विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिलखत — वेदकालांतहि चिलखतें होतीं. चिलखतांस 'अत्का' हा शब्द ॠग्वेदांत आढळतो. पण त्याचा अर्थ संशयास्पद आहे याचा अर्थ 'अंगांत घालण्याचा अंगरखा' असा असून घालतां येणें, काढतां येणें, शिवणें, व अंगाबरोबर असणें अशा इतर वाक्यांच्या संदर्भावरून वरील 'अत्का'चा चिलखत हा अर्थ निश्चित असावा असें दिसत नाहीं. झिमरच्यामतें 'अत्का' म्हणजे योध्याचें चिलखत होय. दुसरा 'द्रापी' हा शब्द ॠग्वेदांत आढळतो. सायणाचार्याच्या मतें द्रापी म्हणजे 'कवच' होय. पण त्याचा अर्थ झगा असावा 'वर्मन्' हा शब्द ॠग्वेदांत चिलखत या अर्थी असलेला आढळतो. तें कशाचें करीत असत हें अनिश्चित आहे. तथापि तें 'स्यूत' असे. पुढें अयस् लोह, अथवा रजत यांच्या चिलखतांचा उल्लेख आढळतो. हीं चिलखतें एखाद्या धातूचीं किंवा कातड्याचीं केलेलीं असावींत.
भारतीय युद्धांत कवच घातलेल्या पदातीचेंहि वर्णन आहे. कवच म्हणजे चिलखत होय. रथी व गजावर बसलेला योद्ध यांच्याजवळ नेहमीं कवच असे. बाणांच्या वर्षावामुळें कवचाचा उपयोग रथी व सारथी यांस फार होत असे. हत्तीवर आरूढ होणारा योद्धाहि कवच वापरीत असे. कर्णाला जन्मतःच कवचकुंडलें होतीं. ती हरण करण्याच्या हेतूनें इंद्र ब्राह्मणाचें रूप घेऊन त्याच्याकडे आला. त्यावेळीं कर्णानें इंद्रास ओळखलें; परंतु औदार्य व दानशूरत्व हेंच त्याचें शील असल्यानें त्यानें ती इंद्रास काढून दिलीं अशी महाभारतांत एक कथा आहे.
मुसुलमानी अंमलांत ढाल व चिलखत यांचा नेहमीं उपयोग करीत असत. मराठ्यांच्या व पेशव्यांच्या अंमलांतहि त्यांचा उपयोग सर्व योद्धे करीत असत. त्या काळीं कापूस, रेशीम, कातडें व लोखंडाच्या कड्या इत्यादि पदार्थ चिलखत करण्याच्या कामीं वापरले जात असत. शिवाजीनें अफझुल खानास मारलें त्यावेळीं त्यांच्या अंगांत 'जरी कुडती' चें चिलखत होतें. शिवाजी, संभाजी, पहिला बाजीराव यांचीं जुनीं चित्रें पहिलीं असतां ते चिलखत वापरीत असत असें दिसतें. शिवाजीचें हें चिलखत हल्लीं सातार्यास महाराजांच्या जलमंदिरांत ठेवलेलें आहे.
लढाईंत ज्या घोड्यांवर किंवा हत्तींवर योद्धे बसत त्या घोड्यांनां व हत्तींनाहि (अर्थात् योध्यांच्या दर्जांप्रमाणें) कातड्याचें किंवा लोखंडाचें चिलखत घालण्याची चाल प्राचीन व मध्ययुगीन कालांत बहुतेक देशांत असे. योध्याच्या दर्जाप्रमाणें त्याचेंहि चिलखत निरनिराळ्या वस्तूंचें असे. अगदीं सामान्य शिपायांच्या अंगांत आंत कापूस भरलेलें, तर जरा वरच्या अधिकार्याच्या अंगांत आंत कातडें असलेलें चिलखत असें. कांहीं सबंध अंगाचीं असत तर कांहीं बिनबाह्यांची असत. कांहींत छातीवर एकावर एक दुप्पट अस्तरण असे. रेशमाच्या लडी एकांत एक गुंतवून त्यांनां सोनेरी तारांनीं वरील जाड कापडाशीं एकजीव करूनहि एखादें चिलखत बनवीत. शिवाजीची जरीची कुडती अशीच आहे.
शस्त्रास्त्रें व चिलखतें यांचा अन्योन्य संबंध अनादि असून त्यांच्या इतिहासात मानवजातीच्या आरंभापासून सुरवात होते. पाषाणयुग कांस्ययुग, व लोहयुग या काळांत कमीअधिक सुधारलेलीं अशीं शस्त्रें असून त्यांच्यापासून रक्षण व्हावें म्हणून ढाल, शिरस्त्राण व चिलखत इत्यादि वस्तूहि फार प्राचीन काळीं होत्या असें आढळून येतें. जुन्या ग्रीक इतिहासाकडे पहातां असें आढळतें कीं, मायसीनी व ग्रीक लोक उरस्त्राण, शिरस्त्राण व ढाली वापरीत असत व शिरस्त्राणांत घोड्यांच्या केसाचा झुबका खोवीत असत. मॅसिडोनिअन लोकांची देहसंरक्षक आयुधें यापेक्षां सुधारलेलीं असत. स्पार्टन सैन्यांत, पोलादी टोप्या आढळून येत. पूर्ण चिलखतांत, छाती व पाठ यांचें संरक्षण होतें, व इतर भागाच्या रक्षणाचीहि त्यांत व्यवस्था असते. रोमन लोकांच्या सैन्यांत, आघाडीचे लोक चिलखत वापरीत असत व एका हातांत भाला किंवा तलवार घेऊन, दुसर्या हातांत ढाल धारण करीत. प्युनिक लढायानंतर लांब रुंद ढाल वापरण्याची चाल पडली. उच्च दर्जाचे सैनिक जाळीचें चिलखत वापरीत असत.
जुन्या शस्त्रास्त्रांत व चिलखतांत मध्ययुगाच्या सुमारास बरीच सुधारणा झाली व त्यानंतरच्या काळांत त्यांचा लवकरच त्याग करण्यांत आला. चिलखतासंबंधीं प्रत्येक राष्ट्राचीं कांही विशिष्ट गोष्ट असते. स्पॅनिश चिलखतांवरून मुरलोकांची अभिरुची दिसून येते. इटालियन चिलखतें अभिजात गोष्टींकडे असलेला एक विशिष्ट कल दिग्दर्शित करतात, व जर्मन लोकांच्या शस्त्रास्त्रांवरून व त्यांच्या चिलखतांवरून, ट्यूटन भावना आढळून येते. नॉर्मन लोकांनी इंग्लंड जिंकलें त्या काळीं सरदाराचा (नाईटचा) लष्करी पोषाख म्हणजे एक चिलखत, शिरस्त्राण, ढाल व तरवार यांनीं युक्त असा असे. तत्कालीन चिलखत गुडघ्यापर्यंत असे व तें कातड्यांवर अनेक कड्या शिवून तयार केलेलें असें. त्यांस नॉर्मन लोक हॉबर्क असें म्हणत असत. तत्कालीन शिरस्त्राण धातूचें, कातड्याचें व क्वचित लाकडाचें केलेलें असे व त्याला उंच शिखरासारखा आकार असून नाकाचें व कपाळाचें संरक्षण व्हावें अशी त्यांत व्यवस्था केलेली असें.
नॉर्मन घोडेस्वार पतंगाच्या आकाराची बरीच मोठी ढाल वापरीत असत व ती पाठीवर टाकली किंवा पुढच्या बाजूनें हातांत घेतली तर तिचा उपयोग चिलखतासारखाच होत असे. रिचर्ड दि लायन हार्टेड हा नखशिखांत चिलखत वापरीत असे. व त्याच्या चिलखतावर कांहीं चिन्हें असत. चौदाव्या शतकांतील आर्तत्राण धर्माच्या ऐन भरभाटींत चिलखतांचे महत्त्व वाढलें. चॉसर कवीनें वर्णिलेला नाइट, चिलखत वापरीत असें व त्याचें वर्णनहि करण्यांत आलें आहे. पंधराव्या शतकाच्या सुमारास शिरस्त्राण व चिलखत यांसंबंधीं रुढी बदलली. नावनिशीविशिष्ट चिन्हें असलेलीं चिलखतें जाऊन त्याच्या ऐवजीं उभय युध्यमान पक्ष ओळखण्याकरितां निशाणें जास्त प्रमाणांत, अस्तित्वांत येऊं लागलीं पंधराव्या शतकांतील चिलखतांच्या आकारांत वैचित्र्य आढळून येतें; परंतु सोळाव्या शतकांतील चिलखतें दिखाऊ व भपकेबाज अशी होतीं. पुढें बंदुकीचा उपयोग जास्त होऊं लागला व लष्करी डावपेंच व लांबच्या मजला मारणें हीं युद्धांतील महत्त्वाची बाब होऊन बसली. त्यामुळें अवजड चिलखतांची फारशी जरुरी भासूं लागली नाहीं.
व्हिक्टोरिया राणीच्या कारकीर्दीत तिच्या संरक्षण लोकांनां जुनी उरस्त्राणें देण्यांत आली होतीं. एकोणिसाव्या शतकांतील ब्रिटिश घोडेस्वारांच्या खांद्यांवर सांखळीचें चिलखत असलेलें आढळतें. गोळीपासून रक्षण व्हावें म्हणून एखादें नवीन चिलखत बनविण्यासंबंधीं शोध चालू आहेत. मारेकर्यांपासून आपाय होऊं नये म्हणून हल्लींच्या काळीं सुद्धां राजे लोक गुप्त चिलखत वापरतात. लंडनच्या गुप्तपोलिसखात्यांत असलीं चिलखतें आहेत. कुतूहल म्हणून जुनीं शस्त्रात्रें व चिलखतें पाहण्याची आधुनिक काळच्या लोकांची प्रवृत्ति असून भारी किंमत देऊनहि तीं विकत घेण्यांत येतात. प्रसिद्ध चित्रकारांनीं चिलखत धारण केलेल्या अनेक योध्यांचीं चित्रें काढलेलीं आहेत व ग्रंथकारांनीं केलेलीं जुन्या कवचधारी योध्यांचीं अनेक वर्णनेंहि आढळतात. [लँग— हामेर अँड हिज एज; बरोज डिस्कव्हरीज इन क्रीट; मॅनाट-दि मायसीनिअन एज; एल्टन दि कंप्लीट बॉडी ऑफ दि— आर्ट मिलिटरी; वालर-मॉन्युमेंटल ब्रासेस; वेदिक इंडेक्स; वैद्य-महाभारस उपसंहार.]