विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चित्तगांग, जि ल्हा.— (उर्फ चितगांव) हा बंगाल प्रांताच्या चित्तगांग विभागांतील एक जिल्हा असून याचें क्षेत्रफळ २४९७ चौ. मैल आहे. हा बंगालच्या उपसागरच्या पूर्वेस असून याच्या दक्षिणेस ब्रह्मदेशांतील अकियाब जिल्हा आहे. याच्या उत्तरेस फेन्नी नदी असनू पूर्वेस चित्तगांग डोंगराळ प्रदेश आहे. हा प्रदेश चारनदीथडी व त्यामध्यें असणार्या टेंकड्यांच्या मुख्य तीन रांगांनी बनला आहे. फेन्नी, कर्णफुली, मातामुखरी, संगु वगैरे या प्रदेशांतील मुख्य नद्या होत. डोंगराळ भागांत देवदार, ताड वगैरे पुष्कळ प्रकारचीं झाडें आढळतात. समुद्रकिनार्यालगतचा प्रदेश गवतानें व्यापिला आहे. या जिल्ह्याचें हवामान उष्ण व दमट असून वार्षिक पावसाचें प्रमाण १११'' आहे. या जिल्ह्यांत तुफानें होतात.
इतिहास :— या जिल्ह्याचा पूर्वी टिप्पेराच्या हिंदुराज्यांत समावेश होत होता. ९व्या शतकांत तें आराकानच्या बौद्ध राजानें काबीज केलें. पुढें तेराव्या शतकांत तें कांहीं कालपर्यंत मोगलांच्या ताब्यांत होतें. पण १५१२ त टिप्पेराच्या राजानें मुसलमानास हांकून लावून आपलें राज्य परत घेतलें. यानंतर पुन्हां एकदां हा जिल्हा मोंगलांच्या ताब्यांत गेला. १५३८ त गोव्याहून येथें पोर्तुगीज लोक धर्मप्रसारार्थ आले होते. १५६० व १५७० च्या दरम्यान मोंगल व अफगाण यांच्यांत झटापट चालू असतां आराकानच्या राजानें हा जिल्हा आपल्या राज्यास जोडला. परंतु मोंगलांनीं १५८२ त याच्या जमिनीचा सारा वसूल केला.
पुढें आराकानी अथवा माघ लोकांनीं हा जिल्हा आपल्या ताब्यांत राहावा म्हणून त्यांत पोर्तुगीज चांचे लोकांचीं फौज पाठवून त्यांच्या स्वाधीन चित्तगांग बंदर केलें. १६०५ मध्यें हे चांचे लोक आपल्या धन्याशीं अरेरावी करूं लागले. त्यांनां हांकून लाविल्यावर तें संदवीप बंदरांत जाऊन राहिले व तेथून त्रास देऊं लागलें. त्यांच्या त्रासामुळें बंगालच्या सुभेदारास आपलें ठाणें बदलून डाक्यास जाऊन रहावें लागलें. १६३८ त मतकराय या आराकानच्या सुभेदारानें आपल्या धन्याशीं बेबनाव करून मोंगलांची मदत मागितली व त्यांच्या स्वाधीन हा जिल्हा केला. यानंतर १६६४-६५ त शहाजहान बादशहानें आराकानच्या राजाचा व पोर्तुगीज चांचे लोकांचा पराभव करून चित्तगांग जिल्हा पुन्हां बंगाल प्रांतास जोडला. १६८५ व १६८९ त ईस्ट इंडिया कंपनीनें चित्तगांग काबीज करण्याचें प्रयत्न केले पण ते सर्व निष्फळ ठरले. १७६० त हा जिल्हा मीर कासीमनें इंग्रजांच्या स्वाधीन केला. या वेळेस एक इंग्रज अधिकारी व त्यांचे सल्लागार मंडळ याचा कारभार पहात असत. १७८४ त ब्रह्मी लोकांनीं आराकान काबीज केलें तेव्हां तेथील पुष्कळ लोक चित्तगांग येथें पळून आले व ते इंग्रजांनीं पुन्हां त्यांच्या स्वाधीन करण्याचें नाकारल्यामुळें पाहिलें ब्रह्मी युद्ध झालें. १८२३ त ब्रह्मी लोकांनीं या प्रदेशावर पुन्हां चाल केली होती. १८५७ च्या बंडांत येथेंहि थोडी धामधूम उडाली होती.
सन १९२१ सालीं या जिल्ह्याची लोकसंख्या १६११४२२ होती. खुद्द चित्तगांग शहराची हवा रोगट आहे. परंतु बाकी सर्व जिल्ह्याची हवा साधारणत: बरी आहे. यांतील बहुतेक लोक चतगैया नांवाची भाषा बोलतात.
शेती :— या जिल्ह्यांतील डोंगरप्रदेश खेरीजकरून बाकीची सर्व जमीन मळीची आहे. यांतील सखल जमीतींत तांदुळाचें व कडधान्याचें पीक हातें. उंच प्रदेशांत तांदुळाची दोन पिकें होतात. याशिवाय सण, ताग, तंबाखू, विड्याची पानें, गवत, ऊंस वगैरे जिनसांची पिकें होतात. यांतील गुरेंढोरें जातवान नाहींत. या प्रदेशाच्या समुद्रकिनार्यावर मासे पकडण्याचा धंदा चालतो.
जं ग लें— या जिल्ह्यांतील १/३ जमीन जंगलांनी व्यापिली असूप २८६ चौरस मैल जमीन जंगलाकरितां राखून ठेवली आहे. येथील जंगलांतून, गुरजन, जारूल, नागेश्वर, गमहार वगैरे झाडें व वेत व बांबू होतात. १९०३-४ सालीं जंगलाचें उत्पन्न १५००० रु. होतें.
व्यापार आणि दळणवळण.— चहा तयार करण्याचा या जिल्ह्यांतील मुख्य धंदा असून सन १९०३ सालीं १३७०००० पौंड चहा तयार झाला होता. पहारतली व कॉक्सचा बाजार येथें हलक्या प्रतीचें सुताचें व रेशमी कापड होतें. याशिवाय वेळूच्या व गवती चटया, टोपल्या, मासे धरण्याची जाळीं तयार होतात. चित्तगांग येथें पूर्वी जहाजें बांधण्याचें काम होत असें. चित्तगांग बंदराहून तांदूळ, चहा व कापूस बाहेरगांवीं पाठविले जाऊन कापड, धातू, साखर, मीठ व तेल हे जिन्नस जिल्ह्यांत आणले जातात. कॉक्सचा बाजार, तेकनाफ, महाजनहाट, नाझीरहाट वगैरे ठिकाणें व्यापाराकरितां प्रसिद्ध आहेत. या जिल्ह्यांत आगगाडीचें कांहीं फांटे असून ३४५ मैल लांबीचे कच्चे व ५३३ मैल लांबीचे पक्के रस्ते आहे.
शि क्ष ण :- १९०३-०४ सालीं एकंदर १९८७ शिक्षणसंस्था असून त्यापैकीं १ कॉलेज, ५९ दुय्यम प्रतीच्या शाळा, ११३८ प्राथमिक शाळा व ७८९ विशेष प्रतीच्यां शाळा होत्या. १९०३ सालीं एकंदर १३ दवाखाने होते.
श ह र.— याच नांवाच्या जिल्ह्याचें व विभागाचें हें मुख्य शहर असून कर्णफूली नदीवर हें वसलें आहे. हें आसाम-बंगाल रेल्वेवरील एक स्टेशन आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या २८७६६ होती. येथें १८६४ त म्युनिसिपालिटी स्थापन झाली.
याची पूर्वी पासून व्यापाराकरितां प्रसिद्धि असून सध्यां हें पूर्वबंगाल प्रांतांतील एक मुख्य बंदर आहे. येथें आगगाडी झाल्यापासून व्यापारास उत्तेजन मिळालें आहे. या बंदरांतून ताग बाहेर रवाना होतो. याशिवाय इतर आयात व निर्गत जिन्नस म्हटले म्हणजे अनुक्रमें कापड, मीठ, रॉकेल, तांदुळ, चहा, कातडीं वगैरे होत. १९०३—०४ सालीं येथून ३१६.७ लाखांचा माल बाहेर रवाना झाला व ७६.१ लाखांचा माल बाहेरून तेथें आला. येथें सरकारी कचेर्या, दवाखाना, रेल्वेकचेर्या वगैरे इमारती आहेत. येथें एक कॉलेज आहे. व हायस्कुलें बरींच आहेत. पौरस्त्य विद्येच्या उत्तेजनार्थ संस्कृत कॉलेज, ओरिएंटल अॅकेडमी, चितगांग मद्रसा वगैरे संस्था आहेत. येथें ज्योति नांवाचें साप्ताहिक वर्तमानपत्र निघतें.