विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चीझी, अँटोनें लिओनार्ड डि (१७७३-१८३२).— एक फ्रेंच पौरस्त्य वाङ्मयविशारद. १७९९ त राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयाच्या पौरस्त्य शाखेंत त्याला नोकरी मिळाली. १८०३ पासून तो संस्कृतचा अभ्यास करूं लागला. त्यावेळीं संस्कृतभाषेचें व्याकरण किंवा कोशहि त्याला उपलब्ध नव्हता. तेव्हां मोठ्या प्रयासानें त्यानें या पौरस्त्य भाषेचें बेताचें ज्त्रान करून घेऊन तींत उत्कृष्ट कविताहि करूं लागला. कॉलेज डि फ्रान्समध्यें नेमलेला (१८१५) पहिला संस्कृतचा प्रोफेसर चीझीच होय. 'मेड्जोउइन एट लीला' (१८०७)-फारशीतून रुपांतरें; 'यद्जन (यज्त्र?) दत्त-बध' (१८१४), आणि 'ला रिकॉनइसन्स डी सकोउन्तला (शकुंतला)', (१८३०)-संस्कृतांतून रूपांतर हे त्याचे कांहीं ग्रंथ होत.