विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्तगांग डोंगराळ प्रदेश — या नांवाचा हा बंगाल प्रांताच्या चित्तगांग विभागांतील सरहद्दीवरील एक जिल्हा असून याचें क्षेत्रफळ ५१३८ चौरस मैल आहे. याच्या उत्तरेस टिप्पेराचें डोंगराळ संस्थान असून पश्चिमेस चित्तगांग जिल्हा आहे. दक्षिणेस आराकन असून पूर्वेस ब्रह्मदेशांतील उत्तर आराकान जिल्हा व आसाममधील लुशई हा डोंगराळ जिल्हा हे आहेत.
हा जिल्हा डोंगर, जंगलें व दर्या यांनीं व्यापिला आहे. यांतील केओकादंग व पिर्यामिड टेंकड्या अनुक्रमें ४०३४ फूट व ३०१७ फूट उंच आहेत. यांतील मुख्य नद्या म्हटल्या म्हणजे फेन्नी, कर्णफुली, संगू व मातामुखरी या होत. येथील जंगलांत हत्ती, वाघ, चित्ते वगैरे जंगली जनावरें आहेत. या जिल्ह्याची हवा एकंदरींत थंड असून दर्यांतील हवा रोगट आहे. पाऊस ९४ इंच पडतो.
या जिल्ह्याचा इतिहास म्हणजे त्यावर होणारे हल्ले व त्यांचा प्रतिकार यांचीं वर्णनें होत. १७७७ येथील राजानें गव्हरनर जनरल वारन हेस्टिंग्ज यास कुकी अथवा लुशाई लोकांचा नायक रामूखान याच्या हल्ल्याविषयीं लिहिलें होतें. हाच क्रम १८९१ पर्यंत चालू होता. याच वर्षी इंग्रजांनी लुशाई प्रदेश आपल्या राज्यास जोडला. १९२१ सालीं या जिल्ह्याची लोकसंख्या १७३२४३ इतकी होती. यांत एकंदर ३६३ खेडीं आहेत आणि याचें मुख्य ठिकाण रंगामाती हें आहे. या जिल्ह्यांत चक्मा, माघ व टिप्पेरा या तीन रानटी जाती रहातात. त्यांची अदमासें संख्या अनुक्रमें ४४०००, ३५००० व २३००० अशी आहे.
शे ती.— हा जिल्हा बहुतेक डोंगराळ असल्यामुळें त्यांतील जमीन नांगरतां येत नाहीं. यांतील जमीनीची पेरणी झूम पद्धतीनें होते ती येणेंप्रमाणें :- जानेवारी व फेब्रुवारी महिन्यांत एखादा चांगलासा जमीनीचा तुकडा पाहून त्यांतील बांबू व इतर झाडेंझुडें तोडून तो साफ करतात. पुढें उन्हाळ्यांत या जमीनीस वणवा लावितात व नंतर पावसाळ्यांत तींत कापूस, तांदूळ, कांहीं भाजीपाला व मका वगैरे एकदम पेरण्यांत येतात. अलीकडे शेतकर्यांस जमीन नांगरावयास लावण्याबद्दल बरीच खटपट करण्यांत आली.
जं ग लें — या जिल्ह्यांत बिनवर्गीकरण केलेलीं व राखून ठेवलेलीं अशी दोन प्रकारचीं जंगलें असून त्यांची क्षेत्रफळें अनुक्रमें ३७५३ व १३८५ चौरस मैल आहेत. १९०३-४ सालीं जंगलखात्याचें उत्पन्न ८८००० रु. होतें. यांतील जंगलांत उत्तम इमारतीलांकूड सांपडतें.
व्या पा र व द ळ ण व ळ ण — या जिल्ह्यांतील रानटी बायका स्वतःसाठीं सुतीं वस्त्रें विणतात. याशिवाय येथील जमीनींत चहा, कापूस, तांदूळ, तीळ, मोहरी, तंबाखू वगैरेचें उत्पन्न होतें. यांपैकीं कापूस बाहेर गांवीं रवाना होतो. यांतील आयात जिन्नस म्हटले म्हणजे सुती कापड, तांदूळ, मीठ, तंबाखू व वाळवलेले मासे हे होत. याचा बहुतेक व्यापार जलमार्गानें चित्तगांग बंदराशीं चालतो. बांदरबन, चंद्रधोना, रंगामाती वगैरे गांवांची व्यापाराकरितां प्रसिद्धि आहे. या जिल्ह्याचें बहुतेक दळणवळण जलमार्गानें होतें. यांत २३० मैल लांबीचें कच्चे रस्ते आहेत. परंतु त्यांवरून गाड्या जाऊं शकत नाहींत.
रा ज्य व्य व स्था — या जिल्ह्याचे चक्मा, मोंग व बोमोंग असे तीन विभाग असून त्यांवर एका अधिकार्याची नेमणूक केली आहे. या अधिकार्यास सुपरिटेंडेंट म्हणतात. प्रत्येक विभागाचा कारभार तेथील नायकावर सोपविला असून सारा वसूल करण्याची जबाबदारी याजकडेच असते. या विभागांतील प्रत्येक खेड्यावर तेथील पुढारी देखरेख करतो व यास सारावसुलीच्या कामाबद्दल कांहीं दस्तुरी मिळते. किरकोळ दिवाणी व फौजदारी खटल्यांत खेड्याचे व विभागाचे नायक निकाल देतात. यांच्याविरुद्ध सुपरिटेंडेंट व त्याचे दोन मदतगार अपील ऐकतात. शेवटचा निकाल देण्याचा अधिकार विभागाच्या कमिशनरास असतो. फांशीच्या शिक्षेस मात्र स्थानिक सरकारची संमति घ्यावी लागते. १९०३-४ सालीं या जिल्ह्याचें उत्पन्न १२८००० ऱु. होतें. १९०३-४ सालीं एकंदर १११ शिक्षणसंस्था होत्या. व यापैकीं ३ दुय्यम प्रतीच्या, ८१ प्राथमिक व २७ विशेष प्रतीच्या शाळा होत्या. वरील सालीं दोन दवाखाने पोलिस शिपायाकरितां असून ३ धर्मार्थ दवाखानें होते.