विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिपळूण, ता लु का.— हा मुंबई इलाख्याच्या रत्नागिरी जिल्ह्यांतील मध्यवर्ति असा तालुका असून याचें क्षेत्रपळ ६७१ चौ. मै. आहे. यांत चिपळूण हें एक गांव व २१२ खेडीं आहेत. १९११ सालीं याची लोकसंख्या सुमारें १९७ हजार होती. जमीनीचा सरकारसारा सुमारें १५६ हजार रु. आहे. हा तालुका समुद्रकिनार्यापासून पश्चिम घाटापर्यंत पसरला असून यांतील बहुतेक प्रदेश डोंगराळ आहे. यांतील मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे वाशिष्टी व शास्त्री या होत. यांतील पावसाचें प्रमाण दर वर्षास १४१ इंच आहे. तालुक्यांत प्राथमिक शिक्षणाच्या शाळा ७२ आहेत. शेती हा मुख्य धंदा असून लुगडीं, बांगड्या वगैरे माल कोठें कोठें तयार होतो. चिपळूण हें व्यापाराचें मुख्य ठिकाण आहे.
गांव — तालुक्याचें मुख्य ठिकाण आहे. याची लोकसंख्या स. १९०१ सालीं ७८९६ होती. हे चांगलें भरभराटींत असून येथें कोकण व देश यांमधला व्यापारहि बराच चालतो. स. १८७६ त येथें म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. गावापासून सरासरी पावमैल अंतरावर कांही बौद्ध लेणीं आढळतात. हें गांव कोंकणस्थ ब्राह्मणांचे मूलस्थान होय. येते एक सबजज्जाची कचेरी, दवाखाना व एक हायस्कूल आहे. येथून जवळच परशुराम क्षेत्र आहे. येथें परशुराम एज्युकेशन नांवाचीं एक शिक्षणसंस्था असून तिनें एक हायस्कूल चालविलें आहे.