विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चितळदुर्ग जिल्हा – हा म्हैसूर संस्थानच्या उत्तरेस असून याचें क्षेत्रफळ ४१५९ चौ. मैल आहे. याच्या उत्तरेस मद्रास इलाख्यांतील बल्लारी जिल्हा असून पूर्वेस अनंतपूर जिल्हा आहे. आणि आग्नेयेस टुमकूर असून नैॠतेस कडूर आहे व पश्चिमेस मुंबई इलाख्यांतील धारवाड जिल्हा व शिमोगा आहे.
हा जिल्हा वेदवंती नामक सखल प्रदेशाचा एक भाग असून यांत तुंगभद्रा, वेदवती, हरिद्रा वगैरे नद्या आहेत. या जिल्ह्याच्या मध्यभागांतील २० मैल रूंदीचा एक आडवा पट्टा पर्वतरांगांनी व्यापिला आहे. याच पट्ट्यांत नाके भैरव (३०२२ फूट) जतिंग रामेश्वर (३४६९ फूट) वगैरें शिखरें आहेत. या पट्ट्याच्या उत्तर व दक्षिण दिशांकडील प्रदेश सपाट आहे. या जिल्ह्यांत चितळदुर्ग येथें दरवर्षी २५ इंच पाऊस पडतो. सर्व जिल्ह्याचे साधारण उष्ममान जानेवारींत ७४०, मेंत ८३० व जुलैत ७५० असते.
इतिहास – अशोक राजाचे जे लेख सांपडले आहेत त्यांवरून असें दिसतें कीं, या जिल्ह्याचा पूर्वेकडील प्रांत इसवी सनाच्या पूर्वी तिसर्या शतकांत मौर्य राज्यांत मोडत असे. ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकांत आंध्र किंवा सातवाहन सत्ताधीश होते असें चितलदुर्ग जवळ जीं शातकर्णीचीं नाणीं सांपडलीं आहेत त्यांवरून व शिमोगा जिल्ह्याच्या शिकारपूर तालुक्यांत जे शातकर्णीचे लेख सांपडले त्यांवरून दिसून येतें. गंग, राष्ट्रकूट व चालुक्य हीं घराणीं राज्य करित असतांना या जिल्ह्याच्या पूर्व व उत्तरभागांत पल्लव लोक ( ज्यांनां नोलंब किंवा नोनंब म्हणत असत व त्या प्रदेशास नोलंबवाडी अथवा नोनंबवाडी म्हणत ) त्यांची राजधानी येंजेरू अथवा हेंजेरू ( सध्यां जिला हेमावती म्हणतात ) येथें होती; परंतु एके काली बल्लारीच्या उत्तरेस तुंगभद्रा नदीवर काम्पीली ( कांपिल्य ) येथें राजधानी होती. इ. सनाच्या ११ व्या व १२व्या शतकांत नोलंबवाडीवर उच्छंगा येथील पांड्य लोक राज्य करित होते. त्यांच्या नंतर होयसल राजे झाले. तेराव्या शतकाच्या शेवटीं देवगिरीचें यादव घराणें प्रबळ होऊन त्यांनीं होयसलांवर जय मिळविला व आपलें राज्य या जिल्ह्याच्या वायव्यभागांत स्थापिलें व दावणगिरी (दावंगेर?) जवळील बेलतूर अथवा बेत्तूर या ठिकाणीं आपली राजधानी केली. होयसल पुन: प्रबळ होऊन त्यांनीं आपली राजधानी बेम्मात्तनकल्लू (हल्लींचें चितळदुर्ग ) येथें केली. परंतु १४ व्या शतकांत ही दोन्हीं राष्ट्रें मुसुलमानांच्या स्वार्यांस बळी पडलीं. पंधराव्या शतकांत चितलदुर्ग विजयनगर राज्याच्या अधिकाराखालीं मांडलिक होतें. तें सन १७७९ त हैदरअल्लीनें जिंकून त्यांतील २०००० बेद लोक श्रीरंगपट्टण बेटांत वसाहत करण्यासाठीं पाठविलें. या जिल्ह्याच्या पूर्वेकडील प्रांतांत दोड्डेरीभोंवतीं आणखी एका संस्थानचा मुलूख हरती वंशाकडे होता. विजापूरच्या स्वार्यांनीं त्यांनां तेथून हुसकून लावल्यानंतर त्यांनी निडुगल येथें आपलें राज्य स्थापलें. सन १७८४ त टिपू सुलतानानें त्यांस जिंकलें. मराठ्यांच्या स्वार्यांपासून या जिल्ह्यास फारच नुकसान पोहोंचलें व यांतील वस्तीहि फार कमी झाली. पुन: १८३० च्या बंडानें याच्या पश्चिम व दक्षिण भागांस फारच उपद्रव पोंचला. याच्या पश्चिमेस अंक्लीमठ आहे. त्यांत देवालयें, स्नानगृहें व योगासाठीं चबुत्रे बांधलेले आहेत.यांत कोणाची वस्ती नाहीं. व याचा पूर्वेतिहास उपलब्ध नाहीं. याच्या जवळच एका गुहेवर १३ व्यां शतकांत लिहिलेला शिलालेख आहे. तुंगभद्रा नदीवर पुष्कळ पडकीं जुनीं देवळें आहेत. परंतु सर्वांत मुख्य व चांगले हरिहर येथें हरिहरेश्वराचें देऊळ आहे. हें होयसलांनीं सन १२२४ त बांधलें. या देवळाच्या छपराचाच मुसुलमानांनीं मशीदीसारखा उपयोग केला व देवळाच्या घुमटांत दरवाजा बसवून त्याचें उपदेशपीठ बनविलें. येथील लो. सं. १९११ त ५६४२४३ होती. यांत ९ शहरें व १२४२ खेडीं आहेत. पैकीं दावणगिरी शहर सर्वांत मोठें आहे व चितळदुर्ग हें जिल्ह्याचें मुख्य ठिकाण आहे. यांतल्या लोकसंख्येपैकीं शेंकडा ६० शेतकीवर, शेंकडा १९ इतर धंद्यांवर व शेंकडा ८.९ निवळ मोलमजुरी वगैरे करून उपजीविका करतात.
शेतकी :- चितळदुर्ग शहराच्या उत्तर व पश्चिमेकडील तालुक्यांत काळी, मधून मधून रेताड व कंकरी, पश्चिमेस तांबड चिकणी व दक्षिण भागांत खारी जमीन आहे. चितळदुर्ग शहरांजवळील कांहीं टेंकड्यांत लोहमिश्रित दगड सांपडतात. मत्तोडजवळ भांडीं तयार करण्यायोग्य दगड सांपडतात.
व्यापार.— यांत घोंगड्या व सुती कापड विणण्याचा धंदा फार आहे. सर्वांत उत्तम व बारीक विणीच्या घोंगड्या दावणगिरी आणि जगलूर तालुक्यांत होतात. जाडेभरडें कापड सर्व तालुक्यांत विणतात. रेशमाचे कारखाने फक्त मोलकालमुरू व हरिहर तालुक्यांतच आहेत. मोलकालमुरू येथें उपर्णीं, पागोटीं व स्त्रियांचीं रेशमी लुगडीं होतात. बंगलोरपासून कच्चें रेशीम येऊन त्यांचें काळें व पांढरें कापड हरिहर येथें विणतात. हिरीयूर, होसदूर्ग व चितलदुर्ग तालुक्यांत लोखंड व पोलादाचे कारखाने आहेत. मोलकालमुरूंत पितळेचीं भांडीं होतात. मत्तोडांत कांचेच्या बांगड्या होतात. कातड्याचें सामान ( चपला वगैरे ) मोलकासमुरूंत होते. या जिल्ह्यांत ८ रेशमाचे, ७६७७ सुताचे, व १३५४ लोकरीचे माग असून ३१ लोखंडाचे कारखाने, ९५ तेलाच्या गिरण्या, आणि ८० साखरेच्या गिरण्या आहेत. बंगलोरपासून पुण्यास जातांना सदर्न मराठा रेल्वे या जिल्ह्याच्या पश्चिम भागांतून जाते.
राज्यव्यवस्था :- या जिल्ह्याचे चल्लाकेरे, चितलदुर्ग,दावणगिरी, हिरीयूर, होललकेरे, होसदुर्ग, जगलूर आणि मोलकालमुरू असे आठ तालुके आहेत. सन १९०३-०४ त जमीनीचें उत्पन्न ७ लाख ४८ हजार व एकंदर उत्पन्न ११ लाख ५४ हजार होते. सन १९०१ त याच्या लोकसंख्येंतील शेंकडा ४.६ मनुष्यांस (८.६ पुरूषांस व ०.४ स्त्रियांस) लिहितां वाचतां येत होतें. सन १९०३-०४ त यांत ४२७ शाळा होत्या. त्यांत २१५ सार्वजनिक व २१२ खासगी शाळा होत्या. यांत १० दवाखाने व चितलदुर्ग येथें एक मोठा दवाखाना आहे.
तालुका.— या तालुक्याचें क्षेत्रफळ ५३० चौरस मैल असून इ. स. १९११ मध्यें येथील लोकसंख्या ९३२५१ होती. ह्यांत चितळदुर्ग (तालुक्याचें मुख्य ठिकाण) शहर व १६४ खेडीं आहेत. दक्षिणोत्तर खडकाळ टेंकड्यांच्या ओळीनें ह्या तालुक्याचे दोन समभाग पाडलेले आहेत. ह्या टेंकडीचा पूर्व आणि पश्चिमेकडील प्रांत सपाट असून जंगल विरहित आहेत. पूर्वेपेक्षां पश्चिमेकडील प्रांतांत पाण्याचा चांगला पुरवठा असून भीमसमुद्र नांवाचें तळें आहे. पूर्वेकडील प्रांतांत मुख्यत्वेंकरून रब्बीचीं पिकें काढितात व पश्चिमेकडील प्रांतांत भात पिकतें.
शहर.— होललकिर रेल्वेस्टेशनपासून २४ मैलांवर आहे. येथील लोकसंख्या इ. स. १९११ मध्यें ६९८६ होती. चंद्रावळी नामक प्राचीन नगरी ह्या शहराच्या अगदीं पश्चिमेस होती. या शहरी कांहीं काळापूर्वी बुद्धलोकांची शिश्याचीं नाणीं सांपडलीं आहेत त्यांवरून असें दिसून येतें की, ती नगरी ख्रिस्तीशकानंतरच्या दुसर्या शतकांतील आंध्र अथवा सातवाहन राजांची असावी. अर्वाचीन शहर अनुक्रमें राष्ट्रकूट, चालुक्य, होयसल, यादव आणि विजयनगर यांच्या ताब्यांत असून त्याचें नांव बेम्मात्तनकल्ल अथवा बेमात्तनूर होतें. चितळदुर्गचे सरदार बेद किंवा बोय जातीचे होते. ते जिल्ह्यांतील अनेक भागांत राहिल्यानंतर त्यांनीं या शहरीं सोळाव्या शतकांत कायमची वस्ती केली, व विजयानगरचें राज्य मोडल्यानंतर आपली स्वतंत्रता स्थापली. त्यांनीं टेंकडीवर तटबंदी करून चितळदुर्ग नांवाचा किल्ला बांधला होता. या शहरांत उच्छंगीअम्मा नांवाचें दुमजली देऊळ आहे. हल्लीं असलेली विस्तीर्ण तटबंदी व मोर्चे हैदरअल्ली व टिपूसुलतान यांनीं अठराव्या शतकांत बांधलेले आहेत. इ.स. १७९९ नंतर कांहीं दिवस या ठिकाणी ब्रिटिशांची छावणी होती. शिवभक्त किंवा लिंगायत लोकांच्या मुख्य गुरूचें रहाण्याचें ठिकाण मर्गीमठ येथून ३ मैलांवर आहे. पश्चिमेस अवघड अशा टेकड्यांच्या समुदायांत अंक्लीमठ आहे. येथें डोंगरांत कोरीव लेणीं आहेत. त्यांत देवळें, स्नानगृहें आणि योगासाठीं बांधलेले चंबुत्रे आहेत. प्रवेशद्वाराजवळच पंचलिंग नांवाची गुहा आहे, तीवर इ.स. १२८६ मधील होयसलांचा शिलालेख आहे. दक्षिणेस जोगिमरदी नांवाची टेंकडी उन्हाळ्यांत हवा खाण्याचें ठिकाण आहे. ह्या शहरांत म्युनिसिपालिटीची स्थापना इ.स. १८७० त झाली. या ठिकाणीं एक हायस्कूल आहे.