विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिकाकोल, तालुका.— हा मद्रास इलाख्याच्या गंजम जिल्ह्यांतील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ ३५० चौ.मै. आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या २६६११७ होती. या तालुक्यांत दोन गांवे व ३०५ खेडीं आहेत. १९०३-०४ सालीं सार्याचें उत्पन्न ४१६५०० रूपये होतें. या तालुक्याच्या दलदलीच्या प्रदेशांत कालवे आहेत.
शहर– मद्रास इलाख्याच्या गंजम जिल्ह्यांतील एका विभागाचें व तालुक्याचें मुख्य ठिकाण असून लांगुल्य नदीच्या डाव्या तिरावर वसलें आहे. १९२१ सालीं याची लोकसंख्या १६२९८ होती. मुसुलमानी अमदानींत हें उत्तर सरकार विभागापैकीं एका सरकारचें मुख्य ठिकाण होतें. येथें १६४१ त गोवळकोंड्याच्या कुतुबशाहींतील शेर महम्मदखान या फौजदारानें बांधलेली एक मसीद आहे. हें इंग्रजांच्या ताब्यांत आल्यावर कांहीं दिवस जिल्ह्याचें मुख्य ठिकाण असून येथें लष्करी छावणी होती. १८६५ पर्यंत येथें जिल्हान्यायधीश रहात असे. याची हवा चांगली आहे. येथें १८६७ सालीं म्युनिसिपालिटीची स्थापना झाली. येथें एक हायस्कूल व सार्वजनिक पुस्तकालय आहे. हें मलमलीच्या व इतर कपड्याकरितां फार प्रसिद्ध आहे.