ज्ञा नें द्रि यें व क ला.— मनुष्याच्या पंच ज्त्रानेंद्रियांशीं जर पूर्वोक्त सप्तकलांचा संबंध जोडला तर कित्येक इंद्रियांशीं कलेचा संबंधच नाहीं असें दिसून येईल :-
पंचमूतें | साधन | इंद्रियें | कला |
आकाश | शब्द | कर्ण | गायन, काव्य. |
वायू | स्पर्श | त्वचा | .... |
तेज | रूप | नेत्र | चित्रकला, मूर्तिकला, वास्तुकला |
आप | रस | जिव्हा | ... |
पृथ्वी | गंध | नाक | ... |
या कोष्टकावरून हें लक्षांत येईल की, केवळ दोनच इंद्रियांनीं वरील सातहि कला व्यापलेल्या आहेत. इतर इंद्रियांच्या व्यापारामध्यें कलेचा भाव कां नसावा, याचाहि थोडासा विचार अवश्य केला पाहिजे. जसे :-
इंद्रियें | शास्त्रें | इंद्रियांचें कार्य |
कर्ण | शब्दशास्त्र | ऐकणें व ऐकिवणें |
त्वचा | कामशास्त्र | (स्वतः) उपभोग घेणें |
नेत्र | रूपशास्त्र | पहाणें व दाखविणें |
जिव्हा | सूपशास्त्र | (स्वतः) उपभोग घेणें |
नाक | सुगंधशास्त्र | (स्वतः) उपभोग घेणें |
या पांच इंद्रियांचीं हीं मुख्य शास्त्रें आहेत. कामशास्त्र हें भोगाचें शास्त्र आहे, व भोग हा स्वतःच भोगावयाचा असतो. आपण भोग भोगीत असतां तो दुसर्यांस देतां येत नाहीं. सूपशास्त्राचेंहि असेंच आहे. उत्तम पक्वान्न तयार केलेलें असलें तरी सुद्धां तें एकाच वेळीं अनेकांनां उपभोगितां येत नाहींत. नाकानें वास घ्यावयाचा असतांहि असाच प्रकार होतो. म्हणजे ह्या तीन इंद्रियांचे विषय समुदायाला एकसमयावच्छेदेकरून ग्रहण करणें अशक्य आहे. पण शब्दशास्त्र व रूपशास्त्र यांचें तसें नाहीं. एका वेळींच एका चित्राचें निरीक्षण करून हजारों लोक जसे आनंदाचे भागी होऊ शकतील त्याचप्रमाणें एकाच वेळीं काव्यश्रवणानेंहि हजारों मनुष्य तल्लींन होऊं शकतील. म्हणून मनुष्याचें मनुष्यत्व राखण्यास व वाढविण्यास जशीं ही दोन (कर्ण व नेत्र) इंद्रियें कारण होत असतात, त्याप्रमाणें इतर इंद्रियें नसतात. मनुष्याचें मनुष्यत्व ''सांघिक जीवनानें'' विकसित होणारें आहे. म्हणून ज्यांच्या योगानें संघभावाला प्रोत्साहन मिळतें, अशा दोनच इंद्रियांशीं संबंध ठेवणार्या हुन्नरांनां 'ललितकला' असें समजण्यांत येत आहे. यासाठींच चित्रकलेचा अध्यात्मिक दृष्टीनें अत्यंत उपयोग होणें शक्य आहे असें सध्यां समजलें जातें. कारण अध्यात्मिक दृष्टि झाली तरी सामुदायिक दृष्टीच होय.
एकटाच जिचा उपभोग घेऊं शकतो ती कांहीं ललितकला नव्हे तर जिचा अनेक माणसें एकसमयावच्छेदेंकरून आस्वाद घेऊं शकतात तीच ललितकला होय. या दृष्टीनें सुग्रणपणा हा गुण कांहीं कलेमध्यें परिणत होऊं शकत नाही. वरील सात कला ह्या अशा दृष्टीनेंच कला आहेत. त्यांच्यामधील माधुर्य एकाहून अधिक माणसें एका वेळीं सुद्धं घेऊं शकतात व तें माधुर्य घेतल्यानंतर सुद्धं तें जसेंच्या तसेंच त्या मूळ कृतींमध्यें कायम असूं शकतें. एका चित्रकारानें काढलेलें चित्र हजार माणसांनी पाहिलें व त्यांतील आनंद घेतला, तरी त्या चित्राचा गुण कोणत्याच रीतीनें कमी होत नाही. म्हणूनच चित्रकलेला 'ललितकला' असें म्हणतात.
'पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥'
शतपथ ब्रा. १४.८,१.
'पूर्णाचें पूर्णत्व घेतलें तरी पूर्णच शिल्लक राहतें.' चित्रांतील सर्व सौंदर्य अनेकांनीं अनुभवलें किंवा उपभोगिलें तरी तें जसेंच्या तसेंच भूकचित्रांत कायम असतें; म्हणूनच आलेख्य ही ललितकला आहे.
- Prev
- Next >>