विभाग तेरावा : घ - जलपैगुरी

चिमणाजी दामोदर — यांचे उपनांव मोघे असून इ. स. १७०८ च्या सुमारास हा खानदेशांत जमावानिशीं रहात होता. प्रथम पेशवे व पिंगळे यांच्या हाताखालचा हा गृहस्थ होता. ताराबाईंच्या कारकीर्दीत हा उदयास आला. याचें वंशज पूर्वखानदेशांत रिंगणगांव येथें जहागीरदार आहेत.  शाहुराजे औरंगजेबाकडून सुटून महाराष्ट्रांत आले तेव्हां चिमणाजी हा खानदेशांत असल्यानें त्याच्याकडे मनुष्य पाठवून त्यास शाहूनें आपणाकडे वळवून घेतलें. चिमणाजी दामोदरचें घराणें पुढें मराठशाहींत साधारण प्रसिद्ध होतें. या घराण्याचा व बाळाजी विश्वनाथाच्या घराण्याचा विशेष घरोबा असून पेशवे हे मोघ्यास 'चिरंजीव' लिहीत असत. चिमणाजी प्रथम शाहूस मिळाला खरा पण पुढें कांहीं दिवसांनी शाहूशीं बेबनाव होऊन, तो कोल्हापूरच्या संभाजीकडे गेला; तेथें त्यानें कांहीं काळ मुख्य प्रधानकीचेंहि काम केलें. त्याचा मृत्यु स. १७३१ च्या दरम्यान झाला. चिमणाजी हा थोरल्या बाजीरावाच्या विरुद्ध पक्षास मिळाला होता व त्रिंबकराव दाभाडेकडून डभईच्या लढाईंत हजर होता. त्या लढाईंत त्याचा पाडाव झाल्यानें पेशव्यांनीं त्याचा सर्व सरंजाम जप्‍त केला व त्यास फक्त तीन गांवें जहागिरीदाखल ठेविलीं. चिमणाजीचा सरंजाम बराच मोठा होता. त्यास कोल्हापूरकर व निजाम यांचेंकडूनहि इनामें मिळालीं होतीं. परंतु वर सांगितल्याप्रमाणें पेशव्यांविरुद्ध वागल्यानें त्याचा सरंजाम नाहींसा झाला. चिमणाजीचा पुत्र बळवंतराव याचा परामर्श पेशवे खासगी रीतीनें घेत असत. हा १७५० त मेला. त्याचा पुत्र त्रिंबकराव हा पानपतावर होता. त्याच्यानंतर या घराण्यांत नांवाजण्यासारखा कोणी पुरुष निपजला नाहीं. मोघे हे मूळचे कोंकणांतील हरिहरेश्वराचे रहाणारे होते. [मराठी रियासत. भा. २;]