विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिक्मगळूर, तालुका.— म्हैसूर संस्थानच्या कडूर जिल्ह्याच्या मध्यावरील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ ६४० चौ.मैल आहे. १९११ सालीं याची लो.सं. ८२०४४ होती. यांत १ गांव व २२० खेडीं आहेत. १९०३-४ सालीं उत्पन्न २१३००० रू. होतें. याच्या पश्चिमेकडील सरहद्दीवरून भद्रानदी वहाते. यांत दरवर्षी ३६ इंच पाऊस पडतो. चिक्मगळूरच्या सभोंवतालचा प्रदेश उंच असून त्यांतील जमीन सुपिक व काळीची आहे. व बाबाबुदन पर्वतामधून निघणार्या कित्येक नद्या या प्रदेशांतून वहात जातात. या प्रदेशांत झाडेंझुडपें फारशीं नाहींत पण त्यांत गहूं, हरभरा, ऊंस, तांदूळ, कांदे हे जिन्नस होतात. बाबाबुदन पर्वताच्या उतारावर कॉफी होते.
शहर.— तालुक्याचें मुख्य ठिकाण. १९११ सालीं याची लो.सं. ८५३७ होती. हें बाबाबुदन पर्वताच्या दक्षिणेकडील काळीची जमीन असलेल्या सुपीक खोर्यांत वसलें आहे. येथील किल्ला ९ व्या शतकांत गंग घराण्याच्या ताब्यांत होता व त्यापासून पुढें तो होयसल घराण्यानें हस्तगत केला. सध्याचें गांव १८६५ त अस्तित्वांत आलें. येथें कित्येक मुसुलमान व्यापारी व दुकानदार राहतात. येथें १८७० त म्युनिसिपालिटीची स्थापना झाली.