विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिन्नविरन्ना — एक तेलगू कवि. तेन्नाली येथील हा कवि कोंडवेडू येथील अन्नवेम्मारेडी राजाच्या वेळीं उदयास आला. ह्याला एक वडील बंधु पेद्दाविरन्ना नांवाचा होता. त्यानें चांगलें अध्ययन केल्यामुळें त्याची उत्कृष्ट कवींमध्यें गणना झाली. दोघे बंधू प्रत्यहि दरबारांत जात असत. तेथें पेद्दाविरन्ना हा राजास फार प्रिय होता. एकदां राजानें पेद्दाविरन्नास अशा अवघड विषयावर कवित्व करण्यास सांगितलें कीं, तशा विषयावर त्यापूर्वी कोणाहि कवीनें कवित्व केलें नव्हतें. पेद्दाविरन्नानें एकदम थोडक्या अवधींत कवित्व करण्याचें कबूल केलें. पुढें घरीं आल्यावर आपल्या बायकोकडून चिन्नाला ही हकीगत कळविली. चिन्नानें देवीची प्रार्थना केली. तिनें चिन्नविरन्नासाठीं पांच सर्गांचें उत्तम काव्य लिहिलें. शेवटच्या पांच ओळी बाकी राहिल्या. पुढें ते पांच श्लोक पेद्दाविरन्नानें करून तें काव्या राजाला अर्पण केलें. त्या दिवसापासून चिन्नविरन्नाची कवित्वाविषयीं चोहोंकडे ख्याति झाली. [परशा-तेलगूवाङ्मय.]