विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिक्नायकन्हळ्ळी, तालुका.— म्हैसूरसंस्थानच्या तुमकूर जिल्ह्याच्या पश्चिमेकडील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ ४३५ चौ.मै. आहे. १९११ सालीं लोकसंख्या ५७४८४ होती. यात १ शहर व २०० खेडीं आहेत. १९०३-४ सालीं यांचें सार्याचें उत्पन्न ११९००० रू. होतें. याच्या पूर्वोत्तर प्रदेशांत टेकड्यांची रांग आहे. याच्या ईशान्येस बोरंकनेव नांवाचें तळें आहे. यांत ताडाचीं व सुपारीचीं झाडें पुष्कळ आहेत.
गांव.– तालुक्याचे मुख्य ठिकाण असून याची लोकसंख्या १९११ सालीं ५१८८ होती. हें १६ व्या शतकाच्या अखेर कर्नाटकी सरदारांपैकीं चिक्कनायक यानें बसविलें. १६७१ पर्यंत मुसलमान व मराठे लोकांनीं यावर आळीपाळीनें अंमल गाजविला. १६७१ सालीं हें म्हैसूरच्या राजानें हस्तगत केलें. १६७२ त म्हैसूरच्या दोड्डदेवराय राजा येथें मरण पावला. १७९१ त मराठ्यानीं येथील किल्ल्याचा विध्वंस करून हें शहर लुटलें. याच्या आसपास सुपारी व ताडांच्या झाडाचे बगीचे आहेत. येथें रंगीत व पांढरें सुती कापड होतें. १८७० त म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. येथें ७ देवालयें आहेत.