील दोन्ही प्रतींचा मिंग घराण्याबरोबर नाश झाला व पेकिंग येथील प्रतीचीहि १९०० सालच्या वेढ्यामध्यें तीच स्थिती झाली. परंतु यांतील कांहीं भाग शिल्लक राहिले आहेत. 'तु शु चिं चेंग' नांवाचा दुसरा एक ज्ञानकोश 'कांग हि' बादशहानें आरंभिलेला त्याचा पुत्र युंग चेंग याच्या कारकीर्दीत पुरा झाला. याच्या १०० प्रती छापून काढल्या होत्या. याची अष्टपत्री आवृत्ति इ.स. १८८९ मध्यें शांघाय येथें निघाली होती. याचे प्रत्येकी २०० पृष्ठांचें १६२८ भाग आहेत. याची एक प्रत ब्रिटीश म्युझिअममध्यें असून त्याच्या विषयसूचीचें इंग्रजीत भाषांतर झालें आहे.

हस्तलिखितें व छापखाने.- वरील लेख वाचतांना एक प्रश्न उभा रहातो कीं, एवढें प्रचंड वाङ्‌मय परंपरेनें कसें चालत आलें? प्रथमतः कांहीं पुराणवस्तुसंशोधकांची अशी समजूत होती कीं चिनी लोक बांबूच्या पातळ कांबीटावर चाकूनें कोरून लिहित असत. ही भ्रमक समजूत पुष्कळ काळ पर्यत चालत आली होती. परंतु अलीकडील शोधांतीं असें निश्चित झालें आहे कीं चिनी लोक प्रथमतः ग्रंथलेखन करूं लागले ते पातळ कांबटीवर अगर लांकडाच्या फळ्यांवर बांबूच्या लेखणीनें रंगाच्या आकृती काढित, व चाकूचा उपयोग चुकीचीं अक्षरें खोडून टाकण्याकरितां करीत. पुढें ख्रि. पू. २०० वर्षांच्या सुमारास बांबूच्या लेखणीच्या ऐवजी कुंचलीचा उपयोग करूं लागले व कांबीटाची व फळकटाची जागा रेशमी कपड्यानें घेतली. पुढें रेशमाचा उपयोग करणें जरा नाजुक व खर्चाचें वाटल्यामुळें कागदाचा शोध लागला. हा शोध प्रथम इ.स. १०५ मध्यें 'त्सैलुन' नांवाच्या एका खोजानें लावला व या कालापासून कुंचली; शाई व कागद हींच चिनी लोकांचीं लेखनसाहित्यें आहेत.

इ.स. १७० मध्यें तैयुंग यानें 'पांच सर्वमान्य ग्रंथ' दगडावर तांबड्या शाईनें लिहून ते खोदून काढविले. याचे ४६ मोठमोठे दगड झाले, त्यांपैकीं कांहीं अद्याप अस्तित्वांत आहेत. तअंग घराण्याच्या कारकीर्दीत प्रसिद्ध शिलालेखांवरील आकृति त्यांतील लेखनपद्धतीच्या दृष्टीनें अगर इतर कांहीं महत्त्वामुळें विद्वज्जनांच्या संग्रहीं आढळूं लागल्या. याच सुमारास लांकडांवर खोदलेल्या लेखांवरून कागदावर अनेक प्रती काढण्याचा प्रचार सुरू झाला. प्रथमतः फक्त चित्रें व प्रार्थना वगैरेंच्याच नकला अशा प्रकारानें काढीत. या कलेचा उपयोग ग्रंथ छापण्याकडे असा इ.स. ९३२ त कन्फ्यूशिअसचें धर्मशास्त्र छापण्याकडे प्रथम करण्यांत आला. इ.स. ९८१ मध्यें 'तैपिंग कुआंगचि' हा ज्ञानकोश प्रथम छापला. पिशेंग (किमयागार १०४३) यानें भाजलेल्या मातीचे खिळे (टाइप) शोधून काढले. मिंग घराण्याच्या कारकीर्दीत हें प्रथम लांकडाचे तयार होऊं लागले, व पुढें तांबें व शिसें उपयोगांत आणूं लागले. तथापि बहुतेक चिनी मोठमोठे ग्रंथ ठोकळ्यांवरच छापलेले आहेत. सध्यां चालू असलेलीं चिनी वर्तमानपत्रें खिळ्या (टाइपा) वर छापलेलीं असून व साधारण दर्जाच्या छापखान्यांत ६००० ते ७००० प्रकारचीं अक्षरें असतात.

[संदर्भ ग्रंथः- रो चॅन्स अ‍ॅन्ड चेंज इन चायना (१९२०) रींश-इंतलेक्चुअल अ‍ॅन्ड पोलिटिकल करंट्स इनदि फार ईस्ट (१९९२) एलिझाबेथ केंडल-ए वे फेअरर इन चायना (१९१३) डोन्स्टन- बुद्धिस्टिक चायना (१९१३) लिमोंग व टॅओ— व्हिलेज अ‍ँड टॉऊन लाईफ इन चायना; टिमॉथीं रिचर्ड-फॉर्टी फाइव इयर्स इन चायना (१९१६). ई.एच. वुइल्सन-ए नॅचरॅलिस्ट इन वेस्टर्न चायना (१९११); क्रेड्रिक कोल्समन— दि फार ईस्ट अनव्हेल्ड (१९१८); ब्लँड रीसेंट इव्हेंट्स, अ‍ॅन्ड प्रेझेंट पॉलीसीज इन चायना, (१९१२); चायना, जपान अँड कोरिया (१९२१); पुटनॅमवील— दि फाइट फॉर दि रिपब्लिक इन चायना (१९१८); एच.एम. व्हिनके— मॉडर्न कॅन्स्टि्यूशनल डेव्हलपमेंट इन चायना (१९२०); दि चायनीज ईयर बुक (१९१९); मॉर्स— ट्रेड अँड अँडमिन्स्ट्रेशन ऑफ चायना (१९२१) कॉलिन्स मिनरल एंटरप्राइज इन चायना (१९११); मिल्टन स्मिथ-दि ब्रिटीश इन चायना अँड फार ईस्टर्न ट्रेड.].

   

खंड १३ : घ - जलपैगुरी  

 

 

 

  घंटय्याकवि
  घटोत्कच
  घटोत्कच लेणीं
  घड्याळ
  घनी
  घनौर
  घांट
  घाटगे
  घाटाळ
  घातमपूर
  घानची
  घायपात
  घारगड किल्ला
  घारघोडा
  घारापुरी
  घाशीराम कोतवाल
  घांसदाणा
  घासी
  घिरथ
  घिसाडी
  घुगुस
  घुंड
  घुबड
  घुराम
  घेरिया
  घेवडा
  घोटकी
  घोडबंदर
  घोडा
  घोडाघांट
  घोडाबारी
  घोडासर
  घोडें
  घोडेघांस
  घोरपड
  घोरपडी
  घोरपडे
  घोरी घराणें
  घोशी
  घोसाळे
  घोसी
  घोळ
 
 
  चउमू
  चकमा
  चकला रोषनाबाद
  चकवाल
  चकिया
  चक्कियर
  चक्कीनोआरो
  चक्रपाणि
  चक्रवर्ती
  चक्राप्पा
  चंगनाचेरी
  चंगर
  चच, चचनामा
  चचान
  चटया
  चडार
  चंडी
  चतुरमहाल
  चतुर साबाजी
  चतुरसिंग
  चतुर्थ
  चत्रा
  चॅथॅम
  चंदगड
  चंद घराणे
  चंदन
  चंदभाट
  चंदरभान
  चंदावरकर, नारायण गणेश
  चंदासाहेब
  चंदीपुर
  चंदेरी
  चंदेल्ल
  चंदौली
  चंदौसी
  चंद्र
  चंद्रकोना
  चंद्रगिरी
  चंद्रगुप्त
  चंद्रगोमिन्
  चंद्रनगर
  चंद्रभागा
  चंद्रहास
  चंद्रावती अथवा चंद्रावली
  चन्नगिरी
  चन्नपट्टण
  चन्नबसव
  चन्नरायपट्टण
  चंपा
  चंपानेर
  चपारण
  चंपावत
  चंपाषष्ठी
  चंबळा नदी
  चबा संस्थान
  चमारडी
  चरक
  चरखा
  चरखारी
  चरणदासी
  चरणव्यूह
  चरबी
  चरबीचें झाड
  चरी
  चर्मण्वती
  चलत-चित्रें
  चलन
  चल्लाकेरे
  चवळी
  चहा
  चक्षुर्मंनु
  चाकण
  चाकवत
  चागई
  चांगदेव
  चांगभकार
  चांगा केशवदास
  चाघताइखान
  चांचेगिरी
  चाचो
  चांडोद
  चाणक्य
  चातुर्मास्य
  चातुर्मास्य याग
  चातुर्वर्ण्य
  चात्सु
  चादचा
  चांदपूर
  चांदबिबी
  चांदभाट
  चांदला
  चांदवड
  चांदा
  चांदूर
  चांदूर बाजार
  चांद्रायण
  चानन शानन
  चानस्मा
  चानाल
  चानोड
  चाप्रा
  चाफळ
  चाबुआ
  चांभार
  चाम
  चामखीळ
  चामन
  चामराजनगर
  चामुंड
  चामुर्शी
  चार
  चारखा
  चारण
  चारदुआरं
  चारसद
  चारा
  चारीकार
  चार्टिझम
  चार्लंमांट, अर्ल ऑफ
  चार्वाक
  चालुक्य घराणें
  चालसिस
  चावडा
  चावंद
  चास-कमान
  चॉसर
  चासा
  चाहमान उर्फ चौहान
  चाळिसगांव
  चिक
  चिकंजी
  चिकबळ्ळापूर
  चिकाकोल
  चिकोडी
  चिक्कणर्ति
  चिक्केरूर
  चिक्टीआबर
  चिक्नायकन्हळ्ळी
  चिक्मगळूर
  चिखलदरा
  चिखली
  चिंगलपट
  चिंच
  चिचगड, जमीनदारी
  चिंचलीगदड
  चिंचवड
  चिचेवाडा
  चिंचौली
  चिंच्यु
  चिटणीस
  चितलनगर जमीनदारी
  चितळ
  चितळदुर्ग
  चिताकुल
  चिंतामणी
  चिंतामणी कवि
  चिंतामणी रघुनाथाचार्य
  चितारी
  चिति
  चितोड
  चित्तगांग
  चित्तगांग डोंगराळ प्रदेश
  चित्ता
  चित्तूर
  चित्फिरोझपूर
  चित्रकला
  चित्रकाव्य
  चित्रकूट
  चित्रकोट
  चित्रगुप्त
  चित्ररथ
  चित्रसंग्रहालयें
  चित्रळ
  चित्रांगदा
  चित्रावाव
  चिदंबर दीक्षित
  चिदंबरम्
  चिंदविन
  चिंदविन नदी
  चिदानंद स्वामी
  चिनडोंगर
  चिनमुलगुंद
  चिन लोक
  चिनसुरा
  चिनाब
  चिनीमाती किंवा केओलिन
  चिन्नविरन्ना
  चिन्नूर
  चिन्योत
  चिपळूण
  चिपळूणकर, कृष्णशास्त्री
  चिपळूणकर, विष्णुशास्त्री
  चिफू
  चिमणाजीआप्पा
  चिमणाजी दामोदर
  चिमणी
  चिरक्कल
  चिराबा
  चिलखत-वेदकालांतहि
  चिलिअनवाला
  चिली
  चिल्का सरोवर
  चिस्ती
  चीझी, अॅंटोनें लिओनार्ड डि
  चीन
  चीनी
  चीपुरुपल्ले
  चीर
  चीराल
  चुका
  चुकचि
  चुटिया
  चुडा
  चुडा संस्थान
  चुडेश्वर
  चुना
  चुनार
  चुंबकजन्य विद्युद्यंत्र
  चुंबकत्व
  चुंबकीय दृकशास्त्र
  चुंबन
  चुमल्हारी
  चुरू
  चूडामण
  चेकोस्लोव्हेकिया
  चेंगीझखान
  चेचेंझे
  चेटवई
  चेट्टी
  चेदूब बेट
  चेंबर्स रॉबर्ट
  चेयूर
  चेर घराणें
  चेरात
  चेरापुंजी
  चेरिअल
  चेरुमन
  चेरो
  चेर्रा
  चेल
  चेसेलडेन, विल्यम
  चेस्टरफील्ड
  चेस्टरफील्ड फिलिफ
  चैतन्य
  चैतसिंग
  चैत्य
  चैन
  चैबासा
  चोखामेळा
  चोवो
  चोडवरम
  चोध्रा
  चोपडे
  चोपदार
  चोबारी
  चोंभा
  चोरांग्ल
  चोरासी
  चोरी
  चोल
  चोल घराणें व चोल साम्राज्य
  चोवीस परगणा जिल्हा
  चौंगू
  चौघाट
  चौथाई, चौथ
  चौधरी
  चौबे जहागीर
  चौल
  चौलमुग्रा
  च्यवन
 
  छछरौली
  छट्टू
  छतारी
  छत्तरपूर
  छत्तिसगड विभाग
  छत्रपूर तहशील
  छत्रसाल
  छत्रे, केरो लक्ष्मण
  छत्रे, विष्णु मोरेश्वर
  छत्रे, सदाशिव काशीनाथ
  छंद:शास्त्र
  छप्पन देशचे राजे
  छप्रौली
  छब्रा
  छलाल
  छात
  छापखाना
  छापिआ
  छाप्री
  छायाचित्रपेटिका
  छाल
  छालिअर
  छिंद, लल्ल
  छिंदवाडा
  छिंपा
  छिब्रामऊ तहसील
  छुईखदान
  छुटिया
  छोटा उदेपूर
  छोटानागपूर
  छोटी साद्री
 
  जकात
  जॅक्सन अॅंड्र
  जॅक्सन व्हिल्ले शहर
  जखमा
  जगजीवनदास
  जगत्याल
  जगदलपूर
  जगदीशपूर
  जगन्नाथ
  जगन्नाथपंडित
  जगन्नाथपुरी
  जगन्नाथ शंकरशेट, मुर्कुटे
  जंगम
  जगय्या पेटा
  जंगल
  जंगल महाल
  जगलूर
  जगाध्री
  जग्रांव
  जंगीपूर
  जघाशूल
  जंजिरा
  जझिया
  जटलंड
  जटामांसि
  जटायु
  जटासूर
  जठरदाह
  जठरव्रण
  जडजीवघाद
  जडद्रव्य
  जडभरत
  जडवाद
  जडान्नविषबाधा
  जडावाचें काम
  जत
  जतिंग रामेश्वर
  जंतुजन्य रोग
  जतोई
  जत्रा
  जंदिआल गुरु
  जंदिआला
  जंदोला
  जनक
  जनजसवंत
  जननेंद्रियांचे गुप्तरोग
  जनमेजय
  जनस्थान
  जनाबाई
  जनार्दनस्वामी
  जनावरें
  जनीजनार्दन
  जपान
  जपानी वार्निस
  जबलपुर
  जंबुकेश्वरस्
  जंबुद्वीप
  जबूसर
  जमखिंडी
  जमदग्नि
  जमरुड
  जमाखर्च
  जमाबंदी
  जमालखान
  जमालपुर
  जमिकुंता
  जमीन
  जमीनदार व कुळें
  जमीनमहसूल
  जमुई
  जमेका
  जमेसाबाद
  जम्नोत्री
  जम्मलमडुगु
  जम्मू
  जयगड
  जयचंद
  जयदेव
  जयद्रथ
  जयनगर
  जयपाल
  जयपूर
  जयपुर जमीनदारी
  जयपुर संस्थान
  जयमल्ल
  जयरथ शृंगार
  जयरामस्वामी
  जयरामात्मज
  जयविजय
  जयसिंह
  जर उतणें
  जरतार
  जरत्कारु
  जरदाळू
  जरा
  जरासंघ
  जरीपटका
  जर्मन सिल्व्हर
  जर्मनी
  जलंगी
  जलजन्य विद्युतशक्ति
  जलघा
  जलपैगुरी

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .