विभाग तेरावा : घ - जलपैगुरी
चास-कमान — मुंबई. जिल्हा पुणे. खेडच्या वायव्येस ६ मैलांवर भीमा नदीच्या दक्षिण तीरावर हें एक व्यापाराचें गांव आहे. खेडच्या उत्तरेस चौदा मैलांवर चासनरोडी म्हणून गांव आहे. येथें चास नांवाची जवळजवळच दोन गांवें असल्यामुळें त्यांनां वेगवेगळें ओळखण्याकरितां चासकमान आणि चासनरोडी अशीं नांवे दिलीं आहेत. कमान आणि नरोडी हीं त्या त्या चासजवळील खेडीं आहेत. पेशव्यांच्या अमदानींत हा गांव जरा पुढे आलेला होता. इ.स. १७५० साली दुसरे बाजीराव बल्लाळ यांची कन्या रखमाबाई हीस चासचा कृष्णराव महादेव जोशी यांस दिली होती. हा जोशी इ.स.१७६१ सालीं पाणिपतच्या रणसंग्रामात प्राणास मुकला. रखमाबाईनें गावाचें सौंदर्य वाढविण्याकरितां बराच पैसा खर्च केला. भीमा नदीवर तिनें घांट बांधला असून गांवाच्या पश्चिमेस नदीकांठीं सोमेश्वर महादेवाचें देऊळ तिनेंच बांधलेलें आहे. मुख्य दरवाजा पूर्वाभिमुख आहे. आंत गेल्यावर एक सुंदर दीपमाला दिसते. ही कार्तिक शुद्ध पौर्णिमेस लावतात. हें देऊळ प्रेक्षणीय आहे.