विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चितारी — चित्रें काढण्याच्या धंद्यावरून स्वतंत्र बनलेली ही जात वर्हाड मध्यप्रांतांतच दिसते. इतर प्रांतांतून चितारी ही जात-नसून धंदेवाईक वर्ग आहे. वर्हाड मध्यप्रांतांत या जातीची वस्ती दीडहजारपर्यंत आहे. लांकडावर व भिंतीवर चित्रें काढणार्या या जातीला हिंदी मुलुखांत चितर, मराठीत चितारी, उडिया मुलुखांत महाराणा व फलबढाई, आणि क्वचित ठिकाणीं मोची व जिनगर म्हणतात. रसेल म्हणतो कीं चितारी वर्ग मोची वर्गापासून उत्पन्न झाला. मंडला जिल्ह्यांत चितारी व जिनगर हे एकमेकांच्या हातचें पाणीसुद्धां पीत नाहींत. हे लोक विश्वकर्म्याची पूजा करतात. जिनगर लोक स्वत:ला रजपूतांचे वंशज समजतात व त्यांनीं राजपूत नांवेंहि आपणांस लाविलीं आहेत. मंडल्याचे चित्रकार आपण गढ्याच्या चित्रकारांचे वंशज आहोंत असें सांगतात. कोणी चित्ररेखेचे वंशज आहोंत असें सांगतात. या वर्गांत मराठी, तेलगू व हिंदुस्थानी जातीचे लोक आहेत. प्रत्येकांच्या निरनिराळ्या जाती आहेत व त्या जातीच्या नियमाप्रमाणें त्यांचीं लग्नें होतात. जिनगर बायका लग्नसमारंभांत वरातीबरोबर जातात पण चितार्यांच्या बायका जात नाहीत. महाराण लोकांत विधवाविवाह संमत आहे. धाकट्या दिराबरोबरच लग्न केलें पाहिजें आणि तो जर नसला तर विधवेनें जन्मभर विधवा राहिलें पाहिजे. मंडल्यांत जर विधवेने लहान दिराबरोबर लग्न केलें तर तिच्या नवर्याची अर्धी संपत्ति दिरास मिळते व अर्धी पहिल्या नवर्याच्या मुलांस मिळते. परंतु जर तिनें दुसर्या कोणाबरोबर लग्न केलें तर पहिल्या नवर्याची सर्व संपत्ति मुलांसह ती नेते. पूर्वीं जर कोणी विवाहित स्त्रीनें व्याभिचार केला तर तिचा लिलांव करून विकून टाकीत. आतां ही चाल बंद आहे. जर नवर्यानें बायकोस काडी मोडून दिली तर तिच्या बापास लग्नाचा खर्च द्यावा लागतो. परंतु तिच्या बरोबर लग्न करणार्यापासून बाप तो खर्च पूर्णपणें भरून घेतो. हे लोक अजून भिंतीवर लग्नमुंजीच्या वेळीं चित्रें काढतात व नागपुरांत अजून भिंतीवर चित्रें काढण्याचा कांहीं मंडळीस शोक आहे, त्यांचीं चित्रें काढून यांचा धंदा चालतो [रसेल व हिरालाल].