विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्रकूट —चित्रकूटपर्वत संयुक्तप्रांताच्या बांडा जिल्ह्यांत आहे. हा चित्रकूट नांवाच्या जी. आय. पी. रेल्वे स्टेशनपासून ३॥ मैलांवर आहे. हा बांडा जिल्ह्याच्या कर्वी तहसिलींत व कामटा राजोलाच्या चौबे जहागिरींत पसरलेला आहे. याच्या पायथ्यापासून एक मैलावर पैशुनी नदी वाहतें. इ. स. १७२५ मध्यें छत्रसालच्या राणीनें याच्यावर एक तट बांधला आहे. राम व सीता वनवासांत असतांना या पर्वतावर रहात असल्याकारणानें यास फार पवित्र मानतात. याचा रामायण, महाभारत, बृहत्संहिता वगैरेंत उल्लेख आहे. यावर व नदीतीरावर पुष्कळ देवळें आहेत. ब्रिटिश हद्दीतल्या ४२ महालांचें उत्पन्न या देवालयांकडे लागलें असून शिवाय आसपासच्या संस्थानांतूहि बरेंच उत्पन्न येतें. रामनवमीला आणि दिवाळीला येथें मोठी यात्रा भरत असते.