विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चिकबळ्ळापूर, तालुका.— म्हैसूर संस्थानच्या कोलार जिल्ह्याच्या पश्चिमेकडील एक तालुका असून याचें क्षेत्रफळ २५० चौ.मै. आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या ५६७५८ होती. यांत एक गांव व २१७ खेडीं आहेत. हा तालुका डोंगराळ असून यांत ७ नद्या आहेत. नैॠत्येकडील जमीन सुपिक असून तीत ऊस चांगला पिकतो. याच्या ईशान्येकडील प्रदेशांत मोठमोठ्या दर्या आहेत.
गांव.— हे म्हैसूर संस्थानच्या कोलार जिल्ह्यांतील त्याच नांवाच्या तालुक्याचें मुख्य ठिकाण असून दोड्डबळ्ळापूरच्या ईशान्येस २२ मैलांवर आहे. १९११ सालीं याची लोकसंख्या ७६६१ होती. हें नंदीदुर्ग रांगेच्या पूर्वेकडील पायथ्याशीं असून आवती येथें आश्रयास राहिलेल्या मोरसू वोक्कलिंग लोकांच्या नायकानें १४७९ त वसविले. त्या वेळेपासून हैदरअल्ली घेईपर्यंत हें विजयानगरचें मांडलीक असून वरील नायकाच्या वंशजांच्या ताब्यांत होते. येथें १८७० त म्युनिसिपालिटीची स्थापना झाली.