विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिपळूणकर, कृष्णशास्त्री (१८२४-१८७८) — एक महाराष्ट्रीय ग्रंथकार व पंडित. हें कोंकणस्थ ब्राह्मण असून यांचें मूळ ठिकाण रत्नागिरी जिल्ह्यांत पांवसगांव होय. पण यांचा जन्म पुण्यास १८२४ मध्यें झाला. हे लहानपणापासूनच फार हुशार व बुद्धिमान होते. प्रथम यांनी वेदपठण व शास्त्राध्ययन केलें; यांचे गुरु मोरशास्त्री साठे यांना 'बृहस्पति' म्हणत. पण १८४८ च्या सुमारास पुण्यास बुधवारवाड्यांत नवीन सरकारी इंग्रजी शाळा सुरू झाली. त्यावेळीं सदरहू मोरशास्त्री यांनीं कृष्णशास्त्री यांस स्पष्ट सांगितलें कीं, ''याउपर खांद्यावर शालजोडी टाकून हिंडण्यांस प्रतिष्ठा राहणार नाहीं. तूं शहाणा असलास तर इंग्रजी शीक.'' कृष्णशास्त्र्यांचें शिकण्याचें वयहि राहिलें नव्हतें तरी त्यांनीं वरील उपदेशानुसार आपल्या वयाच्या २५ व्या वर्षी इंग्रजीच्या अभ्यासास सुरुवात केली. नंतर कांही दिवस ट्रॅन्स्लेटर एक्झिबिशनर व नंतर पुना कॉलेजांत असिस्टंट प्रोफेसर होते. या वेळीं त्यांनी कित्येक स्नेह्यांच्या सहाय्यानें 'विचारलहरी' नामक पत्र सुरू करून तरुण हिंदु विद्यार्थ्यांच्या, मिशनरी मंडळींच्या व्याख्यानांनीं ख्रिस्ती धर्माकडे होत असलेल्या प्रवृत्तीस चांगलाच आळा घातला. पुढें कांहीं दिवस दक्षिणा प्राईझ कमिटीच्या सेक्रेटरीच्या जागीं काम केल्यावर 'रिपोर्टर ऑन दि नेटिव्ह प्रेस' च्या जागीं यांची नेमणूक झाली. हे उत्तम लेखक व वक्तें होतें. यांचे मुख्य ग्रंथ आरबी भाषेंतील सुरस गोष्टी, अनेकविद्यामूलतत्त्वसंग्रह, अर्थशास्त्रपरिभाषा, साक्रेटिसाचें चरित्र, रासेलस आणि व्याकरणावरील निबंध हे होत. हे उत्तम कवीहि होते; यांची पद्यरत्नावली, मेघदूत हीं काव्यें सर्वमान्य आहेत. यांची भाषा फार साधी, शुद्ध, प्रौढ व गोड असे; यांचें भाषांतरित ग्रंथ वाचतांना ते भाषांतररूप आहेत असें मुळींच भासत नाहीं; अव्वल इंग्रजींत मराठी भाषेची सेवा ज्या पंडितांच्या हातून झाली त्यांत हे अग्रेसर होते. २० मे १८७८ रोजीं कृष्णशास्त्री मरण पावले. अलौकिक बुद्धिमत्ता, अभिजात रसिकता, व्यापक विचारसरणी, लोकमताला न दुखविण्याचें धोरण, संस्कृत व इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व आणि बहुमानाची सरकारी नोकरी या कारणांमुळें शास्त्रीबोवांचा लौकिक जसा विद्वन्मंडळांत तसा बहुजन समाजांतहि पहिल्या प्रतीचा होता. शास्त्रीबोवांचे बहुतेक गद्य व पद्य प्रबंध भाषांतरित किंवा आधाररचित आहेत. फक्त 'मराठी व्याकरणावरील चर्चात्मक लेख' 'अर्थशास्त्रपरिभाषा' हा निबंध व 'विद्याप्रशंसा' हें लघुकाव्य, याच काय त्या त्यांच्या स्वतंत्र कृती होत. त्यांचे सर्व ग्रंथ भाषेच्या दृष्टीनें आल्हाददायक असले तरी स्वतंत्र ग्रंथांतील स्वावलंबनाला सहज असलेली तेजस्विता किंवा तडफ त्यांच्या ग्रंथांत आढळत नाहीं. तत्कालीन अनेक सुशिक्षितांप्रमाणें कृष्णशास्त्री हे रसिक तसेच रंगेलहि होते.