विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिंचवड — मुंबई इलाखा. पुणे जिल्हा. हवेली तालुक्यांत पवना नदीवर हें गांव वसलें आहे. १९०१ सालीं याची लोकसंख्या १५९६ होती. येथें मोरयागोसाव्यांची समाधि आहे. हे गणपतीचे भक्त असून यांच्या व यांच्या कुलांतील पुरूषांच्या अंगांत गणपती संचार करीत असे अशी जुनी समजूत आहे. तीवरून यांस देव असें आडनांव पडलें. शिवाजी, अवरंगझेब वगैरेस यांनीं साक्षात्कार दाखविले होते असें सांगतात. शके १८१० त वरील देव घराण्याच्या ७ पिढ्या होऊन तें खुंटलें. पुढें देव घराण्याच्या गादीवर दोन दत्तक पुरूष बसल्यानंतर संस्थान ट्रस्टींच्या ताब्यांत गेलें.
हल्लीं या घराण्याचा वंशज नानाफडणवीस व हरिपंत फडके यांनीं बांधलेल्या वाड्यांत रहात असतो. या वाड्याजवळ या घराण्याच्या दोन शाखांचीं दोन देवालयें आहेत. ह्यापैकीं एक इ.स. १६५९ त व दुसरें १७२० त बांधलें. दरवर्षीं मार्गशीर्ष महिन्यांत येथें मोठा उत्सव होत असतो.
या देवस्थानास शिवाजी, संभाजी, राजाराम व थोरला शाहू यांनीं अनेक इनामें दिलीं आहेत. येथील देवास चिंचवड हें गांव इनाम म्हणून प्रथम शिवाजीनें दिले. शाहूनें त्याशिवाय वाकड (जि. पुणें) हें गांव इनाम दिलें (१७०९). मध्यंतरी राजारामाच्या वेळीं अवरंगझेबानें चाकणपर्यंतचा मुलूख जेव्हां मारिला, तेव्हां चिंचवड गांव देवस्थानाकडून काढून चाकणच्या किल्ल्याच्या खर्चास नेमून दिलें होतें. पुढें शाहूच्या कारकीर्दीत 'भीमे अलीकडे स्वराज्य झाल्यामुळें' व मोंगलांचा संबंध त्या प्रांताचा तुटल्यानें शाहूनें चाकणच्या किल्ल्याच्या नेमणूकींतून काढून चिंचवड गांव पुन्हां तेथील देवाकडे इनाम म्हणून सुरू केलें (१७२४-२५). [इतिहास संग्रह पु. ७. अं १,२,३,]