विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिपळूणकर, विष्णुशास्त्री (१८५०-१८८२)— आधुनिक महाराष्ट्रवाङ्मयाचा जनक व एक लेखक. यांचा जन्म पुण्यास झाला (२० मे १८५०). प्राथमिक शिक्षण झाल्यावर, हे १८६५ सालीं मॅट्रिक झाले व डेक्कन कॉलेजमध्यें गेले; तेथें अभ्यासापेक्षां विविध ग्रंथवाचनाकडे फार लक्ष दिल्यामुळें बी. ए. व्हावयास यानां पांच वर्षे लागलीं. बी. ए. झाल्यावर कांहीं वर्षे शाळाखात्यांत नोकरी केली. १८७९ सालीं सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन स्वतंत्र उद्योगास आरंभ केला. १८७४ त त्यांनीं 'निबंधमाला' मासिक सुरू केलें. 'निबंधमालें' तील लेखांनी यांनीं महाराष्ट्र हालवून सोडला. न्यू इंग्लिश स्कूल, चित्रशाळा, किताबखाना ह्या संस्था काढल्या व 'केसरी' आणि 'मराठा' हीं वर्तमानपत्रें सुरूं केलीं. हे असामान्य बुद्धिमान, उद्योगी, करारी व बाणेदार पुरुष होतें; हे मोठे विद्वान् व खंदे लेखक होते; सर्वच बाबतींत पाश्चात्य अनुकरणाचें बंड विशेषतः सुशिक्षित लोकांत जास्त माजलें व लोकांस आपलेपणाचा विसर पडूं लागला, इतकेंच नव्हे तर पाश्चात्य दुर्गुण शिक्षित म्हणविणार्या लोकांत मान्यता पावूं लागले, अशा वेळीं आपलेपणाची स्मृति ह्यांच्या लेखांनीं जागृत केली व सर्व महाराष्ट्र खडबडून जागा केला. सुशिक्षितांचें लक्ष लोकशिक्षण आणि लोकसेवा ह्या श्रेष्ठकर्तव्याकडे ओढलें जाऊन मराठी भाषेच्या सेवेंत व स्वदेशाच्या इतिहासांत त्यांचें मन अधिकाधिक रमूं लागलें; साधी रहाणी, उदात्त विचार, स्वावलंबन व देशप्रीति इत्यादि महाराष्ट्रीय सद्गुणांची जाणीव ह्यांच्या लेखांनी तरुण पिढीत केली; ह्यांचे लेख व आपल्या आयुष्याच्या अल्पावकाशांत ह्यांनी केलेली देशसेवा महाराष्ट्र कधींहि विसरणार नाहीं. यानां अकालीं मृत्यू आला (१७ एप्रिल १८८२) हें महाराष्ट्राचें दुर्दैव समजलें पाहिजे.
नि बं ध मा ला— मराठी गद्यग्रंथांत अग्रपुजेचा मान 'निबंधमाले'ला सर्वकाळ मिळेल. मालेंतल्या निबंधांत भाषाविषयात्मक सहा (मराठी भाषेची सांप्रतची स्थिति, भाषादूषण, लेखनशुद्धि, भाषांतर, भाषापद्धति, व इंग्रजी भाषा), वाङ्मयात्मक सात (विद्वत्त्व आणि कवित्व, इतिहास, वाचन, वक्तृत्व, ग्रंथावर टीका, जान्सनचें चरित्र व मोरोपंताची कविता), सामाजिक तीन (संपत्तीचा उपभोग, लोकभ्रम व आमच्या देशाची स्थिति), प्रचलित मतखंडनपर एक (लोकहितवादी) आणि मानसशास्त्रपर एक (गर्व) हे मुख्य होते. भाषाविषयक निबंध मार्मिकपणानें लिहिलेलें असून भाषाविषयाचा अभ्यास ज्या दृष्टीनें यूरोपांतील पंडित करितात ती दृष्टि या निबंधांत मालाकारांनी आपल्या देशबांधवांस आणून दिली आहे. वाङ्मयात्मक निबंधांपैकीं काव्यविषयक निबंधांत कांही चुकीची मतें चिपळूणकरांनीं प्रतिपादिलीं आहेत. ''ह्या सुधारणेच्या प्रगतीबरोबर कवितेचा अपकर्ष होतो '', ''अर्धवट सुधारलेल्या लोकांचें वाङ्मय कवित्वरुपानें प्रकट होतें'' हे प्राकृत इंग्रज निबंधकार मेकॉले याचे अग्राह्य ठरलेले सिद्धांस विष्णुशास्त्री यांनीं कसे ग्रहण केले याचें आश्चर्य वाटतें. या चुकीच्या सिद्धंतांवर टीका पांचव्या विभागांत (विज्त्रानेतिहास पृ. ३२) झाली आहे. तसेंच ''सर्वांपेक्षां अधिक सदोष कविता पाहणें असल्यास आमची मराठी होय. तीतील बहुतेक कवींस व्याकरणाची, छंदांची वगैरे ओळखसुद्धां नव्हती असें म्हणण्यास हरकत नाहीं; मग पदलालित्य अर्थगांभीर्य वगैरे काव्यगुणांची तर गोष्टच नको'' वगैरे अभिप्रायहि फार चुकीचे दिसतात. आनंदतनय, रघुनाथपंडित, वामनपंडित, मुक्तेश्वर, विठ्ठल, मोरोपंत, रामजोशी वगैरे पुष्कळ कवी संस्कृत व्याकरणछंदादि शास्त्रांचे ज्त्राते होते या गोष्टीकडे चिपळूणकरांचें कांहीं दुर्लक्ष झालें असावेसें वाटतें. चिपळूणकरांचे जे सामाजिक विषयासंबंधाचें निबंध आहेत त्या सर्वांत मुख्य धोरण एकच दिसतें; तें हें कीं, आपल्या लोकांनीं व्यसनाला, आळसाला, कर्तव्यशून्यतेला व अन्तःकलहाला बळी न पडतां यूरोपीय लोकांप्रमाणें देशोन्नतीच्या कार्याला लागावें. शेवटचा 'आमच्या देशाची स्थिति' हा निबंध राजकीय स्वरूपाचा असून तो १९१० सालीं सरकारच्या नजरेनें राजद्रोही ठरल्यामुळें प्रेसअॅक्टान्वयें सरकारजमा झाला. 'लोकभ्रम' या निबंधांत भूतपिशाच्चें, शकून, फलज्योतिष वगैरेसंबंधीं टीका आहे. पाश्चात्त्य शास्त्राज्त्रांच्या आधुनिक संशोधनाकडे पाहतां या विषयांच्या खरेखोटेपणाबद्दल निश्चित मत देणें आजहि धोक्याचें आहे. तथापि महाराष्ट्रीय वाचकवर्गामध्यें सदरहू निबंधानें चिकित्सक दृष्टि जागृत केली हे योग्य झालें. 'ग्रंथावर टीका' हा विषय घेऊन त्यावर स्वतंत्र निबंध शास्त्रीबोवानीं लिहिला व तदनुसार पंडितांचा वेदार्थयत्न, तारानाटक, रसायनशास्त्र, टेंपेस्ट, ब्राह्मणांची गुलामगिरी वगैरे परीक्षणार्थ आलेल्या अनेक पुस्तकांवर टीका केली. त्यांत त्यांचें मूळ ग्रंथाचें ज्त्रान, सत्यप्रीति, निर्भिडपणा, शांत स्वभाव, सहृदयता, वगैरे टीकाकारास अवश्य असलेले गुण दृष्टीस पडतात. शिवाय ज्याच्यावर टीका करावयाची त्या लेखकाची विद्वत्ता, योग्यता, अधिकार शास्त्रीबोवा कधीं विसरत नसत. त्यामुळें माधवराव रानडे, वेदार्थयत्नकर्ते पंडित, लोकहितवादीकर्ते देशमुख, यांच्यावरील टीका करतांना लेखकाच्या ज्त्रान व देशहिताची कळकळ वगैरे गुणांबद्दल आदरभाव व स्तुति व्यक्त केली आहे. उलटपक्षीं ख्रिस्ती मिशनरी, ज्योतिबा फुलें, वगैरे मंडळीची त्यानीं फजीती उडविली आहे. तात्पर्य सदासर्वकाळ एकच प्रकारचें टीकाशास्त्र न चालविण्याचा योग्य तारतम्यभाव त्यानीं पाळला आहे.
वर सांगितलेल्या मुख्य निबंधांशिवाय सुभाषितें, अर्थसाहित्य, उत्कृष्ट उतारे, विनोदमहदाख्यायिका वगैरे सदरांखालीं निबंधमालेंत चिपळूणकरांनीं विविध व मनोरंजक माहिती दिली आहे. तात्पर्य, इंग्रजी, संस्कृत व मराठी या तीन वाङ्मयांच्या चिपळूणकरांनीं केलेल्या व्यासंगाचें पूर्ण प्रतिबिंब निबंधमालेंत पडलें आहे. विशेषत: इंग्रजी वाङ्मयांत जे जे कांहीं मनोरम चमत्कारिक प्रकार आढळलेले ते सर्व मराठींत आणण्याचा त्यांनीं शक्य तितका प्रयत्न केला. विविध विषयांच्या सुलभ विवेचनानें अनेक प्रकारच्या विपुल माहितीनें भरलेला इतका मनोरंजक व उद्बोधक ग्रंथ मराठींत दुसरा नाहीं. राष्ट्राची विवक्षित स्थिति व जिज्त्रासा लक्षांस घेऊन मर्यादित प्रमाणावर रचलेला 'निबंधमाला' हा केवळ वाङ्मयाचा असा एक ज्त्रानकोशच आहे. त्यांतील निबंध वेकनच्या निबंधासारखे सूत्रात्मक नाहींत, जॉन्सनच्या निबंधांसारखे गहनविचारपरिप्लुत नाहींत, ह्युमच्या निबंधांप्रमाणें समाजशास्त्रावर व मानसशास्त्रावर अति खोल विचार करून लिहिलेले नाहींत व अॅडिसनच्या निबंधांप्रमाणें बहुधां केवळ लौकिक विषयांवर लिहिलेले नाहींत. तर ज्यावर मालाकारानीं शतश: प्रहार केलेल्या मेकॉले नामक इंग्रज लेखाकाच्या निबंधांच्या धर्तीवर आहेत. त्यांत अॅडिसनचा बालबोधपणा व मेकॉलेचा तिखटपणा दोन्ही आहेत.
सुधारणा या शब्दाचा व्यापक अर्थ लक्षांत घेऊन पाहिल्यास चिपळूणकर हे पहिल्या प्रतीचे सुधारक होते असें म्हणावें लागेल. सामाजिक व राजकीय सुधारणांचा पुरस्कार करणार्या कित्येक महाराष्ट्रीयांच्या मतांत आज जी विसंगति दिसते तिला चिपळुणकरांच्या विचारसरणींत स्थान नव्हतें. त्यांची सामाजिक मतें राजकीय मतांइतकी प्रखर होतीं; याचा प्रत्यय 'लोकभ्रम' वगैरे निबंधांवरून येतो. तथापि 'सुधारक' म्हणून म्हणविणारांचा ते द्वेष करीत; त्याला सुशिक्षितांचें व सुधारकांचें थिल्लरपणाचें वर्तन, मिशनर्यांप्रमाणेंच 'सुधारकां'नीं चालविलेली हिंदुधर्माची निंदा आणि आर्यसमाज व प्रार्थनासमाज यांची एकंदर समाजापासून फुटून पडण्याची प्रवृत्ति हीं कारणें होतीं.
महाराष्ट्राच्या तेजस्वी राजकीय विचारांचा उगम निबंधमालेतून झाला. परतंत्र राष्ट्रांतील सुबुद्ध व तेजस्वी व्यक्तींचा कल साहजिक राजकारणाकडे वळतो, कारण स्वदेशाला दास्यांत खितपत पडलेला पहाणें त्यांना असह्य होतें. चिपळुणकरांचा देशाभिमान स्वयंस्फूर्त होता. त्याचा उगम इंग्रजी राज्याविषयींच्या अप्रेमांत झाला. जुन्या विद्येचा अनादर, हिंदुधर्माची निंदा आणि १८५७ च्या बंडाची म्हणजेच परतंत्र राष्ट्राच्या स्वातंत्र्यार्थ धडपडीची ताजी आठवण या परिस्थितींत त्यांचा देशाभिमान वाढला; व त्याला 'निबंधमाला', 'केसरी', 'मराठा', 'न्यू इंग्लिश स्कूल', 'चित्रशाळा' वगैरें फळें आलीं. इतकेंच नव्हें तर महाराष्ट्राच्या देशोन्नतिपर प्रयत्नांनां तेथपासून निश्चित वळण लागलें. [पांगरक-निबंधमालेचें स्वरूप व कार्य. माडखोलकर-विष्णू कृष्ण चिपळुणकर. नटेसन सीरीज मधील चरित्र इत्यादि].