विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिदंबरम् ता लु का.— मद्रास इलाख्याच्या दक्षिणअर्काट जिल्ह्याच्या दक्षिणेकडील तालुका असून याचें क्षेत्रफळ ४०२ चौ. मैल आहे. लो. सं. (१९२१) ३१०४०५ होती. याच्या दक्षिणेस कोलेरून नदी असून बेल्लार ही याच्या मधून वहात जाते. या तालुक्यांत या नद्यांचे पुष्कल कालवे आहेत. १९२१-२२ सालीं सारा व इतर पट्ट्या यांचें उत्पन्न ९५३००० रुपयें होतें. यांत दरवर्षी ५१ इंच पाऊस पडतो.
श ह र—तालुक्याचें मुख्य ठिकाण. हें साऊथ इंडियन रेल्वेचें स्टेशन आहे. १९२१ सालीं याची लोकसंख्या २२५०१ असून १८७३ सालीं येथें म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. कर्नाटक युद्धांत हें एक महत्त्वाचें लष्करी नाकें होतें. १७५३ त हें फ्रेंचांनीं हस्तगत केलें. पुढें १७६० व मेजरमॉनसननें हें काबीज केलें. यानंतर हें हैदर अल्लीच्या ताब्यांत गेलें. येथें त्यानें तटबंदी करून कांहीं फौज ठेविली होती. १७८१ त सर ऐयर कूटनें याच्यावर हल्ला केला; पण तो परतविण्यांत आला.
हें एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचें ठिकाण असून येथें कनकसभा नांवाचें महादेवाचें देवालय आहे. देवळाची इमारत १०व्या शतकांतील दिसतें. येथें हिंदुस्थानांतील पंचलिंगांपैकी एक लिंग आहे. येथें दरवर्षी डिसेंबर व जानेवारी महिन्यांत यात्रा भरते. येथें यात्रेकरू व प्रवासी यांनां उतरण्याकरितां बरेच मठ व धर्मशाळा आहेत. कांहीं वैदिक शाळा व एक हायस्कूल आहे. येथें जनानी रेशमी व कैली कापड तयार होतें.