विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चितोड— चितोड हें शहर राजपुतान्याच्या उदेपूर संस्थानांतील चितोड जिल्ह्याचें मुख्य ठिकाण असून तें चितोड रेल्वे (उदेपूर-चितोड-लाईन) स्टेशनापासून दोन मैलांवर आहे. याच्याजवळच चितोड नांवाचा प्रसिद्ध किल्ला आहे. याच्या पश्चिमेस गंभीर नांवाची नदी वहाते. तिच्यावर इ. स. १४ व्या शतकांत बांधलेला एक पूल आहे. या नदीचा उल्लेख सुप्रसिद्ध पन्नादाईच्या गोष्टींत येतो. मेवाडांतून बाहेर जाणारी सर्व अफू याच गांवीं तोलतात. वर्षास सरासरी ४४०० अफूच्या पेट्यांची निर्गत होते. याची लोकसंख्या (सन १९११) ७३३२ आहे. यांत एक प्राथमिक शिक्षणाची शाळा व एक दवाखानाहि आहे. चितोडचा प्रसिद्ध किल्ला कोणी व केव्हां बांधला हें सांगणें कठीण आहे. तो पांडवांनीं बांधला अशी दंतकथा सांगतात. या किल्याला पूर्वी चित्रकोट म्हणत. त्याचें कारण त्या ठिकाणीं इ.स. ७ व्या शतकांत चित्रांग नांवाचा मोरी (मौर्य) रजपूत राज्य करीत होता असें म्हणतात. हा किल्ला बाप्पारावळ यानें इ.स.७३४ त मोरी लोकांजवळून सर केला व येथेंच इ.स.१५६७ पर्यंत मेवाड संस्थानची राजधानी होती. मुसुलमानांनी याच्यावर चार वेळ स्वार्या केल्या; इ.स. १३०३त अल्लाउद्दीन खिलजीनें (ज्त्रा. को. वि. ७ पहा) , इ.स. चौदाव्या शतकांत महम्मद तघलकनें, इ.स. १५३४ त गुजराथच्या बहाद्दुर शहानें आणि इ.स. १५६७ त अकबरानें. शेवटच्या वेळीं चितोडास २० अक्टोबर १५६७ ते २३ फेब्रुवारी १५६८ पर्यंत अकबरानें वेढा दिला होता. किल्ला मोठ्या शौर्यानें व चिकाटीनें लढला. परंतु सेनापती जयमल्ल हा अवचित एका बंदुकीच्या गोळीनें ठार झाल्यानें व अन्नपाण्याच्या तुटवड्यानें अखेर किल्ला अकबराच्या हातीं आला. मात्र तत्पूर्वी सर्व रजपूत स्त्रियांनीं जोहार केला व रजपूत शिपायांनीं आपले प्राण धारातीर्थी अर्पण केले. त्यामुळे अकबरानें चिडून तीस हजार लोकांची कत्तल केली (स्मिथ). किल्ल्याच्या मुख्य वेशीचे दरवाजे, साहेब नौबती व कालीमातेच्या देवळांतील मोठमोठीं मौल्यवान झुंबरे हीं सर्व अकबरानें आग्रास नेली. जहांगीरनें किल्ल्याची दुरूस्ती करूं दिली नाहीं. तो मेल्यावर शहजहानाच्या वेळीं राणा जगत्सिंग यानें डागडुजी चालविली होती. परंतु शहजहानानें ती बंद पाडिली व तट पाडून टाकला. पुढें १६८० च्या सुमारास औरंगझेबानें येथील ६३ देवळें पाडून टाकिलीं (स्मिथ). तेव्हांपासून १८ व्या शतकापर्यंत हा ओसाड पडला होता. या किल्ल्यावर कीर्तिस्तंभ नांवाचा एक जुना विजयस्तंभ आहे. तो जिजा नांवाच्या एका रजपूत सरदारानें इ.स. बाराव्या किंवा तेराव्या शतकांत बांधला. माळवा आणि गुजराथच्या सुलतानांवर जेव्हां कुंभराण्यानें जय मिळविला तेव्हां त्या यशाचें स्मारक म्हणून त्यानें इ.स. १४४२ ते ४९ च्या दरम्यान एक अप्रतिम खोदीव काम केलेला जयस्तंभ नांवाचा मनोरा येथेंच उभारला. चितोड शहरापासून सात मैलांवर राजपुतान्यांतील एक अतिशय जुनें नागरी नांवाचें खेडें आहे. तेथें ख्रिस्ती शतकापूर्वीचीं कांहीं नाणीं व शिलालेख सांपडले आहेत. याचें पूर्वीचें नांव मध्यमिका असून त्यावर ख्रि.पू. १५४ च्या सुमारास मेनांडर यानें स्वारी केली होती. हें गांव त्यावेळीं शिबी नांवाच्या एका राजवंशाची राजधानी होती. शिलालेख शुंगकालीन असून, त्यांत अश्वमेध व वाजपेय यज्त्राबद्दलची माहिती (विधी व प्रयोग) आहे. चितोडच्या किल्ल्यावरील एका जयस्तंभावर वास्तुशास्त्रावरील टीकेचा एक शिलालेख खोदलेला आहे. चितोड गांवास हल्लीं तट व चार वेशी आहेत. येथींल घराच्या भिंतीवर रजपूत व मुसुलमान यांच्यांत पूर्वी झालेल्या लढायांचीं चित्रें काढलेलीं दिसतात. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाचें नांव हनुमानदरवाजा आहे. त्याच्या पुढें सात दरवाजे टाकून आठवा सूर्यदरवाजा आहे. प्रत्येक दरवाज्यांत साधारण अर्धा मैल अंतर आहे. हनुमानदरवाज्यांतून एकदम सूर्यदरवाजांत एका (मधले ७ दरवाजे न लागतां) चोर वाटेनें जातां येतें. चितोडच्या अनेक युद्धांत सूर्यदरवाजा व रामपालदरवाजा हे प्रसिद्धीस आले आहेत. सूर्यदरवाज्याजवळ उदेपुरकरांचें किरमिजी निशाण उभारलेलें असतें. दरवाज्याच्या आंत दक्षिणेकडे लाखानें बांधलेला दरबार महाल, लाखाचा महाल (येथील शिल्प फार उत्कृष्ट आहे.), मीराबाईचें मंदिर (येथें तिच्यावेळचें एक तुळशीवृंदावन आहे), कुंभाचा विजयस्तंभ (दोन पुरूष उंचीच्या चबुत्र्यावर, दहा मजली उंचीचा हा स्तंभ आहे; आंतून वर जाण्यास प्रशस्त रस्ता असून, चित्रें व मूर्ती भिंतीवर कोरलेल्या आहेत. मूर्तीखालीं त्यांचीं नांवें आहेत; मुसुलमानांचा हात मूर्तीचित्रांवर फिरलेला आहे. नवव्या मजल्याच्या गच्चीवर संगमरवरी हत्ती असून त्याच्यावर दहावा मजला उभारला आहे; येथेंच पश्चिमेकडील २ खांबावर २ शिलालेख, कुंभाच्या जयाच्या हकीकतीचे आहेत.), पुढें लाखानें बांधलेलें विश्वकर्म्या (ब्रम्हदेवा) चें मंदिर आहे व त्यांत ब्रम्हदेवाची मूर्ती आहे. सासूसुनांची कुंडें, दर्यामहाल (येथील चित्रांचा रंग अजून शाबूत आहे), माताजी उर्फ कालीचें देऊळ (येथील झुंबरें नगारे वगैरे सर्व सामुग्री अकबरानें नेली होती. हल्लीं देवळांतील सर्व सामान नवें असून मूर्तीहि अर्वाचीन आहे. येथें एक शिलालेख आहे.), पद्मिनीचा महाल (हा हल्लीं सर्व नवीन बांधलेला आहे. याच्याजवळ सुंदर तलाव आहे.), भीमसिंगाचा महाल (हा पडका आहे), जोहाराची गुहा (ही पद्मिनीच्या महालापासून १ मैलावर रानांत आहे. येथेंच प्रत्येक वेळीं रजपूत स्त्रियांनीं जोहार केला. पहिला जोहार पद्मिनीच्या वेळचा; यावेळीं हजार दीड हजार बायका होत्या; दुसरा जोहार कर्णावतीच्या वेळचा; यावेळीं तेरा हजार बायका होत्या व तिसरा जोहार उदेसिंगाच्या वेळचा होय. अशा रीतीनें वीरमाता व वीरपत्न्या याच्या पवित्र अस्थींनीं शुद्ध असलेली ही गुहा नवसास पावते अशी तिकडे सर्वत्र समजूत आहे. हींत काळोख आहे. स.१८८२ त सज्जनसिंह राण्यानें येथील सर्व अस्थी व राख भरून काशीस पाठविल्याचें समजतें), लाखानें बांधलेले रत्नमंदिर (हें रत्नेश्वर महादेवाचें असून, आंत सर्वत्र उत्तम कोरिव चित्रें आहेत), कीर्तीस्तंभ, मोतीबाजार, दारूगोळ्यांचीं कोठारें, चतुर्भुजाचें (विष्णूचें) मंदिर, अन्नपूर्णेचें मंदिर (पूर्वीची देवी मुसुलमानांनीं फोडली होती. हल्लींची नूतन आहे) वगैरे ठिकाणें पाहण्यासारखीं आहेत. गडावर देवळें व महाल वगैरे शें दीडशें पडक्या इमारती आहेत. चितोडगडाचें क्षेत्रफळ बारा चौरस मैल आहे. वरील इमारतीशिवाय मळे, शेतें, तलाव व बागा गडावर आहेत. गडाचा डोंगर उंच व विस्तीर्ण आहे. गडावर चढण्यास (अवजड लष्करी सामानासह) फक्त एकच रस्ता आहे. त्यामुळें शत्रूला किल्ला पाडाव करण्यास फितुरीशिवाय दुसरें साधन नाहीं असें म्हणतात. सारांश, हा दुर्भेद्य व अजस्त्र किल्ला असल्यानें 'तालमे ताल भोपाल ताल और सब तलैया है' याप्रमाणें 'गडग्रें गड चितोडगड और सब गडैया है' ही तिकडील प्रसिद्ध म्हण पडली असावी. [इंपे.ग्याझे. पु. १०; स्मिथ-अर्लि व ऑक्सफर्ड हिस्टरी ऑफ इंडिया; केसरी ७।३।१९०५.].