विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिखली, जमीनदारी — मध्यप्रांत. जिल्हा भंडारा. या जमीनदारींत चिखली व सावंगी अशीं दोनच खेडीं आहेत. अर्जुनी जमीनदारीच्या दक्षिणेस ही जमीनदारी आहे. जमीनदार हलबा घराण्याचे आहेत. एकंदर ५० लोक या घराण्याचे असून हल्लीं ते गरीब शेतकरी झाले आहेत.
चिखली, तालुका — वर्हाड. बुलढाणें जिल्ह्यांतील एक तालुका. उत्तर अ.२०० ते २०० ३७' पूर्व रे. ७५० ५७' ते ७६० ४२' यांमध्यें. क्षेत्रफळ १००९ चौरस मैल. या तालुक्यांत २९९ गांवें आणि ८ जहागिरीची गांवें आहेत. याला पूर्वी देउळघाट तालुका म्हणत असत. तालुक्यांत महत्वाच्या अशा नद्या नाहींत. लोकसंख्या (१९०१) १२९५९०. शेतकी— जमीन अगदीं साधारण प्रतीची आहे- तरी खरीप आणि रब्बी पिकें बरी येतात. खरीप पिकें— ज्वारी, कापूस, तूर इत्यादि. रब्बी पिकें— गहूं, हरभरा, मसूर इत्यादि. जिल्ह्याचें मुख्य ठिकाण बुलढाणा याच तालुक्यांत आहे.
गांव.— हें तालुक्याचें मुख्य ठिकाण असून बुलढाण्यापासून १४ मैल आहे. उ. अ. २०० २१' व पू.रे. ७६० १८'. लोकसंख्या (१९०१) ५८८९ क्षेत्रफळ. ४४४६ एकर. या गांवाच्या पश्चिमेस एक महादेवाचें देवालय असून तें पुराणवस्तुसंशोधकांच्या दृष्टीनें महत्वाचें आहे.
चिखली, तालुका.— मुंबई इलाख्याच्या सुरत जिल्ह्याच्या पूर्वेकडील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ १६७ चौ.मै. आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या ६२७७४ होती. यांत ६३ खेडीं आहेत. १९०३-४ सालीं सारा व इतर उत्पन्न मिळून २.३ लाख रू. वसूल झाले होते. हा तालुका कित्येक पठारांचा बनला असून या पठारांच्या दरम्यान सखल प्रदेश आहेत. एकंदरींत यांतील जमीन नापीक असून सखल प्रदेशांत मात्र कांहीं धान्यें व ऊस यांचें पीक होतें. यांत अंबिका, कावेरी या नद्या आहेत.
चिखली, संस्थान.— मुंबई इलाखा. खानदेश जिल्ह्यांतील एक संस्थान. यांत भिल्लांची वस्ती आहे. संस्थानिकाच्या पूर्वजांनी राजपिप्पलापासून मूळ जमीनी घेतल्या.