विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिनीमाती किंवा केओलीन.— मूळ या मातीचा शोध चीन देशांत लागला व तेथें या मातीची उंची भांडीं घडवूं लागले. चीन देशांत केओलिंग पर्वताजवळ ही माती सांपडते व त्यावरून हिला केओलीन हें नांव पडलें आहे.
चिनीमाती हा चिकण मातीचा अति शुद्ध प्रकार आहे; व हिचींच चिनी भांडी करतात. ही शुभ्र पांढरी असते. गार, फेलस्पार, व अभ्रक यांचा बनलेला जो ग्रानाईट नामक कणदार दगड त्यांतील फेलस्पार झरून ही माती उत्पन्न होते. चीन देशांत उत्तम जातीची ही माती सांपडते, व तिची चिनी भांडी यूरोपांत करतात. ज्या देशांत ग्रानाईट दगडांचे खडक असतात त्या देशीं ही माती उत्पन्न होते. दक्षिण हिंदुस्थानांत त्रिचनापल्ली, अर्काट, म्हैसूर, निजामचें राज्य आणि उत्तर हिंदुस्थानांत पंजाब, व दिल्ली प्रांत यांत व हिमालयावर ही माती सांपडते.
चि नी भां डीं.— हीं (पोर्सलेन) करण्यास उत्तम प्रतीची पांढरी व शुद्ध अशी कोओलिन नांवाची चिकणमाती घेतात. या भांड्यांकरिता ६२ भाग चिनीमाती (केओलिन), ४ भाग खडू, १७ भाग वाळू आणि १७ भाग फेल्स्फार दगडाची पूड या चोहोंची वेगवेगळाली वस्त्रगाळ पूड करून मिसळतात, व तें मिश्रण चांगले मळून कांही महिनेंपर्यंत सर्द जागीं ढीग करून ठेवतात. नंतर त्याचीं भांडी घडवितात, हें मिश्रण दुसर्या चिकणमातीपेक्षां कमी लवचीक व चिकट असतें, म्हणून याचीं भांडी चाकावर किंवा साच्यांत घडवितांना विशेष काळजी घ्यावी लागतें. भांडीं घडविल्यावर ती सावकाश वाळू देतात, आणि भट्टींत घालून भाजतात. मिना करण्याकरितां कांचमणी (क्वार्टस्) फेल्सपार यांची बुकणी पाण्यांत भिजत घालून व शुद्ध करून नंतर त्यांचें मिश्रण पाण्यांत कालवून दाट करतात व त्यांत थोडेंसें व्हिनिगर (शिर्का) घालतात. या द्रवांत भांडीं बुडवितात, यामुळें भांड्यांच्या छिद्रांत द्रव शिरून त्याचें आच्छादन भांड्यांवर बसते. नंतर प्रत्येक भांडें मातीच्या पिंपांत घालून भाजतात. चिनी भांडें विस्तवांत मृदु होतें. याकरितां पिपांत अनेक भांडी एकावर एक रचतां येत नाहींत. प्रत्येक भांड्यास निराळें पीप लागतें. ही पिपें एकावर एक रचून भट्टींत लांकडें वगैरे घालतात, व भट्टी सावकाश पेटवितात. भट्टी २/३ दिवस पेटती राहून भांडी भाजलीं म्हणजे ३/४ दिवस भट्टी निवूं देतात, आणि नंतर भांडी काढतात.
मिना व केलेलीं चिनी भांडी पांढर्या संगमरवरी दगडासारखीं दिसतात, व त्यावेळीं त्यांस चकाकी नसतें. परंतु चिनी भांड्यांवर मिना केल्यावर ती काचेंसारखी चकचकीत, कणदार, कठीण व कांहीं प्रकाशभेद्य अशीं दिसतात. चिनी भांड्यांवर नक्षी वगैरे काढणें ती मिना केल्यावर हातानें काढतात. निरनिराळे रंग उठविण्याकरितां धातूंचे ऑक्साईड घेतात. हे ऑक्साईड कांच सोरा, किंवा टांकणखार या पदार्थांबरोबर कुटून टर्पेंटाईन तेलांत खलतात, व त्यानें नक्षी काढितात. लाल रंगाकरिता लोखंडाचा ऑक्साईड घेतात. पिंवळ्याकरितां शिशाचा क्रोमेट, निळ्याकरितां कोबाल्टचा ऑक्साईड व हिरव्याकरितां तांब्याचा ऑक्साईड घेतात. जांभळा रंग करण्याकरितां सोनें भुपजलांत विद्रुत करून त्यांत शुद्ध कथलाची कांब बुडवितात. म्हणजे जी जांभळी पूड तळीं बसते, तिचा उपयोग करतात. प्रत्येक रंगाचें काम झाल्यावर भांडें भाजावें लागतें. ज्या भागावर शुद्ध सोनें चढवावयाचें असेल त्या ठिकाणीं सोन्याचा वर्ख किंवा पूड, डिंकाचें पाणी व टांकणखार यांनीं लावितात. यास ऊन केल्यावर डिंक जळून जातो, व टांकणखाराची कांच बनून सोनें पक्कें चिकटतें.
चिनी व दुसरीं उंचीं मातीची भांडीं करण्याचे फार मोठे कारखाने आहेत, व त्या कारखान्यांत हजारों माणसें काम करीत असून सुमारें २०,००,००० रुपयांचा माल विलायतेहून परदेशीं जातो. हिंदुस्थानांतहि सर्व प्रकारचीं भांडीं करण्याचीं द्रव्यें मिळत असून हिंदुस्थानांत दरसाल लाखों रुपयांचीं मातीचीं भांडीं इतर देशांहून येतात. [मोडक-पदार्थ-वर्णन].