विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिफू — उत्तर चिनांतलें एक बंदर असून तें चिलीच्या आखाताच्या दक्षिण किनार्यावर आहे. याला येन्ताई असें स्थानिक नांव आहे. हे शांनटुंग प्रांतांत यीहो नदीच्या मुखाजवळ असून टेंगचौफुच्या पूर्वेला ३० मैलांवर आहे. चिफू पूर्वी फार लहान खेडें होते. परंतु तेंगचौचें बंदर म्हणून ठरवून १८५८ सालीं टीन्टसीनच्या तहानें हें परदेशच्या व्यापारास खुलें केलें. सध्यां येथें ब्रिटीश वकील रहातो. व चिनी सरकारचें जकातीचें ठाणें आहे. येथें परकीय लोक बरेच रहातात.
जुना गांव व समुद्र यांमध्यें परकीय लोकांची वसाहत आहे. चिफू येथें उन्हाळ्यांत बरेच लोक हवा खाण्यासाठीं येतात. रोमनकॅथोलिक व प्रॉटेस्टंट यांचीं प्रार्थनामंदिरें येथें आहेत. येथील बंदर विस्तीर्ण व खोल आहे तरी मोठीं जहाजें व आगबोटी किनार्यापासून बर्याच लांब नांगरतात. लोकरीचें कापड, कापसाचें कापड, लोखंड व अफू इत्यादि वस्तूंची आयात आहे. भाजी, सुकीं फळें, कच्चें रेशीम, वाटाणे, अक्रोड इत्यादि पदार्थ परदेशांत जातात. येथील हवा निरोगी व बंदर चांगलें असल्यामुळें युरोपियन राष्ट्रांच्या चिनी समुद्रांत असलेल्या गलबतांचें हें कोळसे घेण्याचें व एकत्र जमण्याचें ठिकाण झालें आहे. चिफूच्या करारावर (कन्व्हेन्शन,) सर थांमस वेड आणि लिहंगचंग यांनीं या ठिकाणीं सही केली (१८७६).