विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चाहमान उर्फ चौहान (चव्हाण) — चाहमान म्हणजे चव्हाण हें घराणें रजपूतांत अत्यंत श्रेष्ठ दर्जाचें असून तें मूळचें सांबरचें आहे. वीर्यशाली वृतींत ह्या कुलाची इतर कोणीहि बरोबरी करूं शकत नाहीं, असा टॉडचा अभिप्राय आहे. आजतागायत ह्या घराण्याच्या १२०० वर्षांच्या इतिहासाचें अवलोकन केले तर टॉडचा अभिप्राय खरा होय असें दिसून येतें. गुहिलोट घराण्याप्रमाणें ह्यांचे मूळ राजधानीचें ठिकाण जरी आज पूर्वीचेंच नसलें तरी राजपुतान्यांतील बुंदी, कोटा व शिरोही हीं प्रमुख राज्यें ह्याच्या ताब्यांत आहेत व येथील राजांच्या पराक्रमाची ख्याती मुसलमानी स्वार्यांपासून पसरलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण व त्याचा आजा विशालदेव ह्यांच्या काळी तर सार्वभौमत्वाचाहि मान ह्याच घराण्याकडे होता. पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर या घराण्यास व त्याबरोबरच हिंदूपदपादशाहीस एकदम उतरती कळा लागली. गुहिलोट घराणें व चव्हाण घराणें ह्यांच्यात फारच साम्य आहे. दोन्हीहिं घराणी अद्याप चालू आहेत; दोन्हीहिं सारखींच प्रतापशालीं आहेत. पण गुहिलोट घराणें जास्त बाणेदार व करारी आहे. चव्हाण घराण्याचा अभिमान मुसुलमानी अमदानींत टिकला नाहीं. दिल्लीच्या मुसुलमानी राजांचें सार्वभौमत्व त्यांनीं कबूल केलें व ह्या वंशांतील अनेक सरादारांनी आपलीं इमानें जप्त होऊं नयेत, म्हणून मुसुलमानी धर्महि स्वीकारला.
या चव्हाण घराण्याच्या मूळ संस्थापकाविषयी खात्रीची माहिती मिळत नाहीं. चंद बरदाई भाटानें ह्या घराण्याचा जो अग्नीशीं संबंध लावला आहे तो प्रत्यक्ष नसून कविकल्पित असावा. ह्या कुलाचा मूळपुरूष चाहमान अगर अनहिल समजला जातो. चाहमानाचा काळ बुंदीसंस्थानाच्या सुरजमल नामक भाटानें दिलेला आहे परंतु तो संशयास्पद दिसतो. ह्यानें आपल्या 'वंशभास्कर' ग्रंथांत असें लिहिलें आहे कीं, चाहमानापासून पृथ्वीराज चव्हाणापर्यंत एकंदर १३६ राजें होऊन गेले. हें म्हणणें इतिहासदृष्ट्या अतिशयोक्तीचें दिसतें. कारण पृथ्वीराजरासांत तर पृथ्वीराजाच्या आजापर्यंतच्या राजांची संख्या फक्त छत्तीसच सांगितली आहे. सारांश इ.स. ८०० ते १००० पर्यंतची या वंशाची फारच तुटपुंजी माहिती मिळते व जी मिळते तिची भिस्त हर्ष टेंकडीवरील सात (९५५-९७२) शिलालेखांवरच ठेवणें भाग पडतें.
नर्मदेच्या उत्तरेचें माहिष्मती गांव या घराण्याचें मूळ ठिकाण होतें व ह्या घराण्याकडे हिंदुस्थानच्या सार्वभौमत्वाचा मान वारंवार येत असे, असें चाहमानकुलाचे भाट वर्णन करतात. परंतु प्राचीन लेखांवरून यांचें ऐतिहासिक मूळचें ठिकाण म्हणजें, मेवाडच्या उत्तरेस असलेला सांबर अथवा शाकंबरी प्रदेश होय. अजमीरदेखील ह्याच प्रदेशांत मोडतें. हा प्रदेश एकंदर १। लाख खेडीं मिळून झालेला आहे अशी त्या प्रदेशाची ख्याति होती व त्यामुळेंच ह्या प्रदेशास सापदलक्ष असें नांव होतें.
भाण्डारकरांच्या मतें सापदलक्ष हे नांव शिवालिक डोंगराळ प्रदेशाचें असावें व शिवालिक प्रदेश हेंच चाहमानांचे आद्य वसतिस्थान असावें. हरबिलास शारदा हे म्हणतात कीं, सपादलक्ष म्हणजे सांबरराज्य होय, व चाहमानांचे आद्य ठिकाण अहिच्छत्र हें भाण्डारकर म्हणतात त्याप्रमाणें शिवालिक डोंगरांत नसून हल्लीचें राजपुतान्यांतील नागोर शहर होय. महाभारतांत अहिच्छत्र हें पांचाल देशांतील अति प्रसिद्ध ठिकाण म्हणून म्हटलें आहे. प्राकृत काव्यांतून सुद्धा चाहमानांनां संबरीराय म्हणजे सांबरचे राजे असेंच संबोधिलें जातें. सारांश, सांबर हेंच चाहमानांचे मूळचें ठिकाण असावें.
या कुलाच्या मूळ संस्थापकांविषयीं जुन्या लेखांतून पुढील माहिती आढळते. हर्षशिलालेखांत गूवक राजापासून वंशावळ दिली आहे. बिजोलिया लेखांत प्रथम पूर्वजांचा उल्लेख सांपडतो; पण तो घोटाळ्याचा आहे. त्यांत वत्सगोत्री सामंत ब्राम्हण यालाच अहिच्छत्राचा मूळपुरूष म्हटलें आहे.
परंतु या लेखावरून चंदानें दिलेल्या चाहमान कुलाच्या पुढीस उत्पत्तीस बराच मोठा धक्का बसतो. अबूपर्वतांत वशिष्ठ ॠषीचा आश्रम असून त्या आश्रमांत असलेल्या अग्निकुंडापासून चाहमानांचा पूर्वज निर्माण झाला व त्यामुळें चाहमानकुलाची अग्निकुलांत गणना केली जाते वगैरे बिजोलियालेखांत म्हटल्याप्रमाणें सामंत हा ब्राम्हण नसून क्षत्रिय होता असें रा. वैद्य म्हणतात व असा तर्क लढवितात की, अहिच्छत्रपुरांत (हल्लीचे रामपुर अथवा नागोर) चाहमान घराण्यांत अत्यंत पराक्रमी असा सामन्त नांवाचा बलाढ्य रजपुताग्रणी होता; त्याला अनेक सरदारांचे साह्य असे; ह्यानेंच पुढें सांबर प्रांत काबीज केला व तेथें राज्य स्थापिलें. पृथ्वीराजरासांतही चाहमानानंतर सामंतदेवाचें नांव दिलें आहे.
हर्षलेखांत गूवकापासून वंशावळ आहे तर बिजोलियालेखांत (वि.सं.१२२६) सामंतापासून गूवकापर्यंतची वंशावळ आहे. ती अशी:-(१) जयराज,(२) विग्रह पहिला, (३) श्रीचंद्र, (४) गोपेंद्र व (५) दुर्लभ पहिला. यांपुढील गूवकापासून दुसर्या दुर्लभ राजापर्यंत दिलेला क्रम दोन्ही लेखांत बहुतेक सारखाच आहे. दुर्लभ राजाच्या वेळींच (विक्रम सं.१०३०) हर्षलेख लिहिला असल्यामुळें त्यांत दुर्लभानंतरची नांवे नाहींत. दुर्लभानंतरचा चाहमान घराण्याचा वंशक्रम या लेखाच्या शेवटीं दिला आहे. पहिल्या दुर्लभानें हा वंश भरभराटींस आणला.
सामंतदेव व गूवकराज(पहिला) या दोघांचा काळ स्थूलमानानें पुढीलप्रमाणें ठरतो. दुर्लभ राजाचा (दुसरा) काळ विक्रम संवत १०३०(९७३) हे नक्कीच आहे. वाकपतिराज (दुसरा) ह्याचा मुलगा लछमन; यानें नाडूल येथें ह्या घराण्याची दुसरी गादी स्थापन केली. लछमनाचा काळ वि. सं. १०३९ (सन ९८२) हा लेखांतून सांपडतो. मागील प्रत्येक राजांची कारकीर्द ठोकळमानाने २० वर्षांची धरली तर गूवकराजा (पहिला) सन ८३३ त असावा व सामंत राजा इ.स. ७१३ मध्यें राज्य करीत असावा. राजपुताना गॅझी. मध्यें सामंत राजाचा काळ इ.स.७५० हा दिला आहे. परंतु तो कसा ठरविला हें सांगितलें नाहीं. अरबांच्या स्वर्यांचा प्रतिकार करण्यानें जीं गुहिलोट घराण्यासारखी अनेक घराणी प्रसिद्धीस आलीं त्यांतच चाहमानांचा समावेश केला पाहिजे. बाप्पारावळ व सामंतराज हे बहुतेक समकालीन असावे. सामंताने ८ व्या शतकाच्या उत्तरार्धांत सांबर येथें राज्यस्थापना केली. त्याचा वंशज गूवक(पहिला) अतिशय प्रसिद्धीस आला व रजपूत राजमंडळांत त्याची प्रमुखपणें गणना होत असे. हर्षलेखांत गूवकाविषयी असें म्हटलें आहे कीं, ''यस्मिन्नागावलोकप्रवर नृपसभालब्धवीरप्रतिष्ठ:'' सार्वभौम नागभट्ट राजाच्या सभेमध्यें गूवकास शौर्याबद्दल मोठी प्रतिष्ठा मिळाली. यावरून कीलहार्न व स्टेन कोनाऊ यांचें असें म्हणणें आहे की; गूवक हा नागभट्टाच्या दरबारांतील एक प्रमुख सरदार होता परंतु रा.वैद्यांच्या मते सामंत हा कदाचित् स्वतंत्र राजा नसेल, तो एखाद्या राजाचा सरदार असेल पण गूवक हा मात्र स्वतंत्र राजा असवा व आपल्या पराक्रमानें तो उदयास आला असावा व अरबांच्या विरूद्ध लढणार्या रजपूत राजमंडळांत त्याची प्रमुखपणें गणना होत असावी. कदाचित् ह्या राजमंडळाचे आधिपत्यहि नागभट्टाकडे असेल.
पहिला गूवक आणि बाप्पारावळ यांमध्यें बरेच साम्य दिसतें. दोघेहि अत्यंत पराक्रमी वीर, दोघेहि शौर्यानें प्रसिद्धीस आलेले, दोघेहि कुलांचे संस्थापक, दोघांचेही पराक्रम क्षेत्र एक; दोघांनीं मुसुलमानांच्या स्वार्या परतवण्याचा आटोकाट यत्न केला. दोघेहि सारखेच धर्माभिमानी व दोघेहि सारखेच कट्टे शिवोपासक होते. गुहिलोट घराण्याची एकलिंगजीवर निस्सीम श्रद्धा, तशीच चाहमानांची सांबरच्या हर्षदेवावर अत्यंत श्रद्धा. हर्ष लेखांत सांगितलें आहे कीं गूवकानेंच हर्षाचे देऊळ बांधिलें, व त्याच्या पुढील राजांनी अलोट संपत्ति खर्चून देवळास भव्य स्वरूप दिलें.
गूवकानंतर त्याचा मुलगा चंद्रराज राज्य करूं लागला व त्याच्यानंतर दुसरा गूवक गादीवर बसला. दुसर्या गूवकाचा मुलगा चंदन. ह्या चंदनानें दिल्लीच्या तोमर रूद्र राजाचा पराभव केला. या चंदन राजाचा मुलगा वाकपति पहिला हा अत्यंत वीर्यशाली होता. यानें तंत्रपाळ याचा पराभव केला (हर्षलेख). तंत्रपाळ कोणत्या देशचा राजा होता वगैरे कांहींच माहिती सांपडत नाहीं. वाकपतीस विन्ध्यनृपती म्हणतात. ह्यावरून सांबर ते विंध्याद्रीपर्यंत त्यानें आपला अधिकार बसविला असावा. राजपुताना गॅझेटिअरप्रमाणें पृथ्वीराजरासांत वर्णिलेला माणिकराय तो हाच होय. परंतु या विधानास आधार नाहीं. याच्या कनिष्ठ पुत्रानें(लछमनानें) इसवी सन ९८२ मध्यें गाडूल येथें ह्याच घराण्याची एक स्वतंत्र शाखा स्थापन केली. सिरोही येथील हल्लीचें राजे आपणांस सदर शाखेचेच वंशज म्हणतात.
वाकपतीचा जेष्ठ मुलगा सिंहराज सांबरचें राज्य करूं लागला. तो दानशूर असून त्यानें हर्ष देवस्थानास विपुल संपत्ति देऊन देवालयाचें छत्र व घुमट सुवर्णाचे करविले. दानशूरता, वैभव व पराक्रम या बाबतींत हरिश्चंद्राशी याची तुलना केली आहे. त्याने तोमराचा पूर्ण पराभव केला. सिंहराजा शत्रूकडून मारला गेला असें म्हणतात. सिंहराजानंतर त्याचा मुलगा विग्रहराज(दुसरा) गादीवर बसला. हा सर्व बाबतींत बापाच्याच तोडीचा होता. यानें अनहिलवाडच्या मूलराजाचा पराभव केला. हर्ष देवस्थानास यानें दोन खेडीं इनाम दिली. विग्रहानंतर त्याचा भाऊ दुर्लभ(दुसरा) राज्य करूं लागला.
दुसर्या दुर्लभानंतर बहुधा दुसरा वाक्पति व त्याच्यानंतर त्याचा पुत्र वीर्यराम हा गादीवर आला(१०३०). याला धारचा भोज यानें लढाईंत ठार केलें. याचा भाऊ चामुंड यानें नरहरपुर येथें एक विष्णुमंदीर बांधिलें होते. वीर्यरामचा पुत्र तिसरा दुर्लभ हा १०८५त राजा होता; तो मालवराज उदयादित्य व गुर्जरराज (पहिला) कर्ण याचा समकालीन होता. याच्यामागून अजयदेव हा राजा झाला व त्यानेंच अजमेर शहर स्थापन केलें(११००), यांची व याची राणी सोमलदेवी हिचीं पुष्कळ नाणीं आढळतात. त्याच्या मागून पहिला पृथ्वीराज व त्याच्यानंतर अजयराज हे राजे झाले. अजयानें मालवराज सुल्हणाचा पराभव करून, सोमदेवीशीं लग्न केलें(११३०). याला अर्णोराज असेंहि म्हणतात; अवेल्लदेव असेंहि याचें एक नांव आहे. नंतर त्याचा पुत्र चवथा विग्रहराज (वीसलदेव) हा गादीवर आला; यानें आपलें राज्य पुष्कळ वाढविलें, दिल्लीच्या (अनंगपालाचा वंशज) तोमरराजास जिंकून दिल्ली काबीज केली. काहीं दिवसांपूर्वीं अजमेर येथें एका मशिदीच्या खोदकामांत सहा शिलालेख सांपडले; त्यांत दोन नाटके (अपूर्ण) आढळलीं. पैकी एक ललितविग्रहराज (सोमदेवकृत), हें याच विग्रहराजाच्या स्तुतीपर असून, दुसरे हरकेलिनाटक हें खुद्द विग्रहानेंच केलेलें आहे असें म्हणतात. याच्या पुढें पृथ्वीराज दुसरा (पृथ्वीभट) हा राजा झाला (११६५); हा विग्रहाचा पुतण्या होता; याच्या बापाचे नांव सापडत नाहीं; मात्र त्यानें आपल्या बापा (अर्णोराजा) चा खून केला असें म्हणतात. पृथ्वीराजा (दुसरा) नंतर, अर्णोचा तिसरा पुत्र सोमेश्वर गादीवर आला. याची राणी चेदीराजकन्या असून याचे पुत्र प्रख्यात पृथ्वीराज (चव्हाण) व हरिराज हे होते. पृथ्वीराज (तिसरा) हा ११७० त गादीवर आला; याचा जन्म ११५९ त झाला होता. याला सांबरेश्वर, अजमीराधिपती असें म्हणत. याची राजधानी दिल्लीस होती. यास प्रिथ्वीराज, राय पिठोरा असेंहि म्हणतात. यानें परमर्दी चंदेल्लाचा पराभव करून महोबा घेतले (११८२). याच्याच दरबारी चंदभाट होता. पृथ्वीराजाचें नांव सर्व हिंदूंना पूज्य वाटत असते; त्याची उत्तरहिंदुस्थानांत सर्वत्र ख्याति आहे. हाच हिंदूंचा शेवटचा सार्वभौमराजा होय. हा शूर, उदार, प्रेमळ पण विषयी होता. याच्याच चरित्रावर चंदाने (पृथ्वीराज रासा हे) महाकाव्य लिहिलें आहे. यानें जयचंदाची कन्या संयुक्ता हिचें हरण केलें (११७५) होतें. यानें अनेक वेळां मुसुलमानांचा पराभव केला होता. याच्या शौर्यावर व रंगेलपणावर भाटांनीं व कवींनीं महाकाव्यें करावींत असाच हा पुरूष होता. याच्या कारकीर्दीत शिहाबउद्-दीन घोरी यानें पंजाबचा कांहीं भाग जेव्हां बळकावला, तेव्हां यानें सर्व रजपूतराजांचीं आपासांतील भांडणे मिटवून व त्यांनां एक करून, घोरीचा तराईन किंवा तलावरी (स्थानेश्वर व कर्नाळ यांमध्यें) या ठिकाणी सपाटून पराभव केला व त्याला सिंधूनदीच्यापार हांकलून दिलें (११९१). या लढाईंत पृथ्वीचा मेव्हणा चितोडकर समरसिंह यानें फार पराक्रम केला. घोरीनें आठ हजार घोडे खंडणी देऊन आपला जीव वांचविला व पृथ्वीनेंही त्याला उदारपणें सोडून दिलें. परंतु शिहाब हा दुसर्या वर्षी बारा हजार घोडदळ व बरेंचसें पायदळ घेऊन पुन्हां स्थानेश्वर येथें आला. या वर्षी रजपुतांत एकी नव्हती. पृथ्वीराजाचा सासरा जयचंद हा मुसुलमानांस आंतून फितूर होता. पृथ्वीराजाची पहिली राणी इच्छिनीकुमारी ही जैत परमार (अबूचा राजा) याची मुलगी होती. तिला गुजराथच्या (भोंळ्या) भीमराजानें मागणी घातली असतां, जैतानें ती नाकारून तिला पृथ्वीराजास देण्याचें ठरविलें व त्याप्रमाणें निरोप जाऊन पृथ्वीनें येऊन तिच्याशी लग्न लाविलें. पृथ्वीचा बाप सोमेश्वर यास भोळ्या भीमानें लढाईंत ठार केलें होतें; त्याचा सूड घेण्यासाठीं व सासर्या(जैता)च्या आग्रहासाठीं पृथ्वीनें भीमावर स्वारी करून त्याचा साबरमतीकाठीं पुरा पराभव केला. हा भीमदेवहि स्थानेश्वरच्या लढाईंत वरील कारणामुळें हजर झाला नाहीं. पृथ्वीनें आपला सासरा जयचंद याच्या राजसूय यज्त्रास अडथळा केला होता. तो दंश त्याच्या मनांत होता म्हणून तो उलट मुसुलमानांस मिळाला. पृथ्वी हा यावेळी संयुक्तेच्या नादानें वाहवला होता. राज्यकारभाराकडे त्याचें लक्ष राहिलें नव्हतें. चामुंडराय या सरदारास बिनापराध त्यानें कैदेत ठेविलें, कयमाष नांवाच्या राजहितदक्ष प्रधानास अविचारानें ठार केलें वगैरे कारणांनीं त्याचे कांहीं सरदारहि मुसलमानांस आंतून फितूर झालें. जयचंदास पृथ्वीचा राग येण्यास आणीक एक कारण होतें. तो व पृथ्वी हे मावस भाऊ होते. दिल्लीचा तुवरवंशी शेवटचा राजा अनंगपाळ यास दोन मुली होत्या. त्यांचे हे दोघे (पृथ्वी व जयचंद) पुत्र. अनंगानें आपलें राज्य जयचंदास न देता पृथ्वीस दिलें (अशी एक दंत कथा आहे). हें शल्य जयचंदाच्या मनांत होतें त्यामुळें दुसर्या खेपेस शिहाबउद्दीन यास जयचंदानें मुद्दाम वकील पाठवून पृथ्वीवर स्वारी करण्यास बोलावून आणिलें असें म्हणतात. ही दुसरी लढाई स्थानेश्वरास झाली. यावेळीं रजपुतराजे दीडशेंपर्यंत होते व पृथ्वीचें सैन्यहि पुष्कळ होते; परंतु वर सांगितल्याप्रमाणें तें बेदिल होतें. समरसिंह, चामुंडराय, हमीर हाडा वगैरे पृथ्वीच्या निकटच्या मित्रांनीं गंगोदकाच्या शपथा घेतल्या होत्या. शिबाह-उद्-दीननें रजपुतांच्या सैन्याची माहिती पूर्ण मिळविली होती. परंतु पृथ्वीनें मुसुलमानांच्या हालचालीकडे दुर्लक्ष केलें. प्रथम लढाई झाली, तीत रजपुतांनी मुसुलमानांचा मोड केला तेव्हां ते पळालें; त्यावेळीं रजपुत विस्कळींत होऊन त्यांचे पाठीस लागले. तें पाहून शिहावनें आपलें सैन्य एकत्र करून एकदम उलटून रजपुतांवर हल्ले केले. त्यांत रजपुतांचा पराभव झाला. भयंकर लढाई होऊन समरसिंहादि सर्व प्रमुख मंडळी ठार झाली. पृथ्वीराज हा शत्रूच्या हातीं सांपडला; त्यास त्यांनी ठार मारिलें. मुसुलमानांस मागें हटविण्याचा हा रजपुतांचा शेवटचा प्रयत्न होय. घोरीनें लगेच अजमिरावर स्वारी करून तेथील निरपराधी लोकांची कत्तल करून तेथें आपल्या एका हस्तकाची स्थापना केली. आसपासचीं देवळें फोडून तेथें मशिदी बांधल्या व अखेरीस ऐबक नांवच्या आपल्या एका गुलामास दिल्लीस ठेवून व त्याच्या हातीं जिंकलेल्या प्रांताचा कारभार सोपवून शिहाब परत गेला(११९२). पुढें दोन वर्षांनीं शिहाबनें स्वारी करून कनोज घेतलें; त्यावेळीं जयचंदास आपल्या कर्माचें फळ मिळालें (११९४). पृथ्वीराजाच्या मृत्यूबद्दल चंदानें रासामध्ये निराळीच गोष्ट दिली आहे (चंद पहा). याप्रमाणे या चाहमान ऊर्फ चौहान (चव्हाण) घराण्याचा शेवट झाला. इ.स.११६२ त एका आसाराजाच्या अल्हणदेव नांवाच्या पुत्राचा व चाहमान राजाचा उल्लेख आढळतो; हा कदाचित अजमेर शाखेतील असावा. तसेंच इ.स.१२२०त जाबालिपुरच्या एका उदयसिंह चाहुमानाचा उल्लेख सांपडतो. याच्याच कारकीर्दीत विवेकविलासकर्ता जिनदत्त हा उदयास आला.
हर्ष लेख (१० वे शतक) पावेतों तरी चाहमान आपणांस सूर्यवंशी म्हणवीत असत. चौदाव्या शतकापर्यंत हीच समजूत दृढ होती. हम्मीर काव्यांत चाहमानाबद्दल पुष्कळ माहिती आहे. ब्रम्हदेवाला यज्त्र करावयाचा होता म्हणून त्यासाठीं सूर्यापासून चाहमानांस त्यानें निर्माण केलें व अजमीर येथें यज्त्र केला. येथें ब्रम्हदेवाचें कमळ (पुष्कर) हातांतून खाली पडलें; तेथें पुष्कर सरोवर बनलें. येथेंच फक्त (सार्या हिंदुस्थानांत) ब्रम्हदेवाचें मंदिर आहे, अशी आख्यायिका आहे.
परंतु याच आख्यायिकेवरून चंदभाटानें चाहमान कुलाचा अग्निकुलाशीं संबंध जोडला आहे. एकंदरीनें असें दिसतें कीं, चाहमान हे सूर्यवंशी क्षत्रिय असावेत व त्यांचा प्रवेश हिंदुस्थानांत फार प्राचीनकाळीं झाला असावा. अर्वाचीन चाहमान आपणांस सूर्यवंशी न समजतां अग्निवंशी मानतात हा वस्तुस्थितीचा विपर्यास होय.
[संदर्भग्रंथ :- एपि. इंडिका. पु. २, ९; इंडि. अँटिक्वरी.१९१२; राजपुताना ग्याझे.पु. ३; बिजोलिया व हर्ष शिलालेख; मध्ययुगीन भारत भा. २; पृथ्वीराज विजय; पृथ्वीराजरासा; स्मिथ-अर्लिहिस्टरी ऑफ इंडिया; मुसुलमानी रियासत; तबकत्-ई-नासिरी.]
चाहमान यांची वंशावळ |