विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिंदविन, जि ल्हा (उत्तर)—हा उत्तर ब्रह्मदेशाच्या सगैंग विभागांतील एक जिल्हा असून याचें क्षेत्रफळ १५१६३ चौ. मै. आहे. याच्या उत्तरेस टारो व हुकौंग हीं खोरीं असून दक्षिणेस पकोक्कु व दक्षिण चिंदविन हे दोन जिल्हे आहेत. पूर्वेस म्यित्किना, काथा व श्वेबो असून पश्चिमेस आसाम, मणिपूर व चिन डोंगराळ प्रदेश आहे. या जिल्ह्यांत झिंकलिंग, कामति व सौंधसुप संस्थानें आहेत. या जिल्ह्यांतील डोंगरी मुलुखाचें चिंदविन नदीच्या उत्तर-दक्षिण प्रवाहामुळें पूर्व पश्चिम असे दोन भाग झाले आहेत. याच्या वायव्येकडील झिंकलिंग कामती संस्थानच्या सरहद्दीपासून पकोक्कु जिल्ह्यापर्यंतचा प्रदेश डोंगराळ असून यांतील सर्वांत उंच असलेल्या शिखराची उंची १२५५७ फूट आहे. या डोंगरी प्रदेशांतील उत्तरेकडील रांगांस योमा पर्वत ही संज्त्रा असून दक्षिणेकडील टेकड्यांच्या रांगांस पोंदौंग म्हणतात. जिल्ह्यांत चिंदविन व तिला मिळणार्या यू वगैरे नद्या आहेत. यांत हत्ती, वाघ, चित्ते, रानमांजर वगैरे रानटी जनावरें आढळतात. या जिल्ह्यांतील चिंदविन नदीथडीवरील प्रदेशाची हवा प्रकृतीस मानवेल अशी असून इतर भाग रोगट आहे. याच्या निरनिराळ्या भागांत ५० पासून ९२ इंच पाऊस पडतो.
इतिहास.—ब्रह्मी अमदानींत या जिल्ह्याचा राज्यकारभार एका वुन अधिकार्यावर सोंपविला असे. त्याला खम्पत म्हणत असत. हा किदत या लष्करी छावणीच्या ठिकाणीं रहात असे. १८८५ च्या युद्धांत या प्रदेशांत एका व्यापारी कंपनीचा इंग्रज गुमास्ता मारला गेला. १८८६ त डेप्यूटी कमिशनरानें नदीथडीवरील कांहीं ठिकाणीं व कबौ दरींतील तमू येथें इंग्रजी ठाणीं स्थापन केलीं. १८८८ त उत्तर चिंदविन हा जिल्हा दक्षिणचिंदविन जिल्ह्यापासून वेगळा करण्यांत आला. १८८६ त मिंग्यन येथें ग्लीसन नांवाच्या असिस्टंट कमिशनराचा खून झाला. यानंतर १८८८ व १८९०-१ या वर्षी कले दरींतील प्रदेशांत बंडें झालीं. हीं मोडल्यावर १८९२ व १८९४ या सालीं आसाम सरहद्दीवरील चिन लोकांवर स्वार्या करण्यांत येऊन १८९६ सालीं इंग्रजी सीमा दर्शविणारें खांब रोवण्यांत आले. या वेळेपासून चिन लोकांचा उपद्रव कमी झाला. १९२१ सालीं याची लोकसंख्या दोन्हीं संस्थानें धरून १८६८८१ होती. दोन तृतीयांश लोक ब्रह्मी भाषा बोलतात व बाकीच्या राहिलेल्यांपैकीं बहुतेक लोकांची शान भाषा आहे.
शेतीं.— या जिल्ह्यांतील बहुतेक लोक शेतीवर आपली उपजीविका करतात. यांतील खोरी फारच सुपीक आहेत. डोंगराळ प्रदेशांतील उतारावरची जमीन तौंग्य पद्धतीनें लागवडीस आणतात. ही पद्धत पुढें दिल्याप्रमाणें आहे. पहिल्यानें एखादा उतार शोधून काढून त्यांतील गवत जाळून टाकितात व नंतर सर्व झाडें पाडून तींहि एके ठिकाणीं जाळतात. असें केल्यावर गवताची व झाडांची राख पेरणीच्या उतारावर पसरण्यांत येते व यानंतर पर्जन्यवृष्टी होतांक्षणीच बीं पेरण्यांत येतें.
या जिल्ह्याचें मुख्य उत्पन्न म्हटलें म्हणजे तांदूळ होय. याशिवाय यांत जिल्ह्याच्या उपयोगापुरते वाटाणे, तंबाखु, तीळ व कापूस यांचीं पिकें होतात. चार पांच ठिकाणीं चहा होतो. या जिल्ह्यांत रेड्यांचा शेर्ते नांगरण्याकडे उपयोग होतो. यांतील घोडे व बकर्या हीं जनावरें जातवान नसून ती फार क्वचित दृष्टीस पडतात. या जिल्ह्यांत कांहीं ठिकाणीं उथळ नद्या आडवून त्यांचा कालव्यासारखा उपयोग केला आहे. यांतील जलप्रवाहांत मासे सांपडतात. मासे धरण्याच्या कराचें उत्पन्न दरवर्षी १०००० रू. असतें.
जंगलें :— या जिल्ह्यांतील जंगलाचें उत्तर चिंदविन व मिथ्थ असे दोन विभाग असून किंदत ब मिग्यन हीं अनुक्रमें ठिकाणें आहेत. यांतील जंगलांत साग वगैरे इमारतीचीं झाडें आहेत. यांतील लाखेचें उत्पन्न दरवर्षी १०,००० रु. असतें. जिल्ह्याच्या २०७० चौ. मैल प्रदेशांत राखिव जंगलें असून त्यांचा ६१६० चौ. मैल प्रदेश वर्गीकरण न केलेल्या जंगलांनीं व्यापिला आहे. १९०३-४ सालीं जंगलाचें उत्पन्न ३ लाख रु. होतें.
धातू :— या जिल्ह्यांत दगडी कोळसा व घास्लेट बर्याच प्रमाणांत आढळतें. यांतील नद्यांच्या प्रवाहांत सोन्याचे कण सांपडतात. याशिवाय लाल, पांच वगैरे मौल्यवान हिर्यांच्याहि खाणी आहेत. यू नदीवरील येब्बानी गांवीं खार्या पाण्याचें झरे असून तेथें त्यांच्या पाण्यापासून थोड्या प्रमाणावर मीठ होतें.
व्यापार व दळणवळण :— या जिल्ह्यांतील इंदिन व इतर कांहीं ठिकाणीं एका प्रकारचें कापड विणलें व रंगविलें जातें. यांतून मुख्यत्वेंकरून भात, साग, बांबू व मेण हे जिन्नस बाहेरगांवीं जातात व बाहेरून मीठ, लोखंड व पाश्चात्य रेशमी व सुती कापड हे जिन्नस आंत येतात. शिवाय संस्थानांतील लोक कापड, घास्लेट, तिळीचें तेल व मीठ हे जिन्नस घेऊन त्याबद्दल रबर, मेण, बांबू वगैरे जिन्नस देतात. या जिल्ह्यांत आगगाडीचा एकहि फांटा नाहीं. यांतील बहुतेक दळणवळण व व्यापार जलमार्गानें चालतो. चिंदविन व तिला मिळणार्या नद्यांतून नावा सदोदित जाऊं येऊं शकतात. याशिवाय यांत ४०० मैल लांबीचे कच्चे रस्ते आहेत. उन्हाळ्यांत व हिवाळ्यांत कामती या गांवाहून हौंगपा येथें जाण्यास खेचरें उपयोगी पडतात.
हा जिल्हा ब्रिटिश अमलाखालीं आल्यापासून यांतील प्रत्येक कुटुंबामागें १० रु. या प्रमाणें एक थाथमेडा नांवाचा कर बसविण्यांत आला असून तो आजपावेतों चालू आहे. १८९५-९६ सालीं सरकारी जमीनीचा सारा शेंकडा १० ठरविण्यांत आला व याच प्रमाणांत अद्यापिहि वसूल करण्यांत येतो. जिल्ह्याचें एकंदर उत्पन्न १९०३-४ सालीं ४०७००० रु. होतें. व यांपैकीं शेतसारा ८०००० असून थाथमेडा कर २६५००० रु. होता.
१९०३-४ सालीं या जिल्ह्यांत ३० प्राथमिक, २४३ खासगी व एक एतद्देशीय भाषेंतून इंग्रजी शिकविणारी, अशा शाळा होत्या. या शिवाय ६ मुलकी व ३ लष्करी दवाखाने आहेत.
जि ल्हा (दक्षिण).— उत्तर ब्रह्मदेशाच्या सगैंग विभागांतील एक जिल्हा असून याचें क्षेत्रफळ ३४८० चौ. मै. आहे. हा जिल्हा म्हणजे एक त्रिकोण असून त्याचें वरचें टोक उत्तर दिशेस आहे. याच्या उत्तरेस उत्तर चिंदविन व श्वेबो जिल्हे असून पश्चिमेस पकोक्कु जिल्हा व पोदौंग पर्वत आहे. पूर्वेस श्वेबो जिल्हा असून दक्षिणेस पकोक्कु व रागैंग आहेत. चिंदविन नदी या जिल्ह्याच्या वायव्येकडून आग्नेयेस वाहत जाऊन याचे पूर्व व पश्चिम असे दोन समसमान भाग करते. या नदीच्या कांहीं भागांत सदोदित नावा जाऊं येऊं शकतात. याच्या पश्चिम भागांत पोदौंग पर्वत आहे. याची उंची ४००० फूट आहे. याच्या पूर्वेस महदौंग पर्वताची रांग आहे. वरील दोन पर्वतांमधील सखल प्रदेशांत पटोलोन व उत्तर योमा या दोन नद्या आहेत. चिंदविन नदी व महूदौंग पर्वत यांच्या दरम्यान थिंगदोन नांवाची २५ मैल लांबीची एक पर्वतांची रांग आहे. महूदौंग पर्वत व चिंदविन नदी यांच्यामधील प्रदेश व या जिल्ह्याची दक्षिणेकडील सरहद्द डोंगराळ आहे. याचा दक्षिण भाग सपाट असून त्याच्या आग्नेयेस पोवनदौंग, तौंगकोमैक व लेप्तदोग वगैरे टेकड्या आहेत. यांपैकीं पहिल्या टेकडीवर कोरिव लेणीं आढळतात. दक्षिण भागांत कैकुमेयत व न्याकोयामा नद्या आहेत. या जिल्ह्यांत हत्ती, चित्ते, रानटी डुकरें वगैरे जनावरें आहेत. या जिल्ह्यांत मार्च, एप्रिल व मे या महिन्यांत उष्णता फार असते. पावसाळ्याच्या सुमारास या प्रदेशावर वारे वाहतात व त्यामुळें हवा समशीतोष्ण असते. या जिल्ह्याचें साधारण उष्णमान ८ असतें. १९००-१ सालीं यांतील मोनिवा, पेल, बुदलिन व कानी येथें अनुक्रमें ३२, ४५, ४३,५३ इंच पाऊस पडला होता.
हा जिल्हा इ. स. १८८६ त इंग्रजांच्या ताब्यांत आला. १८८७ त त्याच्या बंदोबस्ताकरितां लष्करी शिपायांची एक तुकडी बोलावण्यांत येऊन शांतता राखण्याकरितां मुलकी शिपाई नेमण्यांत आले. पहिल्यानें उत्तर व दक्षिण चिंदबिन हे दोन्हीहि जिल्हे एका डेप्युटी कमिशनरच्या ताब्यांत असून तो अलोन या मुख्य ठिकाणीं रहात असे. १८८८ त उत्तर व दक्षिण चिंदविन असे दोन भाग पाडण्यांत येऊन मोनिवा हें दक्षिण भागाचें मुख्य ठिकाण ठरविण्यांत आलें. १८८७-८९ च्या दरम्यान या जिल्ह्यांत बरीच बंडें झालीं. यांत पुष्कळ देवालयें असून त्यांमध्यें अलौंगढौ कथप हें फार प्रसिद्ध आहे. हें कर्ना प्रदेशांतील पटोलोन व योमा या नद्यांच्या उगमाच्या मध्यभागीं बांधलें असून बुद्धानंतर जी पहिली बौद्धिक सभा भरली होती तिच्या अध्यक्षाचें स्मारक आहे. याशिवाय इतर देवालयें म्हटलीं म्हणजे पौंगवश्वेकुनी श्वेगू, वगैरे होत.
या जिल्ह्यांत १ गांव व १२१२ खेडीं असून १९२१ सालीं याची लोकसंख्या ३४२८८० होती. यापैकीं शेंकडा ९९ पेक्षां अधिक लोक बौद्धधर्माचे असून ते ब्रह्मी भाषा बोलतात. या जिल्ह्यांत पंजाब, बंगाल, संयुक्तप्रांत व मद्रास इलाखा यांतून बरेच हिंदू व मुसुलमान रहावयास आले आहेत. यांतील शेंकडा ६० लोक शेतीवर आपला उदरनिर्वाह करतात.
शेतकी :— या जिल्ह्यांतील जमीन वाळवंटी, चिक्कण व मळीची या तीन प्रकारची असून वाळवंटी जमीनीनें सर्वात अधिक प्रदेश व्यापिला आहे. १९०३-४ सालीं या जिल्ह्याची ६०७ चौ. मै. जमीन लागवडीस आणली होती. यांत तांदूळ, ज्वारी, कापूस, तंबाखू, तीळ व केळीं यांचीं पिकें होतात. यांतील गुरेढोरें म्हटलीं म्हणजे गाई, बकर्या, घोडे हीं होत. चिंदविन नदींत मासें सांपडतात.
जंगलें :— या जिल्ह्यांतील बहुतेक जंगलें पश्चिमेकडील डोंगराळ प्रदेशांत आहेत. त्यांचे एकंदर चार वर्ग असून त्यांतील प्रत्येकांत निरनिराळ्या जातीचें इमारती लाकूड होतें. याशिवाय बांबू, वेत, व कांही प्रकारच्या सालीं यांचें उत्पन्न होतें. १९०३-४ सालीं जंगलाचें उत्पन्न ४०६०० रु. होतें.
धातू :— यांतील सलिंगै प्रदेशांत सल्फेट ऑफ कॉपर सांपडतें. चिनव्यित येथें सोन्याची खाण आहे. संलैंगैजवळ गानेंट व टूरमलीन सांपडतें. कानी प्रदेशांतील महूदौंग रांगेच्या पायथ्याशी व पले प्रदेशांतील काईन येथें घास्लेटाच्या खाणी आहेत. सलिंगैत येथें खार्या विहिरीच्या पाण्यापासून मीठ तयार करतात.
व्यापार व दळणवळण :— अलोन येथें लांकडावरील कोरीव काम होतें. श्वेबोसरहद्दीजवळील अयदव व येदवेट या गांवीं स्वयंपाकाचीं व पिण्याचीं मातीचीं भांडीं तयार होतात. इंदायिंग येथें पितळेचीं भांडीं व घुंगरू होतात. चेहमोन व मोनिवे येथें खोगीर व लगाम होतात. कोथन येथें थोड्या प्रमाणावर रेशमी कापड विणलें जातें. यिनमाबिन विभागांत चटया व गवती पेट्या तयार करतात. मोनीक मौंगदौंग वगैरे ठिकाणीं लाखेच्या बांगड्या व इतर सामान तयार होतें. या जिल्ह्यांतून डाळ, ज्वारी, गुळ, काथ, पितळ व लाखेचें सामान हे जिन्नस बाहेरगांवीं रवाना होतात व मीठ, मीठ लावलेले मासें व परदेशी माल हे जिन्नस बाहेरून येतात. याचा आयात व निर्गत व्यापार बहुतांशीं आगगाडी व जलमार्ग या दोन साधनांनीं चालतो. याशिवाय यांत १४६ मैल पक्क्या व ३५० मैल कच्च्या सडका आहेत. यांतील व्यापारी लोक म्हटले म्हणजे ब्रह्मी व चिनी होत. मोनीवा सतोन हीं यांतील व्यापाराचीं मुख्य ठिकाणें होत. पर्जन्यवृष्टीचें प्रमाण निश्चित नसल्यामुळें या जिल्ह्यांत दुष्काळ पडण्याची भिती असते. १८९१ सालीं असाच एक दुष्काळ पडला होता.
शिक्षणाच्या बाबतींत हा जिल्हा फार मागासलेला आहे. जिल्ह्यांत एकंदर ३ दुय्यम प्रतीच्या, ११३७ प्राथमिक व ७६९ लहान मुलांच्या खाजगी शाळा आहेत.