विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिंच्यु — हे नांव चीनमधील एका प्राचीन व प्रसिद्ध बंदराचें आहे. हे फुकिएन प्रांतांत असून याचें चिनी नांव च्वांगचौफु अथवा त्स्वांगचौफु आहे. हे उत्तर अक्षांश २७० ५७' व पूर्व रेखांश ११८० ३५' यांत आहे. येथून चहा, साखर, तंबाखू, चिनीमातीची भांडीं, वगैरे वस्तूंची निर्यात होते. यांत अरबी व्यापार्यांनीं बांधिलेल्या एका सुंदर मशीदीचे अवशेष आहेत. बर्याच अंतरावर लोयांग नांवाचें एक गांव आहे. तेथें जाण्याचा मार्ग एका चीनमधील अति प्रसिद्ध पुलावरून आहे. वाळूमुळें येथील बंदर निरूपयोगी झाल्यानें अमॉय बंदर भरभराटीस आलें. याचा व्यापार न्गानहाई बंदरांतून चालतो. अजून हें मोठें व लोकवस्तीचें शहर आहे. हें मध्ययुगांत पश्चिमेकडील देशांशीं व्यापार करणारें मोठें बंदर होतें. युरोपियन व अरबी व्यापार्यांच्या वेळीं झैतून अथवा झेटन या नांवानें हें प्रसिद्ध होतें. अबुल फेदाचा भूगोल, रशीदुदीनचा मोंगलांचा इतिहास, इब्नबतूता, मार्को पोलो वगैरे ग्रंथांत व प्रवासी लोकांच्या पुस्तकांत वरील नांव आढळते. इब्नबतूताच्या माहितीवरून येथें झैतुनिया नांवाचा रेशमी कपडा होत असे. यावरूनच साटीन हें नांव आलें असावें.