विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिखलदरा (चिकल्डा) — वर्हाडांतील उमरावती जिल्ह्याच्या मेलघाट तालुक्यांतील एक हवा खाण्याचें प्रसिद्ध ठिकाण असून तें सातपुडा पर्वताच्या ५ मैल लांब तीनचतुर्थांश मैल रूंद व समुद्रसपाटीपासून ३६६४ फूट उंच अशा एका पठारावर वसलें आहे. हें एलिचपुराहून २० मैल अंतरावर असून येथून एलिचपुरास जाण्यास ३ रस्तें आहेत. चिखलदरा व एलिचपुर यांच्या दरम्यान घटंग येथें प्रवाशी लोकांस उतरण्याकरितां एक बंगला आहे. १८३९ पासून याची चांगल्या हवेबद्दल प्रसिद्धि असून येथें मेलघाटाचा तहशिलदार व एक जंगलखात्याचा अधिकारी राहतो. वर्हाडांतील प्रमुख अधिकारी उन्हाळ्यांत कांहीं दिवस येथें रहावयास येतात. येथील हवा समशीतोष्ण, थंड व प्रकृतीस मानवेल अशी आहे. मे, जुलै व डिसेंबर महिन्यांतील सर्वसाधारण उष्णमान ८६०, ७५०, ६५० असतें. येथील देखावा सुंदर आहे व येथें नाना तर्हेची फुलें व वनस्पति दृष्टीस पडतात. पूर्वी येथें बटाटे होत असत. चहा देखील येथें होण्यासारखा आहे. येथील खासगी बगीच्यांतील कॉफी फार उत्तम असते.